Tuesday, August 16, 2011

पाऊस .. आठवणींचा मोरपिसारा..!

वाचकहो,
आज थोडा ब्रेक घेऊन पावसाविषयी लिहावेसे वाटत आहे. त्याला कारणही तसेच आहे.
सकाळी कामावर निघाल्यापासून पावसाची रिपरिप चालू झाली होती, तरीही छत्री न घेताच बाहेर पडले. सुदैवाने, खूप भिजले नाही, आणि तरीही बऱ्याच दिवसांपासून मनात धरून ठेवलेली इच्छा पूर्ण झाली - पाऊस अनुभवण्याची! रमत गमत येताना मनात पावसाचीच अनेक रूपे फेर धरत होती. तशातच मला मी काही महिन्यांपूर्वी 'मनोगत' वर टाकलेल्या पोस्टची आठवण झाली. मग वाटले, कि आपली पावसाविषयीची भावना तुम्हा सर्वांपर्यंत का पोचवू नये? वाचून पहा तर, तुम्हीही लेखातल्या कोणत्या ना कोणत्या भागाशी स्वतःला relate कराल अशी मला आशा, नव्हे खात्रीच आहे....

तर पाउस -
हा फक्त एक शब्द नाही. हे एक गारूड आहे. मधमाश्यांचे असे पोळे की ज्याला एक छोटासा दगड चुकून जरी लागला तरी त्यातून अनंत आठवणीचे मोहोळ उठते.
या विश्वाच्या अफाट पसाऱ्यात असंख्य माणसे व प्रत्येकाचे आपले असे वेगळे विश्व! पण तरीही सर्वांना एका नाजूक धाग्याने बांधून ठेवतो तो हा पाऊस. म्हणुनच कदाचित एखाद्याचे वय सांगताना 'त्याने इतके पावसाळे पाहिले आहेत' असे म्हणतात. 'उन्हाळे किंवा हिवाळे' असे नाही म्हणत.. कदाचित म्हणुनच शतकानुशतके त्याचावर इतके काही बोलले गेले, लिहिले गेले तरी हा आपला प्राजक्ताच्या फुलाप्रमाणे टवटवीत.. कधीकधी मला तर असे वाटते की पावसाला आपण नकळतपणे मानवाचा दर्जाच देऊन टाकलाय जसा काही.. म्हणजे बघा हं, आपण पावसाची वाट बघतो, तो आला नाही तर रागावतो, एकीकडे तमाम वेधशाळा छातीठोकपणे 'पुढचे दोन तीन दिवस तरी पाऊस काही येणार नाही' असे सांगत असताना, एखाद्या लबाड मुलाप्रमाणे तो अचानक येतो, आणि आला की थांबायचे नाव घेत नाही. तो जोरात कोसळला तरी आपल्याला नकोसे होते व जाताना तर तो अगदी हुरहुर लावून जातो. काही का असेना, तो आपल्या भावविश्वाचा एक अविभाज्य घटक असतो हे बाकि खरे... जन्मापासून ते अगदी शेवटपर्यंत तो आपली साथ काही सोडत नाही..

आपल्या जन्मवेळी घरातल्यांच्या तो आनंदाश्रूंच्या रुपात बरसतो. लहानपणी आपल्याला 'पाण्यात होड्या सोड्ण्यातली आणि कानात वार भरलेल्या वासराप्रमाणे चहुबाजूनी फिरण्यातली गम्मत तो शिकवतो. आठवा ती ' ए आई मला पावसात जाऊ दे' किंवा 'सांग सांग भोलानाथ' सारखी गाणी, अवघे बालपण क्षणभर का होइना, परत मिळाल्यासारखे वाटेल. 'खुप पाऊस पडू दे रे देवा, म्हणजे मग शाळेला सुट्टी मिळेल' या प्रार्थनेतला निरागसपणा त्यानेच दिला असतो जसा काही..
तरुणपणी तर काय, आधीच तरल, आतुर झालेल्या मनाला पाऊस चहुबाजुनी खतपाणी घालत असतो. मग ते आवडत्या व्यक्तीला घेऊन पावसात मनसोक्त भिजणे असो वा गरमागरम भजी खात वाफाळलेल्या चहाचे घुटके घेत मारलेल्या निवांत गप्पा असोत, किंवा मग एखाद्या दिवशी कामावर मस्तपैकी दांडी मारून घराच्या खिडकित हरवल्यासारखे तासनतास पाऊस बघत उभे रहाणे असो नाहीतर मित्रांबरोबर ट्रेक ला जाणे असो, सगळीकडे पाऊस आपली मूक सोबत करतच असतो...
आणि आयुष्याच्या संध्याकाळी हा पाऊस आपल्या डोळ्यात गतकाळच्या आठवणींचे पिसारे फुलवतो. थकलेल्या शरीर वा मनाला नवचैतन्य देतो.. जणू आशावाद देत असतो, 'अरे वेड्या, घाबरू नकोस, जोपर्यंत मी आहे, तोपर्यंत अंतानंतरही नवा आरंभ आहेच आहे. कारण मी म्हणजेच जीवन, मी म्हणजेच आशा..!! '
बघाना, आत्ता हा लेख लिहितानाही माझ्या मोबाईलवर 'श्रावणात घन नीळा बरसला' हे गाणे सुरु आहे. आणि डोळ्यासमोर साक्षात् श्रावण उभा आहे. तेंव्हा आता थांबलेलेच बरे.
तुम्हा सर्वाना पाऊस अनुभवण्यासाठी शुभेच्छा...!!

Monday, August 8, 2011

Notting Hill.. एक परीकथा !चित्रपट साधारणतः दोन प्रकारचे असतात. काही अतिशय वास्तवदर्शी असतात तर काही केवळ स्वप्नातच घडू शकतील अशा घटनांचे चित्रण करणारे असतात. मला स्वतःला जसे वास्तवदर्शी चित्रपट पाहायला आवडतात तसेच काही वेळा स्वप्नांच्या राज्यातही रमायला आवडते. का माहित नाही, पण अशा परीकथाही काही वेळा जगण्याची नवीन उमेद देऊन जातात. मन अगदी refresh होते. माझ्या आरामाच्या असंख्य कल्पनेतील खाली दिलेली सर्वात वरच्या क्रमांकाची कल्पना आहे....बाहेर छान पाऊस रिमझिमत असावा, मी माझ्या उबदार घरकुलातील आरामदायी सोफ्यावर निवांतपणे बसून छानश्या जाळीदार खिडकीतून बाहेरचा पाउस व त्यामुळे येणारा गारवा अनुभवत बसावे, एका हातात काहीतरी चटकमटक खायचे व दुसरया हातात चहाचा वाफाळता कप असावा, आणि dvd वर एखाद्या परीकथेत प्रेमाचे गहिरे रंग भारत असावेत... खरच हे चित्र नुसते डोळ्यासमोर आले तरी फार प्रसन्न वाटते. या माझ्या अनुभवाला पूर्णत्व देणाऱ्या ज्या काही परीकथा आहेत त्यामध्ये ' Notting Hill' या चित्रपटाचा क्रमांक खूप वरचा लागतो.

चित्रपट पाहण्याची आणि आवडण्याची कारणे खूप सारी आहेत- बाकी काही आवडत नसले तरी ज्यांना फक्त लंडन हे शहर आवडते त्यांनीही हा चित्रपट जरूर पाहावा. - त्यात मला तर काय, Julia Roberts व Hugh Grant हे दोघेही आवडतात. कोणी म्हणते कि हा चित्रपट Julia Roberts च्या खरया आयुष्यावर आधारित आहे. काही का असेना, आपल्याला मात्र हा चित्रपट एक परीकथा पहिल्याचा आनंद देवून जातो आणि काही क्षणांपुरता का होईना, पण आयुष्य छान आहे, मनात इच्छा असेल तर काहीही घडू शकते, असा विश्वास देतो.

तर William Thacker, हा,(तसा अयशस्वीच म्हणता येईल असा) एक पुस्तकांचे दुकान चालवणारा माणूस! अतिशय अबोल, पण प्रामाणिक आणि सज्जन असा.. (कदाचित म्हणूनच त्याची बायको त्याला सोडून गेलेली असते). तो एका विक्षिप्त (पण मजेशीर) room-mate बरोबर राहत आहे. पण एका बुधवार नंतर त्याचे आयुष्यच बदलून जाते. त्या दिवशी, लाखात एक अशा योगायोगाने, Anna Scott हि जगप्रसिद्ध अभिनेत्री त्याच्या दुकानात पुस्तके घ्यायला येते... त्याच्या साधेपणामुळे प्रभावित होते, नंतर लगेचच एका विचित्र अपघातामुळे ती त्याच्या घरात येऊन पोचते आणि नंतर सुरु होते एक योगायोगांची विलक्षण मालिका..!! आता हि परीकथाच असल्यामुळे शेवट गोड होणार हे ओघाने आलेच, तरीपण julia Roberts व Hugh Grant, यांची पडद्यावरील chemistry अक्षरशः तुफान आहे. त्याला तितकीच मजेशीर साथ आहे ती Rhys Ifans , Tim McInnerny, Gina McKee, Emma Chambers या William च्या धमाल ग्रुपची. अनेक फ्रेम्स मध्ये हि मंडळी स्वतःची छाप सोडतात. काही प्रसंगाची खरी मजा पडद्यावरच घेण्यासारखी... मग तो ' William काही कलाकारांची मुलाखत घेतोय (खोटा पत्रकार बनून) हा प्रसंग असो, किंवा 'Anna William च्या बहिणीच्या वाढदिवसानिमित्त William बरोबर त्याच्या मित्राकडे जाते हा प्रसंग.. यातील गाणीही अतिशय श्रवणीय आहेत...

एकूण काय, थोडावेळ जर वास्तवाचे भान हरपून स्वप्नांच्या राज्यात रमायचे असेल तर हा चित्रपट जरूर पहा..

पुण्यनगरीतील वाहतूकव्यवस्था आणि वाहनांवरील साहित्यसंपदा: एक अभ्यासपूर्ण विवेचन !!

नमस्कार, सुमारे दशकभर पुण्यात राहिल्यावर या नगरीच्या विद्वत्तेचा आम्हाला स्पर्श झाला नसता तरच नवल. त्यामुळे झालेय काय, कोणत्याही गोष्टीची...