Tuesday, October 22, 2013

World Cinema Special: To Rome With Love (Italian, American)

अनेक महिन्यांच्या सुट्टीनंतर पुन्हा एकदा माझ्या चिमुटभर वाचकांच्या सेवेस  हजर झाले आहे. या वेळेचा चित्रपट मात्र एकदम हलकाफुलका निवडला आहे.

खरेतर मला आणि आमच्या 'अहो' ना  (:) ) सशक्त कथाबीज असलेले चित्रपट मनापासून आवडतात. म्हणजे चित्रपट बघायचा दोन/तीन तास आणि त्याच्यावर चर्चा मात्र अनेक दिवस करायची असा आमचा शिरस्ता. पण काही चित्रपट मात्र केवळ बघायचे असतात. म्हणजे भलेही त्यांची कथा खिळवून ठेवणारी नसेल, किंवा त्यांच्यामध्ये "ज्यांच्या केवळ अस्तित्वाने पडदा धन्य होतो" अशी तगडी कलाकारांची फौजही नसेल, पण तरीही सिनेमा सुरु झाला की "आपण एका जागी स्थिर नसून कुठेतरी भटकत आहोत अशी काहीशी जाणीव होते. एखाद्या शहराच्या अनवट जागा ओळखीच्या वाटू लागतात. थोड्या वेळापुरते का होईना पण "मन पाखरू पाखरू" होते. आणि चित्रपट संपल्यावर आपण काय पहिले आहे हे विस्मृतीतही जाते. चित्रपटाचा काळ मात्र आपण मनापासून जगलेलो असतो. आजचा चित्रपट To Rome With Love हाही  याच पठडीतला.

घरबसल्या इटलीतील रोममध्ये फिरून यायचे असेल तर हा चित्रपट एक उत्तम पर्याय आहे. यामध्ये रोम शहर हेच मध्यवर्ती पात्र. त्यामध्ये वावरणारी अनेक माणसे. काही शहरातील तर काही बाहेरची. आपण तो कोलाहल बघत असतानाच हळूहळू त्यातले सूर प्रेक्षकाला सापडू लागतात. काही पात्रे ठळक होऊ लागतात. त्यांच्या गोष्टी आपल्याला उमगू लागतात.

एक सामान्य माणूस ज्याला एके दिवशी सकाळी अचानक तो 'celebrity' झाला आहे असे जाणवते, एक असे जोडपे जे हनिमूनला आले आहे आणि त्यांची चुकामुक झाली आहे, एक अंत्यविधीचे साहित्य पुरवणारा माणूस जो अतिशय चांगला bathroom singer आहे, आणि एक architect जो भूतकाळात हरवून जाण्यासाठी रोममधील जुन्या गल्ल्यांमध्ये फिरत आहे - अशा चार वेगळ्या माणसांच्या मजेशीर गोष्टी म्हणजे हा चित्रपट. कथानक म्हटले तर इतकेच. तरीही वरील माणसांच्या आयुष्यात पुढे काय घडणार आहे हे आपण उत्सुकतेने पाहत राहतो.

प्रथितयश अमेरिकन actor आणि director Woody Allen यांची ही  कलाकृती. चित्रपट नाही  पाहिला तर खूप काही गमवाल असे नाही, पण बघितलात तर निखळ आनंदाचे चार क्षण ओंजळीत नक्की पडतील.

Thursday, July 4, 2013

World Cinema Special: Something Like Happiness (Czech)

नावच किती समर्पक आहे ना - Something Like Happiness...म्हणजे काहीतरी आनंदासारखे वाटणारे. काय आहे ते नक्की नाही माहित पण चांगले वाटतेय काहीतरी आतून.

Rules - प्यार का सुपरहिट फॉर्मुला या फारश्या न गाजलेल्या चित्रपटात नायिकेच्या तोंडी एक वाक्य आहे-  "ख़ुशी का क्या पता, ना जाने कब और कंहा मिल जाये … "

Happiness - निखळ, निर्व्याज आनंद. नक्की कुठे हो मिळतो? कसा असतो तो? आणि किती शाश्वत? म्हणजे मी काही मोठी तत्ववेत्ती नव्हे, पण गम्मत बघा हं, एखादी अतिशय प्रिय वस्तू, एखादा मनापासून आवडणारा खाद्यपदार्थ, एखादे भावलेले गाणे, एखादा रिझवणारा चित्रपट या सर्व गोष्टीही दरवेळी सारखाच आनंद देतात का हो? तर नाही. बहुतांश वेळा ते आजूबाजूच्या आणि आपल्या मनाच्या अवस्थेवर अवलंबून असते. एखादी मनपसंत गजल आपल्या जीवलगांच्या संगतीत खुलते, तर एकटेच असताना अस्वस्थ करते. म्हणजे असेच तुमच्याही बाबतीत होत असेल असे नाही हं, पण थोडक्यात काय, तर प्रत्येकाचा, प्रत्येक क्षणीचा आनंद निराळा आणि तो अनुभवण्याची रीतही निराळी. काहीसे असेच सांगायचा प्रयत्न करतो हा चित्रपट.

कोणतेही तत्वज्ञान नाही, काहीतरी वेगळे सांगितल्याचा अभिनिवेश नाही किंवा कोणत्याही मोठ्या व्यक्तीचे चरित्र नाही. आहेत ती  तुमच्या आमच्यासारखी साधी माणसे.
तीन व्यक्तींची ही गोष्ट - मोनिका, टोनिक, आणि दाशा. एकाच परिसरात वाढलेली तीन मुले. त्यापैकी मोनिकाचे स्वप्न आपल्या प्रियकराबरोबर अमेरिकेला जाण्याचे, टोनिक  मनोमन मोनिकावर प्रेम करणारा तर single mother असलेली दाशा  एका विवाहित पुरुषात गुंतलेली. वास्तवापासून फारकत घेतलेली. पुढे तिचा मनोविकार इतका बळावतो की तिला रुग्णालयात ठेवावे लागते व तिच्या मुलांची जबाबदारी येउन पडते मोनिका व टोनिकवर.
हे असे जगावेगळे कुटुंब आणि त्यांचे एकमेकांमधील bonds.. या सगळ्याची कथा म्हणजे हा चित्रपट.
स्टोरी म्हणावी तर इतकीच. पण आपण या कुटुंबात गुंतत जातो. आणि आपल्याला जाणवते की अरेच्या, आनंद हा असा चोरपावलांनी येतो तर… कोणतीही अपेक्षा नसताना, अचानक.
हेच आयुष्य नव्हे काय? मला असे नाही म्हणायचे की अपेक्षाच नाही ठेवायच्या आयुष्याकडून, पण आठवून पहा जरा, ध्यानीमनी नसताना भेटलेली जीवाभावाची माणसे, अतिशय गरम होत असताना वाऱ्याची आलेली थंडगार झुळुक, दिवसभराच्या कटकटीनंतर आपल्या बाळाने मारलेली मिठी… ही आणि अशी कितीतरी उदाहरणे. पु. लं. च्या भाषेत सांगायचे म्हणजे सहज घराबाहेर पडावे, आकाशाकडे लक्ष जावे आणि ती असावी कोजागिरी पौर्णिमा.. असा सहज मिळालेला निरागस आनंद. किंवा त्यासारखे काहीतरी - Something Like Happiness.... !!

शेवटी खूप दुखः जसे निशब्द तसाच अतिव आनंद हाही तितकाच शब्दांच्या पलिकडला ….  !!!


Thursday, June 20, 2013

World Cinema Special: A Touch of Spice (Greek)

गेले अनेक दिवस प्रचंड धावपळीत घालवल्यावर अचानक जाणवले की  अरे, आपण एक ब्लॉग लिहितो जो गेले सहा महिने अगदी दुर्लक्षित आहे. :( आणि त्याच्यावर काहीतरी छानसे सुरु करून आपण तसेच सोडून दिले आहे. तेंव्हा सर्वप्रथम माझे चिमूटभर वाचक मला माफ करतील अशी अपेक्षा करते.

आज मी ज्या सिनेमाबद्दल लिहिणार आहे तो आहे A Touch of Spice हा ग्रीक सिनेमा. २०१२ च्या एप्रिल महिन्यात पुण्यातील NFAI, FTII, आणि BCL यांच्या संयुक्त प्रयत्नाने भरविल्या गेलेल्या Europian Film Festival मध्ये हा सिनेमा दाखवण्यात आला होता.

आता ग्रीस म्हटले की लगेच आपल्याला Aristotle, Pythagoras, Archimedes, Plato अशा अनेक प्रभृती आठवतात ज्यांचे Physics आणि विशेषतः Astronomy या विषयांमधील कार्य शतकानुशतके नावाजलेले आहे. Astronomy तर अगदी सामान्य ग्रीक माणसाच्याही जगण्याचा एक भाग आहे. तर Astronomy, आयुष्य आणि मसाले अशा वेगळ्याच त्रिकोणावर बेतलेला हा चित्रपट मानवी आयुष्यावर आणि त्यातील खऱ्या अर्थाने महत्वाच्या गोष्टींवर अतिशय नेमकेपणाने भाष्य करतो.

या कथेचा नायक Fanis. एक Astronomy आणि Astrophysics चा अतिशय हुशार professor.  त्याचे आजोबा त्याला बऱ्याच  वर्षांनी भेटणार म्हणून प्रचंड खुशीत असलेला. आजोबाना आश्चर्याचा धक्का देण्यासाठी म्हणून त्याने आजोबांच्या जुन्या मित्रानाही घरी बोलावले आहे. पण काहीतरी बिनसते आणि आजोबा येणार नाहीत असे त्याला उमगते. त्याचे मन भूतकाळात जाते.

यानंतर खऱ्या अर्थाने चित्रपट सुरु होतो. लहानगा Fanis आणि त्याचे हुशार आजोबा या दोघांमधील अतिशय तलम नाते हळूहळू आपल्यासमोर उलगडत जाते. तीच गोष्ट Fanis व त्याची लहानपणीची मैत्रीण Saime यांच्यातील अनुबंधांची. स्वयंपाक करण्याची अतिशय आवड असलेला एक गोड मुलगा… आयुष्य त्याला किती वळणावळणाने उमगत जाते याची ही  अतिशय सुंदर गोष्ट आहे. या मूळ  कथेला जोड आहे ती ग्रीस आणि तुर्कस्थान यांच्यामधील संघर्षाची.

हा चित्रपट कथेप्रमाणेच त्याच्या cinematography साठीही अवश्य पाहण्यासारखा आहे. खास करून Fanis चे आजोबा त्याला ग्राहमालेचा आधार घेऊन मसाले व त्यांचे आयुष्यातील स्थान समजावत असतात तो प्रसंग तर पुन्हा पुन्हा पाहण्यासारखा..  त्यातील तत्वज्ञान समजावून घेण्यासाठी...

चित्रपट संपल्यावर वाटते की  खरच आपल्या सर्वांमध्येही Fanis लपला आहे. अतिशय सुंदर स्वयंपाक करून फक्त त्यात मीठ टाकायला विसरलेला...  आपणही शोधूया का आपल्या आयुष्यातील मीठ ?







पुण्यनगरीतील वाहतूकव्यवस्था आणि वाहनांवरील साहित्यसंपदा: एक अभ्यासपूर्ण विवेचन !!

नमस्कार, सुमारे दशकभर पुण्यात राहिल्यावर या नगरीच्या विद्वत्तेचा आम्हाला स्पर्श झाला नसता तरच नवल. त्यामुळे झालेय काय, कोणत्याही गोष्टीची...