Tuesday, October 22, 2013

World Cinema Special: To Rome With Love (Italian, American)

अनेक महिन्यांच्या सुट्टीनंतर पुन्हा एकदा माझ्या चिमुटभर वाचकांच्या सेवेस  हजर झाले आहे. या वेळेचा चित्रपट मात्र एकदम हलकाफुलका निवडला आहे.

खरेतर मला आणि आमच्या 'अहो' ना  (:) ) सशक्त कथाबीज असलेले चित्रपट मनापासून आवडतात. म्हणजे चित्रपट बघायचा दोन/तीन तास आणि त्याच्यावर चर्चा मात्र अनेक दिवस करायची असा आमचा शिरस्ता. पण काही चित्रपट मात्र केवळ बघायचे असतात. म्हणजे भलेही त्यांची कथा खिळवून ठेवणारी नसेल, किंवा त्यांच्यामध्ये "ज्यांच्या केवळ अस्तित्वाने पडदा धन्य होतो" अशी तगडी कलाकारांची फौजही नसेल, पण तरीही सिनेमा सुरु झाला की "आपण एका जागी स्थिर नसून कुठेतरी भटकत आहोत अशी काहीशी जाणीव होते. एखाद्या शहराच्या अनवट जागा ओळखीच्या वाटू लागतात. थोड्या वेळापुरते का होईना पण "मन पाखरू पाखरू" होते. आणि चित्रपट संपल्यावर आपण काय पहिले आहे हे विस्मृतीतही जाते. चित्रपटाचा काळ मात्र आपण मनापासून जगलेलो असतो. आजचा चित्रपट To Rome With Love हाही  याच पठडीतला.

घरबसल्या इटलीतील रोममध्ये फिरून यायचे असेल तर हा चित्रपट एक उत्तम पर्याय आहे. यामध्ये रोम शहर हेच मध्यवर्ती पात्र. त्यामध्ये वावरणारी अनेक माणसे. काही शहरातील तर काही बाहेरची. आपण तो कोलाहल बघत असतानाच हळूहळू त्यातले सूर प्रेक्षकाला सापडू लागतात. काही पात्रे ठळक होऊ लागतात. त्यांच्या गोष्टी आपल्याला उमगू लागतात.

एक सामान्य माणूस ज्याला एके दिवशी सकाळी अचानक तो 'celebrity' झाला आहे असे जाणवते, एक असे जोडपे जे हनिमूनला आले आहे आणि त्यांची चुकामुक झाली आहे, एक अंत्यविधीचे साहित्य पुरवणारा माणूस जो अतिशय चांगला bathroom singer आहे, आणि एक architect जो भूतकाळात हरवून जाण्यासाठी रोममधील जुन्या गल्ल्यांमध्ये फिरत आहे - अशा चार वेगळ्या माणसांच्या मजेशीर गोष्टी म्हणजे हा चित्रपट. कथानक म्हटले तर इतकेच. तरीही वरील माणसांच्या आयुष्यात पुढे काय घडणार आहे हे आपण उत्सुकतेने पाहत राहतो.

प्रथितयश अमेरिकन actor आणि director Woody Allen यांची ही  कलाकृती. चित्रपट नाही  पाहिला तर खूप काही गमवाल असे नाही, पण बघितलात तर निखळ आनंदाचे चार क्षण ओंजळीत नक्की पडतील.

पुण्यनगरीतील वाहतूकव्यवस्था आणि वाहनांवरील साहित्यसंपदा: एक अभ्यासपूर्ण विवेचन !!

नमस्कार, सुमारे दशकभर पुण्यात राहिल्यावर या नगरीच्या विद्वत्तेचा आम्हाला स्पर्श झाला नसता तरच नवल. त्यामुळे झालेय काय, कोणत्याही गोष्टीची...