Monday, February 21, 2011

गंध !.. उदबत्तिचा, औषधांचा आणि तान्हुल्या जीवाचाही...!!!

नावावरूनच तुम्हाला अंदाज आला असेल की, स्वारीने कालच हा सिनेमा पाहिलेला दिसतोय. 
तर गंध.. काय बरं फरक आहे वास आणि गंध यात? मला वाटते की वासाला आठवणी चिकटल्या की तो गंध होतो. 
ह्या पिक्चरचेच पाहा ना, तीन निरनिराळी  कथानके, पात्रांचे जगण्याचे मापदंडही वेगळे, तरीही या सर्वांना जोडणारा एक common धागा..अर्थात गंध !
पहिली गोष्ट एका उपवर लग्नेच्छु तरुणीची. घरचे 'लग्न कर' म्हणून मागे लागलेले , स्थळही सांगून येतायत आणि अशातच तिला भेटतो एक साधासा तरुण  ज्याच्या शरीरगंधावर ती मोहित होते. पुढे त्याचा पाठलाग करत असताना तिला कळते की तो रात्री एका उदबत्त्या बनविण्याच्या कारखान्यात काम करत असतो. नंतर काय होते हे सुज्ञास  सांगणे न लगे... पण तरीही.. या कथेचा सुखांत होतो!!  खरेतर ही कथा फार वेगळी नाही. काही वेळा तर  अमृता सुभाषच्या थोड्याश्या नाटकी अभिनयाचा वैतागही येतो. तरीपण कथेची मांडणी, camera ने पकडलेल्या ओळखीच्या तरीही वेगळ्या अशा पुण्यातल्या गल्ल्या आणि गिरीश कुलकर्णीचा संयत अभिनय या गोष्टी आपल्याला नक्कीच खिळवून ठेवतात. 
          माझ्यामते तरी हा सिनेमा  उरलेल्या दोन कथांमध्ये जबरदस्त पकड घेतो. एक गोष्ट म्हणजे 'औषध घेणारा माणूस' आणि दुसरी ' बाजूला बसलेली बाई'. त्यापैकी 'औषध घेणारा माणूस' ही गोष्ट आहे एका 'HIV positive ' माणसाची ज्याची बायको त्याला सोडून गेली आहे व काही काळाने त्याला परत भेटायला आली आहे. त्या दोघानमधिल अजूनही शिल्लक असलेल्या प्रेमाचे रंग सोनाली कुलकर्णी व मिलिंद सोमण यांनी अतिशय हळुवारपणे साकारले आहेत. सोनाली कुलकर्णीच्या अभिनयाबद्दल प्रश्नच नाही पण मिलिंद सोमण हा ही किती गुणी कलाकार आहे हे वेळोवेळी  जाणवते. खास उल्लेख करायला हवा तो त्याच्या शुद्ध मराठी उच्चारांचा.. [ हो कारण बरीचशी मराठी models , मराठी अगदी नवीन शिकत असल्यासारखे बोलतात.] 
                   हा 'HIV positive ' माणूस फक्त औषधांवर जगतोय, पण त्याची पत्नी त्याला ज्यावेळी सोडून गेली त्या क्षणापासून त्याने ते घर जसे च्या तसे ठेवले आहे.. तिची आठवण म्हणून! ती खूप दिवसांनी घरी येणार ह्याची तो खूप आतुरतेने वाट पाहत आहे. त्याने मनात अगणित योजना तयार केल्या आहेत. खास तिच्या आवडीचा स्वयंपाक करून घेतला आहे. पण तिला मात्र आल्यापासून कसला तरी सडलेला दर्प येतो आहे घरात आणि मग हळूहळू त्या दोघांना (आणि आपल्यालाही) असे जाणवते की हा माणूस वास घ्यायची शक्तीच गमावून बसलाय. अगदी कांदा किंवा लिंबू अशासारखे तीव्र वासही त्याला जाणवत नाहीत. मग शेवटचा उपाय म्हणून तो gas चे  बटण  लावतो व बर्नर च्या अगदी जवळ जाऊन तो वास घ्यायचा प्रयत्न करतो... कितीतरी वेळ... याचा शेवट दिग्दर्शकाने जसा काही तुमच्यावर सोडला आहे...अगदी कालवाकालव होते त्यावेळी... 
         तिसरी गोष्ट आहे तळकोकणातल्या अशा एका घराची ज्यामध्ये एक माहेरवाशीण बाळंत होत आहे आणि त्या घरातील कर्ती बाई 'बाजूला' बसली आहे. तिचा नवरा बाहेरगावी गेला आहे. या सगळ्या वातावरणाला पार्श्वभूमी आहे ती मुसळधार कोसळणाऱ्या पावसाच्या संततधारेची. एकीकडे या बाईची सासू मुलीचे बाळंतपण पार पाडताना मेटाकुटीला आली आहे तर दुसरीकडे या 'बाजूला' बसलेल्या बाईचीही तगमग होत आहे... दोन कारणांमुळे, एक म्हणजे घरातील घडामोडी व दुसरे म्हणजे तिची स्वतःची कूस अजून रिकामीच आहे.. या सर्व काळामध्ये तिचा एकमेव आधार म्हणजे तिचा भाचा राघव! या दोघांमधील संवाद, त्याच्यामधील राघूचा निरागसपणा, नीना कुलकर्णीच्या डोळ्यामधील भाव [हो, सांगायचे राहिलेच, ही बाजूला बसलेली बाई  नीना कुलकर्णीने रंगवली आहे .]  यातील काहीही miss करून चालणार नाही. शेवटी चौथा दिवस उजाडल्यानंतर कसेबसे सर्व आवरून ही बाई जेव्हा त्या बाळाला हृदयाशी धरून त्याच्या जावळाचा, त्याच्या अंगाचा श्वास भरून गंध घेते तेव्हाची तिची भावमुद्रा आपल्या मनात कायमचे घर करते. 
      ही गोष्ट घडत असताना दिग्दर्शकाने (किंवा कैमेरामन ने म्हणूया हवे तर) तळकोकणाचे असे काही भुलवणारे रूप दाखवले आहे की निव्वळ त्याच्यासाठी ह्या सिनेमाला १०० पैकी २०० मार्क्स द्यावेत. एडिटिंग ची सुद्धा हीच गोष्ट आहे... 
एकूण काय, सचिन कुंडलकर यानी त्यांच्या ठेवणीतून पेश केलेल्या या अत्तराच्या कुपीचा गंध आपल्या मनात दीर्घकाळ रुंजी घालतो हे नक्की...!!

          

6 comments:

  1. review वाचून सिनेमा पहावासा वाटतो. ह्या सिनेमातील जुना वाडा हा कुमठेकर रोड , पुणे इथील माझे होस्टेल आहे.

    ReplyDelete
  2. तुम्ही सिनेमा पाहून त्यावरएवढा छान लिहू शकता. आम्ही करंटे सिनेमा पहायलाही वेळ मिळत नाही. ब्लोग लिहीतीय. पण इतरांचे ब्लोग वाचायलाही साधत नाही. आज मात्र ऑफिसातून आलो आणि ठरवला आज काही करायचा नाही. फक्त इतरांचे ब्लॉग वाचायचे. वर्तमान पत्रातलं सिनेमाचं रसग्रहण ???????? किती ढोबळ असता. तुमच्या सारख्यांनी रसग्रहण केलं ( करता आहात कि नाही माहित नाही. ) तर मराठी सिनेमाचं प्रेक्षक नक्कीच आणखी वाढेल.

    ReplyDelete
  3. श्री शेंडगे साहेब,
    प्रतिक्रियेबद्दल मनापासून धन्यवाद..

    ReplyDelete
  4. मीही पाहिलाय हा सिनेमा ..
    अप्रतिमच
    कोकणातल्या घरात आजी खाली फोडणी देत असतात आणि वरती नीना कुलकर्णी आणि त्यांचा भाच्चा वासावरून
    खाली काय चालले आहे हे ओळखतात , हा scene पण छानच .
    शेवटच्या कथेत संपूर्ण वेळ पावसाचा आवाज साथ करतो , कॅमेरा पण अप्रतिमच

    तुम्ही छान परीक्षण लिहिले आहे , आवडले

    ReplyDelete
  5. प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
    {बाकी तुमचे टोपणनाव छान आहे हं..!! :-) }

    ReplyDelete
  6. Thank you vrushalee,

    I read you e mail and then this blog. Thanks for all the complements.

    Sachin .

    ReplyDelete

पुण्यनगरीतील वाहतूकव्यवस्था आणि वाहनांवरील साहित्यसंपदा: एक अभ्यासपूर्ण विवेचन !!

नमस्कार, सुमारे दशकभर पुण्यात राहिल्यावर या नगरीच्या विद्वत्तेचा आम्हाला स्पर्श झाला नसता तरच नवल. त्यामुळे झालेय काय, कोणत्याही गोष्टीची...