Tuesday, January 31, 2012

रुचकर आणि पौष्टिक थालीपीठ

जगातील सर्वच खाद्यसंस्कृतीत काही काही पदार्थ हे त्या त्या संस्कृतीचे trademarks म्हणावे इतके प्रसिद्ध असतात. या सर्व पदार्थात मला तरी अनेक समान दुवे सापडतात. सर्वात महत्वाचे म्हणजे ते पदार्थ पूर्णान्न या स्वरूपाचे असतात. चविष्ट असतातच आणि करण्यासाठी अतिशय सोपे असतात. तसेच तुम्ही तुमच्या आवडीनिवडीनुसार त्यात हवा तो बदल करूनही त्या पदार्थांचे पोषण मूल्य कमी होत नाहीच, उलट वाढते. थालीपीठ हा आपल्या खाद्यसंस्कृतीतला असाच एक प्रकार. माझ्या मते तरी थालीपीठ या प्रकाराची एकच एक standard म्हणता येईल अशी कृती नाहीच आहे, उलट खाद्यप्रकारातील एक अतिशय flexible प्रकार म्हणून थालीपिठाचा नंबर खूप वरचा आहे. म्हणजे बघा हं, घरात कांदा नाही, ठीक आहे, कोबी वापरा की. लोणी नाही तोंडी लावायला? नो प्रॉब्लेम, बटर, चटणी, दही किंवा अगदीच काही नाही तर ओले खोबरे पण घेऊ शकता तुम्ही. एखादी नको असलेली पालेभाजी, किंवा रात्रीचे काहीही शिळेपाके संपवायचे आहे? मग करा सर्व एकत्र, एखादे पीठ मिसळा, आणि सरळ तव्यावर थालीपीठ लावा. इतके पटापट संपेल कि गृहिणीला चव बघायला म्हणूनही शिल्लक राहणार नाही. 
एकूण काय, थालीपीठाचे पाण्यासारखे आहे. ज्यात घालाल, त्याचा रंग घेऊन खुलते ते. 
तेंव्हा आजच्या थालीपीठासाठी आपल्याला हवी ती भाजणी, किसलेले गाजर, बारीक चिरलेला कोबी, थोडासा कांदा, भरपूर कोथिंबीर, तिखट, मीठ, हिंग, हळद, थोडासा ओवा, थोडेसे तीळ, आणि अर्धा चमचा साखर. हे सर्व मिश्रण एकजीव करून घ्या व तव्यावर थोडेसे तेल टाकून थापून घ्या. एक बाजू शिजली आणि खरपूस झाली कि ती बाजू उलटून दुसरी बाजूही थोडेसे तेल टाकून भाजून घ्या. 
गरमागरम थालीपीठ आणि घरचे लोणी... जगण्यासाठी आणखी काय लागते हो?


Monday, January 30, 2012

इस दाल मे कुछ हरा है..

आजची रेसिपीसुद्धा अगदीच सोपी. खास करून ज्यांना मेथी आवडत नाही त्यांनी ट्राय करण्यासारखी आहे. कृती सांगण्यापूर्वी आपण जरा आहारात मेथीचा समावेश करण्याचे फायदे पाहिले तर कसे? त्यासाठी खाली दिलेल्या लिंक्सना अवश्य भेट दया -


आता वळूया साहित्य आणि कृतीकडे:
साहित्य: शिजलेली डाळ १ वाटी(शक्यतो तुरडाळ), कसुरी मेथी १ वाटी, चवीनुसार तिखट, मीठ, गूळ, आणि चिंच, खवलेला नारळ सजावटीसाठी, आणि फोडणीचे साहित्य
कृती: प्रथम तेल तापत ठेवावे. त्यात थोडी मोहरी टाकून ती तडतडली कि हिंग व हळद टाकावी. नंतर डाळ व कसुरी मेथी टाकून मिश्रण छान घोटून घ्यावे. त्यात चवीनुसार मीठ, तिखट, गूळ व चिंच टाकावी. मिश्रणाला एक उकळी आली कि खोबरे टाकावे व आणखीन एक उकळी आणावी. 
गरमगरम डाळमेथी तयार आहे. ही आमटी पोळी किंवा भात कशाबरोबरही छान लागते. बरोबर एखादी कोशिंबीर असली कि ते जेवण अगदी पूर्णान्न होते. 

Tuesday, January 24, 2012

धमाल खाऊ - घरच्या बाळराजासाठी

देश वा धर्म कोणताही असो, जगातील सगळ्या तरुण मातांसाठी सर्वात महत्वाचा प्रश्न असतो तो म्हणजे "काय केले कि माझे बाळ छान खाईल व त्याला आवश्यक ती पोषणमूल्येही मिळतील. या एकाच प्रश्नामध्ये जगातील अनेक उत्तमोत्तम पाककृतींचा उगम दडला आहे. आजची रेसिपी तशीच काहीशी.. सोपी, तरीही लहान मुलांना आवडणारी..वाढत्या वयातील मुलांसाठी आवश्यक घटकांपैकी काही घटक, जसे  की  आयर्न, कॅल्शिअम पुरेपूर असणारी, साखरेचा वापर न करताही चवीला गोड आणि पौष्टिक. 
रेसीपीचे घटक अगदी सोपे - दाण्याचे कूट, हवा तेवढा खजूर (पाण्यात भिजत टाकून साले काढून घेतलेला - खजुराऐवजी खारकेची पावडर वापरली तरी चालेल), काळ्या मनुका (मिक्सर मधून भरडून घेतलेल्या), बदामाची पावडर, थोडी खसखशीची पावडर, आणि साजूक तूप
कृती - साजूक तुपावर वरील सर्व घटक परतून घ्यावे व हे मिश्रण गार झाले कि त्याचे लाडू वळावे..

आहे कि नाही सोपी! मी तर याला power tablet असेच म्हणते. लहान मुले, आणि हो , स्त्रियासुद्धा (कारण त्यांच्यामध्येही आयर्नची कमतरता असतेच) यांना रोज एक लाडू खायला द्यावा. आताचा मोसम तर असे लाडू खाऊन उत्तम आरोग्याची बेगमी करण्यासाठी फारच चांगला आहे. 

मग वाट कसली पाहताय, उचला एकेक लाडू आणि करा थंडीचा सामना... :)Friday, January 20, 2012

Recipe for Happiness...

रेसिपी? हे काय बरे लिहित आहे मी??  हं..  शेवटी आलेच मी पण याच मार्गावर..!!
थांबा, थांबा, असे गोंधळून जाऊ नका.. सांगते सगळे सविस्तर..!!
जेंव्हा हा ब्लॉग सुरु केला तेंव्हा त्याची वाटचाल कशी होईल, काय काय विषय हाताळले जातील या कशाचीच कोणतीच योजना नव्हती मनात, पण त्यावेळी एक गोष्ट मात्र नक्की (!) ठरवली होती कि शक्यतो आपल्या ब्लॉगचे स्वरूप हे - पाककृतींच्या असंख्य ब्लॉग पैकी एक - असे होऊन द्यायचे नाही. [कृपा करून गैरसमज नकोत हं.. असे करण्यामागची भावना फक्त एवढीच होती कि इतके सारे दिग्गज आपले स्वयंपाकघरातील यशस्वी प्रयोग इतरांना सांगत असताना, माझ्यासारखीने  -जिला conventional स्वयंपाकाची फारशी आवड नाही- आपल्या मतांचे प्रदर्शन कशाला करावे? ]

पण काही महिन्यांपूर्वी सहज बोलता बोलता जेंव्हा माझ्या नवरोजीनी माझ्या पाककलेतील प्रयोगशीलतेला दाद देणारा एक निबंध ऐकवला, तेंव्हापासून हा किडा डोक्यात वळवळत राहिला. त्याचे कृतीत रुपांतर व्हायला नवीन वर्ष उजाडले असले तरी आता मात्र ठरवले आहे, कि ज्या काही साध्यासोप्या पण तरीही थोड्याश्या वेगळ्या अशा पाककृती आपल्या पोतडीत जमा आहेत त्या तुम्हा सर्वांबरोबर शेअर करायच्याच. सुदैवाने, बऱ्याच रेसिपी तयार झाल्यावर त्यांचे फोटो घेऊन ठेवले आहेत. आता त्यांचा उपयोग करण्याची वेळ आली आहे असे वाटते... :)

तेंव्हा आजची पहिली रेसिपी  - Strawberry with Cream...!!
तसे पहिले तर या रेसिपी मध्ये काहीच करायचे नाही आहे, तरीपण ही डिश खाताना मनाला मिळणारा आनंद मात्र खूप मोठा. म्हणूनच रेसिपीचे टोपणनाव - आनंदाची रेसिपी अर्थात Recipe for Happiness... 
या डिशला फार मोठी परंपरा आहे बर का, खास करून Wimbledon टेनिस स्पर्धा आणि Strawberry with Cream यांचे नाते खूप जुने आहे..!!
काल Reliance Fresh मध्ये गेले होते तिथे इतक्या सुंदर Strawberries विक्रीसाठी ठेवल्या होत्या, कि घेण्याशिवाय दुसरा पर्यायच उरला नाही... :) आणि मग काय, छान घरची -फ्रीज मध्ये ठेवून गार केलेली - साय घेतली (तुम्हाला हवे असेल तर बाजारात मिळणारे तयार क्रीमही घेऊ शकता पण घरच्या सायीची मजा नाही त्यात, असे मला वाटले), त्यामध्ये एक चमचा साखर घालून मिश्रण एकजीव करून घेतले, एका strawberry चे दोन तुकडे केले आणि ह्या मिश्रणात घातले... पुढची कृती काय विचारता? अहो तो बाउल घेऊन आरामशीर सोफ्यावर बसायचे आणि मनापासून आस्वाद घ्यायचा... तयारीला लागणारा वेळ ५ मिनिटे, पण जिभेवर रेंगाळणारे समाधान खूप खूप मोठे...!! विश्वास बसत नाही का? ठीक आहे, खालील फोटो पहा, मग समजेल मला काय म्हणायचे आहे ते.. :)पुण्यनगरीतील वाहतूकव्यवस्था आणि वाहनांवरील साहित्यसंपदा: एक अभ्यासपूर्ण विवेचन !!

नमस्कार, सुमारे दशकभर पुण्यात राहिल्यावर या नगरीच्या विद्वत्तेचा आम्हाला स्पर्श झाला नसता तरच नवल. त्यामुळे झालेय काय, कोणत्याही गोष्टीची...