Friday, November 18, 2011

देऊळ ....( तू झोप मी जागा आहे...)!!

तशी मी नास्तिकच! म्हणजे गणपतीबाप्पा, शंकर, सरस्वती वगैरे आपली दोस्त मंडळी आहेत हे खरे; पण उगीचच त्यांच्या नावे काहीतरी वाट्टेल त्या कथा खपवायच्या, भक्ती आणि आस्तिकतेचा बाजार भरवायचा, आंधळेपणाने, सारासार विवेक न वापरता धर्म, रूढी, प्रथा वगैरे गोष्टीना शरण जायचे हे सपशेल, त्रिवार नामंजूर आहे आपल्याला !! तुम्हीपण आहात का त्यातले? मग ह्या देवळात जरूर जा !
काय म्हणता? तुम्ही आस्तिक आहात, पण तुमची श्रद्धा, तुमचा देव तुमच्यापाशी, असे तुम्हाला वाटते? अरे.. मग तुम्हाला या चित्रपटातील केशव उर्फ केश्या अगदी जवळचा वाटून जाईल.
आणि आपण? आपल्यासाठी देव म्हणजे स्वतःच्या पोळीवर तूप ओढून घ्यायचे एक हुकमी साधन आहे का? वा... फार छान...!! हा चित्रपट आपल्यासारख्या संधिसाधू प्रवृत्तींना डोळ्यासमोर ठेवूनच तर बनवला आहे.. म्हणजे पर्यायाने आपणच याचे हिरो झालात की !! तेंव्हा आपली हिरोगिरी पडद्यावर साकारली जात असताना पाहणे हे खूप सुखद असेल आपल्यासाठी.. तेंव्हा आपलेही या देवळात स्वागत !! परत जाताना देवाचा प्रसाद म्हणून थोडे शहाणपणाचे, माणुसकीचे तीर्थ घेऊन गेलात तर अतिउत्तम .. !!
(वरील काही वाक्ये तिरकसपणे लिहिलेली वाटतील कदाचित.. नव्हे ती तशी मुद्दामच लिहिली आहेत..एकंदरीतच चित्रपट पाहत असताना जो अनुभव सतत येत राहतो त्या अवस्थेचा फील तुम्हाला यावा  म्हणून..).
तर हा चित्रपट म्हणजे समाज मनाचा एक आरसा आहे. अतिशय थेट, स्पष्ट, आणि तितकाच प्रामाणिक ! समाजातील विविध प्रवृत्ती, राजकारण्यांची हतबलता आणि समाज सुधारणेच्या बाबतीत असलेली निष्क्रियता, बुद्धीजीवींची तळमळ आणि प्रवाहापुढे झालेला नाईलाज, भोळ्या-निरागस जीवांची दिशाहीनता, समाजातील स्त्रीचे खरे स्थान, अशा अनेक विषयांवर एकाच वेळी मार्मिक, बोचरे भाष्य करणारा असा हा अडीच तासांचा प्रवास, जो उभा केला आहे उमेश कुलकर्णी या संवेदनशील दिग्दर्शकाने !! या प्रवासात त्याचे सोबती कोण आहेत माहित आहे? - नाना पाटेकर, दिलीप प्रभावळकर, मोहन आगाशे, सोनाली कुलकर्णी, गिरीश कुलकर्णी, ज्योती सुभाष, उषा नाडकर्णी, किशोर कदम, विभावरी देशपांडे, आतिशा नाईक, आणि हो - नसिरुद्दीन शाह !! यातील प्रत्येक नावाभोवती असलेले वलय पाहता, काहीतरी वेगळे पाहायला मिळणार याची खात्री सुरुवातीलाच पटते, आणि चित्रपट जसजसा पुढे सरकत जातो तसतशी आपली अवस्था आणखीनच भारून गेल्यासारखी होत जाते. अतिशय संथ गतीत सुरु झालेला हा चित्रपट हळूहळू आपल्या अंगावर येऊ लागतो.. बेचैन करतो.. डोळ्यात अंजन घालतो आणि शेवटला परत एका समेवर येऊन थांबतो.. !!
हा चित्रपट - हि समस्या आणि हे त्याचे उत्तर - अशा निर्णायक भाषेत बोलत नाही. पण समाजात, अगदी आपल्या आजूबाजूला जे घडते त्याचे शंभर टक्के सत्य असे चित्रीकरण करतो. प्रत्येक मनोभूमिकेमागील निरनिराळे कंगोरे, नाण्याच्या एक-दोन नव्हे तर असंख्य बाजू मांडण्याचा प्रयत्न करतो.
एक मंगरूळ नावाचे आडगाव. जिथे काही घडतच नाही, आणि काही घडत नाही म्हणून गावातील तरुण पोरांपासून ते एका स्वयंघोषित पत्रकारापर्यंत सगळेच खूप निरुत्साही, कंटाळलेले आहेत. अशा गावात राहणाऱ्या आणि गावातील एका बड्या आसामीच्या घरची गाय राखण करणाऱ्या केशव, उर्फ केश्या या तरुणाच्या स्वप्नात एकदा दत्तगुरु येतात.. अशा वरकरणी सध्या सरळ वाटणाऱ्या घटनेतून सुरुवात होऊन हा चित्रपट कुठल्याकुठे जातो.. आणि ते ही अतिशय गतिमान प्रकारे..!! या गतीमुळे कोणाची चांदी होते, कोण चक्राखाली भरडले जाते, हे सर्व पडद्यावरच पाहणे इष्ट...!!
यातील मार्मिकतेने रेखाटलेल्या प्रसंगांपैकी एकाचे उदाहरणच द्यायचे झाले तर गावातील पुढारी भाऊ (नाना पाटेकर) व गावाविषयी तळमळ असणारे सुधारकी विचारांचे अण्णा (दिलीप प्रभावळकर) यांच्यातील संवादाचे देता येईल. त्यामध्ये अण्णा तळमळीने बोलत असता शेवटी भाऊ त्यांना सांगतात, " अहो अण्णा, अलीकडे कायदा, पलीकडे आम्ही, आणि मध्येच भक्तांची रांग..!! कायद्याला आमच्यापर्यंत येण्यासाठी ही रांग ओलांडावीच लागणार. तेंव्हा तुम्ही काळजी करू नका.. सर्व काही कायदेशीरच होईल !!"  कायदा हातात घेऊन आपल्याला हवा तसा वाकविण्याच्या सत्ताधीशांच्या प्रवृतीचे याहून नेमके वर्णन मला तरी माहित नाही..!!
या चित्रपटाची philosophy म्हणा, हवं तर, ही अण्णांच्या एकाच वाक्यात करता येईल. ते म्हणतात - देव ज्याला मानायचा असेल त्याने मानावा, ज्याला मानायचे नसेल त्याने मानू नये, पण हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे.. "
पण हा वैयक्तिक प्रश्नच बघताबघता सार्वजनिक रूप कसे धारण करतो आणि समाजमनाच्या जाणीवा कश्या बंदिस्त करतो हे सर्व अनुभवण्यासाठी हा चित्रपट पाहायलाच हवा...!!!


Wednesday, November 2, 2011

भारतीय चित्रपटसृष्टीची जन्मगाथा- अर्थात हरिश्चंद्राची फॅक्टरी ..!!

शनिवार - ३ मे १९१३.. एका महाप्रचंड अशा उद्योगाचे बीजारोपण केले गेले तो दिवस.. या दिवशी भारतातील  पहिला मूकपट प्रदर्शित झाला. नाव होते - राजा हरिश्चंद्र. ह्या अनोख्या प्रयोगाची संकल्पना ज्यांनी मांडली ते होते अर्थातच दादासाहेब फाळके - भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक..!!

पण ही झाली नंतरची गोष्ट. 

मुळात दादासाहेबांना ही प्रेरणा कशी मिळाली, त्या काळात त्यांना काय अडचणी आल्या, त्यांच्या स्वप्नांना त्यांच्या कुटुंबियांची (विशेषतः पत्नीची) कशी साथ लाभली ह्या सर्वांचीच एक रंजक कथा जर पडद्यावर सादर करता आली तर? प्रेक्षकांना खऱ्या अर्थाने दादासाहेबांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या दूरदृष्टी, अपार कष्ट आणि त्याग यांची किमान एक झलक दाखवता आली तर? 

असे अनेक प्रश्न पडले ते परेश मोकाशी या जादूगाराला.. मग काय, या छोट्याश्या बीजातून तयार झाला तो एक ध्यास.. प्रवास.. ! या प्रवासात जर अतिशय गुणी, मेहनती  असे सोबती असतील तर काय साकारू शकते याचे एक उत्तम उदाहरणच या अवलियाने आपल्यासमोर ठेवले - ते बावनकशी सोने म्हणजेच माझ्या अत्यंत आवडत्या चित्रपटांपैकी एक - अर्थात हरिश्चंद्राची फॅक्टरी ..!! 

खरेतर हा फक्त संग्रही ठेवण्याचा (आणि 'आम्हीपण नावाजलेले चित्रपट सीडीवर पदरी बाळगतो' असा टेंभा मिरवण्याचा) चित्रपट नव्हे ! माझ्यामते तरी हे एक tonic आहे. केंव्हाही नैराश्य आले, आयुष्यात आपल्याला काहीच करता येणार नाही असे वाटले कि सरळ (तीच संग्रही ठेवलेली) सीडी काढावी व पुढचे दोन तास निवांतपणे हा चित्रपट पाहावा. विश्वास ठेवा, चित्रपट पाह्ण्यापूर्वीचे आपण व चित्रपट पाहून झाल्यानंतरचे आपण यात तुम्हाला स्वतःलाच अमूलाग्र बदल झालेला जाणवेल. 

हा चित्रपट दादासाहेबांच्या जीवनावर बेतला असल्यामुळे त्यांचे कार्य हा अर्थातच चित्रपटाचा आत्मा आहे. गिरगावच्या चाळीत आपल्या पत्नी आणि दोन मुलांसमवेत राहत असतानाच हा अवलिया 'पडद्यावरील नाटक' प्रत्यक्षात आणण्याचे स्वप्न पाहतो. त्यासाठीचा अभ्यास करण्यासाठी लंडनला जातो, मग भारतात परत येऊन या स्वप्नांना मूर्तरूप देण्यासाठी जंग जंग पछाडतो, आणि सरतेशेवटी पडद्यावर उभी राहते ती राजा हरिश्चंद्राची गोष्ट.. आणि त्याबरोबरच जाणवतो तो फाळके कुटुंबाचा स्वप्नपूर्तीचा आनंद..

माझ्या मते तरी हा चित्रपट आपल्याला भारून टाकल्यासारखा वेगळ्या दुनियेत घेऊन जातो. चित्रपट सुरु होत असतानाच जवळपास १०० वर्षांपूर्वीच्या जुन्या मुंबईचे दर्शन घडते (आणि लगेच जाणवते कि एवढे अत्युच्च दर्जाचे नेपथ्य नितीन चंद्रकांत देसाई या मयसभाकाराखेरीज कुणाचेच असू शकत नाही..) त्या गिरगावातील चाळी, त्यातील एकोपा, एकमेकांविषयी वाटणारी तळमळ, त्या रस्त्यावरील ट्राम्स, 'दादर ला फारशी वस्ती नव्हती" हे वास्तव... सगळे तुम्हाला १०० वर्षे मागे घेऊन जाते. (मला तर नेहेमी हा चित्रपट पाहताना 'आपण १०० वर्षापूर्वी जन्मलो असतो तर किती छान झाले असते ' असे वाटत राहते. )

हे सर्व असले(आणि ते सर्वोत्तमच आहे) तरीही शेवटी कुठल्याही कलाकृतीचे तारू यशस्वीपणे किनारयाला लावतात ते त्यातील कलाकारच.. आणि इथे दिग्दर्शकाने नंदू माधव व विभावरी देशपांडे यांना मुख्य भूमिका देऊन अर्धी (माझ्यामते, जवळपास पूर्ण) लढाई जिंकली आहे. 'दादासाहेब अगदी असेच असतील' हे वाटण्यामागे नंदू माधव या गुणी कलाकाराची अफाट मेहनत आहे. ती सिनेमा बनवण्याची तळमळ, त्यासाठी वाट्टेल तसे आणि तितके कष्ट उपसण्याची तयारी, त्याचवेळी दादासाहेबांमध्ये दडलेला प्रेमळ पिता, कृतज्ञ पती, असे अनेक पैलू त्यांनी अतिशय बारकाव्यांसहित उभे केले आहेत. त्यांना तितकीच ताकदीची जोड मिळाली आहे ती विभावरी देशपांडे या अष्टपैलू अभिनेत्रीची. तिने उभी केलेली दादासाहेबांच्या पत्नीची व्यक्तिरेखा खरोखर कमाल आहे. पतीची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी कंबर कसून उभे राहतानाच, तीन मुलांचे पालनपोषण, चित्रपटात काम करणाऱ्या ३०-४० माणसांचे जेवणखाण, आणि या सर्वांवर कळस म्हणजे दादासाहेबांच्या बरोबरीने कॅमेरा हाताळणे, फिल्म धुणे अशी कामे हसतमुखाने करणे या सगळ्यामुळे त्या व्यक्तिरेखेने एक वेगळीच उंची गाठली आहे. 

हे झाले मुख्य कलाकारांबद्दल. पण मोहित गोखले, अथर्व कर्वे या मुलांपासून ते वैभव मांगले यांच्यासारख्या विनोदी कलाकारापर्यंत प्रत्येकानेच १०० टक्क्यांपेक्षा जास्त योगदान दिले आहे चित्रपटाच्या एकंदर जडणघडणीत...एक आदर्श team-work चे उदाहरण म्हणूनही हा चित्रपट भावतो कुठेतरी. शिवाय '२००९ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला भारतातर्फे "सर्वोत्कृष्ट चित्रपट" म्हणून ऑस्कर पुरस्कारासाठी पाठवले गेले होते'  ही याची एक ओळख आहेच...

तेंव्हा, स्वप्ने पाहणे, ती सत्यात आणण्यासाठी अफाट मेहनत करणे, आणि शेवटी स्वप्नपूर्तीचा झालेला निखळ आनंद, हे सर्व अनुभवण्यासाठी हा चित्रपट जरूर पाहा..!!

पुण्यनगरीतील वाहतूकव्यवस्था आणि वाहनांवरील साहित्यसंपदा: एक अभ्यासपूर्ण विवेचन !!

नमस्कार, सुमारे दशकभर पुण्यात राहिल्यावर या नगरीच्या विद्वत्तेचा आम्हाला स्पर्श झाला नसता तरच नवल. त्यामुळे झालेय काय, कोणत्याही गोष्टीची...