Showing posts with label खाद्यभ्रमंती. Show all posts
Showing posts with label खाद्यभ्रमंती. Show all posts

Thursday, July 2, 2026

गोंधळलेले बटाटे 😀

 साधारण ९ वर्षांनी फिरकले आहे स्वतःच्या ब्लॉग वर. म्हणजे बाकी प्रोफेशनल प्लॅटफॉर्म्स वर लिखाण चालू होते पण मातृभाषेतल्या लिखाणाची मजा वेगळीच. 

तर आज घेऊन आले आहे एक रेसिपी - 

Verwirrender Kartoffeln ( Translation - confusing potatoes) ☺

कृती वाचताना जिन्नस सहज लक्षात येतील-
1. फरसाणाच्या डब्यातलं उरलेलं फरसाण घ्यावं.
2. घरी केलेल्या कुरमुऱ्यांच्या चिवड्यातलं तळागाळातलं मिश्रण घ्यावं.
3. हे सगळं मिश्रण मिक्सर मध्ये बारीक वाटून घ्यावं (इतकं बारीक वाटावं की ब्रम्हदेवाच्या बाबांनाही त्यातले मूळ घटक ओळखता येऊ नयेत 😛).
4. वाटण करताना मध्येच फ्रीजमध्ये ठेवलेल्या आळशीच्या (जवसाच्या) कंटाळवाण्या चटणीची आठवण झाली, की तिलाही या वाटणात चोरपावलानी प्रवेश द्यावा.
5. मग या मिश्रणाच्या सगळ्या तीव्र चवी बॅलन्स होण्यासाठी त्यात उकडलेले बटाटे घालावेत.
6. या मिश्रणाची टिक्की करायचा विचार प्रथम करावा.
7. मग गरम तेलात सोडलेली पहिलीच टिक्की गर्भगळीत झाली, तरी आपण धीर न सोडता “आता याची मस्त थालीपीठं करूया” असं म्हणावं.
8. सरतेशेवटी तव्यावर एकसंध लावलेले थालीपीठ अनेक तुकड्यांमध्ये धारातिर्थी पडल्यावर, सरळ तो सगळा गोळा घेऊन कढईत तेलावर मोकळ्या भाजणीसारखा परतवावा.
9. खायला देताना मात्र पांढऱ्याशुभ्र प्लेटमध्ये याला मध्यभागी ठेवून, बाजूला गोडगुलाबी बिटाच्या दह्यातल्या कोशिंबीरीचे कोंदण द्यावे आणि कांदापातीची कोवळी पाने त्यावर पेरावी 😂
10. आणि कहर म्हणजे, घरच्यांनी “हे मस्त लागतंय, अजून आहे का? “ असं विचारल्यावर, “अशी रेसिपी शतकातून एकदाच, आणि थोडीशीच बनते” असे बाणेदार उत्तर द्यावे 😛😛



Thursday, October 25, 2012

Buon appetito! - अर्थात Happy Pasta Treat

आताच कॅमेऱ्यामधील सगळे फोटो कॉम्पुटरवर घेत होते. सर्व फोटो कॉपी  झाल्यावर ते पुन्हा निवांतपणे चाळणे ओघाने आलेच. बघताना मध्येच एका फोटोपाशी थबकले. माझ्या आवडीच्या ट्रेमध्ये तीन बाउल भरून पास्ता रचलेला. कधी काढला होता बरे हा फोटो?.. हं, साधारण महिन्यापूर्वीचा दिसतोय - आणि मग down the memory lane जाता जाता शेवटी त्या रविवारच्या सुंदर दुपारपाशी येऊन थबकले.
रविवार असूनही दोन्ही बायका येऊन त्यांची कामे करून गेल्या होत्या. (हा भाग्ययोगच एकप्रकारे. कारण काही वेळा सुट्टीच्या दिवशी आम्ही तयार होऊन बसलो असतो बाहेर जाण्यासाठी व या पठ्ठया काही यायचे नाव घेत नाहीत.) आम्हीपण सर्व आवरून निवांतपणे सोफ्यावर आपापल्या आवडत्या जागी विराजमान झालो होतो. टीव्हीवर (कधी नव्हे तो) तिघांच्याही आवडीचा मनपसंत चित्रपट चालू होता. साधारण एकच्या सुमारच तिघानाही एकदमच भुकेची जाणीव झाली. व तिघानाही पास्त्याचे डोहाळे लागले. मग काय, त्यांचा सेनापती (अर्थात अस्मादिक) लागले तयारीला. घरात तशी सगळीच तयारी होती. देर थी  तो बस्स  सभी चीजोंको एकसाथ मिलानेकी !! उनपे थोडा प्यार छिडका, और तय्यार हो गया- मम्मी स्पेशल पास्ता !! (थोडेसे - नाही, बरेचसे- नाटकी वाटते का? कदाचित जाहिरातींचा परिणाम असेल.. By the way,  माझा मुलगा अजून तरी आम्हा दोघांना स्वच्छ आई-बाबा असेच म्हणतो.. :)  )
तर कुठे होते मी? हं, पास्ता !! चला तर, पाहूया साहित्य आणि कृती?
साहित्य:
sunfeast pasta treat चे एक पाकीट (double pack- मी कॉर्न-बेस असलेला घेतला होता.)
चिरलेल्या भाज्या - जसे की कोबी, कांदा, टोमाटो, बिन्स, गाजर, किंवा suitable आणि आवडणाऱ्या दुसऱ्या कोणत्याही (पथ्य एकच की त्या सर्व भाज्या बारीक चिरून घ्याव्यात.)
दोन चमचे बटर
दोन चमचे ओलिव्ह तेल
५-६ पाकळ्या लसूण बारीक चिरून
चवीपुरते मीठ
mixed hurbs
चीज वगैरे आवडीनुसार
कृती:
  1. प्रथम बटर मध्ये चिरलेला लसूण परतून घ्यावा व त्यातच चिरलेल्या भाज्याही परतून घ्याव्यात.
  2. भाज्या शिजत असतानाच एकीकडे पास्ता नेहेमीच्या पद्धतीने करून घ्यावा. (आपण दो-मिनिट नुडल्स करतो त्याच प्रकारे). पास्ता पाण्यात उकळत असतानाच त्यात दोन चमचे ओलिव्ह तेल घालावे. 
  3. पास्ता नीट शिजला कि तो भाज्यांमध्ये मिक्स करावा.
  4. या मिश्रणात चवीपुरते मीठ (भाज्यांसाठीच, कारण पास्ता-मेकर मध्ये मीठ असते), व mixed-hurbs घालावेत.
पुढील दोन मिनिटात पास्ता तयार आहे. त्याचा आस्वाद घ्यावा.




Wednesday, October 24, 2012

दसरा स्पेशल- अरिनमेवा

नमस्कार,
पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय- अर्थात खादाडी.
आता तुम्ही म्हणाल की जर दसरा स्पेशल असे शीर्षक आहे तर नक्कीच ही श्रीखंडाचा कुठलातरी प्रकार टाईपणार असेल. :) पण अरिनमेवा हा काय प्रकार आहे? सांगते.
अरिन म्हणजे आमच्या सुपुत्राचे नाव आणि त्याच्यासाठी केलेला खाऊ म्हणजे अरिनमेवा. :) (थोडेसे 'रानमेवा' सारखे. :) )
त्याला आवडते म्हणून गेल्या आठवड्यात जवळपास ५ लिटर दुधाचे श्रीखंड करून ठेवले होते, आणि त्यातले तो रोज थोडेथोडे इमाने-इतबारे संपवत होता. :) त्यामुळे आमच्याही सर्वांगाला मुंग्या चिकटतील कि काय, अशी शंका येण्याइतपत साखर खाऊन झाली होती. तेंव्हा म्हटले की दसऱ्याला पुन्हा साखरेने ओथंबलेले पक्वान्न करण्यापेक्षा दुसरे काहीतरी ट्राय करावे. (सौ चुहे खाके .... दुसरे काय) ! ह्या सुविचारातून जन्म झाला आजच्या लाडवांचा !! आता इतके पुराण सांगून झाल्यावर कृती सांगू का? :) तर-
साहित्य-
जाडसर कणिक २ वाटया
जाड मुगाचे पीठ १ वाटी
बदाम पावडर अर्धा वाटी
खारीक पावडर, तीळ पावडर, खसखस पावडर हे सगळे मिळून अर्धा वाटी
ओला खजूर एक वाटी
तूप दीड वाटी
पिठीसाखर ५ मोठे चमचे

कृती-
  1. प्रथम ओला खजूर तीन-चार तास भिजत टाकावा. मग त्यातील बिया काढून टाकाव्यात आणि मिक्सरमधून त्याची गुळगुळीत पेस्ट तयार करून घ्यावी.
  2. बदाम ३-४ तास भिजत टाकून साले काढून घ्यावीत व बदामांचीही पावडर तयार करून घ्यावी.
  3. तीळ व खसखस खमंग भाजून घ्यावे आणि त्यांची पण पावडर करून घ्यावी. खारीक पावडर तयार बाजारात मिळते.
  4. मग एक वाटी तुपात कणिक खमंग भाजून घ्यावी. त्यातच बदाम, खारीक, खसखस, व तीळ या सर्व पावडरी टाकून पुन्हा हे मिश्रण परतून घ्यावे. consistency साठी नंतर हे सर्व साहित्य फूड प्रोसेसर मधून फिरवून घ्यावे.
  5. दुसऱ्या पातेल्यात अर्धा वाटी तुपामध्ये मुगाचे पीठ छान भाजून घ्यावे. हे मिश्रण सैलसर झाल्यावर आणि पिठाचा उग्र दर्प गेल्यावर त्यामध्ये  खजुराची पेस्ट टाकून पुन्हा परतून घ्यावे.
  6. ही दोन्ही मिश्रणे एकत्र करावीत त्यांच्यामध्ये पिठीसाखर टाकावी, आणि लगेच हाताला थोडेसे तूप लावून, या मिश्रणाचे (जमतील तसे) लाडू वळावेत. 
तर आज हा प्रयोग करून पाहिला, आणि जेंव्हा आमच्या चिरंजीवानी लागोपाठ दोन लाडू पळवले, तेंव्हा प्रयोगाच्या यशस्वीतेची पावती पण मिळाली. :)









Monday, September 3, 2012

मेरे maggi की कहानी

गेले तीन आठवडे तसे धावपळीतच गेले. Deadlines, deliverables,  release... हुश्श ! आणि वीकांताना होणारा प्रवास. अगदी दमणूक झाल्यासारखी वाटत होती. शेवटी आज थोडे तापाचे निमित्त होऊन घरी बसावे लागले. ते ही बरेच वाटले, एकाअर्थी, कारण सक्तीची विश्रांती तरी मिळाली. पण अशा वेळी एकच गोष्ट त्रासदायक असते - स्वतः बनवून खाणे ! तोंडाची चव गेलेली असते. काहीतरी पटकन करायचे असते, आणि ते थोडेसे चमचमीत, आणि पोटभरीचे पण असावे लागते.  अशा वेळी maggi noodles घरात असणे हे अगदी मोठे वरदान आहे, असे वाटते.  मग काय, करू या तयारी ? बस्स  दो मिनिट  मे?

साहित्य - maggi noodles चे एक पाकीट,  १ चीज क्यूब, थोडासा टोमाटो  सॉस (ऐच्छिक)
कृती -
  1. प्रथम एका पातेल्यात दीड कप पाणी उकळत ठेवावे.
  2. पाणी उकळत असतानाच त्यात चीजचा क्यूब किसून टाकावा.
  3. चीज नीट  मिक्स झाले कि त्यात एक चमचा टोमाटो सॉस  टाकावा (हवा असल्यास).
  4. सर्वात शेवटी नेहेमीप्रमाणे मसाला, व नुडल्स मिक्स कराव्यात.
  5. मग ... टीव्ही चालू करावा, हवा तो सिनेमा लावावा, आणि गरमागरम नुडल्स सोबतीला घेऊन बसावे ...!!  आहे की नाही जीवाची चैन ...!!!



Sunday, July 8, 2012

Sunday Brunch - आलू पराठा

आठवडाभर वाट पाहिल्यावर आला एकदाचा रविवार. त्यात आजचे वातावरण पण कुंद, मंद, धुंद, असे. :) मग अश्या हवेत काहीतरी छान चवदार नको का? (तसे पाहायला गेले तर सर्वच प्रकारचे अन्न हे पूर्णब्रह्म असले तरीही ते चविष्ट असेल तर दुधात साखर. ) आणि चमचमीत पदार्थ म्हटला कि बटाटा हा त्याचा एक अविभाज्य घटक असणार हे जवळपास .ठरलेलेच आहे. त्यातून बटाटेवडा, आलू पराठा, हे प्रकार म्हणजे तर बटाटेप्रेमींच्या मर्मबंधातील ठेव ! पण गोची अशी आहे कि हा बटाटा एकटा येतच नाही कधी. त्याच्याबरोबर भरपूर तेल, चण्याचे पीठ, हिरव्या मिरच्या असा सगळा लवाजमा असल्याशिवाय बटाटे महाराजांचा दरबार पूर्णच होत नाही. मग गरीब बिचाऱ्या diet वर असणाऱ्या मंडळीनी हे प्रकार खायचेच नाहीत का? आजच्या रेसिपीचा उगम या प्रश्नातूनच झाला आहे. आज आपण बनवणार आहोत आलू पराठे, ते सुद्धा अतिशय कमी तेलातील. पण खमंगपणा जराही कमी होऊ न देता. मग जाऊ या का आपल्या प्रयोगशाळेत?

साहित्य- 4 उकडलेले बटाटे, 8 लसूण  पाकळ्या, एक छोटा चमचा तिखट, पाव चमचा हिंग, पाव चमचा हळद, तीन चमचे तेल, दोन चमचे लिंबूरस, थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून, दीड वाटी कणिक, पाणी, मीठ चवीनुसार

कृती-
1. प्रथम उकडलेले बटाटे चांगले मळून  घ्यावेत.
2. तेलात बारीक चिरलेला लसूण परतून घ्यावा. त्यातच हिंग, हळद, तिखट, मीठ, लिंबूरस, कोथिंबीर, टाकून परतून घ्यावे. सर्वात शेवटी कुस्करलेले बटाटे टाकावेत व मिश्रणाला एक छान वाफ आणावी.
3. कणिक थोडेसे मीठ टाकून भिजवून घ्यावी व तिचे छोटे छोटे गोळे करावेत.
4. या गोळ्यांमध्ये वरील सारण भरून पराठे लाटून घ्यावेत व तव्यावर दोन्ही बाजू तेल न टाकताच भाजून घ्याव्यात.
5. गरमागरम पराठे तव्यावरून direct प्लेटमध्ये व सायीच्या दह्यासोबत पोटात. :)

टीपा-
1. या पराठ्यांमध्ये भरायचे सारण आपण पूर्ण शिजवून घेतले असल्यामुळे ते एकजीव होते व सारणाचा गोळा अगदी पुरणपोळी मधील पुरणासारखा गुळगुळीत होतो. असे पराठे लाटायलाही खूप सोपे पडतात.
2. सारण अश्या प्रकारे शिजवून घेतल्यामुळे एकूणच पराठे करताना तेल खूप कमी लागते, तरीही पराठ्यांचा खमंगपणा मुळीच कमी होत नाही.



चटकदार झुणका.. पण जरा हटके :)


नमस्कार वाचकहो,,
आज शनिवार. तसा न कर्त्याचाच  वार. पण मी आणि माझे पिलू सकाळीच आवरून  बसलो होतो.  बाहेर भटकायला जायचे होते ना ! पण जाण्याआधी नेहमीचाच यक्षप्रश्न सोडवायचा होता - आज खायला काय करायचे? मग फ्रीज उघडून आढावा घेतला, काय काय आहे त्याचा- खरेतर काहीतरी चमचमीत खावेसे वाटत होते पण फ्रीजमधील परिस्थिती फारशी उत्साहवर्धक नव्हती :(  थोडेसे किसलेले गाजर, चिरलेला कांदा, चिरलेले tomato व बारीक चिरलेली कोथिंबीर !! म्हणजे तसा पौष्टिक कोशिंबिरीचा मालमसाला होता, पण आजतरी जिभेने मेंदूवर मात करायचा चंगच बांधला होता।. :) मग काय, सुरु झाले जिव्हा आणि मेंदूमधील युद्ध !  एरव्ही हे युद्ध तसे घातकच पण आज त्यातून चक्क एक छान पदार्थ जमून गेला :)
आता तुम्ही म्हणाल कि शीर्षक तर आहे झुणका, मग त्यात नवीन काय आहे? तर हा आहे पौष्टिक झुणका!! कारण त्यात नेहमीच्या फक्त कांद्याबरोबरच गाजर, tomato, असा ऐवजही आहे आणि कोथिंबीर पण जरा सढळ हातानेच वापरली आहे. पण याचा USP काय आहे माहित आहे? यात चण्याच्या पिठाऐवजी चक्क मुगाचे पीठ वापरले आहे. तर आता नमनालाच घडाभर तेल न ओतता एकदम फोडणी करू या का?
साहित्य -
चिरलेला कांदा, किसलेले गाजर, चिरलेले tomato प्रत्येकी अर्धी वाटी, अर्धी वाटी मुगाचे पीठ, चिरलेली कोथिंबीर एक जुडी, तीन मोठे चमचे तेल, पाव चमचा, हिंग अर्धा चमचा हळद, तिखट, मीठ चवीनुसार
कृती -
1. प्रथम मुगाचे पीठ कोरडेच भाजून घ्यावे.
2. त्याच भांड्यात तेलाची फोडणी करून चिरलेल्या भाज्या (कोथिंबीर सोडून) झाकण ठेवून शिजवून घ्याव्यात.
3. भाज्या शिजल्या कि चिरलेली कोथिंबीर टाकून एक  मिनिट मोठ्या आचेवर परतून घ्यावे.
4. मग त्यात तिखट,, मीठ टाकून पुन्हा एकदा परतून घ्यावे.
5. सर्वात शेवटी मुगाचे पीठ पेरून दोन वाफा काढाव्या.
6. पुढे काय? अहो तयार झाला कि झुणका.. :)   गरम गरम भाकरी, किंवा फुलक्यांबरोबर त्याचा आस्वाद घ्यावा.


टीपा-
1. या झुणक्यासाठी  आपण बारीक चिरलेला कोबी, सिमला मिरची, फरसबी, इत्यादी भाज्यांचे मिश्रणही वापरू शकतो.
2. आवडत असल्यास सर्वात शेवटी दोन चमचे दाण्याचे कूट टाकायलाही हरकत नाही.
3. Tomato पुरेसे आंबट नसल्यास एक चमचा लिंबुरस किंवा एक चमचा दही टाकावे.





Thursday, July 5, 2012

खमंग दलिया शिरा

नमस्कार वाचकहो,
बऱ्याच दिवसात काही लिहिलेच नव्हते. विषय सुचत बरेचसे, पण ते तसेच विरून जात. मुलाची नवीन शाळा, अहोंचे इथे नसणे, होणारी धावपळ, चिडचिड.... काही काही करू नये, शांत बसून राहावे, असे वाटण्याचे दिवस. अर्थात मी लिहिले नाही म्हणून जग चालायचे थांबले नाही- पण तरी मन खंतावत होतेच- बोटे शिवशिवत होतीच... म्हणून म्हटले आजच्या दिसामाजी थोडेतरी लिहू या -- :)

गेले काही दिवस मी मला सुचलेल्या (आणि जमलेल्या :) ) पाककृतींवर लिहित होते. आजचाही लेख त्या संदर्भातीलच !
तर हा दलिया शिरा खमंग लागतोच पण पौष्टिकही आहे बर का.. 
साहित्य - अर्धी वाटी दलिया (गव्हाचा जाड रवा - कुठेही मिळतो बाजारात), दोन वाट्या दूध,,पाव वाटी तूप, काजू, बदाम आवडीनुसार तुकडे करून, अर्धी वाटी गूळ
कृती - 
1. तुपावर दलिया छान मोकळा भाजून घ्यावा. दलिया खमंग भाजला गेल्यावर त्यातच काजू-बदामाचे तुकडे पण परतून घ्यावेत.
2. सर्व दूध टाकून दलिया मऊसर शिजवून घ्यावा.
3. दलिया शिजल्यावर त्यात बारीक चिरलेला गूळ घालून मिश्रण ढवळून घ्यावे. 
4. सर्व गूळ विरघळला कि आपला दलीयाचा शिरा तयार झाला. :)


टिपा:

1. जर दलीयामध्ये सगळे दूध शोषले गेले नाही आणि त्या आधीच गूळ टाकला गेला तर दूध फाटायची शक्यता असते,, म्हणून गूळ घालण्याआधी दलिया नीट शिजवून घ्यावा.
2. तुम्ही गुळाऐवजी साखरही वापरू शकता पण गुळामुळे शिऱ्याचा खमंगपणा खूप वाढतो. चवीत खूप फरक पडतो तसेच शिरा पौष्टिकही होतो.
3. लहान मुलांना देण्यासाठी हा अतिशय उत्तम पर्याय आहे.
4. आपण यात सफरचंद, केळी अशी फळेही टाकू शकतो. अशावेळी ती फळे गूळ घालण्यापूर्वी शिजवून घ्यावीत.

 

Thursday, February 2, 2012

मेथी-केळ्याचे शाही पराठे

आज मी आपल्याला आमच्या घरातील सर्वांची आवडती पाककृती सांगणार आहे. हे करताना थोडीशी मेहनत लागते खरी, पण माझ्या मते - its worth it. 


जिन्नस
मेथी २ जुड्या, ४ पिकलेली केळी, ओवा १ चमचा, तीळ २ चमचे, साखर २ चमचे, लाल तिखट १ लहान चमचा,
चिमुटभर हिंग, चिमुटभर हळद, बेसन २ चमचे, रवा २ चमचे, तांदुळाचे पीठ १ चमचा, दही १ चमचा,मीठ चवीनुसार, दोन मोठे चमचे तेल, मिश्रणात मावेल तितकी कणीक

मार्गदर्शन
१) प्रथम मेथी धुवून बारीक चिरून घयावी.
२) पिकलेल्या केळ्यांची साले काढून आतल्या गराचे बारीक तुकडे करून घ्यावे.
३) कढईत तेल तापल्यावर त्यात केळ्याचे तुकडे टाकून थोडेसे परतून घ्यावे. नंतर त्यातच ओवा, तीळ,साखर,लाल तिखट,हिंग ,हळद,मीठ टाकून परतून घ्यावे.
४) या मिश्रणात चिरलेली मेथी टाकून सर्व मिश्रणाला एक वाफ आणावी.
५) हे मिश्रण थंड झाल्यावर त्यात रवा, बेसन, तांदुळाचे पीठ, दही, टाकून व शेवटी त्यात मावेल तितकीच किणक टाकून एकजीव करून घ्यावे. (मिश्रणात पाणी घालू नये. )
६) तयार मिश्रणाचे छोटे छोटे गोळे करून घ्यावेत.
७) या गोळ्यांचे फुलक्यांच्या आकाराचे पराठे लाटून घ्यावेत व म्ध्यम आचेवर दोन्ही बाजूनी छान भाजून घ्यावेत. (भाजताना वाटल्यास थोडे तेल सोडावे. )
 ८) गरम गरम पराठे आपल्या आवडीच्या कुठल्याही चटणीसोबत सर्व्ह करावे.


टीपा
१) हे पराठे नुसतेच खायलाही छान लागतात.
२) केळ्यामुळे पराठे खुसखुशीत होतात व मेथीचा कडूपणाही कमी होतो.
३) यामध्ये सर्व प्रकारची पीठे, पालेभाजी, तीळासारख्या तेलबीया, व केळी असल्यामुळे  हे पूर्णान्न आहे.

ही पाककृती काही महिन्यांपूर्वी मी मनोगतावर जेंव्हा regular लिखाण करत होते त्यावेळी टाकली होती. आज वाटले कि हे लिखाण या ब्लॉगच्या वाचकांबरोबर शेअर करावे. म्हणून हा खटाटोप.



हे पराठे केले तेंव्हा मस्तपैकी भाजी, कोशिंबीर, मिश्र -भात असा मेनू होता. :)


Tuesday, January 31, 2012

रुचकर आणि पौष्टिक थालीपीठ

जगातील सर्वच खाद्यसंस्कृतीत काही काही पदार्थ हे त्या त्या संस्कृतीचे trademarks म्हणावे इतके प्रसिद्ध असतात. या सर्व पदार्थात मला तरी अनेक समान दुवे सापडतात. सर्वात महत्वाचे म्हणजे ते पदार्थ पूर्णान्न या स्वरूपाचे असतात. चविष्ट असतातच आणि करण्यासाठी अतिशय सोपे असतात. तसेच तुम्ही तुमच्या आवडीनिवडीनुसार त्यात हवा तो बदल करूनही त्या पदार्थांचे पोषण मूल्य कमी होत नाहीच, उलट वाढते. थालीपीठ हा आपल्या खाद्यसंस्कृतीतला असाच एक प्रकार. माझ्या मते तरी थालीपीठ या प्रकाराची एकच एक standard म्हणता येईल अशी कृती नाहीच आहे, उलट खाद्यप्रकारातील एक अतिशय flexible प्रकार म्हणून थालीपिठाचा नंबर खूप वरचा आहे. म्हणजे बघा हं, घरात कांदा नाही, ठीक आहे, कोबी वापरा की. लोणी नाही तोंडी लावायला? नो प्रॉब्लेम, बटर, चटणी, दही किंवा अगदीच काही नाही तर ओले खोबरे पण घेऊ शकता तुम्ही. एखादी नको असलेली पालेभाजी, किंवा रात्रीचे काहीही शिळेपाके संपवायचे आहे? मग करा सर्व एकत्र, एखादे पीठ मिसळा, आणि सरळ तव्यावर थालीपीठ लावा. इतके पटापट संपेल कि गृहिणीला चव बघायला म्हणूनही शिल्लक राहणार नाही. 
एकूण काय, थालीपीठाचे पाण्यासारखे आहे. ज्यात घालाल, त्याचा रंग घेऊन खुलते ते. 
तेंव्हा आजच्या थालीपीठासाठी आपल्याला हवी ती भाजणी, किसलेले गाजर, बारीक चिरलेला कोबी, थोडासा कांदा, भरपूर कोथिंबीर, तिखट, मीठ, हिंग, हळद, थोडासा ओवा, थोडेसे तीळ, आणि अर्धा चमचा साखर. हे सर्व मिश्रण एकजीव करून घ्या व तव्यावर थोडेसे तेल टाकून थापून घ्या. एक बाजू शिजली आणि खरपूस झाली कि ती बाजू उलटून दुसरी बाजूही थोडेसे तेल टाकून भाजून घ्या. 
गरमागरम थालीपीठ आणि घरचे लोणी... जगण्यासाठी आणखी काय लागते हो?


Monday, January 30, 2012

इस दाल मे कुछ हरा है..

आजची रेसिपीसुद्धा अगदीच सोपी. खास करून ज्यांना मेथी आवडत नाही त्यांनी ट्राय करण्यासारखी आहे. कृती सांगण्यापूर्वी आपण जरा आहारात मेथीचा समावेश करण्याचे फायदे पाहिले तर कसे? त्यासाठी खाली दिलेल्या लिंक्सना अवश्य भेट दया -


आता वळूया साहित्य आणि कृतीकडे:
साहित्य: शिजलेली डाळ १ वाटी(शक्यतो तुरडाळ), कसुरी मेथी १ वाटी, चवीनुसार तिखट, मीठ, गूळ, आणि चिंच, खवलेला नारळ सजावटीसाठी, आणि फोडणीचे साहित्य
कृती: प्रथम तेल तापत ठेवावे. त्यात थोडी मोहरी टाकून ती तडतडली कि हिंग व हळद टाकावी. नंतर डाळ व कसुरी मेथी टाकून मिश्रण छान घोटून घ्यावे. त्यात चवीनुसार मीठ, तिखट, गूळ व चिंच टाकावी. मिश्रणाला एक उकळी आली कि खोबरे टाकावे व आणखीन एक उकळी आणावी. 
गरमगरम डाळमेथी तयार आहे. ही आमटी पोळी किंवा भात कशाबरोबरही छान लागते. बरोबर एखादी कोशिंबीर असली कि ते जेवण अगदी पूर्णान्न होते. 

Tuesday, January 24, 2012

धमाल खाऊ - घरच्या बाळराजासाठी

देश वा धर्म कोणताही असो, जगातील सगळ्या तरुण मातांसाठी सर्वात महत्वाचा प्रश्न असतो तो म्हणजे "काय केले कि माझे बाळ छान खाईल व त्याला आवश्यक ती पोषणमूल्येही मिळतील. या एकाच प्रश्नामध्ये जगातील अनेक उत्तमोत्तम पाककृतींचा उगम दडला आहे. आजची रेसिपी तशीच काहीशी.. सोपी, तरीही लहान मुलांना आवडणारी..वाढत्या वयातील मुलांसाठी आवश्यक घटकांपैकी काही घटक, जसे  की  आयर्न, कॅल्शिअम पुरेपूर असणारी, साखरेचा वापर न करताही चवीला गोड आणि पौष्टिक. 
रेसीपीचे घटक अगदी सोपे - दाण्याचे कूट, हवा तेवढा खजूर (पाण्यात भिजत टाकून साले काढून घेतलेला - खजुराऐवजी खारकेची पावडर वापरली तरी चालेल), काळ्या मनुका (मिक्सर मधून भरडून घेतलेल्या), बदामाची पावडर, थोडी खसखशीची पावडर, आणि साजूक तूप
कृती - साजूक तुपावर वरील सर्व घटक परतून घ्यावे व हे मिश्रण गार झाले कि त्याचे लाडू वळावे..

आहे कि नाही सोपी! मी तर याला power tablet असेच म्हणते. लहान मुले, आणि हो , स्त्रियासुद्धा (कारण त्यांच्यामध्येही आयर्नची कमतरता असतेच) यांना रोज एक लाडू खायला द्यावा. आताचा मोसम तर असे लाडू खाऊन उत्तम आरोग्याची बेगमी करण्यासाठी फारच चांगला आहे. 

मग वाट कसली पाहताय, उचला एकेक लाडू आणि करा थंडीचा सामना... :)



Friday, January 20, 2012

Recipe for Happiness...

रेसिपी? हे काय बरे लिहित आहे मी??  हं..  शेवटी आलेच मी पण याच मार्गावर..!!
थांबा, थांबा, असे गोंधळून जाऊ नका.. सांगते सगळे सविस्तर..!!
जेंव्हा हा ब्लॉग सुरु केला तेंव्हा त्याची वाटचाल कशी होईल, काय काय विषय हाताळले जातील या कशाचीच कोणतीच योजना नव्हती मनात, पण त्यावेळी एक गोष्ट मात्र नक्की (!) ठरवली होती कि शक्यतो आपल्या ब्लॉगचे स्वरूप हे - पाककृतींच्या असंख्य ब्लॉग पैकी एक - असे होऊन द्यायचे नाही. [कृपा करून गैरसमज नकोत हं.. असे करण्यामागची भावना फक्त एवढीच होती कि इतके सारे दिग्गज आपले स्वयंपाकघरातील यशस्वी प्रयोग इतरांना सांगत असताना, माझ्यासारखीने  -जिला conventional स्वयंपाकाची फारशी आवड नाही- आपल्या मतांचे प्रदर्शन कशाला करावे? ]

पण काही महिन्यांपूर्वी सहज बोलता बोलता जेंव्हा माझ्या नवरोजीनी माझ्या पाककलेतील प्रयोगशीलतेला दाद देणारा एक निबंध ऐकवला, तेंव्हापासून हा किडा डोक्यात वळवळत राहिला. त्याचे कृतीत रुपांतर व्हायला नवीन वर्ष उजाडले असले तरी आता मात्र ठरवले आहे, कि ज्या काही साध्यासोप्या पण तरीही थोड्याश्या वेगळ्या अशा पाककृती आपल्या पोतडीत जमा आहेत त्या तुम्हा सर्वांबरोबर शेअर करायच्याच. सुदैवाने, बऱ्याच रेसिपी तयार झाल्यावर त्यांचे फोटो घेऊन ठेवले आहेत. आता त्यांचा उपयोग करण्याची वेळ आली आहे असे वाटते... :)

तेंव्हा आजची पहिली रेसिपी  - Strawberry with Cream...!!
तसे पहिले तर या रेसिपी मध्ये काहीच करायचे नाही आहे, तरीपण ही डिश खाताना मनाला मिळणारा आनंद मात्र खूप मोठा. म्हणूनच रेसिपीचे टोपणनाव - आनंदाची रेसिपी अर्थात Recipe for Happiness... 
या डिशला फार मोठी परंपरा आहे बर का, खास करून Wimbledon टेनिस स्पर्धा आणि Strawberry with Cream यांचे नाते खूप जुने आहे..!!
काल Reliance Fresh मध्ये गेले होते तिथे इतक्या सुंदर Strawberries विक्रीसाठी ठेवल्या होत्या, कि घेण्याशिवाय दुसरा पर्यायच उरला नाही... :) आणि मग काय, छान घरची -फ्रीज मध्ये ठेवून गार केलेली - साय घेतली (तुम्हाला हवे असेल तर बाजारात मिळणारे तयार क्रीमही घेऊ शकता पण घरच्या सायीची मजा नाही त्यात, असे मला वाटले), त्यामध्ये एक चमचा साखर घालून मिश्रण एकजीव करून घेतले, एका strawberry चे दोन तुकडे केले आणि ह्या मिश्रणात घातले... पुढची कृती काय विचारता? अहो तो बाउल घेऊन आरामशीर सोफ्यावर बसायचे आणि मनापासून आस्वाद घ्यायचा... तयारीला लागणारा वेळ ५ मिनिटे, पण जिभेवर रेंगाळणारे समाधान खूप खूप मोठे...!! विश्वास बसत नाही का? ठीक आहे, खालील फोटो पहा, मग समजेल मला काय म्हणायचे आहे ते.. :)



गोंधळलेले बटाटे 😀

 साधारण ९ वर्षांनी फिरकले आहे स्वतःच्या ब्लॉग वर. म्हणजे बाकी प्रोफेशनल प्लॅटफॉर्म्स वर लिखाण चालू होते पण मातृभाषेतल्या लिखाणाची मजा वेगळीच...