Friday, December 7, 2012

World Cinema Special: The Lives of Others (German)


गेले काही दिवस आम्ही घरच्या घरीच European Film Festival भरवला आहे. फ्रेंच, जर्मन, इटालियन, ग्रीक अशा भाषांमधील चित्रपट पाहणे म्हणजे खरोखरच एक आनंदसोहळा असतो. एक विलक्षण अनुभव. कथा काहीही असो, पण ती पडदयावर कशी पेश करावी याची एकापेक्षा एक सरस अशी उदाहरणे डोळ्यासमोर येत राहतात. हे चित्रपट पाहिल्यावर अगदी Hollywood चित्रपटही पाहणे नको वाटते तिथे बऱ्याचश्या हिंदी मसाला चित्रपटांची तर गोष्टच सोडा. वाटेल तशी कथेला अनावश्यक आणि सुमार दर्जाची गाणी, धडधड अंगावर आदळणाऱ्या आणि एकमेकांशी काही संबंध नसलेल्या बेसुमार फ्रेम्स, शब्दांची अर्थहीन पखरण असलेले संवाद-विसंवाद .. या साऱ्या गोष्टीना फाटा देऊन जे काही कसदार, आणि दर्जेदार उरते त्या सगळ्याची गोळाबेरीज म्हणजे हे चित्रपट.
असे काही चित्रपट पाहिल्यावर मनात आले, की जो अमर्याद आनंद या चित्रपटांनी आम्हाला दिला आहे, तो तुमच्याशी का शेअर करू नये? म्हणून पुढचे काही भाग World Cinema वर. :) आपला अभिप्राय आवर्जून कळवा. त्यानिमित्ताने तुमचेही काही अनुभव शेअर झाले तर सोने पे सुहागा !
या मालिकेतील पहिला सिनेमा आहे - The Lives of Others हा जर्मन सिनेमा. २००७ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला त्या वर्षीचे "सर्वोत्कृष्ट परदेशी चित्रपटाचे " ऑस्कर मिळाले होते.
-----------------------------------------------------------------------------------------------------------
काळजी करू नका, तुमच्या कॉम्पुटरवर एकाएकी format problem झालेला नाही आहे. ती 'dotted line' मी मुद्दामच टाकली आहे. माझ्या मनाची अवस्था  वर्णन करण्यासाठी...
खरे सांगू का, माझी साधारण लेखनशैली अशी आहे, की एखादा विषय मिळाला की पुढचे एक दोन दिवस तो विषय मनात चघळला जात असतो, आणि त्यातूनच त्याचा एक कच्चा आराखडा बनत जातो. मग हळूहळू शब्द सहजपणे स्क्रीनवर उतरत जातात.. पण या वेळी परिस्थिती अगदी वेगळी झाली आहे..
या दिवाळीत आम्ही आमच्या पार्ल्याच्या घरी एकत्र जमलो होतो. त्या दोन दिवसांच्याच मुक्कामातही आम्ही उभयता फोर्ट मधील rhythm house ला जाऊन भरपूर परदेशी सिनेमांच्या DVDs बरोबर घेऊन आलो. :) त्यानंतर लगेच आलेल्या विकांताला -शनिवारी रात्री - हा चित्रपट बघायला बसलो. झोप अनावर झाल्यामुळे नाईलाजाने चित्रपट अर्ध्यावरच सोडला व सकाळी बघण्याचे ठरवले. पण रात्रभर बचैनी जाणवत होती. चित्रपट मनात रुंजी घालत होता. पुढे काय होणार आहे, याची सारखी उत्कंठा लागून राहिली होती. म्हणून सकाळी उठल्या उठल्या पटकन सर्व आवरून चित्रपट बघायला बसलो.....
शेवटचा डायलॉग- "no, it's for me."...... चित्रपट संपतो. आम्ही दोघेही freeze झालेलो... डोळ्यांच्या कडा ओलावलेल्या.. जीवाची घालमेल. काय वाटतेय नक्की समजतच नाहीये...
चित्रपट अनुभवून साधारण पंधरा दिवस उलटून गेलेले आणि हा लेख लिहायला घेतलेला - (म्हणजे dotted lines च्या आधीचा भाग हा साधारण आठवडाभरापूर्वी लिहिलेला आहे. ) काही सुचतच नाही. एरवीचे -शहाण्या मुलासारखे हाती लागणारे - शब्द कुठेतरी गायब झालेत. अजूनही असे वाटत आहे की माझे हे चित्रपट जगणे चालूच आहे. हा चित्रपट अजून उलगडतोच आहे... गेला आठवडाभर जवळपास रोज मी तो "शेवटचा सीन" बघतच आहे. आणि डोळ्यात पाणी आणतच आहे. वेड लागलेय कि काय आपल्याला?... इतके भारावून गेलो आहोत आपण ?
म्हणून ठरवले  -  काहीच बोलायचे नाही आता. सरळ  लिंक देऊन टाकायची तुम्हाला- तुम्हीच बघा तो चित्रपट आणि  अनुभवा स्वतःपुरतेच...काही जाणवले अंतर्यामी, तर  जरूर कळवा..

The Lives of Others

इतकेच सांगेन शेवटी, चित्रपट बघा मात्र नक्की...Otherwise, you will miss something real good...!! आणि हो, या चित्रपटातील central character निभावणारे Ulrich Muhe आता आपल्यात नाहीत......!!!!












Sunday, November 25, 2012

YouTube special: A bit of Fry and Laurie

Stephen Fry व Hugh Laurie- छोटया पडदयावरील एक अतिशय गाजलेली जोडगोळी. या दोघांचा A bit of Fry and Laurie हा धमाल शो BBC1 आणि BBC2 या channels वर १९८९ आणि १९९५ साली प्रसारित झाला. इंग्रजीचा अफलातून वापर आणि प्रासंगिक विनोद यांचा हा सुंदर मिलाफ. इंग्रजी भाषा कशी वळते हे जाणून घ्यायची इच्छा असलेल्या प्रत्येकाने आवर्जून पाहावा असा. या मालिकेतील काही भागांच्या लिंक्स वानगीदाखल खाली देत आहे. YouTube वर या मालिकेचे सगळेच भाग available आहेत.



Wednesday, November 21, 2012

YouTube special: Blackadder

Blackadder ही Rowan Atkinson ची आणखीन एक गाजलेली मालिका. त्यांचे एकूण चार खंड बीबीसी वर प्रसारित झाले. Edmund Blackadder या रोवानने साकारलेल्या मध्यवर्ती पात्रांबरोबरच  बाल्ड्रिक, प्रिन्स जॉर्ज, लेफ्ट. जॉर्ज, लॉर्ड चेम्बर्लीन अशी अनेक पात्रे त्या काळी तुफान लोकप्रिय झाली.
YouTube वर केवळ Blackadder या नावाने शोध घेतला तरी या मालिकेचे चारही खंड मिळतात. त्यापैकीच माझे काही आवडते भाग खाली जोडत आहे -

 Happy Viewing !! तुमचा अभिप्राय जरुर कळवा.




Sunday, November 18, 2012

भगव्याच निखाऱ्यावरती त्याची एकांत समाधी ...

आजची सकाळ. नेहेमीच्याच रविवार सकाळ प्रमाणे. तरीही खूप खूप वेगळी..
मी पेपर चाळत बसलेली -
ढाण्या वाघ हरपला..
युगांत..
The Tiger's Last Sigh..
कितीतरी पेपर्स, बातमी मात्र एकच. जसे कितीतरी नेते, पण बाळासाहेब एकमेव...
मथळे वाचून झाल्यावर पुढचा मजकूर वाचताच येत नाहीये. डोळे भरून आलेत. एरव्हीचा बुद्धिवाद बाजूला ठेवून अश्रू ओघळत आहेत.. खूप आश्चर्य वाटत आहे. स्वतःविषयीच..
आम्ही कोणत्याही पक्षाचे समर्थन न करणारे. मतदानाबाबत उदासीन. दंगल, बंद, मोर्चे या सगळ्याशिवायही प्रश्न सोडवता येऊ शकतील कदाचित, अशा मताचे. थोडेसे 'स्वतःपुरताच' मर्यादित विचार करणारे. आयुष्यात राजकारणापेक्षा कितीतरी महत्वाच्या आणि constructive गोष्टी आहेत ज्यामध्ये आपण स्वतःला झोकून देवू शकतो असे मानणारे... तरीही !
आठवली ती कालची संध्याकाळ. शनिवारची हक्काची दुपारची झोप झाल्यावर टीव्ही लावला. 'ती' बातमी पाहिली. पहिली प्रतिक्रिया- शेवटी आली बातमी ! दुसरी प्रतिक्रिया - इतर नेतेमंडळी काय बोलत आहेत ते तरी पाहू या. तिसरी प्रतिक्रिया - अरे, या channel वर बाळासाहेबांचीच मुलाखत दाखवत आहेत, ती ऐकायला हवी....
शेवटी रात्री दीड वाजता नाईलाजाने टीव्ही समोरून उठलो तेंव्हा एक विचार मनात येत होता - शेवटच्या कधी बरं इतक्या तन्मयतेने आपण टीव्हीवरील बातम्या पहिल्या होत्या? - हं, बरोबर, २६ नोव्हेंबर २००८. ताजवरील हल्ल्याच्या वेळी. त्यानंतर एकदम आज...
कुमार केतकर आणि निखील वागळे बाळासाहेबांचे चतुरस्त्र व्यक्तिमत्व उलगडत होते. संयुक्त महाराष्ट्र, शिवसेनेची स्थापना, दसरा मेळावे, आणीबाणी, बाळासाहेबांच्या अनेक प्रसंगातील भूमिका, उद्धव, राज....कितीतरी गोष्टी.. त्यातील राजकारण अनेक लोकांकडून ऐकलेले. पण राहून राहून एक प्रश्न पडत होता- ज्या दोन व्यक्ती कधीतरी साहेबांच्या टीकेच्या धनी होत्या, त्याच साहेबांविषयी इतके भरभरून, पोटतिडीकीने कसे बोलत आहेत? नंतर जाणवले की अश्या एक दोन नव्हे तर हजारो व्यक्ती आहेत. इतका कुठला magnetism असेल बरं यांच्याकडे? राजकीय विचारधारा व कृती काहीही असो, सगळ्यांचे या मुद्द्यावर एकमत होत होते - बाळासाहेबांसारखा माणूस पुन्हा होणे नाही....त्यांची व्यंगचित्रकारिता, उत्स्फूर्तता, कलाकारांविषयी असणारे प्रेम, त्यांच्या एखादया भूमिकेमागे असणारा विचार, त्यांचा परखडपणा, आक्रमकता, वैयक्तिक आयुष्यात जपलेली असंख्य नाती, बागकामाचा छंद .... सारेच 'प्रचंड' आणि अनाकलनीय...  सगळेच या अजब रसायनाबद्दल पुनःपुन्हा विचार करण्यास भाग पाडणारे !! अंथरुणावर पडलो खरे, पण झोप अशी येईच ना.
उगवली ती आजची सकाळ - उठल्यावर लगेचच हात टीव्हीच्या बटणाकडे.. आजचा दिवस आमच्यासारख्या लाखो लोकांनी बाळासाहेबांच्या नावे केला असेल...नऊच्या सुमारास मातोश्रीहून त्यांची महायात्रा निघाली. 'न भूतो न भविष्यति' असा जनसागर लोटलेला.. अश्रूंचे कढ, घोषणांचा गजर...'अमर रहे' ही घोषणा नेहेमीचीच पण ' कोण आला कोण आला, शिवसेनेचा वाघ आला' , किंवा ' परत या परत या, बाळासाहेब परत या' अशा घोषणा ऐकल्यावर पुन्हा मनात प्रश्नचिन्ह - अशी काय बरे जादूची कांडी होती या माणसाकडे? आपल्यासारख्या सामान्य माणसाना जिथे घरातील मोजक्या सदस्यांचीही मर्जी सांभाळणे कठीण जाते, तिथे माणसांचा व त्यांच्या भावनांचा महामेरू  कसा हाताळला असेल बाळासाहेबांनी?
मुंगीच्या पावलांनी अंत्ययात्रा पुढे सरकत होती. रिपोर्टर सांगत होता - इतक्या प्रमाणावर गर्दी १९५६ साली डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या वेळी लोटली होती. त्यानंतर आज....
संध्याकाळचे सहा-सव्वासहा वाजलेले. आज पहिल्यांदा दोन सूर्य एकाच वेळी अस्ताला चाललेले... घालमेल, उदासी, अनेक प्रश्नचिन्ह, भावनांचा गोंधळ... !! दिवसभर 'बाळासाहेब' या व्यक्तीच्या अनेक पैलूंवर चर्चा केलेली, वादविवाद झडलेले... आता मात्र उरली आहे ती निव्वळ शांतता !! कविवर्य अशोक बागवेंच्या शब्दात -
ज्वाळात जळून गेलेला तो सूर्यच होता आधी
भगव्याच निखाऱ्यावरती त्याची एकांत समाधी ...

बाळासाहेब... तुम्हाला मनापासून आदरांजली......!!!!




















Friday, November 9, 2012

YouTube Special: Not the Nine O'Clock News

नमस्कार,

मी वर लिहिले आहे ती विनोदी मालिका बीबीसी वर १९७९-१९८२ या काळात प्रसारित झाली होती. आपल्यापैकी काही जणांचा त्यावेळी जन्मही झाला नव्हता. :) पण या मालिकेतील विनोद आजही आपल्याला तितकेच हसवतात. ज्या अनेक ताऱ्यांचा उगम या मालिकेनंतर झाला त्यापैकी एक म्हणजेच आपला मिस्टर बीन. Rowan Atkinson च्या विनोदाचे आणखी काही पैलू उलगडण्याचा हा प्रयत्न. अर्थात या मालिकेतील प्रत्येक कलाकाराभोवती स्वतःचे असे वलय आहेच. आणि या सगळ्याला ब्रिटीश -stiff upper lip style- विनोदाची चटपटीत फोडणी!  समाजातील प्रत्येक स्तरामधील ढोंगीपणा त्यांनी अशा प्रकारे मांडला आहे की  तुम्हीही हे एपिसोड्स पाहिल्यावर म्हणाल - क्या बात है, लाजवाब  !!



Wednesday, November 7, 2012

YouTube Special: Rowan Atkinson

 मिस्टर बीन !! हे नाव ऐकल्यावरच लहानथोर सर्वांच्याच ओठांवर हसू उमटते. कमीत कमी शब्दांचा वापर करूनही केवळ अफलातून हालचालींच्या जोरावरही किती उत्तम विनोदनिर्मिती होऊ शकते, याचे चार्ली चाप्लिननंतरचे हे दुसरे आदर्श उदाहरण. अर्थात Rowan Atkinson हा फक्त मूकाभिनय करू शकतो, असे वाटत असेल, तर खालील लिंक्स जरूर पहा. इथे शारीरिक हालचाली नाहीत. रोवानची सिग्नेचर असलेले गोंधळ किंवा अंगविक्षेप नाहीत. आहे तो फक्त इंग्रजीचा अप्रतिम वापर !! हे प्रवेश पाहिल्यावर मी इंग्रजीच्या नव्याने प्रेमात पडले. :) रोवानचा मिस्टर बीन विसरायला लावणारे असे हे एक से बढकर एक प्रवेश आहेत. ते पाहताना पदोपदी त्याच्यातील चतुरस्त्र कलाकाराला सलाम ठोकावासा वाटतो.

 Elton John interview

 Beekeeping

Fatal Beatings

The Good Loser

Elementary Dating

Welcome to the Hell

Jesus

With friends like these

एन्जॉय !! :)



Tuesday, November 6, 2012

YouTube Special: विनोदाचे वारकरी Abbott व Costello

मला सांगा, १३ गुणिले ७ किती? काय म्हणालात? ९१?
चूक. अगदी चूक. अहो १३ गुणिले ७ बरोबर २८ ! विश्वास नाही बसत? खालील स्पष्टीकरण पहा मग-
 abbott and costello 13 x 7 is 28


Abbott आणि Costello - कृष्णधवल चित्रपटांच्या काळातील अतिशय लोकप्रिय विनोदी जोडगोळी. असे म्हणतात, की लोकांना रडवण्यापेक्षा हसवणे जास्ती कठीण आहे. आणि त्यातही अशी clean, आणि फक्त शाब्दिक comedy बघायला मिळणे हे आणखी दुर्मिळ. हा सर्व सीन सलग चित्रित करण्यात आला आहे. यावरूनच या जोडगोळीचे अशा प्रकारच्या विनोदावरील वर्चस्व सिद्ध होते.

या दोघांचाच आणखी एक गाजलेला प्रवेश म्हणजे - Who is on first. त्याची लिंक खालीलप्रमाणे.
 Abbott and Costello who is on first
 हा ही  प्रवेश सलग चित्रित करण्यात आला आहे. Seriously Hats off to these guys..!!!


आणखी एक छोटासा प्रवेश-
Abbott and Costello two tens for a five

Happy Viewing !!!




Thursday, November 1, 2012

YouTube Special: Skyfall

आज एक नोव्हेंबर ! भारतातील बॉण्डप्रेमींसाठी खास दिवस. कारण आज नवीन बॉण्डपट Skyfall रिलीज झालाय ना. अर्थात आजचा विषय बॉण्ड आणि त्याच्याशी निगडीत असंख्य गोष्टी हा नाहीये. तर त्या निमित्ताने तुम्हाला सांगायचे आहे Adele या गुणी गायिकेबद्दल.
फक्त २४ वर्षाची ही गायिका, कवी, आणि संगीतकार.  YouTube वर अपलोड झालेल्या तिच्या अनेक गाण्यांना कोट्यावधी हिट्स मिळाल्या आहेत. त्यातील माझ्या आवडीच्या चार गाण्यांच्या लिंक्स खाली जोडत आहे. त्यापैकी एक आहे अर्थातच Skyfall या बॉण्डपटाचे थीम साँग - निव्वळ अप्रतिम. जरूर ऐका आणि पहा.






Wednesday, October 31, 2012

YouTube Special: In Search of the Giant Anaconda

असे चक्रावून जाऊ नका - "हे काय? सलग तिसरा भाग सापांवर?? " म्हणून. मी तरी काय करू? साप आणि ऑस्टिन महाशय असे आणखीन एक combination मला YouTube वर सापडले. हा anaconda वरील भागसुद्धा मी कितीतरी दिवस शोधत होते. पण अडचण तीच. कार्यक्रमाचे नाव काही केल्या सापडत नव्हते. अखेरीस सापडले एकदाचे. आता YouTube वर लिहीतेच आहे तर हा भाग शेअर न करून कसे चालेल?


तर Anaconda - त्याच्यावरील भयंकर Hollywood चित्रपट पाहून आपल्याला माहित झाला आहेच. :) (त्या चित्रपट मालिकेतील तिसरा भाग तर अगदी कहर आहे - काय तर म्हणे साठ फुटी anaconda !! त्याची भीती वाटण्याऐवजी  हसूच येते.)


असो, पण इथे मात्र ऑस्टिन महाशय निघाले आहेत खऱ्याखुऱ्या green anaconda च्या शोधात. जाऊन पोचले आहेत थेट amazon नदीवर. :) या नदीवरचा त्यांचा मनोरंजक प्रवास आणि शेवटी त्यांच्या प्रयत्नांना आलेले यश हे सर्व चित्रित करणारी अतिशय सुंदर documentary - त्याची लिंक:
 http://www.youtube.com/watch?v=bENFSFR9LMw

Happy Viewing. :)


 

Monday, October 29, 2012

YouTube special: In Search of the King Cobra

नमस्कार,
YouTube special मालिकेतील हा तिसरा भाग. परत एकदा नागाधीराजालाच समर्पित. :)
तुम्ही Austin Stevens हे नाव ऐकले आहे का? National Geographic व Discovery ही channels नेमाने बघणाऱ्या सर्वांनाच ही वल्ली माहित असेल. मोठा अवलिया इसम - फोटोग्राफर, सर्पमित्र, इत्यादी अनेक बिरुदे लागलेला एक खराखुरा निसर्गप्रेमी. त्याच्या निवेदनाने आणि वावराने नटलेली ही किंग कोब्रा वरील आणखी एक documentary. त्यात नायक अर्थातच किंग कोब्रा असला, तरीही इतर असंख्य प्रकारच्या सापांविषयी अतिशय रोचक माहिती या Stevens साहेबांनी दिली आहे. सोबतीला त्यांच्या अनेक live performances ची फोडणी आहेच. एकूण काय, तर कोणत्याही सर्पप्रेमीने अजिबात चुकवून चालणार नाही अशी ही documentary. तिची लिंक खाली देत आहे.
http://www.youtube.com/watch?v=qTG0ITwemLc



Sunday, October 28, 2012

YouTube Special: Secret of the king cobra

किंग कोब्रा ... नागधीराज !! जगातील सर्वात विषारी तरीही सर्वात देखणा सर्प. hypnotic. या सापाकडे पहिले की कुतूहल, भीती, आदर अशा सर्वच भावनांची मनात गर्दी होते.
National Geographic channel ने काही साधारण दोन वर्षांपूर्वी किंग कोब्रा वर जवळपास एक तासाभराची सुंदर आणि अतिशय माहितीपूर्ण documentary प्रक्षेपीत  केली होती. ती आम्हा उभयतांनी अगदी तन्मयतेने पाहिली. त्या documentary मध्ये किंग कोब्राच्या एकंदरीत आयुष्याचा मागोवा घेतला होता. त्यातील एका प्रसंगाने तर आम्हाला कमालीचे disturb केले. एकंदरीतच मिळालेल्या रोचक माहितीमुळे या जातिवंत जनावराविषयीचे कुतूहल खूप वाढले.
त्यानंतर बरेच दिवस आम्ही ही documentary YouTube वर मिळते का ते पाहण्याचा प्रयत्न केला. पण व्यर्थ. किती तरी वेळा "किंग कोब्रा" असा सर्च टाकला पण हवे ते काही गवसले नाही. बरे, कार्यक्रमाचे नावही नीट माहित नव्हते. आणि एक दिवस अनपेक्षितपणे खालील लिंक मिळाली-
http://www.youtube.com/watch?v=XiYOW7XMM1E
आमच्या आनंदाला पारावर उरला नाही. या कार्यक्रमाचे पुढचे तीन भाग खालील लिंक्सवर उपलब्ध आहेत.
http://www.youtube.com/watch?v=gNRrdYcUHv4&feature=relmfu
http://www.youtube.com/watch?v=v5vH78Kv1ik&feature=relmfu
http://www.youtube.com/watch?v=McsCnX42UVc&feature=relmfu





Friday, October 26, 2012

YouTube special: हर दिल को सुनाते है...

नमस्कार,
YouTube - मनोरंजन क्षेत्रातील नवा आध्याय !! माहितीचा खजिना. आपल्याला हवे ते मिळवून देणारी अलिबाबाची गुहा..!! कोणतेही गाणे हवेय?, एखादी जुनी documentary बघायचेय? कि चक्क एखादा चित्रपट पहायचा आहे?प्रश्न कितीही, उत्तर एकच - YouTube..!!
पुढील काही दिवस मी YouTube वरील माझे शोधकार्य आपल्याबरोबर शेअर करणार आहे. आता तुम्हाला वाटेल यात काय विशेष? एखादा योग्य तो keyword टाकून हवी ती गोष्ट मिळवणे कितीसे कठीण आहे? त्यासाठी म्या पामराने खास लेखमाला वगैरे खरडायची काय गरज आहे? पण माझा अनुभव असा आहे की अशा प्रकारच्या सरळ साध्या  शोधमोहीमेतही अनेक अडचणी येऊ शकतात. काही वेळा कार्यक्रमाचे नीट नावच माहित नसते. तर काही वेळा गाण्याचे शब्द -म्हणजे धून तर डोक्यात घोळत असते पण कुठेतरी काहीतरी अडते हे खरे. :)
असो, तर या लेखमालेचा उद्देश हा, मला सापडलेला माहितीचा मनोरंजक खजिना आपल्यापुढे मांडायचा, इतकाच आहे.  या लिंक्स  पाहून अगदी मुठभर लोकांना जरी काही तरी हवे ते गवसल्याचा आनंद मिळाला तरी मला खूप समाधान आहे.
तर, आजचा पहिला भाग -  २० वर्षापूर्वीच्या दूरदर्शनवरील गाजलेल्या एका सिरीयलवरचा !! माझी खात्री आहे, ही सीरिअल आजही अनेकांच्या मर्मबंधातील ठेव असेल. दीपिका देशपांडे आणि कंवलजीत सिंग यांच्यातील अनुबंध हळुवारपणे उलगडणारी, आणि बरोबर १४ भागात संपूनही खूप  हुरहूर लावून गेलेली अशी ही सीरिअल - अर्थात फरमान..!!


इतकी वर्षे झाली तरी ही सीरिअल आठवणीच्या कप्प्यात खास जागी विराजमान आहे. ती मिळवण्याचा मी आटोकाट प्रयत्न करत होते- खूप दिवस. YouTube ही अर्थातच शोधून झाले होते, पण हाती लागला तो २ मिनिटाचा एकमेव एपिसोड.. :( पण म्हणतात ना -प्रयत्ने वाळूचे... , तसेच झाले. माझ्यासारखीच अनेकांची इच्छा तीव्र असणार बहुतेक म्हणून एक दिवस पाहते तो काय? फरमानचे सर्व भाग खुद्द दीपिका देशपांडेनेच  अपलोड केले होते... एखादा खजिना सापडल्याचा आनंद झाला त्यावेळी... पहिल्या भागाची लिंक खाली जोडत आहे -

http://www.youtube.com/watch?v=tmuKNpF7Ge0


त्यापुढील सगळे भाग आपल्याला शेजारील विंडो मधून access करता येतील.
तेंव्हा Happy Viewing. आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा.

Thursday, October 25, 2012

Buon appetito! - अर्थात Happy Pasta Treat

आताच कॅमेऱ्यामधील सगळे फोटो कॉम्पुटरवर घेत होते. सर्व फोटो कॉपी  झाल्यावर ते पुन्हा निवांतपणे चाळणे ओघाने आलेच. बघताना मध्येच एका फोटोपाशी थबकले. माझ्या आवडीच्या ट्रेमध्ये तीन बाउल भरून पास्ता रचलेला. कधी काढला होता बरे हा फोटो?.. हं, साधारण महिन्यापूर्वीचा दिसतोय - आणि मग down the memory lane जाता जाता शेवटी त्या रविवारच्या सुंदर दुपारपाशी येऊन थबकले.
रविवार असूनही दोन्ही बायका येऊन त्यांची कामे करून गेल्या होत्या. (हा भाग्ययोगच एकप्रकारे. कारण काही वेळा सुट्टीच्या दिवशी आम्ही तयार होऊन बसलो असतो बाहेर जाण्यासाठी व या पठ्ठया काही यायचे नाव घेत नाहीत.) आम्हीपण सर्व आवरून निवांतपणे सोफ्यावर आपापल्या आवडत्या जागी विराजमान झालो होतो. टीव्हीवर (कधी नव्हे तो) तिघांच्याही आवडीचा मनपसंत चित्रपट चालू होता. साधारण एकच्या सुमारच तिघानाही एकदमच भुकेची जाणीव झाली. व तिघानाही पास्त्याचे डोहाळे लागले. मग काय, त्यांचा सेनापती (अर्थात अस्मादिक) लागले तयारीला. घरात तशी सगळीच तयारी होती. देर थी  तो बस्स  सभी चीजोंको एकसाथ मिलानेकी !! उनपे थोडा प्यार छिडका, और तय्यार हो गया- मम्मी स्पेशल पास्ता !! (थोडेसे - नाही, बरेचसे- नाटकी वाटते का? कदाचित जाहिरातींचा परिणाम असेल.. By the way,  माझा मुलगा अजून तरी आम्हा दोघांना स्वच्छ आई-बाबा असेच म्हणतो.. :)  )
तर कुठे होते मी? हं, पास्ता !! चला तर, पाहूया साहित्य आणि कृती?
साहित्य:
sunfeast pasta treat चे एक पाकीट (double pack- मी कॉर्न-बेस असलेला घेतला होता.)
चिरलेल्या भाज्या - जसे की कोबी, कांदा, टोमाटो, बिन्स, गाजर, किंवा suitable आणि आवडणाऱ्या दुसऱ्या कोणत्याही (पथ्य एकच की त्या सर्व भाज्या बारीक चिरून घ्याव्यात.)
दोन चमचे बटर
दोन चमचे ओलिव्ह तेल
५-६ पाकळ्या लसूण बारीक चिरून
चवीपुरते मीठ
mixed hurbs
चीज वगैरे आवडीनुसार
कृती:
  1. प्रथम बटर मध्ये चिरलेला लसूण परतून घ्यावा व त्यातच चिरलेल्या भाज्याही परतून घ्याव्यात.
  2. भाज्या शिजत असतानाच एकीकडे पास्ता नेहेमीच्या पद्धतीने करून घ्यावा. (आपण दो-मिनिट नुडल्स करतो त्याच प्रकारे). पास्ता पाण्यात उकळत असतानाच त्यात दोन चमचे ओलिव्ह तेल घालावे. 
  3. पास्ता नीट शिजला कि तो भाज्यांमध्ये मिक्स करावा.
  4. या मिश्रणात चवीपुरते मीठ (भाज्यांसाठीच, कारण पास्ता-मेकर मध्ये मीठ असते), व mixed-hurbs घालावेत.
पुढील दोन मिनिटात पास्ता तयार आहे. त्याचा आस्वाद घ्यावा.




Wednesday, October 24, 2012

दसरा स्पेशल- अरिनमेवा

नमस्कार,
पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय- अर्थात खादाडी.
आता तुम्ही म्हणाल की जर दसरा स्पेशल असे शीर्षक आहे तर नक्कीच ही श्रीखंडाचा कुठलातरी प्रकार टाईपणार असेल. :) पण अरिनमेवा हा काय प्रकार आहे? सांगते.
अरिन म्हणजे आमच्या सुपुत्राचे नाव आणि त्याच्यासाठी केलेला खाऊ म्हणजे अरिनमेवा. :) (थोडेसे 'रानमेवा' सारखे. :) )
त्याला आवडते म्हणून गेल्या आठवड्यात जवळपास ५ लिटर दुधाचे श्रीखंड करून ठेवले होते, आणि त्यातले तो रोज थोडेथोडे इमाने-इतबारे संपवत होता. :) त्यामुळे आमच्याही सर्वांगाला मुंग्या चिकटतील कि काय, अशी शंका येण्याइतपत साखर खाऊन झाली होती. तेंव्हा म्हटले की दसऱ्याला पुन्हा साखरेने ओथंबलेले पक्वान्न करण्यापेक्षा दुसरे काहीतरी ट्राय करावे. (सौ चुहे खाके .... दुसरे काय) ! ह्या सुविचारातून जन्म झाला आजच्या लाडवांचा !! आता इतके पुराण सांगून झाल्यावर कृती सांगू का? :) तर-
साहित्य-
जाडसर कणिक २ वाटया
जाड मुगाचे पीठ १ वाटी
बदाम पावडर अर्धा वाटी
खारीक पावडर, तीळ पावडर, खसखस पावडर हे सगळे मिळून अर्धा वाटी
ओला खजूर एक वाटी
तूप दीड वाटी
पिठीसाखर ५ मोठे चमचे

कृती-
  1. प्रथम ओला खजूर तीन-चार तास भिजत टाकावा. मग त्यातील बिया काढून टाकाव्यात आणि मिक्सरमधून त्याची गुळगुळीत पेस्ट तयार करून घ्यावी.
  2. बदाम ३-४ तास भिजत टाकून साले काढून घ्यावीत व बदामांचीही पावडर तयार करून घ्यावी.
  3. तीळ व खसखस खमंग भाजून घ्यावे आणि त्यांची पण पावडर करून घ्यावी. खारीक पावडर तयार बाजारात मिळते.
  4. मग एक वाटी तुपात कणिक खमंग भाजून घ्यावी. त्यातच बदाम, खारीक, खसखस, व तीळ या सर्व पावडरी टाकून पुन्हा हे मिश्रण परतून घ्यावे. consistency साठी नंतर हे सर्व साहित्य फूड प्रोसेसर मधून फिरवून घ्यावे.
  5. दुसऱ्या पातेल्यात अर्धा वाटी तुपामध्ये मुगाचे पीठ छान भाजून घ्यावे. हे मिश्रण सैलसर झाल्यावर आणि पिठाचा उग्र दर्प गेल्यावर त्यामध्ये  खजुराची पेस्ट टाकून पुन्हा परतून घ्यावे.
  6. ही दोन्ही मिश्रणे एकत्र करावीत त्यांच्यामध्ये पिठीसाखर टाकावी, आणि लगेच हाताला थोडेसे तूप लावून, या मिश्रणाचे (जमतील तसे) लाडू वळावेत. 
तर आज हा प्रयोग करून पाहिला, आणि जेंव्हा आमच्या चिरंजीवानी लागोपाठ दोन लाडू पळवले, तेंव्हा प्रयोगाच्या यशस्वीतेची पावती पण मिळाली. :)









Tuesday, October 23, 2012

इंग्लिश विंग्लिश- अर्थात शोध स्वतःचा !!

गेल्या आठवडयातील सर्वात सुंदर गोष्ट कोणती असेल तर इंग्लिश विंग्लिश हा चित्रपट दोन वेळा पाहता आला- एकदा माझ्या best half बरोबर आणि दुसऱ्या  वेळेला आईसोबत.
खरच सांगते, काय सुंदर अनुभव होता. श्रीदेवीच्या आतापर्यंच्या पडदाभर व्यापून उरणाऱ्या  अस्तित्वाला वेगळ्या प्रकारे छेद देणारा.. त्याचवेळी तिची नवीन इमेज आपल्या मनभर व्यापून टाकणारा..
हा चित्रपट दोन स्त्रियांचा- एक अर्थातच श्रीदेवी, आणि दुसरी या चित्रपटाची दिग्दर्शिका गौरी शिंदे !! चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी सर्वसामान्य लोकांना माहित नसलेली गौरी आज घराघरात जाऊन पोचली आहे. कोणताही बडेजाव न आणता गोष्टीरूपात तुमच्या-आमच्या आयुष्याची कथा सादर करायची तिची हातोटी विलक्षण आहे. तसे पहिले तर हा विषय खूप नवीन आहे असे नाही. तरीही तो पडद्यावर पाहताना एक क्षणही कंटाळा येत नाही हे श्रेय या दोन superwomen चे. मांडणीतला इतका साधेपणा, विषय सोपा करून सांगण्याची वृत्ती, पण तरीही.. तरीही काहीतरी वेगळे, थेट भिडणारे असे तत्वज्ञान.. असा त्रिवेणी संगम या चित्रपटाच्या निमित्ताने पाहायला मिळतो.. भाषा शिकणे हे केवळ निमित्त, पण त्या अनुषंगाने इतर कितीतरी महत्वाच्या मुद्द्यांना हा चित्रपट स्पर्श करतो.
गोष्ट एका संसारी स्त्रीची. राजा-राणी, दोन मुले व मुलांची आजी असे पुण्यातील सुखी कुटुंब. बाबा नोकरी करणारे, व आई  गृहिणी - हो गृहिणीच, कारण तसे पहिले तर ती अतिशय निगुतीने लाडू करून ते विकत असली तरी घरच्यांच्या दृष्टीने हा प्रकार फारसा दखल न घेण्याजोगा - घरचे लोक ही  तुमच्या-आमच्यासारखीच सामान्य माणसे. ती वाईट, खलनायकी मुळीच नाहीत. त्या चौघांचेही त्या गृहिणीवर खूप प्रेम आहे- अगदी सासुचेसुद्धा !  पण झालेय असे, की ही कथानकाची नायिका, खरेतर अतिशय हुशार असूनही कुठेतरी आत्मविश्वास गमावून बसली आहे. त्याचे मुख्य कारण म्हणजे तिचे इंग्लिश कच्चे आहे. त्यामुळे ती नकळतपणे मुले व नवऱ्याच्या चेष्टेचा विषय झाली आहे. तिला जाणूनबुजून दुखवायचा प्रयत्न कोणी करत नसले, तरी आपली नायिका मात्र आतल्याआत कुढत आहे. "आपण कोणालाच नकोसे आहोत की काय? " असा थोडासा टोकाचा विचारही कधीकधी तिच्या मनात येऊन जातो. (चित्रपटाच्या शेवटी ती तिच्या या अवस्थेची कारणमीमांसाही अतिशय समर्पकपणे आणि नेमकेपणाने करते. )


तिच्या आयुष्याला कलाटणी मिळते जेंव्हा तिला तिच्या भाचीच्या लग्नासाठी एकटीला अमेरिकेला जावे लागते. त्यानंतर तिचे एका -चार आठवडयांमध्ये इंग्लिश शिकवणाऱ्या - क्लासमध्ये जाणे, तिचे तेथील सोबती, आणि सर्वात शेवटी तिचा परत आलेला आत्मविश्वास, या सर्व इथे वाचण्यापेक्षा अनुभवायच्याच गोष्टी आहेत.


या चित्रपटाचा आत्मा अर्थातच श्रीदेवी. एक मध्यमवयीन, आत्मविश्वास गमावलेली स्त्री तिने ज्या तडफेने रंगवली आहे त्याला खरोकारच तोड नाही !! एरवीची नृत्यात अप्सरा असलेली श्री, या चित्रपटातील काही मोजक्या प्रसंगात ज्या प्रकारे अडखळत, लाजत नाचते त्या अभिनयाला खरच hats off !!! शशी गोडबोलेची (या चित्रपटाची नायिका) खंत, उदासी, मध्यमवर्गीय साधेपणा, आणि तरीही अंगभूत हुशारीमुळे नवीननवीन आव्हानांना सामोरे जाताना परत मिळालेला आत्मविश्वास, त्याचबरोबर दुसऱ्यांचे  आपल्या प्रेमात पडणे अतिशय समजूतदारपणे आणि maturity ने हाताळायची वृत्ती  ह्या व अशा असंख्य गोष्टी श्रीदेवीने अतिशय समजून घेऊन साकारल्या आहेत. तिच्या तोंडी असलेले कितीतरी वरवर सहज वाटणारे संवाद पण एखादे तत्वज्ञान सांगून जातात. हे श्रेय अर्थात दिग्दर्शिकेचे. संपूर्ण चित्रपटात कुठेही भपका नाही. खोटा डामडौल नाही. आहेत ती तुमच्या-आमच्या सारखी हाडामासाची जिवंत माणसे !! मेणाचे पुतळे नव्हेत...!!



अर्थात वर म्हटल्याप्रमाणे भाषा शिकणे हे निमित्तमात्र, पण या चित्रपटात जो मुख्य विचार मांडला आहे तो खरोखर स्तुत्य आहे. चित्रपटाच्या शेवटी श्रीदेवी आपल्या फ्रेंच सोबत्याला उद्देशून म्हणते - जब हम अपने आपको पसंद नही करते, अपने आपसे नफरत करते है, तो आसपास की कोई चीज हमे अच्छी नही लगती और मन दुसरी, नयी चीजोंकी तरफ आकर्षित हो जाता है. मगर जब हम खुदसे प्यार करना सीख जाते है, तो वोही चीजे हमे बिल्कुल नयी लगने लगती है. Thank you for teaching me to love myself.... "




खरेच, स्वतःवर प्रेम करणे, स्वतःमधील असामान्यत्व शोधणे आणि त्याच्या जाणीवेने आतून शांत होणे.... किती सुंदर process आहे नं  ही ! पण आजूबाजूच्या भाऊगर्दीत हरवून जात असताना आपण नेमके आत्मभान जपायला विसरतो. त्याचे परिणाम - हरवलेला आत्मविश्वास, दुखावलेली मने, वाटणारी खंत... एक ना दोन !!
चला तर, स्वतःला थोडेसे मोकळे करू या. ज्या इज्जतीची, मानाची आपण समाजाकडून अपेक्षा करतो, ती सर्वप्रथम आपणच आपल्याला देऊ या. आत दडलेल्या कलाकाराला जागे करू या. आपल्यामध्ये काय उणीवा आहेत त्याच्याबद्दल विचार करून खंतावत बसण्यापेक्षा आपल्यातील गुणांना मनोहारी पैलू पाडू  या..!!






आपणा सर्वाना विजयादशमीच्या खूप साऱ्या  शुभेच्छा.. !!

टीप: वरील सर्व चित्रे महाजालावरून साभार...
















Friday, October 12, 2012

अकेले है, तो क्या गम है ?

' मनुष्य हा समाजप्रिय प्राणी आहे'
'Man is a social animal '

लेखाचे शीर्षक म्हणजे वरील समाजमान्य कल्पनेला उघडपणे छेद  देणारे आहे, याची मला कल्पना आहे. बऱ्याच जणांना असेही वाटेल की "काय बोलतेय ही ?" एकटेपणा हा फक्त लादलेला असू शकतो. एकटेपणात आनंद कुठून आला? मला ओळखणारे काही कदाचित असेही म्हणतील, "सर्व काही दृष्ट लागण्यासारखे चालू असताना कसला एकांत हवाय हिला? काहीतरीच खूळ आहे झालं."
पण तुम्हाला सांगू का? मी कायम एकटेच राहण्याचा प्रचार आणि समर्थन अर्थातच करत नाही आहे हं ! मी म्हणतेय तो एकांत म्हणजे स्वतःच स्वतःला बक्षीस दिलेले आयुष्यातील काही क्षण !!
असे कधी जाणवलेय का तुम्हाला, की आयुष्यातील बराच काळ  आपण कोणाचेतरी-कोण असेच जगत असतो- जसे की राजूचे बाबा, मिनीची आई, रेवाची सासू, मिसेस काळे, टीमचा manager, सोसायटीचा गुरखा, कामतांकडील पोळ्यावाली वगैरे वगैरे.. लक्षात आले न मला काय म्हणायचेय ते ! अर्थात या सगळ्याच्या विरुद्ध नाही आहे हं मी. एका निरोगी, सुदृढ समाजाकरिता हे सर्व धागेदोरे आवश्यक आहेत.आपल्या आयुष्याचे इंद्रधनुष्य या सर्व लोकांमुळेच तर सजत असते.
हे सर्व मान्य केले तरीसुद्धा काही वेळा मात्र आपला स्वतःचा  रंग कोणता? असा प्रश्न भेडसावत राहतो मनाला. आजूबाजूच्या -एरव्ही आपल्या आत्यंतिक जवळच्या- माणसांची गर्दी वाटू लागते. त्यांच्या गुजगोष्टी या गोंगाट वाटू लागतात. त्यांच्या सहज केलेल्या सूचना या आपल्यामध्ये केलेला हस्तक्षेप वाटू लागतो.....
यापैकी काहीही झाले की खुशाल समजावे - आपल्या मनाला आपली गरज आहे !! सारे काही, थोड्या वेळापुरते बाजूला ठेवून फक्त मनाचे ऐकायचे आहे. त्याचे लाड करायचे आहेत. काहीही हस्तक्षेप न करता त्याच्या सगळ्या तक्रारी ऐकून घ्यायच्या आहेत.
माझ्या मते तरी प्रत्येकाला कधी न कधीतरी अशा एकांताची नितांत आवश्यकता असते. हे एक प्रकारचे cleansing आहे म्हणा ना!! आपल्या मनाचे. मनातील सर्व शंका-कुशंका, चिडचिड, राग बाहेर काढून पुन्हा नव्याने आयुष्याला, आपल्या माणसाना सामोरे जायचे...
मला तरी असे cleansing खूप आवडते. आज असेच झाले. तसे काहीच कारण नसताना मन उगाचच मलूल झाले होते. काही सुचत नव्हते. एक प्रकारची बेचैनी भरून राहिली होती. मनाचे ओरडणे बाहेर ऐकू येईल कि काय अशी शंका वाटायला लागली तेंव्हा ठरवले, की स्वतःलाच छान मेजवानी द्यायची. आतून शांत व्हायचे.. मग काय, lunch-break मध्ये माझ्या आवडीच्या एका छानश्या हॉटेलमध्ये गेले- हो, एकटीच.. ! त्या तारांकित हॉटेलमधील कर्मचारीवर्गही चेहेऱ्याने  ओळखीचा झाला आहे. आजवर मी, माझे पतीदेव, व आमचे पिल्लू, अशा त्रिकुटाचे स्वागत करण्याची सवय असलेल्या त्या लोकांना मला एकटीलाच पाहून थोडे आश्चर्यच  वाटले. पण त्यांनी तसे न दर्शवू देता मला छान कोपऱ्यातले टेबल दिले. माझा पुढील एक तास अतिशय मस्त गेला. मेनुमधील चविष्ट डिशेस खाऊन बघताना मला जाणवले की  कितीतरी दिवसात आपण मनापासून पदार्थांच्या चवीच  घेतल्या नाही आहेत. असे एकटे बसलोच नाही आहोत बरेच दिवसात आपण...लोकांच्या -एकट्या माणसाकडे बघून टाकल्या जाणाऱ्या- सहानुभूतीच्या नजरांचीसुद्धा इतकी गम्मत वाटत होती !! शेवटी dessert खाताना मला कळले की  आपले मन पण आपल्यासारखेच तृप्त, शांत झाले आहे.... Alexander Pope या सुप्रसिद्ध कवीची "solitude" ही कविता अर्थासहित उलगडायला लागली आहे....
तेंव्हा वाचकहो, Enjoy the solitude, till it lasts...!! सोबतीला फक्त हे dessert.. आणि माझ्या शुभेच्छा....!!



Thursday, September 27, 2012

एक संवाद: गणपतीबरोबर !!

दरवर्षीप्रमाणे तुझे गणेशचतुर्थीला वाजतगाजत आगमन झाले. आमचा प्रचंड उत्साह ढोलताशांच्या रुपात प्रकट होतच होता. तुझे सुपाएवढे कान कितीही मोठा आवाज सहन करू शकतात - नव्हे, मोठा आवाज नसेल तर तो तुझ्यापर्यंत पोचणारच नाही - असे वाटल्यामुळे तर आम्हाला अधिकच चेव चढला होता. आजारी, वयोवृद्ध माणसे, तान्ही बाळे यांना त्याचा थोडा त्रास झाला असेल म्हणा, पण आमच्या तुझ्यावरील अगाध श्रद्धेपुढे या गोष्टी अगदी क्षुल्लक आहेत. समाजात असेही घटक आम्हाला सामावून घ्यावे लागतात त्याबद्दल आम्हाला माफ कर.
तुझ्या स्वागताची किती जय्यत तयारी करतो आम्ही ! मंडप, वाजंत्री, लाउडस्पीकर, देखावे.. एक न दोन हजार प्रकार. आता या सगळ्यासाठी कमी का पैसा लागतो? म्हणून आम्ही वर्गणी मागायला गेलो, तर काही समाजकंटक आम्हालाच उलटा उपदेश करायला गेले. आता, त्यांना कसे हाताळायचे हे माहित आहे आम्हाला, पण तरीही, लोक देवाच्या दारीही  पैसे देताना इतकी कटकट का बरे करतात? त्यांना माफ कर देवा !!
तुला माहित आहे? आमच्यातले काही वेडे असेही आहेत कि गणपती येणार, म्हटल्यावर त्यांना कसलेच भान राहत नाही. रात्रंदिवस जागून सजावट काय करतात, देखावे काय उभारतात- थोडक्यात निरपेक्ष सेवेचा आव आणतात !! आता तू सांग, लोक तुला बघायला येणार कि बाकीच्या गोष्टी? आणि सर्वात महत्वाचे काम तर दहा दिवस जागरण करण्याचे आहे, जे आम्ही करतो. मग तूच सांग, कोण तुझे खरे भक्त? आता, रात्रभर जागायचे म्हणजे थोडा विरंगुळा पाहिजेच नाही का? आणि शहरात तर जागाच इतकी कमी आहे कि मग नाईलाजाने आम्हाला पत्ते तुझ्यासामोरच खेळावे लागतात. पण आमचे जे कार्यकर्ते तुझ्यासमोर साधे जागरणही करू शकत नाहीत त्यांना माफी असावी देवा !!
या दिवसांमध्ये आम्ही इतर कामांबरोबरच सामाजिक एकोपा जपण्याचाही खूप प्रयत्न करतो. आमच्या मंडपातील लाउड स्पीकर्सवर "मुन्नी  बदनाम हुई", "शीला की जवानी", " "छम्मकछल्लो ", आणि "वाजले कि बारा" गुण्यागोविंदाने  नांदत असतात. काहीना ते ही  बघवत आणि ऐकवत नाही. अर्थात  काळजी नसावी देवा ! आम्ही तुला वचन देतो, की अशा लोकांना आम्ही कधीच भाव दिला नाही आणि यापुढेही देणार नाही.
तुझ्या भक्तांच्याही किती रे तऱ्हा !! काही सच्चे भक्त तुला मनापासून सोन्याने मढवून टाकतात. काही नुसता तोंडदेखला नमस्कार करतात तर काही तो ही करत नाहीत. तुला सांगतो देवा, सोन्याचांदीमुळेच तर तुझे रूप खुलते. अशावेळी तुझ्यासमोरील दानपेटीत एक बंदा रुपयाही न टाकता, वर तू त्यांना प्रसन्न झाले पाहिजेस, अशी निरर्थक अपेक्षा ठेवणाऱ्या खुळ्या भक्तांची अगदी कीव येते बघ आम्हाला !! एका हाताने द्यावे व दुसऱ्या  हाताने घ्यावे, हा साधा व्यवहार कळत नाही त्यांना? खरच कमाल आहे !!
सर्वात मजा येते ती तुझ्या विसर्जनानंतर !! आधीच काही नास्तिक कंठशोष करत असतात- तुझी उंची किती असावी यावरून !! आता तू मला सांग, देव खुजा दिसून चालेल काय? आणि तू किती उंच आहेस त्यावरच आमची भक्ती मोजली जाते न? मग? हा, आता मूर्ती खूप उंच म्हटल्यावर विसर्जनानंतर होणारी तिची विटंबना ओघाने आलीच. पण एकदा तुझ्यातले देवपण विसर्जित केले, कि मग तू काय, आणि साधी माती काय ! काय फरक आहे? ते पर्यावरणवादी उगाचच काहीतरी पराचा कावळा करतात झाले...!!
पण गणराया, तू घाबरू नकोस. केविलवाणा तर मुळीच होऊ नकोस. आम्ही आश्वासन देतो तुला, जोपर्यंत आमच्या जीवात जीव आहे तोपर्यंत आम्ही तुझ्या भक्तीचा बाजार असाच भरवत राहू...!! तुला सोन्याचांदीने असाच मढवत राहू..!! समाजातील माणुसकीचा बळी देवून तुझा गाभारा नेहेमीच भरत  राहू... !! Promise !!!





Wednesday, September 5, 2012

एक पत्र - आमच्या शिक्षकाला ...


 चि. अरिन,
सर्वप्रथम शिक्षकदिनाच्या अनेक शुभेच्छा !
तुला आमचा आद्य गुरु मानण्याचे कारण म्हणजे, रूढार्थाने आम्ही दोघे कितीही शिकलो असलो तरी आयुष्य जगताना लागणारी मुळाक्षरे ही तू आल्यानंतरच गिरवायला सुरवात केली रे आम्ही !!

प्रसंग पहिला - तुझा जन्मदिवस, अर्थात  १४ एप्रिल. भर उन्हाळ्याचे दिवस असल्याने हॉस्पिटल मधील चकाचक AC रूम घेतली असूनही त्यादिवशी नेमके लाईट गेलेले आणि भरीस भर म्हणून संपूर्ण हॉस्पिटलचा जनरेटर बिघडलेला! मी अतिशय अस्वस्थ होते. आणि जन्मल्याबरोबर बाळाला छान दुपट्यात गुंडाळायचे सोडून, तुझ्या दोन्ही आज्या तुला संपूर्ण उघडा करून हातावर घेऊन फिरवत होत्या, अगदी दिवसभर!! अशा हतबल वातावरणात अगदी शांत राहायचे सामर्थ्य कसे रे आले तुझ्याकडे ?

प्रसंग दुसरा - पाच महिन्याची maternity leave संपल्यामुळे तुला पाळणाघरात ठेवायला सुरुवात केली ते दिवस. बऱ्याच वेळा तर तू झोपेत असायचास. मग तू, तुझी bag, माझी पर्स अशी सगळी वरात रिक्षात बसायची. ते क्षण संपूच नये असे वाटत असतानाच पाळणाघर यायचे आणि मग मनात नसतानाही तुला शिल्पा टीचरकडे सोपवावे लागायचे. तिथे सर्व टीचर व मावश्या खूप खूप चांगल्या होत्या व त्यांनी तुला खूप जपले, तरीही माझ्या मनातील अपराधीपणाची भावना अजूनही तशीच आहे. पण तू ? डोळ्यात पाण्याचा थेंबही न आणता आनंदी चेहेऱ्याने परिस्थितीचा स्वीकार करण्याचा समंजसपणा  कुठे शिकलास तू राजा?

प्रसंग तिसरा - डॉक्टरांनी चुकीचे antibiotics दिल्यामुळे पुढचे तीन दिवस तुला हॉस्पिटलमध्ये राहावे लागले. त्यात भरीस भर म्हणून सलाईन नीट  लागले नाही, व तुझा गोजिरवाणा हात सुजला होता. आम्ही दोघे डोळ्यातले पाणी मोठ्या कष्टाने थोपवत होतो. अशा वेळी, हात दुखत असतानाही खूप खेळकर होतास तू. कसे जमवलेस रे बाळा हे?

प्रसंग चौथा- तू थोडासा मोठा झालेला. मस्त बोलायला शिकलेला. आणि आम्ही दोघे - अतिरिक्त वाढलेला मेंदू व शब्दसंपत्ती यांचा उपयोग एकमेकांशी भांडायला करणारे - जगातील असंख्य नवरा-बायको प्रमाणेच !! असेच एकदा आमची तात्विक चर्चा रंगात आली होती. आवाज चढत चालले होते. तू त्याच टेबलावर बसला आहेस, याची जराही दाखल नं  घेता. आणि अचानक तू म्हणालास, "आई बाबा, काळजी करू नका" .... आमचे शब्द घशातच अडकले. आपले बाळ इतके मोठे कधी झाले?..... खर सांगते अरिन,  त्या दिवसानंतर तुझ्या मांडीवर डोके ठेऊन तुझ्याकडून बोबड्या स्वरातील अंगाईगीते ऐकताना खूप आधार वाटतो रे !!

प्रसंग पाचवा -  तुझे बाबा तीन महिन्यासाठी १२००० मैल दूर गेलेले. मी मारे सगळ्यांना सांगितले कि राहू आम्ही दोघेच, पण ते तितके सोपे नसते हे जाणवत होते. अशातच एक दिवस दुनियेचा वैताग डोक्यात घेऊन आलेली मी, काहीतरी छोटेसे कारण होऊन तुला ओरड ओरड ओरडले. पण ते जाणवेपर्यंत उशीर झाला होता. तुला time-out दिल्यानंतर हताश झालेली मी सुन्नपणे सोफ्यावर जाऊन बसले- डोळे मिटून, कितीतरी वेळ - काही वेळाने तू जवळ आलास, आणि प्रेमाने म्हणालास - "आई, तू sad नको होऊस. i m sorry. मी नाही वागणार असे पुन्हा ".... माझा कंठ दाटून आला. सोनू, स्वतःच्या छोटुश्या चुकीबद्दल लगेच माफी मागण्याची शिकवण कोणी रे दिली तुला? मोठी माणसे नाही करत असे - इतक्या सहज...

असे किती प्रसंग तुझ्याबरोबरचे ... आमच्या डोळ्यात नवीन शिकवणीचे अंजन घालणारे ...!! 
खरच, राजा, तुझे असणे, म्हणजेच आमचे हसणे ! We remain indebted forever ....!!!

फक्त तुझेच, 
आई-बाबा









Monday, September 3, 2012

मेरे maggi की कहानी

गेले तीन आठवडे तसे धावपळीतच गेले. Deadlines, deliverables,  release... हुश्श ! आणि वीकांताना होणारा प्रवास. अगदी दमणूक झाल्यासारखी वाटत होती. शेवटी आज थोडे तापाचे निमित्त होऊन घरी बसावे लागले. ते ही बरेच वाटले, एकाअर्थी, कारण सक्तीची विश्रांती तरी मिळाली. पण अशा वेळी एकच गोष्ट त्रासदायक असते - स्वतः बनवून खाणे ! तोंडाची चव गेलेली असते. काहीतरी पटकन करायचे असते, आणि ते थोडेसे चमचमीत, आणि पोटभरीचे पण असावे लागते.  अशा वेळी maggi noodles घरात असणे हे अगदी मोठे वरदान आहे, असे वाटते.  मग काय, करू या तयारी ? बस्स  दो मिनिट  मे?

साहित्य - maggi noodles चे एक पाकीट,  १ चीज क्यूब, थोडासा टोमाटो  सॉस (ऐच्छिक)
कृती -
  1. प्रथम एका पातेल्यात दीड कप पाणी उकळत ठेवावे.
  2. पाणी उकळत असतानाच त्यात चीजचा क्यूब किसून टाकावा.
  3. चीज नीट  मिक्स झाले कि त्यात एक चमचा टोमाटो सॉस  टाकावा (हवा असल्यास).
  4. सर्वात शेवटी नेहेमीप्रमाणे मसाला, व नुडल्स मिक्स कराव्यात.
  5. मग ... टीव्ही चालू करावा, हवा तो सिनेमा लावावा, आणि गरमागरम नुडल्स सोबतीला घेऊन बसावे ...!!  आहे की नाही जीवाची चैन ...!!!



Friday, August 31, 2012

आपण एक सशक्त पालक आहोत का?

कालपरवाच पेपरमध्ये एक सुन्न करणारी बातमी वाचली- लहान मुलांच्या बेधुंद पार्टीची ! आज सकाळी टीव्हीवर त्याचसंदर्भात चर्चा चालली होती- मुलांमधील व्यसनांचे वाढते प्रमाण, त्यांच्यामधील बेपर्वाई, सतत नाविन्य मिळवण्याच्या ओढीपायी केलेले धाडस, वगैरे, वगैरे .
हे सर्व पाहून, ऐकून, अंतर्मुख झाले . मनात असंख्य प्रश्न पडले . वाटले - काहीतरी चुकत आहे नक्कीच ! पण त्याची जबाबदारी कुणा एका घटकावर टाकणे योग्य नाही . आपणा सर्वांनी मिळूनच कळत-नकळतपणे हे कोष विणले आहेत, आणि त्यात अधिकाधिक गुंतत चाललो आहोत . हा चक्रव्यूह भेदायचा असेल, तर किमानपक्षी पालकांनी थोडेसे आत्मचिंतन करणे अगदी गरजेचे झाले आहे . स्वतःला काही प्रश्न विचारून त्यांची परखड उत्तरे मिळवायलाच हवीत, आपल्या सर्वांच्याच निरामय आयुष्यांसाठी !!
  • निरोगी संततीसाठी आपण मनापासून प्रयत्न करतो, तसेच ते बाळ  जन्माला आल्यावर त्याचे मानसिक संगोपन नीट होण्यासाठी विशेष प्रयत्न करणे, ही आपलीच जबाबदारी आहे, याची आपण सतत जाणीव बाळगतो का?
  • आपले मूल आपल्याशी मोकळेपणाने बोलते का? तितकी संधी, व तेवढा वेळ आपण त्याला देतो का?
  •  दिवसातून किती वेळ आपण मुलांबरोबर मूल होऊन रमतो? आपण त्याला/तिला मोठ्यांच्या म्हणवल्या जाणाऱ्या कामांमध्ये थोडेतरी सहभागी होऊ देतो का?
  • कुटुंबातील सर्वजण दिवसातून एकदातरी एकत्र जेवतो का? 'खरकटे हात तसेच आहेत, पण आपल्या गप्पा, चर्चा संपत नाहीयेत' असे सुंदर दृश्य आठवड्यातून किती वेळा आपल्या घरी दिसते?
  • ' भिंतीवर रेषा ओढल्या, खेळणी नीट  आवरली नाहीत, जेवताना अन्न खाली सांडले' या आणि अशा अनेक गोष्टी आपल्याला त्रासदायक वाटल्या, तरी त्याविषयी आपण मुलांना शांतपणे समजावतो का, की फक्त त्यांच्यावर ओरडतो?
  • आपण मुलांना फक्त महागडे computer games आणून देतो, कि कधीकधी त्यांच्याबरोबर मैदानात जाऊन भरपूर खेळाचा आनंदही घेतो?
  • स्वतःच्या हाताने लावलेल्या झाडाला आलेले पहिले फूल, रस्त्याने चालताना अचानक दिसलेला एखादा अनोळखी पक्षी, पहिला पाउस आल्यावर मातीला येणारा मंद सुगंध, आणि या सर्वामध्ये दाटलेला आनंद - याची ओळख आपण  त्याला करून देतो का?
  • आपल्या मुलाच्या मनात सभोवतालच्या जगाविषयी दडलेले कुतूहल आपण प्रामाणिकपणे शमवायचा प्रयत्न करतो का?
  • आपल्या मुलांना नकार सहज पचवायची सवय आपण लावत आहोत का? हे करत असतानाच त्यांच्या आत्मसन्मानाला दुखापत होणार नाही, याची काळजी आपण घेतो आहोत का?
  • आपल्या घराची ओढ आपल्या मुलाला वाटते की  मित्र-मैत्रिणींबरोबरच ते जास्त रमते?
  • कुटुंबातील सर्वजण मिळून कुठल्यातरी धमाल सहलीला गेले आहेत, असे चित्र किती दिवसांपूर्वीचे आहे ?
  •  उगाचच ओरडल्यानंतर कधी मनापासून मुलांची माफी मागितली आहे का? आपल्या स्वरातील सच्चेपणा त्याला जाणवला आहे का?
  • आपले आईवडील कायम आपल्या पाठीशी असतील, अशी आश्वासक जाणीव त्याला आहे का? आपले निरपेक्ष प्रेम त्याच्यापर्यंत पोचते का?
  • मुलांकडून सर्वच गोष्टीत यशस्वी होण्याची अपेक्षा ठेवतानाच काही वेळा अपयशही हसतमुखाने स्वीकारण्याची, व त्यातून बोध घेऊन पुढे जायची तयारी आपण ठेवतो का?
  •  त्याला नियमांचे पालन करायला सांगणारे आपण, कितीसे नियम स्वतः पाळतो? आपले वागणे त्याच्या नजरेत आदर्श आहे का?
  • आपले पाल्य एक डॉक्टर, इंजिनियर व्हावे या अपेक्षेबरोबरच, ते एक चांगले नागरिक व्हावे, यासाठी आपण प्रयत्न करतो का? आपण स्वतः  तशी वागणूक अंगीकारतो का?
  • आपले मूल खूप बुद्धिवादी व्हावे अशी अपेक्षा ठेवतानाच, त्याचा बुद्धिवाद आपण handle कसा करत आहोत हे ही आपल्याला महत्वाचे वाटते का?
खूप खूप आदर्श वाटते का सगळे? पुस्तकी? पण तरीही ...
प्रयत्न करायला काय हरकत आहे ?   शेवटी आपल्या रोपट्याचा एक विस्तीर्ण वृक्ष व्हावा अशी इच्छा असेल तर त्याला नीट खतपाणी घालण्याची जबाबदारी आपलीच नाही का?
आणि सर्वात महत्वाची गोष्ट - रोज, हो अगदी रोज, आपल्या आनंदाच्या ठेव्याला जवळ घ्या ... त्याला मायेने स्पर्श करा .. त्याला कळू  दे - तुमचे त्याच्यावर मनापासून निर्व्याज प्रेम आहे .... !! तुमच्या एका स्पर्शात त्याचे जग सामावले आहे ....!!

चला, आपण सर्व मिळून हे आयुष्य सुंदर बनवूया !! खूप उशीर होण्याआधीच .....!!






Wednesday, August 29, 2012

अरिन - आमचा friend, philosopher, and guide

ह्या व्यक्तीने आल्यापासून आमच्या संपूर्ण आयुष्यावर आपला अनभिषिक्त हक्क प्रस्थापित केला आहे. इतका, की तो येण्यापूर्वी आम्ही कसे जगत होतो, असा प्रश्न पडतो कधीकधी !

याचे वय वर्षे फक्त तीन, पण आव असा कि सगळे काही समजते . जरा काही मनाविरुद्ध झाले की त्याच्या नकट्या नाकावर गोडुला राग उमटलाच म्हणून समजा ! गाल तर असे गोबरे, की कायमच स्वारी लाडू खात बसली आहे असे वाटते. कधी तो "छोटा भीम" असतो, तर कधी "spider man"! कधीकधी तो चक्क डॉक्टर काका होतो, आणि घरातील सगळ्यांना एकच औषध देतो. एरव्ही दवाखान्यात जायला घाबरणारे आपण, या पिटुकल्या डॉक्टर-काकाच्या अगदी प्रेमात पडतो.

घरातील सर्वांपेक्षा हा चिमुरडा बिझी आहे. तो सकाळी साडेआठला शाळेत जातो तो संध्याकाळी साडेसहा वाजता परततो. त्याची अंघोळ, त्याचे खेळणे, खाणे, धडपडणे, रडणे, सगळे काही एक नवीन अनुभव असतो, अगदी रोज !!

दिवसभराच्या थकव्याने तो लगेच झोपून गेला तरी आम्ही मात्र त्याच्या लांब पापण्याआड दडलेल्या टपोऱ्या डोळ्यात लपलेली स्वप्ने शोधायचा प्रयत्न करत असतो ....ती सर्व साकार होवोत म्हणून मनोमन आशीर्वाद देत असतो .... आमच्या काळजाच्या तुकड्याला ... अरिनला !!!









Monday, August 27, 2012

फुलले रे क्षण माझे

एकदम गैरसमज नको. इथे फक्त मी काढलेले छान छान फुलांचे फोटो टाकत आहे.
गेल्या काही दिवसांमध्ये थोडे फिरणे झाले. माहेरी एक मस्त रिफ्रेशिंग चक्कर मारून आलो, आणि गेल्या शुक्रवारी ऑफिसची वर्षासहल होती. मनसोक्त फोटो काढता आले.
माणसांचे फोटो काढायचा मला तसा कंटाळाच आहे. :) त्यापेक्षा निसर्गाची वेगवेगळी रूपे कॅमेऱ्यात बंदिस्त करायला मला आवडते. त्याचेच हे काही नमुने -











Monday, July 30, 2012

वय वर्षे तीन आणि पहिली कमाई

शीर्षक वाचून आश्चर्य वाटले ना? 
आजचा लेख आहे माझ्या पिल्लावर ! जगातल्या कुठल्याही  आईप्रमाणे मला आता 'proud mother' असल्याचे फिलिंग आले आहे.
गोष्ट छोटीशीच पण शेअर करावीशी वाटली तुमच्याबरोबर- 
तर माझ्या तीन वर्षाच्या बछड्याच्या day-care मध्ये खूप छान छान activities सुरु असतात- हो, अगदी रोज! ही सर्व छ्बुकडी पण त्यात इतकी रमतात म्हणून सांगू? रोज त्याला day-care मधून घरी घेऊन जाताना त्याची अखंड बडबड सुरु असते, दिवसभर काय केले त्याबद्दल. बऱ्याच वेळेला त्याच्या दोन्ही हातांवर चिमुकल्या चांदण्या रेखलेल्या असतात- तो दिवसभर शहाण्या मुलासारखा वागला म्हणून!! ते चांदणगोंदण  पाहिल्यावर मग त्याला अगदी कुठे ठेऊ आणि कुठे नको असे होऊन जाते. जणूकाही मलाच मोट्ठे बक्षीस मिळाले आहे असा आनंद होतो. त्याच्या चेहेऱ्यावरचे निरागस हसू, मोठ्यामोठ्या डोळ्यात उमटलेले कुतूहल सगळे काही मनाच्या कुपीत साठवून ठेवावेसे वाटते. 
त्याच्या day-care मध्ये जुलै महिन्याची theme होती -' रेन' अर्थात पाऊस! इतक्या धमाल गोष्टी होत्या त्याअंतर्गत! एक दिवस या सर्व मुलांना त्यांचे आवडते chocolate कसे तयार होते त्याचे प्रात्यक्षिक दाखवले. एक दिवस बघते तर पिल्लाच्या हातात दोन-दोन कागदी बेडूक. :) त्याचा पूर्ण weekend त्या बेडूक-द्वयीबरोबर खेळण्यात गेला. 
मग आली नागपंचमी. त्यादिवशी त्याला घरी आणताना पाहिले तर स्वारी सारखी हात पसरून बघत होती. नीट निरखून पहिले तर त्याचे इवलूसे हात मेंदीने रंगलेले.. मुलांना पावसाळा, त्यात येणारे सण, नवजीवीत होणारी जीवसृष्टी यांची ओळख करून देण्याचा किती सुंदर मार्ग आहे न हा!
गेल्या आठवड्यात गम्मतच झाली. day-care मधून बाहेर पडताना अरीनच्या हातात एक थर्माकोलचा छान रंगवलेला कप होता. त्यात त्याने मेथीच्या बिया पेरल्या होत्या. 'आई, हि बघ माझी activity' - तो उत्साहात सांगत होता. गेला आठवडाभर आम्ही दोघे त्या मेथ्याना पाणी घालत आहोत. आता त्या कपातून मेथीची कोवळी पाने डोकावतायत. 
हा सगळा किस्सा मी माझ्या मैत्रिणीला सांगत होते तर ती उत्स्फूर्तपणे म्हणाली - अरे वाह, तेरे बेटे कि पेहेली कमाई !! अब उसे मेथीकी सब्जी खिलाना..!!
छोटेसेच वाक्य, पण माझ्या मनात रुतून बसले. वाटले, खरच सर्वच कमाई काही पैशात नाही मोजता येत. ती मेथीचे दाणे टाकताना वाटलेली उत्सुकता, त्यांना रोज पाणी देताना येणारी मजा आणि आता कोवळी हिरवाई बघताना मुलाच्या चेहेऱ्यावर दाटलेला निरागस आनंद - हि सर्व कमाईच नव्हे काय? त्याची आणि माझीही !! कधीही न संपणारी ....







                                                                





                                                                    


Sunday, July 8, 2012

Sunday Brunch - आलू पराठा

आठवडाभर वाट पाहिल्यावर आला एकदाचा रविवार. त्यात आजचे वातावरण पण कुंद, मंद, धुंद, असे. :) मग अश्या हवेत काहीतरी छान चवदार नको का? (तसे पाहायला गेले तर सर्वच प्रकारचे अन्न हे पूर्णब्रह्म असले तरीही ते चविष्ट असेल तर दुधात साखर. ) आणि चमचमीत पदार्थ म्हटला कि बटाटा हा त्याचा एक अविभाज्य घटक असणार हे जवळपास .ठरलेलेच आहे. त्यातून बटाटेवडा, आलू पराठा, हे प्रकार म्हणजे तर बटाटेप्रेमींच्या मर्मबंधातील ठेव ! पण गोची अशी आहे कि हा बटाटा एकटा येतच नाही कधी. त्याच्याबरोबर भरपूर तेल, चण्याचे पीठ, हिरव्या मिरच्या असा सगळा लवाजमा असल्याशिवाय बटाटे महाराजांचा दरबार पूर्णच होत नाही. मग गरीब बिचाऱ्या diet वर असणाऱ्या मंडळीनी हे प्रकार खायचेच नाहीत का? आजच्या रेसिपीचा उगम या प्रश्नातूनच झाला आहे. आज आपण बनवणार आहोत आलू पराठे, ते सुद्धा अतिशय कमी तेलातील. पण खमंगपणा जराही कमी होऊ न देता. मग जाऊ या का आपल्या प्रयोगशाळेत?

साहित्य- 4 उकडलेले बटाटे, 8 लसूण  पाकळ्या, एक छोटा चमचा तिखट, पाव चमचा हिंग, पाव चमचा हळद, तीन चमचे तेल, दोन चमचे लिंबूरस, थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून, दीड वाटी कणिक, पाणी, मीठ चवीनुसार

कृती-
1. प्रथम उकडलेले बटाटे चांगले मळून  घ्यावेत.
2. तेलात बारीक चिरलेला लसूण परतून घ्यावा. त्यातच हिंग, हळद, तिखट, मीठ, लिंबूरस, कोथिंबीर, टाकून परतून घ्यावे. सर्वात शेवटी कुस्करलेले बटाटे टाकावेत व मिश्रणाला एक छान वाफ आणावी.
3. कणिक थोडेसे मीठ टाकून भिजवून घ्यावी व तिचे छोटे छोटे गोळे करावेत.
4. या गोळ्यांमध्ये वरील सारण भरून पराठे लाटून घ्यावेत व तव्यावर दोन्ही बाजू तेल न टाकताच भाजून घ्याव्यात.
5. गरमागरम पराठे तव्यावरून direct प्लेटमध्ये व सायीच्या दह्यासोबत पोटात. :)

टीपा-
1. या पराठ्यांमध्ये भरायचे सारण आपण पूर्ण शिजवून घेतले असल्यामुळे ते एकजीव होते व सारणाचा गोळा अगदी पुरणपोळी मधील पुरणासारखा गुळगुळीत होतो. असे पराठे लाटायलाही खूप सोपे पडतात.
2. सारण अश्या प्रकारे शिजवून घेतल्यामुळे एकूणच पराठे करताना तेल खूप कमी लागते, तरीही पराठ्यांचा खमंगपणा मुळीच कमी होत नाही.



चटकदार झुणका.. पण जरा हटके :)


नमस्कार वाचकहो,,
आज शनिवार. तसा न कर्त्याचाच  वार. पण मी आणि माझे पिलू सकाळीच आवरून  बसलो होतो.  बाहेर भटकायला जायचे होते ना ! पण जाण्याआधी नेहमीचाच यक्षप्रश्न सोडवायचा होता - आज खायला काय करायचे? मग फ्रीज उघडून आढावा घेतला, काय काय आहे त्याचा- खरेतर काहीतरी चमचमीत खावेसे वाटत होते पण फ्रीजमधील परिस्थिती फारशी उत्साहवर्धक नव्हती :(  थोडेसे किसलेले गाजर, चिरलेला कांदा, चिरलेले tomato व बारीक चिरलेली कोथिंबीर !! म्हणजे तसा पौष्टिक कोशिंबिरीचा मालमसाला होता, पण आजतरी जिभेने मेंदूवर मात करायचा चंगच बांधला होता।. :) मग काय, सुरु झाले जिव्हा आणि मेंदूमधील युद्ध !  एरव्ही हे युद्ध तसे घातकच पण आज त्यातून चक्क एक छान पदार्थ जमून गेला :)
आता तुम्ही म्हणाल कि शीर्षक तर आहे झुणका, मग त्यात नवीन काय आहे? तर हा आहे पौष्टिक झुणका!! कारण त्यात नेहमीच्या फक्त कांद्याबरोबरच गाजर, tomato, असा ऐवजही आहे आणि कोथिंबीर पण जरा सढळ हातानेच वापरली आहे. पण याचा USP काय आहे माहित आहे? यात चण्याच्या पिठाऐवजी चक्क मुगाचे पीठ वापरले आहे. तर आता नमनालाच घडाभर तेल न ओतता एकदम फोडणी करू या का?
साहित्य -
चिरलेला कांदा, किसलेले गाजर, चिरलेले tomato प्रत्येकी अर्धी वाटी, अर्धी वाटी मुगाचे पीठ, चिरलेली कोथिंबीर एक जुडी, तीन मोठे चमचे तेल, पाव चमचा, हिंग अर्धा चमचा हळद, तिखट, मीठ चवीनुसार
कृती -
1. प्रथम मुगाचे पीठ कोरडेच भाजून घ्यावे.
2. त्याच भांड्यात तेलाची फोडणी करून चिरलेल्या भाज्या (कोथिंबीर सोडून) झाकण ठेवून शिजवून घ्याव्यात.
3. भाज्या शिजल्या कि चिरलेली कोथिंबीर टाकून एक  मिनिट मोठ्या आचेवर परतून घ्यावे.
4. मग त्यात तिखट,, मीठ टाकून पुन्हा एकदा परतून घ्यावे.
5. सर्वात शेवटी मुगाचे पीठ पेरून दोन वाफा काढाव्या.
6. पुढे काय? अहो तयार झाला कि झुणका.. :)   गरम गरम भाकरी, किंवा फुलक्यांबरोबर त्याचा आस्वाद घ्यावा.


टीपा-
1. या झुणक्यासाठी  आपण बारीक चिरलेला कोबी, सिमला मिरची, फरसबी, इत्यादी भाज्यांचे मिश्रणही वापरू शकतो.
2. आवडत असल्यास सर्वात शेवटी दोन चमचे दाण्याचे कूट टाकायलाही हरकत नाही.
3. Tomato पुरेसे आंबट नसल्यास एक चमचा लिंबुरस किंवा एक चमचा दही टाकावे.





Thursday, July 5, 2012

खमंग दलिया शिरा

नमस्कार वाचकहो,
बऱ्याच दिवसात काही लिहिलेच नव्हते. विषय सुचत बरेचसे, पण ते तसेच विरून जात. मुलाची नवीन शाळा, अहोंचे इथे नसणे, होणारी धावपळ, चिडचिड.... काही काही करू नये, शांत बसून राहावे, असे वाटण्याचे दिवस. अर्थात मी लिहिले नाही म्हणून जग चालायचे थांबले नाही- पण तरी मन खंतावत होतेच- बोटे शिवशिवत होतीच... म्हणून म्हटले आजच्या दिसामाजी थोडेतरी लिहू या -- :)

गेले काही दिवस मी मला सुचलेल्या (आणि जमलेल्या :) ) पाककृतींवर लिहित होते. आजचाही लेख त्या संदर्भातीलच !
तर हा दलिया शिरा खमंग लागतोच पण पौष्टिकही आहे बर का.. 
साहित्य - अर्धी वाटी दलिया (गव्हाचा जाड रवा - कुठेही मिळतो बाजारात), दोन वाट्या दूध,,पाव वाटी तूप, काजू, बदाम आवडीनुसार तुकडे करून, अर्धी वाटी गूळ
कृती - 
1. तुपावर दलिया छान मोकळा भाजून घ्यावा. दलिया खमंग भाजला गेल्यावर त्यातच काजू-बदामाचे तुकडे पण परतून घ्यावेत.
2. सर्व दूध टाकून दलिया मऊसर शिजवून घ्यावा.
3. दलिया शिजल्यावर त्यात बारीक चिरलेला गूळ घालून मिश्रण ढवळून घ्यावे. 
4. सर्व गूळ विरघळला कि आपला दलीयाचा शिरा तयार झाला. :)


टिपा:

1. जर दलीयामध्ये सगळे दूध शोषले गेले नाही आणि त्या आधीच गूळ टाकला गेला तर दूध फाटायची शक्यता असते,, म्हणून गूळ घालण्याआधी दलिया नीट शिजवून घ्यावा.
2. तुम्ही गुळाऐवजी साखरही वापरू शकता पण गुळामुळे शिऱ्याचा खमंगपणा खूप वाढतो. चवीत खूप फरक पडतो तसेच शिरा पौष्टिकही होतो.
3. लहान मुलांना देण्यासाठी हा अतिशय उत्तम पर्याय आहे.
4. आपण यात सफरचंद, केळी अशी फळेही टाकू शकतो. अशावेळी ती फळे गूळ घालण्यापूर्वी शिजवून घ्यावीत.

 

Thursday, February 2, 2012

मेथी-केळ्याचे शाही पराठे

आज मी आपल्याला आमच्या घरातील सर्वांची आवडती पाककृती सांगणार आहे. हे करताना थोडीशी मेहनत लागते खरी, पण माझ्या मते - its worth it. 


जिन्नस
मेथी २ जुड्या, ४ पिकलेली केळी, ओवा १ चमचा, तीळ २ चमचे, साखर २ चमचे, लाल तिखट १ लहान चमचा,
चिमुटभर हिंग, चिमुटभर हळद, बेसन २ चमचे, रवा २ चमचे, तांदुळाचे पीठ १ चमचा, दही १ चमचा,मीठ चवीनुसार, दोन मोठे चमचे तेल, मिश्रणात मावेल तितकी कणीक

मार्गदर्शन
१) प्रथम मेथी धुवून बारीक चिरून घयावी.
२) पिकलेल्या केळ्यांची साले काढून आतल्या गराचे बारीक तुकडे करून घ्यावे.
३) कढईत तेल तापल्यावर त्यात केळ्याचे तुकडे टाकून थोडेसे परतून घ्यावे. नंतर त्यातच ओवा, तीळ,साखर,लाल तिखट,हिंग ,हळद,मीठ टाकून परतून घ्यावे.
४) या मिश्रणात चिरलेली मेथी टाकून सर्व मिश्रणाला एक वाफ आणावी.
५) हे मिश्रण थंड झाल्यावर त्यात रवा, बेसन, तांदुळाचे पीठ, दही, टाकून व शेवटी त्यात मावेल तितकीच किणक टाकून एकजीव करून घ्यावे. (मिश्रणात पाणी घालू नये. )
६) तयार मिश्रणाचे छोटे छोटे गोळे करून घ्यावेत.
७) या गोळ्यांचे फुलक्यांच्या आकाराचे पराठे लाटून घ्यावेत व म्ध्यम आचेवर दोन्ही बाजूनी छान भाजून घ्यावेत. (भाजताना वाटल्यास थोडे तेल सोडावे. )
 ८) गरम गरम पराठे आपल्या आवडीच्या कुठल्याही चटणीसोबत सर्व्ह करावे.


टीपा
१) हे पराठे नुसतेच खायलाही छान लागतात.
२) केळ्यामुळे पराठे खुसखुशीत होतात व मेथीचा कडूपणाही कमी होतो.
३) यामध्ये सर्व प्रकारची पीठे, पालेभाजी, तीळासारख्या तेलबीया, व केळी असल्यामुळे  हे पूर्णान्न आहे.

ही पाककृती काही महिन्यांपूर्वी मी मनोगतावर जेंव्हा regular लिखाण करत होते त्यावेळी टाकली होती. आज वाटले कि हे लिखाण या ब्लॉगच्या वाचकांबरोबर शेअर करावे. म्हणून हा खटाटोप.



हे पराठे केले तेंव्हा मस्तपैकी भाजी, कोशिंबीर, मिश्र -भात असा मेनू होता. :)


Tuesday, January 31, 2012

रुचकर आणि पौष्टिक थालीपीठ

जगातील सर्वच खाद्यसंस्कृतीत काही काही पदार्थ हे त्या त्या संस्कृतीचे trademarks म्हणावे इतके प्रसिद्ध असतात. या सर्व पदार्थात मला तरी अनेक समान दुवे सापडतात. सर्वात महत्वाचे म्हणजे ते पदार्थ पूर्णान्न या स्वरूपाचे असतात. चविष्ट असतातच आणि करण्यासाठी अतिशय सोपे असतात. तसेच तुम्ही तुमच्या आवडीनिवडीनुसार त्यात हवा तो बदल करूनही त्या पदार्थांचे पोषण मूल्य कमी होत नाहीच, उलट वाढते. थालीपीठ हा आपल्या खाद्यसंस्कृतीतला असाच एक प्रकार. माझ्या मते तरी थालीपीठ या प्रकाराची एकच एक standard म्हणता येईल अशी कृती नाहीच आहे, उलट खाद्यप्रकारातील एक अतिशय flexible प्रकार म्हणून थालीपिठाचा नंबर खूप वरचा आहे. म्हणजे बघा हं, घरात कांदा नाही, ठीक आहे, कोबी वापरा की. लोणी नाही तोंडी लावायला? नो प्रॉब्लेम, बटर, चटणी, दही किंवा अगदीच काही नाही तर ओले खोबरे पण घेऊ शकता तुम्ही. एखादी नको असलेली पालेभाजी, किंवा रात्रीचे काहीही शिळेपाके संपवायचे आहे? मग करा सर्व एकत्र, एखादे पीठ मिसळा, आणि सरळ तव्यावर थालीपीठ लावा. इतके पटापट संपेल कि गृहिणीला चव बघायला म्हणूनही शिल्लक राहणार नाही. 
एकूण काय, थालीपीठाचे पाण्यासारखे आहे. ज्यात घालाल, त्याचा रंग घेऊन खुलते ते. 
तेंव्हा आजच्या थालीपीठासाठी आपल्याला हवी ती भाजणी, किसलेले गाजर, बारीक चिरलेला कोबी, थोडासा कांदा, भरपूर कोथिंबीर, तिखट, मीठ, हिंग, हळद, थोडासा ओवा, थोडेसे तीळ, आणि अर्धा चमचा साखर. हे सर्व मिश्रण एकजीव करून घ्या व तव्यावर थोडेसे तेल टाकून थापून घ्या. एक बाजू शिजली आणि खरपूस झाली कि ती बाजू उलटून दुसरी बाजूही थोडेसे तेल टाकून भाजून घ्या. 
गरमागरम थालीपीठ आणि घरचे लोणी... जगण्यासाठी आणखी काय लागते हो?


Monday, January 30, 2012

इस दाल मे कुछ हरा है..

आजची रेसिपीसुद्धा अगदीच सोपी. खास करून ज्यांना मेथी आवडत नाही त्यांनी ट्राय करण्यासारखी आहे. कृती सांगण्यापूर्वी आपण जरा आहारात मेथीचा समावेश करण्याचे फायदे पाहिले तर कसे? त्यासाठी खाली दिलेल्या लिंक्सना अवश्य भेट दया -


आता वळूया साहित्य आणि कृतीकडे:
साहित्य: शिजलेली डाळ १ वाटी(शक्यतो तुरडाळ), कसुरी मेथी १ वाटी, चवीनुसार तिखट, मीठ, गूळ, आणि चिंच, खवलेला नारळ सजावटीसाठी, आणि फोडणीचे साहित्य
कृती: प्रथम तेल तापत ठेवावे. त्यात थोडी मोहरी टाकून ती तडतडली कि हिंग व हळद टाकावी. नंतर डाळ व कसुरी मेथी टाकून मिश्रण छान घोटून घ्यावे. त्यात चवीनुसार मीठ, तिखट, गूळ व चिंच टाकावी. मिश्रणाला एक उकळी आली कि खोबरे टाकावे व आणखीन एक उकळी आणावी. 
गरमगरम डाळमेथी तयार आहे. ही आमटी पोळी किंवा भात कशाबरोबरही छान लागते. बरोबर एखादी कोशिंबीर असली कि ते जेवण अगदी पूर्णान्न होते. 

Tuesday, January 24, 2012

धमाल खाऊ - घरच्या बाळराजासाठी

देश वा धर्म कोणताही असो, जगातील सगळ्या तरुण मातांसाठी सर्वात महत्वाचा प्रश्न असतो तो म्हणजे "काय केले कि माझे बाळ छान खाईल व त्याला आवश्यक ती पोषणमूल्येही मिळतील. या एकाच प्रश्नामध्ये जगातील अनेक उत्तमोत्तम पाककृतींचा उगम दडला आहे. आजची रेसिपी तशीच काहीशी.. सोपी, तरीही लहान मुलांना आवडणारी..वाढत्या वयातील मुलांसाठी आवश्यक घटकांपैकी काही घटक, जसे  की  आयर्न, कॅल्शिअम पुरेपूर असणारी, साखरेचा वापर न करताही चवीला गोड आणि पौष्टिक. 
रेसीपीचे घटक अगदी सोपे - दाण्याचे कूट, हवा तेवढा खजूर (पाण्यात भिजत टाकून साले काढून घेतलेला - खजुराऐवजी खारकेची पावडर वापरली तरी चालेल), काळ्या मनुका (मिक्सर मधून भरडून घेतलेल्या), बदामाची पावडर, थोडी खसखशीची पावडर, आणि साजूक तूप
कृती - साजूक तुपावर वरील सर्व घटक परतून घ्यावे व हे मिश्रण गार झाले कि त्याचे लाडू वळावे..

आहे कि नाही सोपी! मी तर याला power tablet असेच म्हणते. लहान मुले, आणि हो , स्त्रियासुद्धा (कारण त्यांच्यामध्येही आयर्नची कमतरता असतेच) यांना रोज एक लाडू खायला द्यावा. आताचा मोसम तर असे लाडू खाऊन उत्तम आरोग्याची बेगमी करण्यासाठी फारच चांगला आहे. 

मग वाट कसली पाहताय, उचला एकेक लाडू आणि करा थंडीचा सामना... :)



Friday, January 20, 2012

Recipe for Happiness...

रेसिपी? हे काय बरे लिहित आहे मी??  हं..  शेवटी आलेच मी पण याच मार्गावर..!!
थांबा, थांबा, असे गोंधळून जाऊ नका.. सांगते सगळे सविस्तर..!!
जेंव्हा हा ब्लॉग सुरु केला तेंव्हा त्याची वाटचाल कशी होईल, काय काय विषय हाताळले जातील या कशाचीच कोणतीच योजना नव्हती मनात, पण त्यावेळी एक गोष्ट मात्र नक्की (!) ठरवली होती कि शक्यतो आपल्या ब्लॉगचे स्वरूप हे - पाककृतींच्या असंख्य ब्लॉग पैकी एक - असे होऊन द्यायचे नाही. [कृपा करून गैरसमज नकोत हं.. असे करण्यामागची भावना फक्त एवढीच होती कि इतके सारे दिग्गज आपले स्वयंपाकघरातील यशस्वी प्रयोग इतरांना सांगत असताना, माझ्यासारखीने  -जिला conventional स्वयंपाकाची फारशी आवड नाही- आपल्या मतांचे प्रदर्शन कशाला करावे? ]

पण काही महिन्यांपूर्वी सहज बोलता बोलता जेंव्हा माझ्या नवरोजीनी माझ्या पाककलेतील प्रयोगशीलतेला दाद देणारा एक निबंध ऐकवला, तेंव्हापासून हा किडा डोक्यात वळवळत राहिला. त्याचे कृतीत रुपांतर व्हायला नवीन वर्ष उजाडले असले तरी आता मात्र ठरवले आहे, कि ज्या काही साध्यासोप्या पण तरीही थोड्याश्या वेगळ्या अशा पाककृती आपल्या पोतडीत जमा आहेत त्या तुम्हा सर्वांबरोबर शेअर करायच्याच. सुदैवाने, बऱ्याच रेसिपी तयार झाल्यावर त्यांचे फोटो घेऊन ठेवले आहेत. आता त्यांचा उपयोग करण्याची वेळ आली आहे असे वाटते... :)

तेंव्हा आजची पहिली रेसिपी  - Strawberry with Cream...!!
तसे पहिले तर या रेसिपी मध्ये काहीच करायचे नाही आहे, तरीपण ही डिश खाताना मनाला मिळणारा आनंद मात्र खूप मोठा. म्हणूनच रेसिपीचे टोपणनाव - आनंदाची रेसिपी अर्थात Recipe for Happiness... 
या डिशला फार मोठी परंपरा आहे बर का, खास करून Wimbledon टेनिस स्पर्धा आणि Strawberry with Cream यांचे नाते खूप जुने आहे..!!
काल Reliance Fresh मध्ये गेले होते तिथे इतक्या सुंदर Strawberries विक्रीसाठी ठेवल्या होत्या, कि घेण्याशिवाय दुसरा पर्यायच उरला नाही... :) आणि मग काय, छान घरची -फ्रीज मध्ये ठेवून गार केलेली - साय घेतली (तुम्हाला हवे असेल तर बाजारात मिळणारे तयार क्रीमही घेऊ शकता पण घरच्या सायीची मजा नाही त्यात, असे मला वाटले), त्यामध्ये एक चमचा साखर घालून मिश्रण एकजीव करून घेतले, एका strawberry चे दोन तुकडे केले आणि ह्या मिश्रणात घातले... पुढची कृती काय विचारता? अहो तो बाउल घेऊन आरामशीर सोफ्यावर बसायचे आणि मनापासून आस्वाद घ्यायचा... तयारीला लागणारा वेळ ५ मिनिटे, पण जिभेवर रेंगाळणारे समाधान खूप खूप मोठे...!! विश्वास बसत नाही का? ठीक आहे, खालील फोटो पहा, मग समजेल मला काय म्हणायचे आहे ते.. :)



पुण्यनगरीतील वाहतूकव्यवस्था आणि वाहनांवरील साहित्यसंपदा: एक अभ्यासपूर्ण विवेचन !!

नमस्कार, सुमारे दशकभर पुण्यात राहिल्यावर या नगरीच्या विद्वत्तेचा आम्हाला स्पर्श झाला नसता तरच नवल. त्यामुळे झालेय काय, कोणत्याही गोष्टीची...