Monday, January 31, 2011

दिल तो बच्चा है जी..

आजचीच गोष्ट. छान आरामात घालवलेल्या शनिवार-रविवार या जोडगोळीनंतर  आलेला उदासवाणा सोमवार. बरयाच वेळा मला तरी सोमवारी ऑफिसला बुट्टीच मारावी असा विचार मनात येउन जातो. पण काय करणार? मज़बूरी, दुसरे काय ! त्यातून आज महिना अखेर. अस्मादिकांच्या बचत खात्यात थोडेसे जास्तीचे पैसे जमा असतील (पगाराचे हो, दुसरे कुठले?) असा विचार करून स्वारी सर्व काही वेळेवर आवरून, पिल्लाला डे-केयर मध्ये सोडून खुशीत मोबाइल वर गाणी ऐकत ऑफिसला जायला निघाली. मी सहसा बसने प्रवास करते. पैशाची बचत, चार अनुभव गाठीशी बांधता येतात वगैरे वगैरे... (पुण्यातले ट्राफिक पाहता खरा विचार हा असतो की  ड्राईवरने बस कशीही चालवली तरी काही विपरीत झाल्यास बसचे [व पर्यायाने आपले] सर्वात कमी नुकसान होईल.) पण आज शेयर-मारुती येताना दिसली, म्हटले चला जाउन बघूया. त्या मारुती वाल्याचा चेहरा अगदी श्रीरामांच्या जवळपासचा दिसत होता  म्हटल्यावर माझी हिम्मत आणखिन वाढली. 
   आत बसले मात्र, त्याने आपले खरे स्वरुप सर्व प्रवाशाना दाखवायला सुरुवात केली. गाडी नावाप्रमाणेच मारुती असावी की काय अशा वेगाने तो ती चालवत (की उडवत) होता. ह्या स्वर्गलोकिच्या वाहनासमोर 'speed-breaker' किंवा रस्त्यावरील इतर वाहने अशा क्षुद्र गोष्टींची काय पत्रास हो? त्यात भरिस भर म्हणून ती 'share-vehicle special' ढिंचाक गाणी! मी तत्परतेने माझ्या सेल वरची गाणी बंद करून टाकली. उगाच आपल्या  सेलची battery कशाला डाउन करा? (असे सुविचार पुण्यात शिफ्ट झाल्यापासून सुचतायत बर का !!). आणि सह्प्रवाश्यांच्या चेहेरयावरिल भीती, चिंता, कुतूहल, राग अशा भावनांचे मिश्रण वाचत बसले होते.  
अचानक गाडीत चाललेला तो वाद्यांचा कलकलाट बंद झाला आणि राहत फतेह अली खान चे हळुवार स्वर कानावर येऊ लागले....'दिल तो बच्चा है जी, थोडा कच्चा है जी...' त्या एकंदर माहौलाशी ते वरवर इतके विसंगत वाटत होते तरीही त्या सुरात अशी काही जादू होती की मन खरच एखाद्या लहान मुलासारखे टुणकन उडी मारून गाडीच्या बाहेर पळाले. पतिराजांबरोबर छानसा पिक्चर बघून व मस्त dinner घेउन आले. बछडयाबरोबर धमाल दंगामस्ती करून आले. माझ्या आवडीचे छानसे पुस्तक वाचून आले. तसेच माहेरी जाउन आईच्या उबदार कुशीत शिरून आले. आजीशी पत्ते खेळून आले. कितीतरी गतकाळातले क्षण पुन्हा नव्याने जगून आले. अनेक नात्यांच्या रेशीमगाठी नव्याने विणून आले..
' madam, उतरा की आता. दहा रुपयात आणखी किती पुढे जाणार?? ' .. गाडिवाल्याच्या प्रेमळ दटावणीने माझी तंद्री भंगली. त्याला दहा रुपये देताना मी मनात म्हटले 
' मित्रा, इथे पुढे कोणाला जायचे आहे? दहा रुपयात तू मला कितीतरी मागे नेऊन आणलेस तेच
 आजचा दिवस तरी पुरेल..!!'

Monday, January 24, 2011

असा गन्धर्व पुन्हा न होणे..!!

भीमसेन जोशींचे निधन.. ऑफिस मध्ये आल्या आल्या 'सकाळ' वर ही बातमी वाचली.
खूप धक्का बसला वगैरे म्हणता येणार नाही. कारण गेले काही दिवस त्यांच्या तब्येती विषयी काहीबाही ऐकायला येतच होते. आणि एकंदरीत  त्यांचे वय पाहता  मनाला पुढील अशुभाची चाहुल लागली होती. पण म्हणतात ना, आनंदाच्या झाडाची कितीही फुले तोड़ता आली तरी 'आणखिन हवे' चा पुकारा मन काही थाम्बवत नाही. तसेच पंडित भीमसेन जोशींचे गाणे.. कितीही ऐका, दरवेळी नवा सुगंध येतो त्यातून. जिवंतपणी समाधिचा अनुभव घ्यायचा असेल तर पंडितजींच्या गाण्यासारखे दुसरे साधन नाही.. या गारुडातून कोणाचीही सुटका झाली नाही. मग तो अगदी एखादा सुपरस्टार असो किंवा एखादा 'माउलीच्या भेटीला' निघालेला वारकरी .. त्यांच्या अलौकिक स्वरानी जेथे साक्षात् पंढरीच्या विठोबाला भारुन टाकले तिथे तुमच्या-आमच्यासारख्या मर्त्य मानवांची काय कथा हो? 
       माझी खात्री आहे, आता आकाशातले तमाम देवदेवता आनंदात असतील... इतकी वर्षे या गंधर्वाला भूलोकिवर पाठवल्यामुळे रिकामा झालेला त्यांचा दरबार आता भरला असेल. पण ही पृथ्वीवरची मैफल संपली त्याचे काय? 
      असा निराश विचार मनात आला, पण तितक्यातच असे वाटले की अरे, पंडितजींनी आपल्या सर्वाना सुरांचा जो अमूल्य ठेवा दिला आहे तो एक नाही तर सात जन्म पुरणारा आहे मग काळजी कशाला? 


   

  

Monday, January 17, 2011

श्रावणात घन निळा बरसला....

लेखाचे शीर्षक वाचून तुम्ही म्हणाल की या गुलाबी  थंडीत हिला श्रावण कुठे आठवतोय? पण त्याला निमित्तही तसेच झाले.
             तर झाले असे की माझ्या प्रेमळ, उदार, बहुगुणी (वगैरे वगैरे..) नवरयाने आमच्या नविन घराला शोभेल असे SONY चे चकाचक 'HOME THEATRE' खरेदी केले आहे. तसा माझा नवरा (आणि आता माझा दिड वर्षाचा बछड़ा देखिल ) संगीताचा दर्दी ! अर्थात माझीही आवड साधारण त्याच्यासारखीच  आहे म्हणा. तर काल खूप दिवसानी थोडा निवांतपणा होता म्हणून छान गाणी ऐकत बसलो होतो. CD play होत होती. आणि मध्येच कधीतरी हे गाणे सुरु झाले... ऐकता ऐकता डोळ्यासमोर साक्षात श्रावण उभा राहात होता. मन एकदम माहेरीच पळाले आणि ओटीवरील झोपाळ्यावर झोके घेऊ लागले..
     
       माझ्या माहेरी सर्व सणवार अगदी यथासांग पार पाडले जातात आणि त्यातही श्रावणाची मजा काही खासच. सुरुवात होते ती दीवली आमवास्येपासून. [त्याला 'गटारी अमावस्या' असे म्हटलेले मला तरी नाही आवडत बाबा]. ते तबकातले पुरणाचे खरपूस दिवे ज्यानी खाल्ले आहेत त्याना मी का असे म्हणते ते कळेल.
     मग आमचे आवडते काम म्हणजे 'जिवतिचा कागद' देवघरातील भिंतीवर लावणे! त्यातले 'नर्सोबाचे (नरसिन्हाचे) चित्र हे इतके जिवंत रेखाटले गेले आहे की मला अजूनही त्याची भीती वाटते. मग येणारे श्रावणी शुक्रवार, श्रावणी शनिवार, श्रावणी सोमवार , श्रावणी मंगळवार वगैरे नेहेमीचेच -पण नावामागे 'श्रावण' लावल्यामुळे एकदम special झालेले- यशस्वी कलाकार. आणि त्याबरोबरच आईची ब्राह्मण -सवाष्ण जेऊ घालण्यासाठी चाललेली तयारी. आम्ही खुश, कारण पुरणपोळी, उकडीचे मोदक, भरड्याचे वडे, नारळीभात, ओल्या नारळाच्या करंज्या, खांडवी अश्या पक्वानांची घरी अगदी रेलचेल असायची. त्याचबरोबर ,विशेष करून शनिवारच्या दिवसभराच्या उपवासानंतर गरमागरम कोळ-खिचड़ी, त्यावर साजुक तुपाची धार व बरोबर लाल माठाची भाजी ही खरोखर आत्मा व रसना दोन्ही एकदमच संतुष्ट करून जायची. तिन्हीसांजा झालेल्या, बाहेर रिमझिम पाउस पडतोय, देवांपाशी मंद नंदादीप तेवतोय, उदबत्तिच्या गंधाने पूर्ण घर भरून आणि भारुन गेले आहे ,अशा  वातावरणातली ती गरमागरम खिचड़ी नुसती आठवली तरी जीव नुसता गलबलून जातो.. 
  
आमचे ग्रामदैवत रामेश्वर! श्रावण महिन्यातल्या पहिल्या सोमवार पासून ते दुसरया सोमवार पर्यंतचे सात दिवस देवळात 'सप्ता ' असतो. सतत वेगवेगळी भजनी मंडळे देवासमोर छान छान भजने सादर करतात. तो झांजांचा मंजुळ आवाज अजूनही माझ्या कानात घुमतो कधीकधी.. तो दारात अवचित उगवलेला तेरडा, टाकळा, रुईची पाने, त्या मंगलागौरीसाठीच्या तर्हेतर्हेच्या वनस्पती, तो केवड़ा, तो मध्यरात्रि साजरा होणारा कृष्णजन्म, ती दही-पोहे व लोणी-साखरेची वाटी, नागाला वाहिलेले नागाणे-फुटाणे... सगळ्या आठवणींचे छानसे इंद्रधनुष्य होउन मनाभोवती फेर धरायला लागते आणि 'श्रावणात घन निळा बरसला....' हे गाणे त्याच्या अर्थासाहित उलगडायला लागते..!!
खरच, श्रावण हा मराठी महिन्यांचा अनभिषिक्त सम्राट आहे ते उगीच नाही काही ..
अशीच मला आवडलेली श्रावणाची एक net वरून मिळालेली कविता व छबी खाली जोडत आहे.. 





Friday, January 14, 2011

मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा..!!








चला ,ह्या संक्रांतीच्या निमित्ताने आपल्या घराप्रमाणेच आपली मनेही साफ़ करुया.  
एकमेकाना माफ़ करुया. ! प्रतिद्या करुया की आपण सारे - 
 नव्या ओळखी करून घेऊ . जुने सम्बन्ध वृद्धिंगत करु. नातेवाइकान्बरोबरच आपण ज्यांच्यावर खरया अर्थाने अवलंबून असतो तया मोलकरीण, ड्राइवर अशा लोकानाही स्नेहाचे वाण देऊ. त्यांच्या कष्टाचा सन्मान करू. आजारी लोकांची प्रेमाने (किमान फोनवरून तरी ) विचारपूस करू. आपल्या लहानग्याना जवळ बसवून मायेने त्यांचे लाड करू. त्याना ढीगभर खेळण्यांबरोबरच आपला थोडासा वेळही देऊ.  सर्वानी मिळून तोंड गोड करू. आणि आपले आयुष्य, जगणे सुन्दर करू...
          तुम्हा सर्वाना मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा..!!
       
 तीळगूळ घ्या गोड गोड बोला..





Monday, January 10, 2011

My Name is Khan.. च्या निमित्ताने ..!!

कालच NDTV Imagine ला हा पिक्चर लागला होता. बाकि काही विशेष करण्यासारखे नव्हते म्हणून म्हटल चला बघून टाकू. 
पिक्चर पाहिला आणि का कोण जाणे, खूप अस्वस्थता दाटून आली मनात. तसे पाह्यला गेले तर typical  'करण जोहर'  छाप असलेला आणि ९/११ च्या हल्ल्याची पार्श्वभूमी वापरून, प्रेक्षकाना अमेरिका दर्शन घडवलेला एक सामान्य चित्रपट असेही त्याचे वर्णन होऊ शकेल. याहून सर्वदृष्टिनी कितीतरी सरस चित्रपट मी यापूर्वी कितिदातरी पाहिले आहेत, तरीपण मग ही अस्वस्थता कसली? 
विचार करत गेले तसे तसे जाणवत गेले की ही बेचैनी होती माझ्या छोट्या पिल्लासाठीची जो यावर्षी pre-school मध्ये जाईल.  मग त्याचे मित्र, त्यांचे आपल्यादृष्टिने  अतिशय क्षुल्लक पण त्यांच्याकरिता खूप महत्वाचे असे इगो problems, त्यातून उद्भवणारे मतभेद आणि शेवटी त्याचे मारामारीत होणारे पर्यवसन, हे सगळे चित्र  डोळ्यासमोर तरळले व जीव अगदी घाबराघुबरा झाला. मनात आले, आईवडील रात्र-रात्र जागून ज्या चिमण्या जीवाचे रक्षण करतात,त्याच्याभोवतीच आपल्या आयुष्याचे तलम वस्त्र
 विणतात, त्या तान्हुल्या जीवाची किम्मत कोणाच्यातरी ego पेक्षाही कमी? हा ego निर्माण तरी
 कसा होतो आणि तो जोपसतो तरी कोण? आणि हे मारामारी करणारेही कोणाचा तरी मुलगा/मुलगी असतातच ना? म्हणजे पर्यायाने समाजाचा एक घटक म्हणून आपणही अशा घटना घडण्यास  अप्रत्यक्षपणे जबाबदार नाही काय? 
      विचार खोल खोल जात होते. मनाचा तळ ढवळून काढत होते. वाटले की 'आपण एका ठराविक जाती/धर्मात जन्माला आलो यात आपला दोष किंवा कर्तृत्व ते काय?.' खर तर जात ही जन्माने नाही तर कर्माने ठरायला हवी. आणि ह्या संदर्भात ह्या पिक्चर मध्ये झरीना वहाब च्या तोंडी एक मार्मिक वाक्य आहे. ती मुलाला म्हणते की माणसांच्या फक्त दोनच जाती- एक चांगली माणसे आणि दुसरी वाईट. माझ्या पाहण्यात असे एक भटजी आहेत की जे दररोज पौरोहित्य करतात पण त्यानी आपल्या आईला वृद्धाश्रमात ठेवले आहे. त्याचवेळी माझा एक मुस्लिम मित्र मात्र स्वताला मुलबाळ नसतानाही , 'सबका मालिक एक ' म्हणत दुसरयाना मदत करायला एका पायावर तयार.. आता तुम्हीच सांगा, कोणाचा धर्मं कोणता? 


या नविन वर्षात बाकी काही संकल्प नाही केले तरी ' माणसाला प्रथम फक्त माणूस म्हणून पाहायचा ' संकल्प सोडायला आणि तो तडीस नेण्यासाठी मनापासून प्रयत्न करायला काय हरकत आहे? मी तरी प्रयत्न करणार आहे. तुम्ही आहात का माझ्या बरोबर??

Tuesday, January 4, 2011

छान छान बडबडगीते... माझ्या छकुल्यासाठी


असे म्हणतात की जात्यावर बसल्यावर आपोआप ओव्या सुचतात, त्यात भर टाकून मी म्हणेन की आई झाल्यावर आपसूकच आपल्यातला कलाकार (की नकलाकार)जागृत होतो. 
                 माझा मुलगा अरिन आता जवळपास दोन वर्षाचा आहे. तो जन्मल्यापासून माझ्या स्वरचित (स्व-रचित, हो, उगाच माझा आणि स्वरांचा काही घनिष्ट सम्बन्ध आहे असा गैरसमज नको व्हायला !!) बडबडगीतांची cassette ऐकतच वाढलाय. त्याच्या ख़ास पसंतीची ही काही गाणी...


१) हत्तुल्या
    हत्तुल्या रे हत्तुल्या तू होशील का माझा फ्रेंड ?
     देईन मी तुला cashew almond
      हत्तुल्या रे हत्तुल्या तू होशील का माझा यार?
  देईन मी तुला ग्लुको बिस्किटे चार
     हत्तुल्या रे हत्तुल्या तू होशील का माझा दोस्त?
    देईन मी तुला चीकू केळी  मस्त 
    हत्तुल्या रे हत्तुल्या तू येशील का माझ्या घरी?
 देईन मी तुला रगडा-पाणीपुरी
हत्तुल्या रे हत्तुल्या आपण भाऊ-भाऊ 
दोघे मिळून लांब लांब फिरायला जाऊ..


२) आमचा अरिन म्हणजे छोटी मनिमाऊ
  सारखा सारखा त्याला हवा खाऊ..
    नकटुले नाक त्याचे मोठे मोठे डोळे 
  गोबरे गोबरे गाल आणि केस कुरळे कुरळे 
सारखा सारखा त्याला किती पाहू ग..
 खेळायला सवंगडी झाले बघा  गोळा
बघता बघता किती हा जमला गोतावळा
मित्र मैत्रीण त्याचे भूभू काऊ चिऊ ग..


                     

काही दिवसांपूर्वीच आम्ही आमच्या नविन घरात शिफ्ट झालो. या घराच्या एका टेरेस मधून सूर्योदय दिसतो तर दुसरया टेरेस मधुन सूर्यास्त.. तेंव्हापासून रोज सकाळी एकदा अरिनच्या बाबाना टाटा केला की अरिन आणि मी टेरेस मध्ये जातो व सूर्योदय बघतो. अरिन ची सूर्यबाप्पाशी चांगलीच गट्टी जमली  आहे. त्यावरचे माझे हे latest बडबडगीत...


३) सूर्यबाप्पा..


सूर्यबाप्पा सूर्यबाप्पा उठलात का?
ढगांची चादर काढता का?
आकाशात छान-छान दिसता का?
थंडी आमची पळवता का !
आईने गोड गोड चहा केलाय
त्याच्यात थोड़े आले टाकलय
गरम गरम चहा तुम्ही पिणार का?


प्रचलित गाण्यांची विडंबने तर असंख्य केली आहेत पण त्याविषयी पुढील लेखात... 
आणि हो, एक राहिलेच,  
तुम्हा सर्वाना  नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा.. !!

पुण्यनगरीतील वाहतूकव्यवस्था आणि वाहनांवरील साहित्यसंपदा: एक अभ्यासपूर्ण विवेचन !!

नमस्कार, सुमारे दशकभर पुण्यात राहिल्यावर या नगरीच्या विद्वत्तेचा आम्हाला स्पर्श झाला नसता तरच नवल. त्यामुळे झालेय काय, कोणत्याही गोष्टीची...