Thursday, July 4, 2013

World Cinema Special: Something Like Happiness (Czech)

नावच किती समर्पक आहे ना - Something Like Happiness...म्हणजे काहीतरी आनंदासारखे वाटणारे. काय आहे ते नक्की नाही माहित पण चांगले वाटतेय काहीतरी आतून.

Rules - प्यार का सुपरहिट फॉर्मुला या फारश्या न गाजलेल्या चित्रपटात नायिकेच्या तोंडी एक वाक्य आहे-  "ख़ुशी का क्या पता, ना जाने कब और कंहा मिल जाये … "

Happiness - निखळ, निर्व्याज आनंद. नक्की कुठे हो मिळतो? कसा असतो तो? आणि किती शाश्वत? म्हणजे मी काही मोठी तत्ववेत्ती नव्हे, पण गम्मत बघा हं, एखादी अतिशय प्रिय वस्तू, एखादा मनापासून आवडणारा खाद्यपदार्थ, एखादे भावलेले गाणे, एखादा रिझवणारा चित्रपट या सर्व गोष्टीही दरवेळी सारखाच आनंद देतात का हो? तर नाही. बहुतांश वेळा ते आजूबाजूच्या आणि आपल्या मनाच्या अवस्थेवर अवलंबून असते. एखादी मनपसंत गजल आपल्या जीवलगांच्या संगतीत खुलते, तर एकटेच असताना अस्वस्थ करते. म्हणजे असेच तुमच्याही बाबतीत होत असेल असे नाही हं, पण थोडक्यात काय, तर प्रत्येकाचा, प्रत्येक क्षणीचा आनंद निराळा आणि तो अनुभवण्याची रीतही निराळी. काहीसे असेच सांगायचा प्रयत्न करतो हा चित्रपट.

कोणतेही तत्वज्ञान नाही, काहीतरी वेगळे सांगितल्याचा अभिनिवेश नाही किंवा कोणत्याही मोठ्या व्यक्तीचे चरित्र नाही. आहेत ती  तुमच्या आमच्यासारखी साधी माणसे.
तीन व्यक्तींची ही गोष्ट - मोनिका, टोनिक, आणि दाशा. एकाच परिसरात वाढलेली तीन मुले. त्यापैकी मोनिकाचे स्वप्न आपल्या प्रियकराबरोबर अमेरिकेला जाण्याचे, टोनिक  मनोमन मोनिकावर प्रेम करणारा तर single mother असलेली दाशा  एका विवाहित पुरुषात गुंतलेली. वास्तवापासून फारकत घेतलेली. पुढे तिचा मनोविकार इतका बळावतो की तिला रुग्णालयात ठेवावे लागते व तिच्या मुलांची जबाबदारी येउन पडते मोनिका व टोनिकवर.
हे असे जगावेगळे कुटुंब आणि त्यांचे एकमेकांमधील bonds.. या सगळ्याची कथा म्हणजे हा चित्रपट.
स्टोरी म्हणावी तर इतकीच. पण आपण या कुटुंबात गुंतत जातो. आणि आपल्याला जाणवते की अरेच्या, आनंद हा असा चोरपावलांनी येतो तर… कोणतीही अपेक्षा नसताना, अचानक.
हेच आयुष्य नव्हे काय? मला असे नाही म्हणायचे की अपेक्षाच नाही ठेवायच्या आयुष्याकडून, पण आठवून पहा जरा, ध्यानीमनी नसताना भेटलेली जीवाभावाची माणसे, अतिशय गरम होत असताना वाऱ्याची आलेली थंडगार झुळुक, दिवसभराच्या कटकटीनंतर आपल्या बाळाने मारलेली मिठी… ही आणि अशी कितीतरी उदाहरणे. पु. लं. च्या भाषेत सांगायचे म्हणजे सहज घराबाहेर पडावे, आकाशाकडे लक्ष जावे आणि ती असावी कोजागिरी पौर्णिमा.. असा सहज मिळालेला निरागस आनंद. किंवा त्यासारखे काहीतरी - Something Like Happiness.... !!

शेवटी खूप दुखः जसे निशब्द तसाच अतिव आनंद हाही तितकाच शब्दांच्या पलिकडला ….  !!!


पुण्यनगरीतील वाहतूकव्यवस्था आणि वाहनांवरील साहित्यसंपदा: एक अभ्यासपूर्ण विवेचन !!

नमस्कार, सुमारे दशकभर पुण्यात राहिल्यावर या नगरीच्या विद्वत्तेचा आम्हाला स्पर्श झाला नसता तरच नवल. त्यामुळे झालेय काय, कोणत्याही गोष्टीची...