Wednesday, November 2, 2011

भारतीय चित्रपटसृष्टीची जन्मगाथा- अर्थात हरिश्चंद्राची फॅक्टरी ..!!

शनिवार - ३ मे १९१३.. एका महाप्रचंड अशा उद्योगाचे बीजारोपण केले गेले तो दिवस.. या दिवशी भारतातील  पहिला मूकपट प्रदर्शित झाला. नाव होते - राजा हरिश्चंद्र. ह्या अनोख्या प्रयोगाची संकल्पना ज्यांनी मांडली ते होते अर्थातच दादासाहेब फाळके - भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक..!!

पण ही झाली नंतरची गोष्ट. 

मुळात दादासाहेबांना ही प्रेरणा कशी मिळाली, त्या काळात त्यांना काय अडचणी आल्या, त्यांच्या स्वप्नांना त्यांच्या कुटुंबियांची (विशेषतः पत्नीची) कशी साथ लाभली ह्या सर्वांचीच एक रंजक कथा जर पडद्यावर सादर करता आली तर? प्रेक्षकांना खऱ्या अर्थाने दादासाहेबांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या दूरदृष्टी, अपार कष्ट आणि त्याग यांची किमान एक झलक दाखवता आली तर? 

असे अनेक प्रश्न पडले ते परेश मोकाशी या जादूगाराला.. मग काय, या छोट्याश्या बीजातून तयार झाला तो एक ध्यास.. प्रवास.. ! या प्रवासात जर अतिशय गुणी, मेहनती  असे सोबती असतील तर काय साकारू शकते याचे एक उत्तम उदाहरणच या अवलियाने आपल्यासमोर ठेवले - ते बावनकशी सोने म्हणजेच माझ्या अत्यंत आवडत्या चित्रपटांपैकी एक - अर्थात हरिश्चंद्राची फॅक्टरी ..!! 

खरेतर हा फक्त संग्रही ठेवण्याचा (आणि 'आम्हीपण नावाजलेले चित्रपट सीडीवर पदरी बाळगतो' असा टेंभा मिरवण्याचा) चित्रपट नव्हे ! माझ्यामते तरी हे एक tonic आहे. केंव्हाही नैराश्य आले, आयुष्यात आपल्याला काहीच करता येणार नाही असे वाटले कि सरळ (तीच संग्रही ठेवलेली) सीडी काढावी व पुढचे दोन तास निवांतपणे हा चित्रपट पाहावा. विश्वास ठेवा, चित्रपट पाह्ण्यापूर्वीचे आपण व चित्रपट पाहून झाल्यानंतरचे आपण यात तुम्हाला स्वतःलाच अमूलाग्र बदल झालेला जाणवेल. 

हा चित्रपट दादासाहेबांच्या जीवनावर बेतला असल्यामुळे त्यांचे कार्य हा अर्थातच चित्रपटाचा आत्मा आहे. गिरगावच्या चाळीत आपल्या पत्नी आणि दोन मुलांसमवेत राहत असतानाच हा अवलिया 'पडद्यावरील नाटक' प्रत्यक्षात आणण्याचे स्वप्न पाहतो. त्यासाठीचा अभ्यास करण्यासाठी लंडनला जातो, मग भारतात परत येऊन या स्वप्नांना मूर्तरूप देण्यासाठी जंग जंग पछाडतो, आणि सरतेशेवटी पडद्यावर उभी राहते ती राजा हरिश्चंद्राची गोष्ट.. आणि त्याबरोबरच जाणवतो तो फाळके कुटुंबाचा स्वप्नपूर्तीचा आनंद..

माझ्या मते तरी हा चित्रपट आपल्याला भारून टाकल्यासारखा वेगळ्या दुनियेत घेऊन जातो. चित्रपट सुरु होत असतानाच जवळपास १०० वर्षांपूर्वीच्या जुन्या मुंबईचे दर्शन घडते (आणि लगेच जाणवते कि एवढे अत्युच्च दर्जाचे नेपथ्य नितीन चंद्रकांत देसाई या मयसभाकाराखेरीज कुणाचेच असू शकत नाही..) त्या गिरगावातील चाळी, त्यातील एकोपा, एकमेकांविषयी वाटणारी तळमळ, त्या रस्त्यावरील ट्राम्स, 'दादर ला फारशी वस्ती नव्हती" हे वास्तव... सगळे तुम्हाला १०० वर्षे मागे घेऊन जाते. (मला तर नेहेमी हा चित्रपट पाहताना 'आपण १०० वर्षापूर्वी जन्मलो असतो तर किती छान झाले असते ' असे वाटत राहते. )

हे सर्व असले(आणि ते सर्वोत्तमच आहे) तरीही शेवटी कुठल्याही कलाकृतीचे तारू यशस्वीपणे किनारयाला लावतात ते त्यातील कलाकारच.. आणि इथे दिग्दर्शकाने नंदू माधव व विभावरी देशपांडे यांना मुख्य भूमिका देऊन अर्धी (माझ्यामते, जवळपास पूर्ण) लढाई जिंकली आहे. 'दादासाहेब अगदी असेच असतील' हे वाटण्यामागे नंदू माधव या गुणी कलाकाराची अफाट मेहनत आहे. ती सिनेमा बनवण्याची तळमळ, त्यासाठी वाट्टेल तसे आणि तितके कष्ट उपसण्याची तयारी, त्याचवेळी दादासाहेबांमध्ये दडलेला प्रेमळ पिता, कृतज्ञ पती, असे अनेक पैलू त्यांनी अतिशय बारकाव्यांसहित उभे केले आहेत. त्यांना तितकीच ताकदीची जोड मिळाली आहे ती विभावरी देशपांडे या अष्टपैलू अभिनेत्रीची. तिने उभी केलेली दादासाहेबांच्या पत्नीची व्यक्तिरेखा खरोखर कमाल आहे. पतीची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी कंबर कसून उभे राहतानाच, तीन मुलांचे पालनपोषण, चित्रपटात काम करणाऱ्या ३०-४० माणसांचे जेवणखाण, आणि या सर्वांवर कळस म्हणजे दादासाहेबांच्या बरोबरीने कॅमेरा हाताळणे, फिल्म धुणे अशी कामे हसतमुखाने करणे या सगळ्यामुळे त्या व्यक्तिरेखेने एक वेगळीच उंची गाठली आहे. 

हे झाले मुख्य कलाकारांबद्दल. पण मोहित गोखले, अथर्व कर्वे या मुलांपासून ते वैभव मांगले यांच्यासारख्या विनोदी कलाकारापर्यंत प्रत्येकानेच १०० टक्क्यांपेक्षा जास्त योगदान दिले आहे चित्रपटाच्या एकंदर जडणघडणीत...एक आदर्श team-work चे उदाहरण म्हणूनही हा चित्रपट भावतो कुठेतरी. शिवाय '२००९ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला भारतातर्फे "सर्वोत्कृष्ट चित्रपट" म्हणून ऑस्कर पुरस्कारासाठी पाठवले गेले होते'  ही याची एक ओळख आहेच...

तेंव्हा, स्वप्ने पाहणे, ती सत्यात आणण्यासाठी अफाट मेहनत करणे, आणि शेवटी स्वप्नपूर्तीचा झालेला निखळ आनंद, हे सर्व अनुभवण्यासाठी हा चित्रपट जरूर पाहा..!!

Tuesday, August 16, 2011

पाऊस .. आठवणींचा मोरपिसारा..!

वाचकहो,
आज थोडा ब्रेक घेऊन पावसाविषयी लिहावेसे वाटत आहे. त्याला कारणही तसेच आहे.
सकाळी कामावर निघाल्यापासून पावसाची रिपरिप चालू झाली होती, तरीही छत्री न घेताच बाहेर पडले. सुदैवाने, खूप भिजले नाही, आणि तरीही बऱ्याच दिवसांपासून मनात धरून ठेवलेली इच्छा पूर्ण झाली - पाऊस अनुभवण्याची! रमत गमत येताना मनात पावसाचीच अनेक रूपे फेर धरत होती. तशातच मला मी काही महिन्यांपूर्वी 'मनोगत' वर टाकलेल्या पोस्टची आठवण झाली. मग वाटले, कि आपली पावसाविषयीची भावना तुम्हा सर्वांपर्यंत का पोचवू नये? वाचून पहा तर, तुम्हीही लेखातल्या कोणत्या ना कोणत्या भागाशी स्वतःला relate कराल अशी मला आशा, नव्हे खात्रीच आहे....

तर पाउस -
हा फक्त एक शब्द नाही. हे एक गारूड आहे. मधमाश्यांचे असे पोळे की ज्याला एक छोटासा दगड चुकून जरी लागला तरी त्यातून अनंत आठवणीचे मोहोळ उठते.
या विश्वाच्या अफाट पसाऱ्यात असंख्य माणसे व प्रत्येकाचे आपले असे वेगळे विश्व! पण तरीही सर्वांना एका नाजूक धाग्याने बांधून ठेवतो तो हा पाऊस. म्हणुनच कदाचित एखाद्याचे वय सांगताना 'त्याने इतके पावसाळे पाहिले आहेत' असे म्हणतात. 'उन्हाळे किंवा हिवाळे' असे नाही म्हणत.. कदाचित म्हणुनच शतकानुशतके त्याचावर इतके काही बोलले गेले, लिहिले गेले तरी हा आपला प्राजक्ताच्या फुलाप्रमाणे टवटवीत.. कधीकधी मला तर असे वाटते की पावसाला आपण नकळतपणे मानवाचा दर्जाच देऊन टाकलाय जसा काही.. म्हणजे बघा हं, आपण पावसाची वाट बघतो, तो आला नाही तर रागावतो, एकीकडे तमाम वेधशाळा छातीठोकपणे 'पुढचे दोन तीन दिवस तरी पाऊस काही येणार नाही' असे सांगत असताना, एखाद्या लबाड मुलाप्रमाणे तो अचानक येतो, आणि आला की थांबायचे नाव घेत नाही. तो जोरात कोसळला तरी आपल्याला नकोसे होते व जाताना तर तो अगदी हुरहुर लावून जातो. काही का असेना, तो आपल्या भावविश्वाचा एक अविभाज्य घटक असतो हे बाकि खरे... जन्मापासून ते अगदी शेवटपर्यंत तो आपली साथ काही सोडत नाही..

आपल्या जन्मवेळी घरातल्यांच्या तो आनंदाश्रूंच्या रुपात बरसतो. लहानपणी आपल्याला 'पाण्यात होड्या सोड्ण्यातली आणि कानात वार भरलेल्या वासराप्रमाणे चहुबाजूनी फिरण्यातली गम्मत तो शिकवतो. आठवा ती ' ए आई मला पावसात जाऊ दे' किंवा 'सांग सांग भोलानाथ' सारखी गाणी, अवघे बालपण क्षणभर का होइना, परत मिळाल्यासारखे वाटेल. 'खुप पाऊस पडू दे रे देवा, म्हणजे मग शाळेला सुट्टी मिळेल' या प्रार्थनेतला निरागसपणा त्यानेच दिला असतो जसा काही..
तरुणपणी तर काय, आधीच तरल, आतुर झालेल्या मनाला पाऊस चहुबाजुनी खतपाणी घालत असतो. मग ते आवडत्या व्यक्तीला घेऊन पावसात मनसोक्त भिजणे असो वा गरमागरम भजी खात वाफाळलेल्या चहाचे घुटके घेत मारलेल्या निवांत गप्पा असोत, किंवा मग एखाद्या दिवशी कामावर मस्तपैकी दांडी मारून घराच्या खिडकित हरवल्यासारखे तासनतास पाऊस बघत उभे रहाणे असो नाहीतर मित्रांबरोबर ट्रेक ला जाणे असो, सगळीकडे पाऊस आपली मूक सोबत करतच असतो...
आणि आयुष्याच्या संध्याकाळी हा पाऊस आपल्या डोळ्यात गतकाळच्या आठवणींचे पिसारे फुलवतो. थकलेल्या शरीर वा मनाला नवचैतन्य देतो.. जणू आशावाद देत असतो, 'अरे वेड्या, घाबरू नकोस, जोपर्यंत मी आहे, तोपर्यंत अंतानंतरही नवा आरंभ आहेच आहे. कारण मी म्हणजेच जीवन, मी म्हणजेच आशा..!! '
बघाना, आत्ता हा लेख लिहितानाही माझ्या मोबाईलवर 'श्रावणात घन नीळा बरसला' हे गाणे सुरु आहे. आणि डोळ्यासमोर साक्षात् श्रावण उभा आहे. तेंव्हा आता थांबलेलेच बरे.
तुम्हा सर्वाना पाऊस अनुभवण्यासाठी शुभेच्छा...!!

Monday, August 8, 2011

Notting Hill.. एक परीकथा !



चित्रपट साधारणतः दोन प्रकारचे असतात. काही अतिशय वास्तवदर्शी असतात तर काही केवळ स्वप्नातच घडू शकतील अशा घटनांचे चित्रण करणारे असतात. मला स्वतःला जसे वास्तवदर्शी चित्रपट पाहायला आवडतात तसेच काही वेळा स्वप्नांच्या राज्यातही रमायला आवडते. का माहित नाही, पण अशा परीकथाही काही वेळा जगण्याची नवीन उमेद देऊन जातात. मन अगदी refresh होते. माझ्या आरामाच्या असंख्य कल्पनेतील खाली दिलेली सर्वात वरच्या क्रमांकाची कल्पना आहे....बाहेर छान पाऊस रिमझिमत असावा, मी माझ्या उबदार घरकुलातील आरामदायी सोफ्यावर निवांतपणे बसून छानश्या जाळीदार खिडकीतून बाहेरचा पाउस व त्यामुळे येणारा गारवा अनुभवत बसावे, एका हातात काहीतरी चटकमटक खायचे व दुसरया हातात चहाचा वाफाळता कप असावा, आणि dvd वर एखाद्या परीकथेत प्रेमाचे गहिरे रंग भारत असावेत... खरच हे चित्र नुसते डोळ्यासमोर आले तरी फार प्रसन्न वाटते. या माझ्या अनुभवाला पूर्णत्व देणाऱ्या ज्या काही परीकथा आहेत त्यामध्ये ' Notting Hill' या चित्रपटाचा क्रमांक खूप वरचा लागतो.

चित्रपट पाहण्याची आणि आवडण्याची कारणे खूप सारी आहेत- बाकी काही आवडत नसले तरी ज्यांना फक्त लंडन हे शहर आवडते त्यांनीही हा चित्रपट जरूर पाहावा. - त्यात मला तर काय, Julia Roberts व Hugh Grant हे दोघेही आवडतात. कोणी म्हणते कि हा चित्रपट Julia Roberts च्या खरया आयुष्यावर आधारित आहे. काही का असेना, आपल्याला मात्र हा चित्रपट एक परीकथा पहिल्याचा आनंद देवून जातो आणि काही क्षणांपुरता का होईना, पण आयुष्य छान आहे, मनात इच्छा असेल तर काहीही घडू शकते, असा विश्वास देतो.

तर William Thacker, हा,(तसा अयशस्वीच म्हणता येईल असा) एक पुस्तकांचे दुकान चालवणारा माणूस! अतिशय अबोल, पण प्रामाणिक आणि सज्जन असा.. (कदाचित म्हणूनच त्याची बायको त्याला सोडून गेलेली असते). तो एका विक्षिप्त (पण मजेशीर) room-mate बरोबर राहत आहे. पण एका बुधवार नंतर त्याचे आयुष्यच बदलून जाते. त्या दिवशी, लाखात एक अशा योगायोगाने, Anna Scott हि जगप्रसिद्ध अभिनेत्री त्याच्या दुकानात पुस्तके घ्यायला येते... त्याच्या साधेपणामुळे प्रभावित होते, नंतर लगेचच एका विचित्र अपघातामुळे ती त्याच्या घरात येऊन पोचते आणि नंतर सुरु होते एक योगायोगांची विलक्षण मालिका..!! आता हि परीकथाच असल्यामुळे शेवट गोड होणार हे ओघाने आलेच, तरीपण julia Roberts व Hugh Grant, यांची पडद्यावरील chemistry अक्षरशः तुफान आहे. त्याला तितकीच मजेशीर साथ आहे ती Rhys Ifans , Tim McInnerny, Gina McKee, Emma Chambers या William च्या धमाल ग्रुपची. अनेक फ्रेम्स मध्ये हि मंडळी स्वतःची छाप सोडतात. काही प्रसंगाची खरी मजा पडद्यावरच घेण्यासारखी... मग तो ' William काही कलाकारांची मुलाखत घेतोय (खोटा पत्रकार बनून) हा प्रसंग असो, किंवा 'Anna William च्या बहिणीच्या वाढदिवसानिमित्त William बरोबर त्याच्या मित्राकडे जाते हा प्रसंग.. यातील गाणीही अतिशय श्रवणीय आहेत...

एकूण काय, थोडावेळ जर वास्तवाचे भान हरपून स्वप्नांच्या राज्यात रमायचे असेल तर हा चित्रपट जरूर पहा..

Tuesday, April 12, 2011

एक उनाड - अं हं - एक यादगार दिवस ... !!

काल सोमवार. आठवड्याचा पहिला आणि बहुतकरून सर्वांना थोडासा नकोसाच वाटणारा दिवस.. पण माझ्यासाठी मात्र खूप खूप चांगला उगवला होता बऱ का ! 
त्याचे झाले काय, की गेल्या वीकेंड ला माझा लाडका, एकुलता एक धाकटा भाऊ माझ्याकडे राहायला आला होता. शनिवार-रविवार मध्ये मी, माझा नवरा, माझा दोन वर्षाचा छकुला व त्याचा मामा अशी चार जणांनी मिळून धमाल केल्यावर सोमवारी मात्र मला माझे लहानपण पुन्हा -एक दिवसासाठी का होईना - अनुभवावेसे वाटले , म्हणून मग नवरा कामावर गेल्यावर आणि अरिन ला day-care मध्ये सोडल्यावर  (ऑफिसला रीतसर सुट्टी टाकून)  मी आणि माझे बंधुराज जे बाहेर पडलो ते गावभर भटकंती करून व झक्कास जेवण करून थेट दुपारीच घरी उगवलो. त्यानंतर , घरातील टेरेस मध्ये तासभर गप्पांचा फड जमवला. काल सुदैवाने हवासुद्धा कुंद, पावसाळी -पण मला अतिशय आवडणारी- अशी होती. मग एकदम माझ्या डोक्यात आले, की अरे, आपल्याला लाडक्या नवरोजीनी गेल्या वाढदिवसाला जो champion board गिफ्ट दिला आहे तो तसाच धूळ खात पडून आहे. मग काय, पुढचा तासभर मस्तपैकी कॅरम खेळून जीव रमवला. सोबतीला अखंड गप्पांचा रतीब चालूच होता. त्यावेळी जाणवले की खरच कितीतरी दिवसांनी आपण असे मोकळेपणानी हसतोय, बडबडतोय... मधली वर्षे जणूकाही गायबच झाली होती आमच्या दोघांसाठी! माझ्या  डोळ्यासमोर  ते झोपाळ्यावर झोके घेणारे, घर-घर खेळणारे, मध्येच भांडणारे पण परत एकत्र येणारे दोन छोटे निरागस जीव दिसायला लागले.. धूसर धूसर...! माझ्या भावाचीही थोडीफार तशीच अवस्था होती. कालच्या एका दिवसाने मला किमान पाच वर्षांनी तरुण केले... !!

माझा हा कालचा अनुभव हा अगदी प्रातिनिधिक म्हणावा असा. आपल्यापैकी प्रत्येकाला कधीतरी , रुटीन मधून बाहेर पडून, एक दिवस तरी निवांत, मनाजोगता घालवण्याची नितांत गरज असते. असं म्हणतात की असा एक दिवस जरी आपण जगलो तरी आयुष्य जवळपास पाच वर्षांनी वाढते. 

नेमकी हीच थीम आहे मी आज ज्याविषयी लिहिणार आहे त्या चित्रपटाची! नाव आहे अर्थातच - एक उनाड दिवस !
विश्वास दाभोळकर एक अतिशय शिस्तप्रिय माणूस. नियमाप्रमाणे अथवा शिस्तीने न वागणारी माणसे त्यांना सहनच होत नाहीत. पण या माणसावर जेंव्हा त्याच्या वाढदिवशीच काही कारणामुळे एक संपूर्ण दिवस बाहेर -रस्त्यावर - व्यतीत करण्याची वेळ येते, तेंव्हा काय होते याचे सुरेख चित्रण या सिनेमात केले आहे. सामान्य माणसे, त्यांचे छोटे छोटे आनंद व त्यातूनच त्यांच्या चेहेरयांवर फुललेले निर्व्याज हसू हे सगळे आपल्याही कुठेतरी आत आत भिडते.. पटते.  तसे पाहिले तर अशा क्षणातच आपले आयुष्य सामावले असते की ! म्हणून तर कितीही पैसे कमावले, कितीही मोठी घरे बांधली, कितीही गाडया घेतल्या, रूढार्थाने कितीही यशस्वी झालो तरी आईच्या हातचे जेवण, मुलांच्या डोळ्यातील कुतूहल, सहचारीचा आश्वासक स्पर्श या सर्व गोष्टींचा समावेश नसेल तर आयुष्य जगले काय नि नाही काय? खर की नाही?
अशोक सराफ हे विश्वास दाभोळकर म्हणून अगदी झकास. बाकी सर्वांच्याच अगदी छोट्या भूमिका आहेत. खास उल्लेख करायलाच हवा तो फैयाज यांच्यावर चित्रित केलेल्या 'हुरहूर असते तीच उरी ' या शोभा जोशी यांनी गायलेल्या गजलेचा... ती गजल, ते शब्द, ती चाल सारे काही  एकदम ' hi class' !!

शेवटी एक सांगावेसे वाटते की शांतपणे बसून हा चित्रपट पाहिलात तरी तुम्हाला पाच वर्षांनी तरुण झाल्यासारखे वाटेल...लावता पैज? 

Friday, April 8, 2011

कुंकू .. (सन १९३७)

वाचकहो, 
लेखाचे शीर्षक वाचून तुमच्या चेहरयावर उमटलेले प्रश्नचिन्ह मला स्पष्टपणे दिसते आहे. ' Out of Africa ' नंतर लगेच कुंकू? आणि ते सुद्धा आपल्या आजोबांच्या काळातील? पण माझी खात्री आहे, जर तुमच्यापैकी कोणी हा सिनेमा पहिला असेल तर तुम्हाला या दोघांमधील समान धागा लगेचच उलगडेल. या दोघांचेही एक ठळक वैशिष्टय असे कि हे दोन्ही चित्रपट खरया अर्थाने स्त्री-केंद्रित आहेत. मग भले समस्या निराळ्या का असेनात..!!
      एका वाक्यात सांगायचे तर हा सिनेमा म्हणजे एक नामवंत वकील 'काकासाहेब' आणि त्यांची (मुलगी शोभेल अशी) पत्नी 'नीरा' यांच्यातील खिळवून ठेवणारा संघर्ष आहे. 

नीरेवरील मातापित्यांचे छत्र केंव्हाच हरपले आहे. पण त्यापूर्वी त्यांनी आपल्या लेकीला उच्च शिक्षण दिले आहे. सुसंस्कृत केले आहे, तसेच स्वतंत्रपणे विचार करायलाही शिकवले आहे. अशी ही सर्वगुणसंपन्न नीरा, आपल्या मामा-मामीच्या घरात राहत आहे. त्या घरातील परिस्थिती तिच्या घराच्या अगदी विरुद्ध आहे. मामा मामी घरच्या गरिबीला आणि खंडीभर मुलांना कंटाळलेले आहेत. परिस्थितीवश मामा नीरेचे लग्न तिच्यापेक्षा वयाने बरयाच मोठया अशा एका नामवंत वकिलाशी लावून देतो. हे लग्न नीरेला फसवून करण्यात आले आहे. म्हणजे बैठकीला एका तरुण मुलाला बसवून प्रत्यक्ष लग्नाच्या वेळी मात्र या बिजवराला उभे करण्यात आले आहे. नीरेला जेंव्हा सत्य परिस्थिती उमगते तेंव्हा सर्वप्रथम ती हे लग्नच नाकारते. पण घरातील कोणीही तिचे काहीएक न ऐकता तिला नवरयाबरोबर त्याच्या गावी रवाना करतात. नीरा त्या गावाला जाते खरी, पण तिथे त्या घरातच ती स्वताचे वेगळे विश्व निर्माण करते. वृद्ध पतीचा मान राखतानाच त्याला शरण जायचे नाकारते. नवर्याच्या कारस्थानी आत्याविरुद्ध बंड पुकारतानाच, तिच्या नातीबरोबर मैत्रीचे संबंध प्रस्थापित करते. घरातील अडगळीच्या खोलीचे स्वरूप पालटते. त्या खोलीला देवघरचे रूप आणते. काकासाहेबांच्या उद्धट आणि रंगेल मुलाला वठणीवर आणतानाच त्यांच्या बुद्धिमान मुलीचा आदर्श मात्र सतत डोळ्यासमोर ठेवते. शेवटी काय होते ते पडद्यावरच पाहणे योग्य..
चित्रपट, मग तो कोणत्याही काळातील असे ना का, त्याची कथा हाच त्याचा खरा आत्मा असतो, हे हा चित्रपट पाहिल्यावर आपल्याला नव्याने जाणवते. तसे पाहिले तर हा चित्रपट 'कृष्णधवल' काळातील आहे. तरीपण दमदार कथेच्या आणि सच्या सादरीकरणाच्या शोधात असलेल्या कुणाही रसिकाला रंगांची कमतरता मुळीच जाणवू नये अशीच या चित्रपटाची मांडणी आहे. 
शांता आपटे (नीरा) आणि केशवराव दाते (काकासाहेब) या नामवंत कलाकार मंडळीनी आपापल्या भूमिकांमध्ये आपला जीव ओतला आहे.  त्यातील आशयघन गाणी, प्रभात ची दर्जेदार निर्मितीमूल्ये.. सारेच विचार करायला लावणारे.. आपणा सर्वांसाठी हा चित्रपट एक महत्वाचा संदेश देवून जातो - 

' मन शुद्ध तुझ गोष्ट आहे पृथ्वीमोलाची !
तू चाल पुढं, तुला रं गड्या भीती कशाची, परवा ही कुणाची ?' 


Tuesday, April 5, 2011

'Out of Africa'--- नव्हे 'out of the world ' ......

वाचकहो, 
पुढील काही दिवस माझ्या ब्लॉगच्या माध्यमातून मी पाहिलेल्या , आणि अर्थातच मला आवडलेल्या चित्रपटांविषयी लिहिण्याचा मानस आहे. हेतू हा, कि त्या निमित्ताने आपल्याबरोबर विचारांची देवाणघेवाण करता येईल व त्याहूनही महत्वाचे म्हणजे, मला तो चित्रपट पुन्हा नव्याने अनुभवता येईल. तर आजचे या मालिकेतले पहिले पुष्प.. अर्थात , ' OUT OF AFRICA....!!

 दिग्दर्शक Sydney Pollack च्या १९८५ साली पडद्यावर आलेल्या या अद्वितीय कलाकृतीला सात वेगवेगळ्या विभागांमध्ये 'academy awards ' ने गौरवण्यात आले होते. मला वाटते कि इतकी माहितीसुद्धा हा चित्रपट पाहण्यासाठी तुम्हाला उद्युक्त करण्यास पुरेशी आहे. तरीपण ..
तर हा चित्रपट Isak Dinesen (टोपणनाव Karen Blixen) या लेखिकेच्या 'out of Africa' या १९३७ साली प्रकाशित झालेल्या आत्मचरित्रावर बेतलेला आहे. आणि तो घडतो साधारण १९१४ ते १९३१ या कालखंडात.
चित्रपट सुरु होतो तो डेन्मार्क मध्ये... वृद्ध कारेन अंथरुणावर खिळली आहे. तरीही तिच्या डोळ्यासमोर तरळत आहे तिने आफ्रिकेत मोंबासा येथे Ngong Hills च्या पायथ्याशी विकत घेतलेले फार्म हाउस ! आफ्रिकेतील वास्तव्याशी निगडीत आहे तो तिच्या आयुष्यातील रुढार्थाने सर्वात अपयशी , पण तरीही तिच्यादृष्टीने सर्वात रोमांचकारी कालखंड ! कारण त्याला Denys Finch Hatton या मुक्तात्म्याच्या प्रेमाची गहिरी झालर लाभली आहे !!
कारेन गोष्ट सांगायला सुरुवात करते.."I had a farm in Africa......" आणि मग सुरु होतो जवळपास अडीच तासांचा प्रवास... कधीही संपू नये असे वाटणारा... 
कारेन ही एक श्रीमंत, उच्चकुलीन अशी डेन्मार्क येथे राहणारी स्त्री. केवळ baroness हे बिरूद लावण्यासाठी ती   bror Blixen नावाच्या एका baron शी लग्न ठरवते. तिचे स्वप्न असते.. आफ्रिकेमधील तिच्या टुमदार फार्म हाउसवर एक डेअरी सुरु करण्याचे. पण लग्न करण्यासाठी जेंव्हा ती आफ्रिकेत पोचते, तेंव्हा तिच्या लक्षात येते कि तिच्या सुनियोजित वराने त्या जागेचा वापर कॉफीची लागवड करण्याकरता करायचे ठरविले आहे; नव्हे तशी तयारीही सुरु केली आहे ! संघर्षाची पहिली ठिणगी इथेच पडते.  लग्नाच्या दुसरयाच दिवशी कारेनला एकटीला टाकून तिचा नवरा दूर शिकारीला निघून जातो.. तिला मनस्वी यातना होतात. पण ती आहे त्या परिस्थितीशी मुकाबला करण्यास सज्ज होते. कॉफी लागवडीच्या कामात जातीने लक्ष घालते. तिथल्या स्थानिक कामगारांची मने आपल्या वागणुकीने जिंकते. त्यांच्यासाठी पुरेसा रोजगार उपलब्ध करण्याचा प्रयत्न करते. त्या कुकुयू जमातीच्या आदिवासींच्या मुलांनी शाळेत यावे म्हणून जंग-जंग पछाडते. या सगळ्यामध्ये तिला आधार मिळतो तो Denys Finch Hatton या उमद्या व्यक्तिमत्वाचा.. तो तिला एक स्त्री म्हणून न वागवता एक माणूस, एक व्यक्ती म्हणून सन्मानाने वागवतो. तिच्या स्वातंत्र्याचा आदर करतो. तिला खऱ्या अर्थाने मुक्तपणे जगायला शिकवतो. कारेन त्याच्यामध्ये पूर्ण गुंतत जाते.. पण सरतेशेवटी तिचे दुर्दैव तिच्या इच्छाशक्तीवर मात करते.. 

आता चित्रपटाची पूर्ण स्टोरी सांगायची म्हटली तर एवढीच... पण त्यातील अतिशय तलम कशिदाकारी हि फक्त पडद्यावरच पाहण्यासारखी... खरे तर हा चित्रपट नुसता पाहण्याचा नाहीच. तर ती पंचेद्रीयानी अनुभवण्याची गोष्ट आहे.. चित्रपटातील सिंहांची शिकार, हत्तींचे चित्कार, रातकिड्यांची किरकिर, कानांना तृप्त करणारी मोझार्ट ची symphony, तो आफ्रिकेतील वेळीअवेळी कोसळणारा पाउस, हे सगळे शब्दात पकडणे केवळ अशक्य.. 
चित्रपटातील कालखंड साधारण पहिल्या महायुद्धाच्या आसपासचा. त्यामुळे, त्याकाळी स्त्रियांना मिळणारी दुय्यम वागणूक पाहता, कारेनचा संघर्ष आणखीनच उठून दिसतो. 
चित्रपटाच्या अनेक plus points पैकी प्रामुख्याने काही सांगायचे म्हटले तर त्यातील कलाकारांची फौज! Meryl Streep ही गुणी अभिनेत्री 'कारेन ' अक्षरशा जगली आहे. तीच गोष्ट Robert Redford याची. या दोन दिग्गजान्विषयी मी काही लिहावे इतकी माझी पात्रता नाही... दुसरे म्हणजे या चित्रपटाची cinematography.. 
ती फक्त अनुभवायची! जगायची !!
काय, आता इतके सांगितल्यावर वाटतोय न हा चित्रपट पाहण्यासारखा? मी तरी लिहिता लिहिताच पुन्हा एकदा तो जगले... विश्वास ठेवा, चित्रपट पाहिल्यावर खूप वेळ रेंगाळत राहील तो मनात...!!!

टीप - वरील व्यक्त केलेली मते हे माझे वैयक्तिक अनुभव आहेत.. त्याची कृपया चित्रपटाच्या समीक्षेशी गल्लत करू नये ही विनंती. 

Monday, April 4, 2011

सृजनाची ही असे घडी, चला उभारू उंच गुढी...!!





तो फुलांनी गच्च बहरलेला गुलमोहोर, ती कोकीळा, तो अशोकवृक्ष, ती आंबा व कडुनिंबाची कोवळी पालवी, तो मोगऱ्याचा गंध काय बरे सांगत आहेत? ती सकाळची प्रफुल्लीत सूर्यकिरणे कोणाचे स्वागत करीत आहेत ? 
कालपर्यंत सोबतीला असलेली मनावरची मरगळ अचानक कुणी निपटून काढली आहे? ही त्या चैत्राची किमया तर नव्हे? मग प्रवीण दवणे म्हणतात तशी खरच ही 'चैत्रपालवी' नव्हे तर ' मैत्रापालवी' आहे... शांताबाई शेळके यांनी या रुतूराजाचे स्वागत किती समर्पकपणे केले आहे..
गगना गंध आला, मधुमास धुंद झाला
फुलले पलाश रानी, जळत्या ज्वाला.. !!

आपणा सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा ..!
नूतन वर्षाभिनंदन.....!!!



गोंधळलेले बटाटे 😀

 साधारण ९ वर्षांनी फिरकले आहे स्वतःच्या ब्लॉग वर. म्हणजे बाकी प्रोफेशनल प्लॅटफॉर्म्स वर लिखाण चालू होते पण मातृभाषेतल्या लिखाणाची मजा वेगळीच...