Thursday, December 15, 2011

Sometimes NOTHING is EVERYTHING...

वाचकहो,

काही दिवसांपूर्वी Julia Roberts चा Eat, Pray, Love हा चित्रपट टीव्हीवर पाहत होते. Julia च्या इतर अनेक चित्रपटांच्या मानाने हा तसा संथ गतीचा आणि वेगळ्या धाटणीचा चित्रपट आहे. कदाचित  म्हणूनच की काय, तो हळूहळू आतमध्ये मुरत जातो आणि मग आपण चित्रपटातील philosophy वर कधी विचार करायला लागतो हे आपले आपल्यालाही कळत नाही...
तर आयुष्याचा अर्थ शोधायला निघालेली एक मनातून अस्वस्थ अशी स्त्री.. तिला जगभर फिरताना काय काय अनुभव येतात आणि मग त्या अनुभवांचा एक घटक होताना ती आतून  कशी शांत, समाधानी  होत जाते याची ही कथा आहे. या प्रवासात एका टप्प्यावर ती इटलीला येऊन पोचते. तिथे काही दिवस व्यतीत करताना  तिला त्या लोकांच्या कायम तोंडावर असलेले एक वाक्य खूप भावते - "ll dolce far niente"  अर्थात "the sweetness of doing nothing" ....
चित्रपट चालू असताना हे वाक्य आले आणि त्याने मनाचा कब्जा घेतला. एका दृष्टीने हा तसा नवीन विचार होता. - "the SWEETNESS of doing NOTHING ?? "  काही न करण्यातील गोडवा, आनंद ?? - अरे, इतके दिवस तर आपण कृतीशील असण्याबाद्दलचे कितीतरी विचार ऐकले. 'आराम हराम आहे' हेच आपल्यावर सतत बिंबवले गेले आहे. मग हे काय वेगळेच बरे? मी हळूहळू अंतर्मुख होत होते ... आणि एका क्षणी मला जाणवले की आपण आतून शांत शांत झालो आहोत... एका कुहरात हरवलो आहोत, ज्याच्या पलीकडे प्रकाश आहे की नाही याचीही आपल्याला फिकीर नाही... आणि मग अचानक वरील वाक्याचा अर्थ गवसला.... समाधी, समाधी म्हणतात ती याहून वेगळी असेल का?
खरच, एरव्ही आपण अगदी एकटे असतानाही  किती गजबजाटात हरवलेलो असतो ना? कामवालीच्या दांड्या, मुलांची शाळेची घाई, बॉसच्या deadline ची आठवण करून देणाऱ्या मेल्स, traffic चा त्रास, सहकाऱ्यांच्या कटकटी, संप, बंद, रोजचा पेपर वाचूच नये असे फिलिंग देणाऱ्या आतील बातम्या, पेट्रोल चे अखंड वाढते दर... एक ना दोन, हजार कटकटी.. काही आपल्या आवाक्यातील, तर बरयाचश्या आपल्या कुवतीबाहेरच्या...तरीपण आपण त्यांच्यावर विचार करणे, वैतागणे थांबवत नाही.. आणि हा सगळा भार पडतो आपल्या मनावर... ते बिचारे निमुटपणे हा ताण सहन करत राहते... पण किती दिवस?
चला मग, आता आपल्या मनाला थोडी विश्रांती देऊ या का? असे करायचे, की घरातलाच एक कोपरा निवडायचा...अगदी कुठलाही... आणि तिथे सर्व शरीर सैलावून बसायचे... मग अलगद डोळे मिटायचे.. मनातील विचारांना, त्यांना हवे त्या दिशेला जाऊन द्यायचे.. पण आपण मध्ये लुडबुड करायची नाही हं.. आताचा वेळ हा फक्त आपल्या मनाचे ऐकायचा आहे... गम्मत म्हणजे, आपण घाईत असताना, कधी एकदा आपल्याला शांतपणा मिळेल याची वाट बघत असतो, पण जेंव्हा खरोखरच शांतपणे बसायची वेळ येते तेंव्हा ते वाटते तितके सोपे नाही हं... बरोबरच आहे, आपण कायम आपल्या मनाला मारून मुटकून एका कोपरयात बसवत असतो. आता आपण कोपरयात बसून मनाला हवे तसे बागडून द्यायचे म्हणजे काय? ...
पण या अवस्थेत काही वेळ गेल्यावर, खरच खूप खूप वेगळे वाटते.. थोड्या वेळाने आपण शांतपणे डोळे उघडतो तेंव्हा अगदी पुनर्जन्म झाल्यासारखे वाटते.. भिंतीवर पडलेला उन्हाचा कवडसाही वेगळे रूप घेऊन येतो आपल्यासाठी.. पानांची सळसळ, गच्चीतील कबुतरांचे मंद घुमणे, कुठेतरी दूर देवळात वाजणारी घंटा, स्वयंपाकघरात कढवल्या जाणारया लोण्याचा खरपूस वास, घरातील लहान मुलाचे खुदुखुदू हसणे, देवघरातील उदबत्तीचा मंद सुगंध, प्रेमाने रान्धलेल्या अन्नाची जिभेवर रेंगाळणारी चव या आणि अशा असंख्य गोष्टी आपल्या चेहेरयावर हसू उमटवतात.. कोंडलेला श्वास मोकळा होतो...आपण नव्याने सज्ज होतो... आयुष्याची लढाई लढण्यासाठी.. नव्हे, आयुष्य समरसून जगण्यासाठी....तेंव्हाच कुठेतरी जाणवते - खरच... Sometimes NOTHING is EVERYTHING....



No comments:

Post a Comment

पुण्यनगरीतील वाहतूकव्यवस्था आणि वाहनांवरील साहित्यसंपदा: एक अभ्यासपूर्ण विवेचन !!

नमस्कार, सुमारे दशकभर पुण्यात राहिल्यावर या नगरीच्या विद्वत्तेचा आम्हाला स्पर्श झाला नसता तरच नवल. त्यामुळे झालेय काय, कोणत्याही गोष्टीची...