नमस्कार वाचकहो,,
आज शनिवार. तसा न कर्त्याचाच वार. पण मी आणि माझे पिलू सकाळीच आवरून बसलो होतो. बाहेर भटकायला जायचे होते ना ! पण जाण्याआधी नेहमीचाच यक्षप्रश्न सोडवायचा होता - आज खायला काय करायचे? मग फ्रीज उघडून आढावा घेतला, काय काय आहे त्याचा- खरेतर काहीतरी चमचमीत खावेसे वाटत होते पण फ्रीजमधील परिस्थिती फारशी उत्साहवर्धक नव्हती :( थोडेसे किसलेले गाजर, चिरलेला कांदा, चिरलेले tomato व बारीक चिरलेली कोथिंबीर !! म्हणजे तसा पौष्टिक कोशिंबिरीचा मालमसाला होता, पण आजतरी जिभेने मेंदूवर मात करायचा चंगच बांधला होता।. :) मग काय, सुरु झाले जिव्हा आणि मेंदूमधील युद्ध ! एरव्ही हे युद्ध तसे घातकच पण आज त्यातून चक्क एक छान पदार्थ जमून गेला :)
आता तुम्ही म्हणाल कि शीर्षक तर आहे झुणका, मग त्यात नवीन काय आहे? तर हा आहे पौष्टिक झुणका!! कारण त्यात नेहमीच्या फक्त कांद्याबरोबरच गाजर, tomato, असा ऐवजही आहे आणि कोथिंबीर पण जरा सढळ हातानेच वापरली आहे. पण याचा USP काय आहे माहित आहे? यात चण्याच्या पिठाऐवजी चक्क मुगाचे पीठ वापरले आहे. तर आता नमनालाच घडाभर तेल न ओतता एकदम फोडणी करू या का?
साहित्य -
चिरलेला कांदा, किसलेले गाजर, चिरलेले tomato प्रत्येकी अर्धी वाटी, अर्धी वाटी मुगाचे पीठ, चिरलेली कोथिंबीर एक जुडी, तीन मोठे चमचे तेल, पाव चमचा, हिंग अर्धा चमचा हळद, तिखट, मीठ चवीनुसार
कृती -
1. प्रथम मुगाचे पीठ कोरडेच भाजून घ्यावे.
2. त्याच भांड्यात तेलाची फोडणी करून चिरलेल्या भाज्या (कोथिंबीर सोडून) झाकण ठेवून शिजवून घ्याव्यात.
3. भाज्या शिजल्या कि चिरलेली कोथिंबीर टाकून एक मिनिट मोठ्या आचेवर परतून घ्यावे.
4. मग त्यात तिखट,, मीठ टाकून पुन्हा एकदा परतून घ्यावे.
5. सर्वात शेवटी मुगाचे पीठ पेरून दोन वाफा काढाव्या.
6. पुढे काय? अहो तयार झाला कि झुणका.. :) गरम गरम भाकरी, किंवा फुलक्यांबरोबर त्याचा आस्वाद घ्यावा.
टीपा-
1. या झुणक्यासाठी आपण बारीक चिरलेला कोबी, सिमला मिरची, फरसबी, इत्यादी भाज्यांचे मिश्रणही वापरू शकतो.
2. आवडत असल्यास सर्वात शेवटी दोन चमचे दाण्याचे कूट टाकायलाही हरकत नाही.
3. Tomato पुरेसे आंबट नसल्यास एक चमचा लिंबुरस किंवा एक चमचा दही टाकावे.
No comments:
Post a Comment