Wednesday, July 13, 2016

किल्ला.. आठवणींचा आणि अनुभवांचा....

नमस्कार,

सध्या सगळीकडे अगदी नभ उतरू आलं आहे. मुसळधार कोसळणारा पाऊस आणि मन चिंब करणाऱ्या आठवणी - कसं अलवार आणि अतूट नातं. शाळेत असताना हिरव्यागार गवतात फुलपाखरांशी केलेली दंगामस्ती, भिजून कुडकुडत घरी येणे आणि नेमके लाईट नसणे. मग काळोखातच आईच्या हातचे गरमागरम जेवण, तिचा प्रेमळ स्पर्श. मग माळ्यावर बसून कानात साठवलेला तो पावसाचा घनगंभीर आवाज.

बाहेर पाऊस कोसळतोय.. वेड्यासारखा. मन आंदोळतय आठवणींच्या झुल्यावर.. आणि टीव्ही वर चित्रपट चालू होतो - किल्ला ....

एक आठवीत शिकणारा मुलगा. वडील नुकतेच गेलेले. आईवर स्वतःला आणि या मुलाला सावरण्याची दुहेरी जबाबदारी. त्यात तिची कोकणात झालेली बदली. या सर्व अनपेक्षित बदलांना सामोरे जाताना त्या मुलाचे बदलणारे भावविश्व अतिशय प्रभावीपणे मांडले आहे या चित्रपटात.

हा मुलगा एकदम "good boy" या पठडीतला आहे हे सुरवातीलाच जाणवते. आईची घालमेल त्याला समजतेय. तिला जमेल तितके सांभाळून घ्यायचा त्याचा प्रामाणिक प्रयत्न आहे. पण त्याचेही अल्लड वय आहे. लहानपण आणि तरुणपण यांच्या सीमारेषेवरील असलेले त्याचे मन हळुवार झाले आहे. नवीन शाळा, नवीन मित्र, त्यांची वेगळी भाषा, या सगळ्यांशी जुळवून घेता घेता काहीवेळा कोंडमारा होतो मनाचा. पण त्याबरोबरच परिस्थितीचा अबोल स्वीकार ही भावनाही कुठेतरी आईकडे बघता बघता जाणवतेय त्याला.

एके दिवशी तो आणि त्याचे नवीन मित्र गावाजवळच्या किल्ल्यापर्यंत सायकलची शर्यत लावतात. सर्वजण किल्ल्यावर पोचून मजेत दंगामस्ती करत असताना अचानक पाऊस सुरू होतो. हा मुलगा आणि त्याचे मित्र यांची चुकामूक होते. आणि काही काळ तो किल्ल्याच्या सानिध्यात एकटाच असतो.. कोसळणारा पाऊस अनुभवत. मग मित्रांबरोबरचा अबोला, पुन्हा जमलेली गट्टी आणि सर्व काही सुरळीत चाललेय असे वाटतं असतानाच आईची पुन्हा झालेली बदली. पुन्हा नवा गाव नवा देश आणि अर्थातच नवे अनुभव...

हे सगळे चित्रीकरण इतके सुरेख आहे की आपल्या आजूबाजूलाच ते घडतेय असे सारखे वाटत राहते. त्यातून कोकण आणि पाऊस.... इतके मुसळधार आणि हिरवेगार गारुड आहे ना चित्रपटभर की तोच एक अनुभव होऊन जातो. संवाद फारसे नाहीतच. भाषाही उगीचच अलंकारिक नाही. सगळा नजरेचा, आणि बदलणाऱ्या चेहऱ्यांचा खेळ. पण खरे आयुष्य तरी शब्दबंबाळ कुठे असते हो? ते तर अनेक निवांत आणि आश्वासक क्षणांमधूनच उलगडत जाते ना हळूवार...

नक्की बघा हा चित्रपट - अमृता सुभाषसाठी, छोटया चिन्मय साठी (अर्चित देवधर), त्याच्या मित्रांसाठी आणि हो, कोंकण आणि पावसासाठीसुद्धा !!!




 

1 comment:

पुण्यनगरीतील वाहतूकव्यवस्था आणि वाहनांवरील साहित्यसंपदा: एक अभ्यासपूर्ण विवेचन !!

नमस्कार, सुमारे दशकभर पुण्यात राहिल्यावर या नगरीच्या विद्वत्तेचा आम्हाला स्पर्श झाला नसता तरच नवल. त्यामुळे झालेय काय, कोणत्याही गोष्टीची...