Thursday, August 3, 2017

पुण्यनगरीतील वाहतूकव्यवस्था आणि वाहनांवरील साहित्यसंपदा: एक अभ्यासपूर्ण विवेचन !!

नमस्कार,

सुमारे दशकभर पुण्यात राहिल्यावर या नगरीच्या विद्वत्तेचा आम्हाला स्पर्श झाला नसता तरच नवल. त्यामुळे झालेय काय, कोणत्याही गोष्टीची अतिरिक्त चिकित्सा केल्याशिवाय आमचा आत्मा थंड होत नाही. मग त्याला वाहतूक हा विषय कसा वर्ज्य राहील ? मी तर पुण्यातील गाड्यांच्या नंबरप्लेट्सवर पी. एच. डी. केलेली असल्याच्या थाटात निदान करत असते. म्हणजे गाडीची नंबरप्लेट आणि मेक पाहूनच फक्त गाडीच नविन आहे की ड्रायव्हरही, आणि नवीन ड्रायव्हर कश्या प्रकारच्या चुका करेल याचे आडाखे मी सहज बांधू शकते आणि बहुतेक वेळा ते बरोबरही असतात. माझी मॅनेजर यालाच बहुधा कौतुकाने ATD (Attention to Details) म्हणते तर माझे डॉक्टर यालाच ATDD (Attention to Detail Disorder) म्हणतात. असो.

तर, आजच्या रम्य सकाळी सुमारे दहाच्या दरम्यान ऑफिसला निघायचा अतिशहाणपणा केल्यामुळे युनिव्हर्सिटी चौकात अशक्य गर्दी असणार हे निश्चितच होते. पण सकाळपासूनच कधी नव्हे तो बरा मूड जमून आल्यामुळे रोजच्यासारखी स्वतःशीच चिडचिड नं करता (माझी ट्रॅफिक मधील चिडचिड पण unique असते बरं का ! म्हणजे MH27, WB05, etc. असे नंबर्स पाहून, "छे, असे काय नंबर्स असतात? बहुतेक मंगळावरून आलेली गाडी दिसतेय वगैरे वगैरे), गाडीच्या बंद काचांआडून सभोवतालच्या घटनांचे निरीक्षण करायला लागले. आणि काय सांगू लोकहो, माझ्या साहित्यिक ज्ञानात आमूलाग्र भर पडली.

माझ्या समोरील एक "क्षत्रिय कुलवतंस" i20 आपल्या खानदानी सिगरेटचा धूर इतरांवर फेकत त्या सर्वांची कुळे धन्य करण्याचे कर्तव्य चोख बजावत होती. इकडेतिकडे इंचभरही जागा शिल्लक नसताना माझ्या मागच्या हुंदाईने मला कर्णकर्कश्य हॉर्नच्या माध्यमातूनच "थोडं पटकन पुढे होता का प्लिज" असे विचारले. मग मी पण आरशातूनच हातवारे करून "आता समोरच्या गाडीवरून उडून जाऊ का पुढे? " असा प्रेमळ सवाल केल्यावर आमचा संवाद तिथेच थांबला. इतक्याच माझ्या शेजारूनच एक "CNG, Smart Solutions" वायुवेगाने आली आणि तिने "Wrong side ने पटकन पुढे घुसणे" हे कसे smart solution आहे याचे प्रात्यक्षिकच दाखवून दिले. माझ्या थोडेसे पुढे एक "जीवाचे पाखरू" वाला टेम्पो जवळपास रांगतच आणि ते ही उजव्या लेनमधून पुढे सरकण्याचा प्रयत्न करत होता. "बहुदा ह्या पाखराला पंख फुटले नसावेत अजून".. इति माझे मन.. थोडे पुढे गेले गर्दीतून तर एक "नाद केला बाद केला " इंडिका स्वतःच रन आऊट होऊन बंद पडली होती रस्त्याच्या कडेला.
थोडे पुढे एका अरुंद वळणावर गाड्यांची रांगच लागली असताना तेवढ्यात एक नवीकोरी नंबर प्लेटही नं पडलेली ऑडी उडत आली आणि डाव्या बाजूने मार्ग काढायचा प्रयत्न करू लागली. माझ्या मनात विचार सुरु झाले .. "ऑडीच्या नव्या airbags टेस्ट व्हायची हीच ती वेळ !! अरे बाबा, पण नंबर प्लेट नसताना इन्शुरन्स क्लेम करता येत नाही. आणि ड्राइव्हरबाबा, तुझा पण आहे ना mediclaim??" थोडे पुढे सिग्नलला थांबले असताना एका "चांगभलं" fortuner ने एक लालजर्द पिचकारी शेजारच्या दुचाकीस्वारावर उडवून त्याच्या शुभ्र शर्टाचं चांगलंच भलं केलं. मग त्या दुचाकीस्वार बाजीरावानेही fortunerच्या मागील सात पिढ्यांची प्रेमळ चौकशी केली.

अरेच्चा, असे साहित्यिक विवेचन करता करता ऑफिस आलेच की. म्हणजे कोणत्याही परिस्थितीवर विनोद हा जालीम उपाय आहे तर.. हुश्य !!!


तळटीप - वरील विवेचनाचा हेतू केवळ निखळ मनोरंजनाचा आहे. त्यातून कोणी मनाला लावून घेतल्यास मंडळ जबाबदार नाही. कारण जबाबदारी घेणे आणि योग्य वेळी ती टाळणे हे ही आमचे वैशिष्टय आहे बरं का !!!
 

1 comment:

पुण्यनगरीतील वाहतूकव्यवस्था आणि वाहनांवरील साहित्यसंपदा: एक अभ्यासपूर्ण विवेचन !!

नमस्कार, सुमारे दशकभर पुण्यात राहिल्यावर या नगरीच्या विद्वत्तेचा आम्हाला स्पर्श झाला नसता तरच नवल. त्यामुळे झालेय काय, कोणत्याही गोष्टीची...