Tuesday, April 12, 2011

एक उनाड - अं हं - एक यादगार दिवस ... !!

काल सोमवार. आठवड्याचा पहिला आणि बहुतकरून सर्वांना थोडासा नकोसाच वाटणारा दिवस.. पण माझ्यासाठी मात्र खूप खूप चांगला उगवला होता बऱ का ! 
त्याचे झाले काय, की गेल्या वीकेंड ला माझा लाडका, एकुलता एक धाकटा भाऊ माझ्याकडे राहायला आला होता. शनिवार-रविवार मध्ये मी, माझा नवरा, माझा दोन वर्षाचा छकुला व त्याचा मामा अशी चार जणांनी मिळून धमाल केल्यावर सोमवारी मात्र मला माझे लहानपण पुन्हा -एक दिवसासाठी का होईना - अनुभवावेसे वाटले , म्हणून मग नवरा कामावर गेल्यावर आणि अरिन ला day-care मध्ये सोडल्यावर  (ऑफिसला रीतसर सुट्टी टाकून)  मी आणि माझे बंधुराज जे बाहेर पडलो ते गावभर भटकंती करून व झक्कास जेवण करून थेट दुपारीच घरी उगवलो. त्यानंतर , घरातील टेरेस मध्ये तासभर गप्पांचा फड जमवला. काल सुदैवाने हवासुद्धा कुंद, पावसाळी -पण मला अतिशय आवडणारी- अशी होती. मग एकदम माझ्या डोक्यात आले, की अरे, आपल्याला लाडक्या नवरोजीनी गेल्या वाढदिवसाला जो champion board गिफ्ट दिला आहे तो तसाच धूळ खात पडून आहे. मग काय, पुढचा तासभर मस्तपैकी कॅरम खेळून जीव रमवला. सोबतीला अखंड गप्पांचा रतीब चालूच होता. त्यावेळी जाणवले की खरच कितीतरी दिवसांनी आपण असे मोकळेपणानी हसतोय, बडबडतोय... मधली वर्षे जणूकाही गायबच झाली होती आमच्या दोघांसाठी! माझ्या  डोळ्यासमोर  ते झोपाळ्यावर झोके घेणारे, घर-घर खेळणारे, मध्येच भांडणारे पण परत एकत्र येणारे दोन छोटे निरागस जीव दिसायला लागले.. धूसर धूसर...! माझ्या भावाचीही थोडीफार तशीच अवस्था होती. कालच्या एका दिवसाने मला किमान पाच वर्षांनी तरुण केले... !!

माझा हा कालचा अनुभव हा अगदी प्रातिनिधिक म्हणावा असा. आपल्यापैकी प्रत्येकाला कधीतरी , रुटीन मधून बाहेर पडून, एक दिवस तरी निवांत, मनाजोगता घालवण्याची नितांत गरज असते. असं म्हणतात की असा एक दिवस जरी आपण जगलो तरी आयुष्य जवळपास पाच वर्षांनी वाढते. 

नेमकी हीच थीम आहे मी आज ज्याविषयी लिहिणार आहे त्या चित्रपटाची! नाव आहे अर्थातच - एक उनाड दिवस !
विश्वास दाभोळकर एक अतिशय शिस्तप्रिय माणूस. नियमाप्रमाणे अथवा शिस्तीने न वागणारी माणसे त्यांना सहनच होत नाहीत. पण या माणसावर जेंव्हा त्याच्या वाढदिवशीच काही कारणामुळे एक संपूर्ण दिवस बाहेर -रस्त्यावर - व्यतीत करण्याची वेळ येते, तेंव्हा काय होते याचे सुरेख चित्रण या सिनेमात केले आहे. सामान्य माणसे, त्यांचे छोटे छोटे आनंद व त्यातूनच त्यांच्या चेहेरयांवर फुललेले निर्व्याज हसू हे सगळे आपल्याही कुठेतरी आत आत भिडते.. पटते.  तसे पाहिले तर अशा क्षणातच आपले आयुष्य सामावले असते की ! म्हणून तर कितीही पैसे कमावले, कितीही मोठी घरे बांधली, कितीही गाडया घेतल्या, रूढार्थाने कितीही यशस्वी झालो तरी आईच्या हातचे जेवण, मुलांच्या डोळ्यातील कुतूहल, सहचारीचा आश्वासक स्पर्श या सर्व गोष्टींचा समावेश नसेल तर आयुष्य जगले काय नि नाही काय? खर की नाही?
अशोक सराफ हे विश्वास दाभोळकर म्हणून अगदी झकास. बाकी सर्वांच्याच अगदी छोट्या भूमिका आहेत. खास उल्लेख करायलाच हवा तो फैयाज यांच्यावर चित्रित केलेल्या 'हुरहूर असते तीच उरी ' या शोभा जोशी यांनी गायलेल्या गजलेचा... ती गजल, ते शब्द, ती चाल सारे काही  एकदम ' hi class' !!

शेवटी एक सांगावेसे वाटते की शांतपणे बसून हा चित्रपट पाहिलात तरी तुम्हाला पाच वर्षांनी तरुण झाल्यासारखे वाटेल...लावता पैज? 

4 comments:

  1. मी पहिला आहे तो सिनेमा, आणि तू म्हणते तसे खरच पाच वर्षांनी तरुण झाल्या सारखे वाटते :)
    खूप दिवस झाले ठरवते कि आपण पण एक दिवस निवांत office ला बुट्टी मारून कुठे तरी मस्त फिरावे , Sat & Sun पण असतात पण ऑफिसला सुट्टी मारून फिरण्यात काही और मज्जा आहे. बघू कधी शक्य होत ते.

    ReplyDelete
  2. असे म्हणतात की कोणत्याही शुभकार्यासाठी 'आज आणि आत्ता' यासारखा मुहूर्त नाही. आज जमणार नसेल तर उद्या तरी सुट्टी टाक. निवांतपणे पिल्लाशी खेळ. घरात दुसरे कोणीच नाही असे समज आणि एकदम "राणीसारखी" वाग. बघ किती मस्त वाटते ते!

    ReplyDelete
  3. आज पुन्हा एकदा मी तुझा post वाचला. कारण मला जे लेख आवडतात ते मी पुन्हा पुन्हा वाचते , आणि मला असे वाटते की या post बरोबर एक उनाड दिवस या सिनेमाचा एखादा फोटो जर टाकलस ना तर वाचायला अजुनच मज्जा येईल.

    ReplyDelete
  4. असे चित्रपट पुन्हा पुन्हा पाहावे...जगायला शिकवतात ते...

    ReplyDelete

पुण्यनगरीतील वाहतूकव्यवस्था आणि वाहनांवरील साहित्यसंपदा: एक अभ्यासपूर्ण विवेचन !!

नमस्कार, सुमारे दशकभर पुण्यात राहिल्यावर या नगरीच्या विद्वत्तेचा आम्हाला स्पर्श झाला नसता तरच नवल. त्यामुळे झालेय काय, कोणत्याही गोष्टीची...