Tuesday, February 9, 2016

The Happiness Project अर्थात आनंदाची पूर्वतयारी

नमस्कार,

गेल्या काही दिवसांपासून Gretchen Rubin या लेखिकेचे The Happiness Project  हे पुस्तक वाचत आहे. १२ महिने, १२ उद्दिष्टये, आणि त्यांची अंमलबजावणी असे काहीसे स्वरूप आहे या पुस्तकाचे.

एक ३६ वर्षाची स्त्री. प्रेमळ नवरा, दोन गुणी मुली, मनासारखे काम, सुंदर घर… सगळे कसे चौकटीतल्या चित्रासारखे. आणि एक दिवस तिला अचानक जाणवते - आपण असायला  हवे तितके आनंदी  होत नाही आजकाल. म्हणजे ही स्त्री खंतावलेली, निराश, उदास नाहीये बरं का, पण तिला अतिशय consciously, समजून उमजून आनंदी व्हायचे आहे. हातून निसटलेल्या गेलेल्या असंख्य आनंदी क्षणांबद्दल नंतर कधीतरी हळहळ व्यक्त करण्यापेक्षा सभोवताली असलेल्या सुखाची आताच प्रशंसा करायची आहे, ते साजरं करायचं आहे आणि त्याहूनही पुढे जाऊन येणारे क्षणही आनंदी कसे करता येतील, त्यादृष्टीने आपली मानसिकता कशी असावी लागेल या सगळ्याचाच साधकबाधक विचार करायचा आहे.  या आत्मपरिवर्तनाच्या दिशेने चालू झालेल्या तिच्या प्रवासाचे वर्णन म्हणजे हे पुस्तक.

खरंच आपण सगळेच किती धडपड करत असतो नं आनंदासाठी. आजूबाजूला पाहावे तर कस्तुरीमृगांची वर्दळ दिसते. सगळेच आनंदाच्या शोधात. कुणाला बारीक व्हायचे आहे तर कुणाला जाड. कुणाला थोडा अजून पैसा कमवायचाय, तर कोणाला हाती असलेला पैसा कसा वापरायचा हा प्रश्न. कोणाकडे वेळ नाही म्हणून खंत तर आणखी कोणीतरी हाती असलेल्या वेळाचे काय करायचे या चिंतेत. प्रत्येकालाच दुसऱ्या कुणासारखे तरी होऊन सुख मिळवायचे आहे. नं सरणारी तगमग… काहींच्या बाबतीत अगदी आयुष्य संपेपर्यंत !! आणि मग स्वतःशीच खंतावलेला संवाद -  " I would have been somebody".

खरंतर आपण या क्षणीही "somebody" आहोतच की. प्रश्न आहे तो हे स्वीकारण्याचा.  मला वाटते आनंदाचे diet plan सारखेच आहे. म्हणजे सगळ्यांच्या लेखी आनंदाची व्याख्या, आणि आनंदी व्हायची तत्वे साधारण सारखीच. खरी अडचण येते ती मनातल्या कल्पना प्रत्यक्षात आचरणात आणताना.

"how to be happy" असा Google सर्च केला तर साधारण ६३ कोटी लिंक्स दिसतात. किती मजेची गोष्ट आहे नं, खरंतर हवा, पाणी अन्न वस्त्र आणि निवारा यासारखाच आनंदी असणे हा ही आपला जन्मसिद्ध हक्क आहे. आणि तरीही तो मिळवणे हे कितीतरी लोकांसाठी सर्वात कठीण काम असते. असे तर नसेल नं कदाचित की माहितीच्या महापुरात आपला स्वतःशीच संवाद थांबलाय? सतत दुसऱ्या कुणासारखे तरी होण्याच्या प्रयत्नांमध्ये आपला मूळ आत्माच हरवलाय?

तुम्ही लहान मूल पाहिलेय का लक्ष देऊन? स्वतःमध्ये रममाण झालेले. अपेक्षा आणि अपेक्षाभंगाचे ओझे या सर्वांपासून मुक्त… मोठे होत जाताना आपल्यामधील सहज, उपजत आनंद हळूहळू कसा कमी होत जातो नं.

हे पुस्तक एक निमित्त आहे माझ्यासाठी - आतमधील लहान मूल जोपासण्याचे. Leo Tolstoy म्हणतो त्याप्रमाणे " If you want to be happy, BE. " इतक्या सहजपणे आनंदी राहण्याचे… प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे नं सहजतेसाठी !!!


                                      




 

No comments:

Post a Comment

पुण्यनगरीतील वाहतूकव्यवस्था आणि वाहनांवरील साहित्यसंपदा: एक अभ्यासपूर्ण विवेचन !!

नमस्कार, सुमारे दशकभर पुण्यात राहिल्यावर या नगरीच्या विद्वत्तेचा आम्हाला स्पर्श झाला नसता तरच नवल. त्यामुळे झालेय काय, कोणत्याही गोष्टीची...