Tuesday, January 26, 2016

भारत माझा देश आहे…

नमस्कार,

सगळ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप शुभेच्छा.

गेल्या शुक्रवारी "एअरलिफ्ट" बघायला गेलो होतो. सुन्दर… निव्वळ अप्रतिम…

मध्येच येणारी गाणी, इराकी जनरलचे थोडे खटकणारे हिन्दी आणि कदाचित आणखीनही काही दोष, या सर्वांना नजरेआड करूनही प्रत्येक भारतीयाने आवर्जून पाहावा असा हा चित्रपट. कारण कुवेतच्या एम्बसी मध्ये भारताचा झेंडा फडकला जाताना डोळ्यात येणारे अश्रू त्या नायकाचे किंवा त्याच्याबरोबर इराकमध्ये अडकलेल्या दीड लाख लोकांचेच राहत नाहीत तर "आंखो से अश्क़ बनके जजबात बह राहा है " या ओळीप्रमाणे प्रत्येक भारतीयाचे होतात. तरुणाईने ओसंडून वाहणाऱ्या सिनेमागृहातूनही टाळ्यांचा कडकडाट ऐकू येतो. "वन्दे मातरम" चा जयघोष होतो तेंव्हा देशभक्ती, देशप्रेम या मनाच्या कोपऱ्यात वसलेल्या पण एरव्ही निव्वळ पुस्तकी वाटणाऱ्या शब्दांना हिऱ्यांचे तेज चढते.

१९९० चा सुमार. आपली मातृभूमी सोडून पोटापाण्याच्या उद्योगासाठी कुवेत मध्ये गेलेले १७०००० भारतीय. त्यांच्या नाना तऱ्हा. "आपण कुवेती नागरिकच आहोत " या नकळतपणे उराशी बाळगलेल्या समजुतीला जोरदार ठेच लागते जेंव्हा सद्दाम हुसैन कुवेतवर लष्करी हल्ले चढवतो. सर्वप्रथम डोके वर काढतो तो स्वार्थ - मी आणि माझे कुटुंब यांची सुरक्षितता. या स्वार्थाचे रुपांतर हळूहळू एका उदात्त हेतूमध्ये कसे होते आणि मग त्याची अंमलबजावणी करण्यासाठी काय प्रयत्न केले जातात याची सत्यकथा म्हणजे हा चित्रपट.

१७०००० नागरिक आणि सलग ५९ दिवस war-zone मध्ये ४८८ civil airplanes उडवून या नागरिकांची केलेली सुटका - जगातील सर्वात मोठे rescue operation !! त्यातील "रणजीत सन्याल ही व्यक्तीरेखा खरोखर अस्तित्वात आहे का ? या सर्व प्रकरणात शासकीय यंत्रणा कशी राबली?, भारत-कुवेत संबंध कसे होते? इतके लोक कॅम्पमध्ये एकत्र होते का?" हे सर्व प्रश्न निश्चित महत्वाचे आहेत पण त्याही पलीकडे जाऊन सर्वात महत्वाचे ठरते ते भारतीयत्व … आपली मायभूमी आपल्याला पंखाखाली घेईल हा यथार्थ विश्वास ! केवळ देशबांधवांच्या सुटकेसाठी प्राण पणाला लावून वैमानिकांनी केलेले धाडस !! आणि ही शौर्यकथा पडद्यावर पाहताना आपल्या भारतीय असल्याचा वाटलेला अभिमान !!!

असाच ऊर भरून आला आजचे प्रजासत्ताक दिनाचे संचलन टीव्हीवर बघताना. काय वैविध्यपूर्ण आहे हो आपला देश ! एकीकडे हिमालयाची अजस्त्र भिंत तर दुसरीकडे महासागरांचा त्रिवेणी संगम. एकीकडे वाळूचे डोंगर तर दुसरीकडे डोळ्यांचे पारणे फिटवणारी हिरवाई.  किती जातीधर्माचे लोक आणि त्यांच्या अनेकविध चालीरीती. आपली शिल्पकला, हस्तकला, नृत्यसाधना, योगासने, चाणक्यनीती, या  सगळ्याची जगाला वर्षानुवर्षे पडलेली भुरळ. आपले शिष्टाचार, सहिष्णूता, आणि विविधतेमध्ये एकता… किती अनमोल खजिना आहे आपल्याकडे !! असे असतानाही जेंव्हा कोणी "मला देशाने काय दिले? " यासारखे प्रश्न उपस्थित करतात तेंव्हा मनात साहजिकच प्रश्न उमटतो की "आपण देशासाठी काय देत आहोत? " म्हणजे globalization, appreciating other cultures, food trends, quality वगैरे या कशालाही माझा विरोध नाहीये अर्थातच, पण अशी मुक्तपणे विचार करण्याची संधीही एक भारतीय असल्यामुळे मला सहज मिळतेय हे मात्र निश्चित विसरता येणार नाही. आणि शेवटी देश म्हणजे काय हो, त्या देशातील जनताच नं? मग आपण कोणता खारीचा वाटा उचलत आहोत आपल्या देशाच्या प्रगतीमध्ये? आपण पाळतोय का वाहतुकीचे नियम? आपण नकार देतोय का लाच दयायला किंवा घ्यायला? आपण भरतोय का कर नियमितपणे? आपला आहे का सक्रिय सहभाग निवडणूक प्रक्रियेत? आपण परिसराची स्वच्छता राखण्यात लावतोय का हातभार? आपण जगवतोय का एकतरी झाड? अशा कितीतरी गोष्टी… प्रामाणिक इच्छा मात्र हवी.

चला तर, या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने मी संकल्प केलाय एक इवलुसा - आपले विस्मृतीत गेलेले खाद्यपदार्थ शोधून काढून ते माझ्या स्वयंपाकघरात रांधण्याचा… तुम्ही कोणता संकल्प करणार आहात?

वन्दे मातरम… !!

 
 
 
      
 




 

No comments:

Post a Comment

पुण्यनगरीतील वाहतूकव्यवस्था आणि वाहनांवरील साहित्यसंपदा: एक अभ्यासपूर्ण विवेचन !!

नमस्कार, सुमारे दशकभर पुण्यात राहिल्यावर या नगरीच्या विद्वत्तेचा आम्हाला स्पर्श झाला नसता तरच नवल. त्यामुळे झालेय काय, कोणत्याही गोष्टीची...