Thursday, September 27, 2012

एक संवाद: गणपतीबरोबर !!

दरवर्षीप्रमाणे तुझे गणेशचतुर्थीला वाजतगाजत आगमन झाले. आमचा प्रचंड उत्साह ढोलताशांच्या रुपात प्रकट होतच होता. तुझे सुपाएवढे कान कितीही मोठा आवाज सहन करू शकतात - नव्हे, मोठा आवाज नसेल तर तो तुझ्यापर्यंत पोचणारच नाही - असे वाटल्यामुळे तर आम्हाला अधिकच चेव चढला होता. आजारी, वयोवृद्ध माणसे, तान्ही बाळे यांना त्याचा थोडा त्रास झाला असेल म्हणा, पण आमच्या तुझ्यावरील अगाध श्रद्धेपुढे या गोष्टी अगदी क्षुल्लक आहेत. समाजात असेही घटक आम्हाला सामावून घ्यावे लागतात त्याबद्दल आम्हाला माफ कर.
तुझ्या स्वागताची किती जय्यत तयारी करतो आम्ही ! मंडप, वाजंत्री, लाउडस्पीकर, देखावे.. एक न दोन हजार प्रकार. आता या सगळ्यासाठी कमी का पैसा लागतो? म्हणून आम्ही वर्गणी मागायला गेलो, तर काही समाजकंटक आम्हालाच उलटा उपदेश करायला गेले. आता, त्यांना कसे हाताळायचे हे माहित आहे आम्हाला, पण तरीही, लोक देवाच्या दारीही  पैसे देताना इतकी कटकट का बरे करतात? त्यांना माफ कर देवा !!
तुला माहित आहे? आमच्यातले काही वेडे असेही आहेत कि गणपती येणार, म्हटल्यावर त्यांना कसलेच भान राहत नाही. रात्रंदिवस जागून सजावट काय करतात, देखावे काय उभारतात- थोडक्यात निरपेक्ष सेवेचा आव आणतात !! आता तू सांग, लोक तुला बघायला येणार कि बाकीच्या गोष्टी? आणि सर्वात महत्वाचे काम तर दहा दिवस जागरण करण्याचे आहे, जे आम्ही करतो. मग तूच सांग, कोण तुझे खरे भक्त? आता, रात्रभर जागायचे म्हणजे थोडा विरंगुळा पाहिजेच नाही का? आणि शहरात तर जागाच इतकी कमी आहे कि मग नाईलाजाने आम्हाला पत्ते तुझ्यासामोरच खेळावे लागतात. पण आमचे जे कार्यकर्ते तुझ्यासमोर साधे जागरणही करू शकत नाहीत त्यांना माफी असावी देवा !!
या दिवसांमध्ये आम्ही इतर कामांबरोबरच सामाजिक एकोपा जपण्याचाही खूप प्रयत्न करतो. आमच्या मंडपातील लाउड स्पीकर्सवर "मुन्नी  बदनाम हुई", "शीला की जवानी", " "छम्मकछल्लो ", आणि "वाजले कि बारा" गुण्यागोविंदाने  नांदत असतात. काहीना ते ही  बघवत आणि ऐकवत नाही. अर्थात  काळजी नसावी देवा ! आम्ही तुला वचन देतो, की अशा लोकांना आम्ही कधीच भाव दिला नाही आणि यापुढेही देणार नाही.
तुझ्या भक्तांच्याही किती रे तऱ्हा !! काही सच्चे भक्त तुला मनापासून सोन्याने मढवून टाकतात. काही नुसता तोंडदेखला नमस्कार करतात तर काही तो ही करत नाहीत. तुला सांगतो देवा, सोन्याचांदीमुळेच तर तुझे रूप खुलते. अशावेळी तुझ्यासमोरील दानपेटीत एक बंदा रुपयाही न टाकता, वर तू त्यांना प्रसन्न झाले पाहिजेस, अशी निरर्थक अपेक्षा ठेवणाऱ्या खुळ्या भक्तांची अगदी कीव येते बघ आम्हाला !! एका हाताने द्यावे व दुसऱ्या  हाताने घ्यावे, हा साधा व्यवहार कळत नाही त्यांना? खरच कमाल आहे !!
सर्वात मजा येते ती तुझ्या विसर्जनानंतर !! आधीच काही नास्तिक कंठशोष करत असतात- तुझी उंची किती असावी यावरून !! आता तू मला सांग, देव खुजा दिसून चालेल काय? आणि तू किती उंच आहेस त्यावरच आमची भक्ती मोजली जाते न? मग? हा, आता मूर्ती खूप उंच म्हटल्यावर विसर्जनानंतर होणारी तिची विटंबना ओघाने आलीच. पण एकदा तुझ्यातले देवपण विसर्जित केले, कि मग तू काय, आणि साधी माती काय ! काय फरक आहे? ते पर्यावरणवादी उगाचच काहीतरी पराचा कावळा करतात झाले...!!
पण गणराया, तू घाबरू नकोस. केविलवाणा तर मुळीच होऊ नकोस. आम्ही आश्वासन देतो तुला, जोपर्यंत आमच्या जीवात जीव आहे तोपर्यंत आम्ही तुझ्या भक्तीचा बाजार असाच भरवत राहू...!! तुला सोन्याचांदीने असाच मढवत राहू..!! समाजातील माणुसकीचा बळी देवून तुझा गाभारा नेहेमीच भरत  राहू... !! Promise !!!





Wednesday, September 5, 2012

एक पत्र - आमच्या शिक्षकाला ...


 चि. अरिन,
सर्वप्रथम शिक्षकदिनाच्या अनेक शुभेच्छा !
तुला आमचा आद्य गुरु मानण्याचे कारण म्हणजे, रूढार्थाने आम्ही दोघे कितीही शिकलो असलो तरी आयुष्य जगताना लागणारी मुळाक्षरे ही तू आल्यानंतरच गिरवायला सुरवात केली रे आम्ही !!

प्रसंग पहिला - तुझा जन्मदिवस, अर्थात  १४ एप्रिल. भर उन्हाळ्याचे दिवस असल्याने हॉस्पिटल मधील चकाचक AC रूम घेतली असूनही त्यादिवशी नेमके लाईट गेलेले आणि भरीस भर म्हणून संपूर्ण हॉस्पिटलचा जनरेटर बिघडलेला! मी अतिशय अस्वस्थ होते. आणि जन्मल्याबरोबर बाळाला छान दुपट्यात गुंडाळायचे सोडून, तुझ्या दोन्ही आज्या तुला संपूर्ण उघडा करून हातावर घेऊन फिरवत होत्या, अगदी दिवसभर!! अशा हतबल वातावरणात अगदी शांत राहायचे सामर्थ्य कसे रे आले तुझ्याकडे ?

प्रसंग दुसरा - पाच महिन्याची maternity leave संपल्यामुळे तुला पाळणाघरात ठेवायला सुरुवात केली ते दिवस. बऱ्याच वेळा तर तू झोपेत असायचास. मग तू, तुझी bag, माझी पर्स अशी सगळी वरात रिक्षात बसायची. ते क्षण संपूच नये असे वाटत असतानाच पाळणाघर यायचे आणि मग मनात नसतानाही तुला शिल्पा टीचरकडे सोपवावे लागायचे. तिथे सर्व टीचर व मावश्या खूप खूप चांगल्या होत्या व त्यांनी तुला खूप जपले, तरीही माझ्या मनातील अपराधीपणाची भावना अजूनही तशीच आहे. पण तू ? डोळ्यात पाण्याचा थेंबही न आणता आनंदी चेहेऱ्याने परिस्थितीचा स्वीकार करण्याचा समंजसपणा  कुठे शिकलास तू राजा?

प्रसंग तिसरा - डॉक्टरांनी चुकीचे antibiotics दिल्यामुळे पुढचे तीन दिवस तुला हॉस्पिटलमध्ये राहावे लागले. त्यात भरीस भर म्हणून सलाईन नीट  लागले नाही, व तुझा गोजिरवाणा हात सुजला होता. आम्ही दोघे डोळ्यातले पाणी मोठ्या कष्टाने थोपवत होतो. अशा वेळी, हात दुखत असतानाही खूप खेळकर होतास तू. कसे जमवलेस रे बाळा हे?

प्रसंग चौथा- तू थोडासा मोठा झालेला. मस्त बोलायला शिकलेला. आणि आम्ही दोघे - अतिरिक्त वाढलेला मेंदू व शब्दसंपत्ती यांचा उपयोग एकमेकांशी भांडायला करणारे - जगातील असंख्य नवरा-बायको प्रमाणेच !! असेच एकदा आमची तात्विक चर्चा रंगात आली होती. आवाज चढत चालले होते. तू त्याच टेबलावर बसला आहेस, याची जराही दाखल नं  घेता. आणि अचानक तू म्हणालास, "आई बाबा, काळजी करू नका" .... आमचे शब्द घशातच अडकले. आपले बाळ इतके मोठे कधी झाले?..... खर सांगते अरिन,  त्या दिवसानंतर तुझ्या मांडीवर डोके ठेऊन तुझ्याकडून बोबड्या स्वरातील अंगाईगीते ऐकताना खूप आधार वाटतो रे !!

प्रसंग पाचवा -  तुझे बाबा तीन महिन्यासाठी १२००० मैल दूर गेलेले. मी मारे सगळ्यांना सांगितले कि राहू आम्ही दोघेच, पण ते तितके सोपे नसते हे जाणवत होते. अशातच एक दिवस दुनियेचा वैताग डोक्यात घेऊन आलेली मी, काहीतरी छोटेसे कारण होऊन तुला ओरड ओरड ओरडले. पण ते जाणवेपर्यंत उशीर झाला होता. तुला time-out दिल्यानंतर हताश झालेली मी सुन्नपणे सोफ्यावर जाऊन बसले- डोळे मिटून, कितीतरी वेळ - काही वेळाने तू जवळ आलास, आणि प्रेमाने म्हणालास - "आई, तू sad नको होऊस. i m sorry. मी नाही वागणार असे पुन्हा ".... माझा कंठ दाटून आला. सोनू, स्वतःच्या छोटुश्या चुकीबद्दल लगेच माफी मागण्याची शिकवण कोणी रे दिली तुला? मोठी माणसे नाही करत असे - इतक्या सहज...

असे किती प्रसंग तुझ्याबरोबरचे ... आमच्या डोळ्यात नवीन शिकवणीचे अंजन घालणारे ...!! 
खरच, राजा, तुझे असणे, म्हणजेच आमचे हसणे ! We remain indebted forever ....!!!

फक्त तुझेच, 
आई-बाबा









Monday, September 3, 2012

मेरे maggi की कहानी

गेले तीन आठवडे तसे धावपळीतच गेले. Deadlines, deliverables,  release... हुश्श ! आणि वीकांताना होणारा प्रवास. अगदी दमणूक झाल्यासारखी वाटत होती. शेवटी आज थोडे तापाचे निमित्त होऊन घरी बसावे लागले. ते ही बरेच वाटले, एकाअर्थी, कारण सक्तीची विश्रांती तरी मिळाली. पण अशा वेळी एकच गोष्ट त्रासदायक असते - स्वतः बनवून खाणे ! तोंडाची चव गेलेली असते. काहीतरी पटकन करायचे असते, आणि ते थोडेसे चमचमीत, आणि पोटभरीचे पण असावे लागते.  अशा वेळी maggi noodles घरात असणे हे अगदी मोठे वरदान आहे, असे वाटते.  मग काय, करू या तयारी ? बस्स  दो मिनिट  मे?

साहित्य - maggi noodles चे एक पाकीट,  १ चीज क्यूब, थोडासा टोमाटो  सॉस (ऐच्छिक)
कृती -
  1. प्रथम एका पातेल्यात दीड कप पाणी उकळत ठेवावे.
  2. पाणी उकळत असतानाच त्यात चीजचा क्यूब किसून टाकावा.
  3. चीज नीट  मिक्स झाले कि त्यात एक चमचा टोमाटो सॉस  टाकावा (हवा असल्यास).
  4. सर्वात शेवटी नेहेमीप्रमाणे मसाला, व नुडल्स मिक्स कराव्यात.
  5. मग ... टीव्ही चालू करावा, हवा तो सिनेमा लावावा, आणि गरमागरम नुडल्स सोबतीला घेऊन बसावे ...!!  आहे की नाही जीवाची चैन ...!!!



Friday, August 31, 2012

आपण एक सशक्त पालक आहोत का?

कालपरवाच पेपरमध्ये एक सुन्न करणारी बातमी वाचली- लहान मुलांच्या बेधुंद पार्टीची ! आज सकाळी टीव्हीवर त्याचसंदर्भात चर्चा चालली होती- मुलांमधील व्यसनांचे वाढते प्रमाण, त्यांच्यामधील बेपर्वाई, सतत नाविन्य मिळवण्याच्या ओढीपायी केलेले धाडस, वगैरे, वगैरे .
हे सर्व पाहून, ऐकून, अंतर्मुख झाले . मनात असंख्य प्रश्न पडले . वाटले - काहीतरी चुकत आहे नक्कीच ! पण त्याची जबाबदारी कुणा एका घटकावर टाकणे योग्य नाही . आपणा सर्वांनी मिळूनच कळत-नकळतपणे हे कोष विणले आहेत, आणि त्यात अधिकाधिक गुंतत चाललो आहोत . हा चक्रव्यूह भेदायचा असेल, तर किमानपक्षी पालकांनी थोडेसे आत्मचिंतन करणे अगदी गरजेचे झाले आहे . स्वतःला काही प्रश्न विचारून त्यांची परखड उत्तरे मिळवायलाच हवीत, आपल्या सर्वांच्याच निरामय आयुष्यांसाठी !!
  • निरोगी संततीसाठी आपण मनापासून प्रयत्न करतो, तसेच ते बाळ  जन्माला आल्यावर त्याचे मानसिक संगोपन नीट होण्यासाठी विशेष प्रयत्न करणे, ही आपलीच जबाबदारी आहे, याची आपण सतत जाणीव बाळगतो का?
  • आपले मूल आपल्याशी मोकळेपणाने बोलते का? तितकी संधी, व तेवढा वेळ आपण त्याला देतो का?
  •  दिवसातून किती वेळ आपण मुलांबरोबर मूल होऊन रमतो? आपण त्याला/तिला मोठ्यांच्या म्हणवल्या जाणाऱ्या कामांमध्ये थोडेतरी सहभागी होऊ देतो का?
  • कुटुंबातील सर्वजण दिवसातून एकदातरी एकत्र जेवतो का? 'खरकटे हात तसेच आहेत, पण आपल्या गप्पा, चर्चा संपत नाहीयेत' असे सुंदर दृश्य आठवड्यातून किती वेळा आपल्या घरी दिसते?
  • ' भिंतीवर रेषा ओढल्या, खेळणी नीट  आवरली नाहीत, जेवताना अन्न खाली सांडले' या आणि अशा अनेक गोष्टी आपल्याला त्रासदायक वाटल्या, तरी त्याविषयी आपण मुलांना शांतपणे समजावतो का, की फक्त त्यांच्यावर ओरडतो?
  • आपण मुलांना फक्त महागडे computer games आणून देतो, कि कधीकधी त्यांच्याबरोबर मैदानात जाऊन भरपूर खेळाचा आनंदही घेतो?
  • स्वतःच्या हाताने लावलेल्या झाडाला आलेले पहिले फूल, रस्त्याने चालताना अचानक दिसलेला एखादा अनोळखी पक्षी, पहिला पाउस आल्यावर मातीला येणारा मंद सुगंध, आणि या सर्वामध्ये दाटलेला आनंद - याची ओळख आपण  त्याला करून देतो का?
  • आपल्या मुलाच्या मनात सभोवतालच्या जगाविषयी दडलेले कुतूहल आपण प्रामाणिकपणे शमवायचा प्रयत्न करतो का?
  • आपल्या मुलांना नकार सहज पचवायची सवय आपण लावत आहोत का? हे करत असतानाच त्यांच्या आत्मसन्मानाला दुखापत होणार नाही, याची काळजी आपण घेतो आहोत का?
  • आपल्या घराची ओढ आपल्या मुलाला वाटते की  मित्र-मैत्रिणींबरोबरच ते जास्त रमते?
  • कुटुंबातील सर्वजण मिळून कुठल्यातरी धमाल सहलीला गेले आहेत, असे चित्र किती दिवसांपूर्वीचे आहे ?
  •  उगाचच ओरडल्यानंतर कधी मनापासून मुलांची माफी मागितली आहे का? आपल्या स्वरातील सच्चेपणा त्याला जाणवला आहे का?
  • आपले आईवडील कायम आपल्या पाठीशी असतील, अशी आश्वासक जाणीव त्याला आहे का? आपले निरपेक्ष प्रेम त्याच्यापर्यंत पोचते का?
  • मुलांकडून सर्वच गोष्टीत यशस्वी होण्याची अपेक्षा ठेवतानाच काही वेळा अपयशही हसतमुखाने स्वीकारण्याची, व त्यातून बोध घेऊन पुढे जायची तयारी आपण ठेवतो का?
  •  त्याला नियमांचे पालन करायला सांगणारे आपण, कितीसे नियम स्वतः पाळतो? आपले वागणे त्याच्या नजरेत आदर्श आहे का?
  • आपले पाल्य एक डॉक्टर, इंजिनियर व्हावे या अपेक्षेबरोबरच, ते एक चांगले नागरिक व्हावे, यासाठी आपण प्रयत्न करतो का? आपण स्वतः  तशी वागणूक अंगीकारतो का?
  • आपले मूल खूप बुद्धिवादी व्हावे अशी अपेक्षा ठेवतानाच, त्याचा बुद्धिवाद आपण handle कसा करत आहोत हे ही आपल्याला महत्वाचे वाटते का?
खूप खूप आदर्श वाटते का सगळे? पुस्तकी? पण तरीही ...
प्रयत्न करायला काय हरकत आहे ?   शेवटी आपल्या रोपट्याचा एक विस्तीर्ण वृक्ष व्हावा अशी इच्छा असेल तर त्याला नीट खतपाणी घालण्याची जबाबदारी आपलीच नाही का?
आणि सर्वात महत्वाची गोष्ट - रोज, हो अगदी रोज, आपल्या आनंदाच्या ठेव्याला जवळ घ्या ... त्याला मायेने स्पर्श करा .. त्याला कळू  दे - तुमचे त्याच्यावर मनापासून निर्व्याज प्रेम आहे .... !! तुमच्या एका स्पर्शात त्याचे जग सामावले आहे ....!!

चला, आपण सर्व मिळून हे आयुष्य सुंदर बनवूया !! खूप उशीर होण्याआधीच .....!!






Wednesday, August 29, 2012

अरिन - आमचा friend, philosopher, and guide

ह्या व्यक्तीने आल्यापासून आमच्या संपूर्ण आयुष्यावर आपला अनभिषिक्त हक्क प्रस्थापित केला आहे. इतका, की तो येण्यापूर्वी आम्ही कसे जगत होतो, असा प्रश्न पडतो कधीकधी !

याचे वय वर्षे फक्त तीन, पण आव असा कि सगळे काही समजते . जरा काही मनाविरुद्ध झाले की त्याच्या नकट्या नाकावर गोडुला राग उमटलाच म्हणून समजा ! गाल तर असे गोबरे, की कायमच स्वारी लाडू खात बसली आहे असे वाटते. कधी तो "छोटा भीम" असतो, तर कधी "spider man"! कधीकधी तो चक्क डॉक्टर काका होतो, आणि घरातील सगळ्यांना एकच औषध देतो. एरव्ही दवाखान्यात जायला घाबरणारे आपण, या पिटुकल्या डॉक्टर-काकाच्या अगदी प्रेमात पडतो.

घरातील सर्वांपेक्षा हा चिमुरडा बिझी आहे. तो सकाळी साडेआठला शाळेत जातो तो संध्याकाळी साडेसहा वाजता परततो. त्याची अंघोळ, त्याचे खेळणे, खाणे, धडपडणे, रडणे, सगळे काही एक नवीन अनुभव असतो, अगदी रोज !!

दिवसभराच्या थकव्याने तो लगेच झोपून गेला तरी आम्ही मात्र त्याच्या लांब पापण्याआड दडलेल्या टपोऱ्या डोळ्यात लपलेली स्वप्ने शोधायचा प्रयत्न करत असतो ....ती सर्व साकार होवोत म्हणून मनोमन आशीर्वाद देत असतो .... आमच्या काळजाच्या तुकड्याला ... अरिनला !!!









Monday, August 27, 2012

फुलले रे क्षण माझे

एकदम गैरसमज नको. इथे फक्त मी काढलेले छान छान फुलांचे फोटो टाकत आहे.
गेल्या काही दिवसांमध्ये थोडे फिरणे झाले. माहेरी एक मस्त रिफ्रेशिंग चक्कर मारून आलो, आणि गेल्या शुक्रवारी ऑफिसची वर्षासहल होती. मनसोक्त फोटो काढता आले.
माणसांचे फोटो काढायचा मला तसा कंटाळाच आहे. :) त्यापेक्षा निसर्गाची वेगवेगळी रूपे कॅमेऱ्यात बंदिस्त करायला मला आवडते. त्याचेच हे काही नमुने -











Monday, July 30, 2012

वय वर्षे तीन आणि पहिली कमाई

शीर्षक वाचून आश्चर्य वाटले ना? 
आजचा लेख आहे माझ्या पिल्लावर ! जगातल्या कुठल्याही  आईप्रमाणे मला आता 'proud mother' असल्याचे फिलिंग आले आहे.
गोष्ट छोटीशीच पण शेअर करावीशी वाटली तुमच्याबरोबर- 
तर माझ्या तीन वर्षाच्या बछड्याच्या day-care मध्ये खूप छान छान activities सुरु असतात- हो, अगदी रोज! ही सर्व छ्बुकडी पण त्यात इतकी रमतात म्हणून सांगू? रोज त्याला day-care मधून घरी घेऊन जाताना त्याची अखंड बडबड सुरु असते, दिवसभर काय केले त्याबद्दल. बऱ्याच वेळेला त्याच्या दोन्ही हातांवर चिमुकल्या चांदण्या रेखलेल्या असतात- तो दिवसभर शहाण्या मुलासारखा वागला म्हणून!! ते चांदणगोंदण  पाहिल्यावर मग त्याला अगदी कुठे ठेऊ आणि कुठे नको असे होऊन जाते. जणूकाही मलाच मोट्ठे बक्षीस मिळाले आहे असा आनंद होतो. त्याच्या चेहेऱ्यावरचे निरागस हसू, मोठ्यामोठ्या डोळ्यात उमटलेले कुतूहल सगळे काही मनाच्या कुपीत साठवून ठेवावेसे वाटते. 
त्याच्या day-care मध्ये जुलै महिन्याची theme होती -' रेन' अर्थात पाऊस! इतक्या धमाल गोष्टी होत्या त्याअंतर्गत! एक दिवस या सर्व मुलांना त्यांचे आवडते chocolate कसे तयार होते त्याचे प्रात्यक्षिक दाखवले. एक दिवस बघते तर पिल्लाच्या हातात दोन-दोन कागदी बेडूक. :) त्याचा पूर्ण weekend त्या बेडूक-द्वयीबरोबर खेळण्यात गेला. 
मग आली नागपंचमी. त्यादिवशी त्याला घरी आणताना पाहिले तर स्वारी सारखी हात पसरून बघत होती. नीट निरखून पहिले तर त्याचे इवलूसे हात मेंदीने रंगलेले.. मुलांना पावसाळा, त्यात येणारे सण, नवजीवीत होणारी जीवसृष्टी यांची ओळख करून देण्याचा किती सुंदर मार्ग आहे न हा!
गेल्या आठवड्यात गम्मतच झाली. day-care मधून बाहेर पडताना अरीनच्या हातात एक थर्माकोलचा छान रंगवलेला कप होता. त्यात त्याने मेथीच्या बिया पेरल्या होत्या. 'आई, हि बघ माझी activity' - तो उत्साहात सांगत होता. गेला आठवडाभर आम्ही दोघे त्या मेथ्याना पाणी घालत आहोत. आता त्या कपातून मेथीची कोवळी पाने डोकावतायत. 
हा सगळा किस्सा मी माझ्या मैत्रिणीला सांगत होते तर ती उत्स्फूर्तपणे म्हणाली - अरे वाह, तेरे बेटे कि पेहेली कमाई !! अब उसे मेथीकी सब्जी खिलाना..!!
छोटेसेच वाक्य, पण माझ्या मनात रुतून बसले. वाटले, खरच सर्वच कमाई काही पैशात नाही मोजता येत. ती मेथीचे दाणे टाकताना वाटलेली उत्सुकता, त्यांना रोज पाणी देताना येणारी मजा आणि आता कोवळी हिरवाई बघताना मुलाच्या चेहेऱ्यावर दाटलेला निरागस आनंद - हि सर्व कमाईच नव्हे काय? त्याची आणि माझीही !! कधीही न संपणारी ....







                                                                





                                                                    


गोंधळलेले बटाटे 😀

 साधारण ९ वर्षांनी फिरकले आहे स्वतःच्या ब्लॉग वर. म्हणजे बाकी प्रोफेशनल प्लॅटफॉर्म्स वर लिखाण चालू होते पण मातृभाषेतल्या लिखाणाची मजा वेगळीच...