Tuesday, January 4, 2011

छान छान बडबडगीते... माझ्या छकुल्यासाठी


असे म्हणतात की जात्यावर बसल्यावर आपोआप ओव्या सुचतात, त्यात भर टाकून मी म्हणेन की आई झाल्यावर आपसूकच आपल्यातला कलाकार (की नकलाकार)जागृत होतो. 
                 माझा मुलगा अरिन आता जवळपास दोन वर्षाचा आहे. तो जन्मल्यापासून माझ्या स्वरचित (स्व-रचित, हो, उगाच माझा आणि स्वरांचा काही घनिष्ट सम्बन्ध आहे असा गैरसमज नको व्हायला !!) बडबडगीतांची cassette ऐकतच वाढलाय. त्याच्या ख़ास पसंतीची ही काही गाणी...


१) हत्तुल्या
    हत्तुल्या रे हत्तुल्या तू होशील का माझा फ्रेंड ?
     देईन मी तुला cashew almond
      हत्तुल्या रे हत्तुल्या तू होशील का माझा यार?
  देईन मी तुला ग्लुको बिस्किटे चार
     हत्तुल्या रे हत्तुल्या तू होशील का माझा दोस्त?
    देईन मी तुला चीकू केळी  मस्त 
    हत्तुल्या रे हत्तुल्या तू येशील का माझ्या घरी?
 देईन मी तुला रगडा-पाणीपुरी
हत्तुल्या रे हत्तुल्या आपण भाऊ-भाऊ 
दोघे मिळून लांब लांब फिरायला जाऊ..


२) आमचा अरिन म्हणजे छोटी मनिमाऊ
  सारखा सारखा त्याला हवा खाऊ..
    नकटुले नाक त्याचे मोठे मोठे डोळे 
  गोबरे गोबरे गाल आणि केस कुरळे कुरळे 
सारखा सारखा त्याला किती पाहू ग..
 खेळायला सवंगडी झाले बघा  गोळा
बघता बघता किती हा जमला गोतावळा
मित्र मैत्रीण त्याचे भूभू काऊ चिऊ ग..


                     

काही दिवसांपूर्वीच आम्ही आमच्या नविन घरात शिफ्ट झालो. या घराच्या एका टेरेस मधून सूर्योदय दिसतो तर दुसरया टेरेस मधुन सूर्यास्त.. तेंव्हापासून रोज सकाळी एकदा अरिनच्या बाबाना टाटा केला की अरिन आणि मी टेरेस मध्ये जातो व सूर्योदय बघतो. अरिन ची सूर्यबाप्पाशी चांगलीच गट्टी जमली  आहे. त्यावरचे माझे हे latest बडबडगीत...


३) सूर्यबाप्पा..


सूर्यबाप्पा सूर्यबाप्पा उठलात का?
ढगांची चादर काढता का?
आकाशात छान-छान दिसता का?
थंडी आमची पळवता का !
आईने गोड गोड चहा केलाय
त्याच्यात थोड़े आले टाकलय
गरम गरम चहा तुम्ही पिणार का?


प्रचलित गाण्यांची विडंबने तर असंख्य केली आहेत पण त्याविषयी पुढील लेखात... 
आणि हो, एक राहिलेच,  
तुम्हा सर्वाना  नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा.. !!

No comments:

Post a Comment

पुण्यनगरीतील वाहतूकव्यवस्था आणि वाहनांवरील साहित्यसंपदा: एक अभ्यासपूर्ण विवेचन !!

नमस्कार, सुमारे दशकभर पुण्यात राहिल्यावर या नगरीच्या विद्वत्तेचा आम्हाला स्पर्श झाला नसता तरच नवल. त्यामुळे झालेय काय, कोणत्याही गोष्टीची...