Monday, January 17, 2011

श्रावणात घन निळा बरसला....

लेखाचे शीर्षक वाचून तुम्ही म्हणाल की या गुलाबी  थंडीत हिला श्रावण कुठे आठवतोय? पण त्याला निमित्तही तसेच झाले.
             तर झाले असे की माझ्या प्रेमळ, उदार, बहुगुणी (वगैरे वगैरे..) नवरयाने आमच्या नविन घराला शोभेल असे SONY चे चकाचक 'HOME THEATRE' खरेदी केले आहे. तसा माझा नवरा (आणि आता माझा दिड वर्षाचा बछड़ा देखिल ) संगीताचा दर्दी ! अर्थात माझीही आवड साधारण त्याच्यासारखीच  आहे म्हणा. तर काल खूप दिवसानी थोडा निवांतपणा होता म्हणून छान गाणी ऐकत बसलो होतो. CD play होत होती. आणि मध्येच कधीतरी हे गाणे सुरु झाले... ऐकता ऐकता डोळ्यासमोर साक्षात श्रावण उभा राहात होता. मन एकदम माहेरीच पळाले आणि ओटीवरील झोपाळ्यावर झोके घेऊ लागले..
     
       माझ्या माहेरी सर्व सणवार अगदी यथासांग पार पाडले जातात आणि त्यातही श्रावणाची मजा काही खासच. सुरुवात होते ती दीवली आमवास्येपासून. [त्याला 'गटारी अमावस्या' असे म्हटलेले मला तरी नाही आवडत बाबा]. ते तबकातले पुरणाचे खरपूस दिवे ज्यानी खाल्ले आहेत त्याना मी का असे म्हणते ते कळेल.
     मग आमचे आवडते काम म्हणजे 'जिवतिचा कागद' देवघरातील भिंतीवर लावणे! त्यातले 'नर्सोबाचे (नरसिन्हाचे) चित्र हे इतके जिवंत रेखाटले गेले आहे की मला अजूनही त्याची भीती वाटते. मग येणारे श्रावणी शुक्रवार, श्रावणी शनिवार, श्रावणी सोमवार , श्रावणी मंगळवार वगैरे नेहेमीचेच -पण नावामागे 'श्रावण' लावल्यामुळे एकदम special झालेले- यशस्वी कलाकार. आणि त्याबरोबरच आईची ब्राह्मण -सवाष्ण जेऊ घालण्यासाठी चाललेली तयारी. आम्ही खुश, कारण पुरणपोळी, उकडीचे मोदक, भरड्याचे वडे, नारळीभात, ओल्या नारळाच्या करंज्या, खांडवी अश्या पक्वानांची घरी अगदी रेलचेल असायची. त्याचबरोबर ,विशेष करून शनिवारच्या दिवसभराच्या उपवासानंतर गरमागरम कोळ-खिचड़ी, त्यावर साजुक तुपाची धार व बरोबर लाल माठाची भाजी ही खरोखर आत्मा व रसना दोन्ही एकदमच संतुष्ट करून जायची. तिन्हीसांजा झालेल्या, बाहेर रिमझिम पाउस पडतोय, देवांपाशी मंद नंदादीप तेवतोय, उदबत्तिच्या गंधाने पूर्ण घर भरून आणि भारुन गेले आहे ,अशा  वातावरणातली ती गरमागरम खिचड़ी नुसती आठवली तरी जीव नुसता गलबलून जातो.. 
  
आमचे ग्रामदैवत रामेश्वर! श्रावण महिन्यातल्या पहिल्या सोमवार पासून ते दुसरया सोमवार पर्यंतचे सात दिवस देवळात 'सप्ता ' असतो. सतत वेगवेगळी भजनी मंडळे देवासमोर छान छान भजने सादर करतात. तो झांजांचा मंजुळ आवाज अजूनही माझ्या कानात घुमतो कधीकधी.. तो दारात अवचित उगवलेला तेरडा, टाकळा, रुईची पाने, त्या मंगलागौरीसाठीच्या तर्हेतर्हेच्या वनस्पती, तो केवड़ा, तो मध्यरात्रि साजरा होणारा कृष्णजन्म, ती दही-पोहे व लोणी-साखरेची वाटी, नागाला वाहिलेले नागाणे-फुटाणे... सगळ्या आठवणींचे छानसे इंद्रधनुष्य होउन मनाभोवती फेर धरायला लागते आणि 'श्रावणात घन निळा बरसला....' हे गाणे त्याच्या अर्थासाहित उलगडायला लागते..!!
खरच, श्रावण हा मराठी महिन्यांचा अनभिषिक्त सम्राट आहे ते उगीच नाही काही ..
अशीच मला आवडलेली श्रावणाची एक net वरून मिळालेली कविता व छबी खाली जोडत आहे.. 





4 comments:

  1. लेख वाचून पुन्हा एकदा जुन्या आठवणी ताज्या झाल्या, माझ्या माहेरी आणि सासरी सुद्धा श्रावण महिन्यातले सगळे सण साजरे होतात. नागपंचमीच्या तर विशेष आठवणी आहेत कारण पंचमी चे खेळ खूप खेळायचो. खूप मज्जा यायची तेंव्हा. पण आत्ता असे वाटते कि ते खेळ माझी मुलगी खेळेल का कधी ?

    ReplyDelete
  2. नक्कीच... फक्त आपली इच्छाशक्ति हवी. जर आपल्यात ती आवड असेल तर मुलाना आपोआप गोडी लागतेच ..

    ReplyDelete
  3. छान आहे तुझा ब्लॉग. वाचेन मी आता नेहमी :)

    ReplyDelete
  4. श्रावण म्हटला की पहिले हेच गाणे सुचते...सुंदर वर्णन

    ReplyDelete

पुण्यनगरीतील वाहतूकव्यवस्था आणि वाहनांवरील साहित्यसंपदा: एक अभ्यासपूर्ण विवेचन !!

नमस्कार, सुमारे दशकभर पुण्यात राहिल्यावर या नगरीच्या विद्वत्तेचा आम्हाला स्पर्श झाला नसता तरच नवल. त्यामुळे झालेय काय, कोणत्याही गोष्टीची...