Monday, January 10, 2011

My Name is Khan.. च्या निमित्ताने ..!!

कालच NDTV Imagine ला हा पिक्चर लागला होता. बाकि काही विशेष करण्यासारखे नव्हते म्हणून म्हटल चला बघून टाकू. 
पिक्चर पाहिला आणि का कोण जाणे, खूप अस्वस्थता दाटून आली मनात. तसे पाह्यला गेले तर typical  'करण जोहर'  छाप असलेला आणि ९/११ च्या हल्ल्याची पार्श्वभूमी वापरून, प्रेक्षकाना अमेरिका दर्शन घडवलेला एक सामान्य चित्रपट असेही त्याचे वर्णन होऊ शकेल. याहून सर्वदृष्टिनी कितीतरी सरस चित्रपट मी यापूर्वी कितिदातरी पाहिले आहेत, तरीपण मग ही अस्वस्थता कसली? 
विचार करत गेले तसे तसे जाणवत गेले की ही बेचैनी होती माझ्या छोट्या पिल्लासाठीची जो यावर्षी pre-school मध्ये जाईल.  मग त्याचे मित्र, त्यांचे आपल्यादृष्टिने  अतिशय क्षुल्लक पण त्यांच्याकरिता खूप महत्वाचे असे इगो problems, त्यातून उद्भवणारे मतभेद आणि शेवटी त्याचे मारामारीत होणारे पर्यवसन, हे सगळे चित्र  डोळ्यासमोर तरळले व जीव अगदी घाबराघुबरा झाला. मनात आले, आईवडील रात्र-रात्र जागून ज्या चिमण्या जीवाचे रक्षण करतात,त्याच्याभोवतीच आपल्या आयुष्याचे तलम वस्त्र
 विणतात, त्या तान्हुल्या जीवाची किम्मत कोणाच्यातरी ego पेक्षाही कमी? हा ego निर्माण तरी
 कसा होतो आणि तो जोपसतो तरी कोण? आणि हे मारामारी करणारेही कोणाचा तरी मुलगा/मुलगी असतातच ना? म्हणजे पर्यायाने समाजाचा एक घटक म्हणून आपणही अशा घटना घडण्यास  अप्रत्यक्षपणे जबाबदार नाही काय? 
      विचार खोल खोल जात होते. मनाचा तळ ढवळून काढत होते. वाटले की 'आपण एका ठराविक जाती/धर्मात जन्माला आलो यात आपला दोष किंवा कर्तृत्व ते काय?.' खर तर जात ही जन्माने नाही तर कर्माने ठरायला हवी. आणि ह्या संदर्भात ह्या पिक्चर मध्ये झरीना वहाब च्या तोंडी एक मार्मिक वाक्य आहे. ती मुलाला म्हणते की माणसांच्या फक्त दोनच जाती- एक चांगली माणसे आणि दुसरी वाईट. माझ्या पाहण्यात असे एक भटजी आहेत की जे दररोज पौरोहित्य करतात पण त्यानी आपल्या आईला वृद्धाश्रमात ठेवले आहे. त्याचवेळी माझा एक मुस्लिम मित्र मात्र स्वताला मुलबाळ नसतानाही , 'सबका मालिक एक ' म्हणत दुसरयाना मदत करायला एका पायावर तयार.. आता तुम्हीच सांगा, कोणाचा धर्मं कोणता? 


या नविन वर्षात बाकी काही संकल्प नाही केले तरी ' माणसाला प्रथम फक्त माणूस म्हणून पाहायचा ' संकल्प सोडायला आणि तो तडीस नेण्यासाठी मनापासून प्रयत्न करायला काय हरकत आहे? मी तरी प्रयत्न करणार आहे. तुम्ही आहात का माझ्या बरोबर??

No comments:

Post a Comment

पुण्यनगरीतील वाहतूकव्यवस्था आणि वाहनांवरील साहित्यसंपदा: एक अभ्यासपूर्ण विवेचन !!

नमस्कार, सुमारे दशकभर पुण्यात राहिल्यावर या नगरीच्या विद्वत्तेचा आम्हाला स्पर्श झाला नसता तरच नवल. त्यामुळे झालेय काय, कोणत्याही गोष्टीची...