Monday, January 31, 2011

दिल तो बच्चा है जी..

आजचीच गोष्ट. छान आरामात घालवलेल्या शनिवार-रविवार या जोडगोळीनंतर  आलेला उदासवाणा सोमवार. बरयाच वेळा मला तरी सोमवारी ऑफिसला बुट्टीच मारावी असा विचार मनात येउन जातो. पण काय करणार? मज़बूरी, दुसरे काय ! त्यातून आज महिना अखेर. अस्मादिकांच्या बचत खात्यात थोडेसे जास्तीचे पैसे जमा असतील (पगाराचे हो, दुसरे कुठले?) असा विचार करून स्वारी सर्व काही वेळेवर आवरून, पिल्लाला डे-केयर मध्ये सोडून खुशीत मोबाइल वर गाणी ऐकत ऑफिसला जायला निघाली. मी सहसा बसने प्रवास करते. पैशाची बचत, चार अनुभव गाठीशी बांधता येतात वगैरे वगैरे... (पुण्यातले ट्राफिक पाहता खरा विचार हा असतो की  ड्राईवरने बस कशीही चालवली तरी काही विपरीत झाल्यास बसचे [व पर्यायाने आपले] सर्वात कमी नुकसान होईल.) पण आज शेयर-मारुती येताना दिसली, म्हटले चला जाउन बघूया. त्या मारुती वाल्याचा चेहरा अगदी श्रीरामांच्या जवळपासचा दिसत होता  म्हटल्यावर माझी हिम्मत आणखिन वाढली. 
   आत बसले मात्र, त्याने आपले खरे स्वरुप सर्व प्रवाशाना दाखवायला सुरुवात केली. गाडी नावाप्रमाणेच मारुती असावी की काय अशा वेगाने तो ती चालवत (की उडवत) होता. ह्या स्वर्गलोकिच्या वाहनासमोर 'speed-breaker' किंवा रस्त्यावरील इतर वाहने अशा क्षुद्र गोष्टींची काय पत्रास हो? त्यात भरिस भर म्हणून ती 'share-vehicle special' ढिंचाक गाणी! मी तत्परतेने माझ्या सेल वरची गाणी बंद करून टाकली. उगाच आपल्या  सेलची battery कशाला डाउन करा? (असे सुविचार पुण्यात शिफ्ट झाल्यापासून सुचतायत बर का !!). आणि सह्प्रवाश्यांच्या चेहेरयावरिल भीती, चिंता, कुतूहल, राग अशा भावनांचे मिश्रण वाचत बसले होते.  
अचानक गाडीत चाललेला तो वाद्यांचा कलकलाट बंद झाला आणि राहत फतेह अली खान चे हळुवार स्वर कानावर येऊ लागले....'दिल तो बच्चा है जी, थोडा कच्चा है जी...' त्या एकंदर माहौलाशी ते वरवर इतके विसंगत वाटत होते तरीही त्या सुरात अशी काही जादू होती की मन खरच एखाद्या लहान मुलासारखे टुणकन उडी मारून गाडीच्या बाहेर पळाले. पतिराजांबरोबर छानसा पिक्चर बघून व मस्त dinner घेउन आले. बछडयाबरोबर धमाल दंगामस्ती करून आले. माझ्या आवडीचे छानसे पुस्तक वाचून आले. तसेच माहेरी जाउन आईच्या उबदार कुशीत शिरून आले. आजीशी पत्ते खेळून आले. कितीतरी गतकाळातले क्षण पुन्हा नव्याने जगून आले. अनेक नात्यांच्या रेशीमगाठी नव्याने विणून आले..
' madam, उतरा की आता. दहा रुपयात आणखी किती पुढे जाणार?? ' .. गाडिवाल्याच्या प्रेमळ दटावणीने माझी तंद्री भंगली. त्याला दहा रुपये देताना मी मनात म्हटले 
' मित्रा, इथे पुढे कोणाला जायचे आहे? दहा रुपयात तू मला कितीतरी मागे नेऊन आणलेस तेच
 आजचा दिवस तरी पुरेल..!!'

1 comment:

पुण्यनगरीतील वाहतूकव्यवस्था आणि वाहनांवरील साहित्यसंपदा: एक अभ्यासपूर्ण विवेचन !!

नमस्कार, सुमारे दशकभर पुण्यात राहिल्यावर या नगरीच्या विद्वत्तेचा आम्हाला स्पर्श झाला नसता तरच नवल. त्यामुळे झालेय काय, कोणत्याही गोष्टीची...