Monday, April 20, 2015

August Rush

नमस्कार,

गेल्या आठवडयात आम्हा तिघांनाही बराचसा मोकळा वेळ होता. पण तरीही आजकाल पंचाईत अशी होते की खूप आशेने टीव्ही लावावा तर काहीही चांगले पाहायला मिळत नाही. सर्व प्रकारच्या मराठी  मालिका आमच्या "to watch" लिस्ट मधून कधीच बाद झाल्या आहेत. हिंदी चित्रपटही अगदी चुकून बघितला जातो. आणि इंग्लिश चित्रपटांचेही तसेच. परवा मात्र अगदी अपघातानेच एक चांगला चित्रपट बघायला मिळाला. चित्रपटाचे नाव ऑगस्ट रश.

टेक १: एक तरुण आणि तरुणी भेटतात. दोघांची कॉमन आवड संगीत. त्यांना निसर्गातील प्रत्येक गोष्टीत एक नाद, लय जाणवत असते. तर असे हे वेडे जीव भेटतात आणि एका रात्रीनंतर त्यांची ताटातूट होते. ती गर्भवती राहते पण तिचे मूल जन्मतःच दगावले अशी तिची समजूत करण्यात येते.

टेक २: एक दहा अकरा वर्षाचा अतिशय भावूक निळ्या डोळ्यांचा मुलगा विनवणी करतोय. रिमांड होम मधील एका अधिकाऱ्याची. त्याला कुठेही जायचे नाहीये. त्याला विश्वास आहे की त्याचे आई-वडील आहेत, आणि ते कधीतरी त्याला भेटतील. परिस्थितीपुढे कोणाचाच काही इलाज नाही हे जाणवल्यावर तो मुलगा चक्क पळून जातो. जगात वेगवेगळे अनुभव घेत जातो. तहानभूक हरवणारी अशी एकच गोष्ट सोबतीला - संगीत. लोकांची गर्दी, भांड्याचे आवाज, भटक्या लोकांच्या आरोळ्या या सगळ्यातच त्याला एक नाद जाणवत असतो. मजल दरमजल करत तो चक्क एका प्रसिद्ध संगीत विद्यालयात दाखल केला जातो. तेथील शिक्षकही त्याच्या प्रतिभेने चकित होतात.

इकडे या तरुणीला आपल्या वडिलांकडून कळते की तिचा मुलगा जिवंत आहे. तिकडे तो तरुण आपल्या प्रेयसीला शोधत असतो. आपल्याला एक मुलगाही आहे हे त्याला ज्ञात नसते.

उरलेला चित्रपट म्हणजे या तीन जीवांच्या पुनर्भेटीचा उत्कट प्रवास आहे. सर्वात शेवटी जेंव्हा त्या तिघानाही जेंव्हा शब्दावाचून या नयनिचे त्या नयनी सर्व जाणवते तो क्षण आम्ही तिघांनी अक्षरशः हातात हात गुंफून अनुभवला… खरंच अप्रतिम !!

 
 






 

No comments:

Post a Comment

पुण्यनगरीतील वाहतूकव्यवस्था आणि वाहनांवरील साहित्यसंपदा: एक अभ्यासपूर्ण विवेचन !!

नमस्कार, सुमारे दशकभर पुण्यात राहिल्यावर या नगरीच्या विद्वत्तेचा आम्हाला स्पर्श झाला नसता तरच नवल. त्यामुळे झालेय काय, कोणत्याही गोष्टीची...