Wednesday, April 15, 2015

Before Sunrise, before sunset, and before midnight...

नमस्कार,

तुम्ही जर चांगल्या चित्रपटांचे भुकेलेले असाल तर तुम्ही वर उल्लेखलेली Triology नक्की पाहिलेली असेल. मला स्वतःला त्या मालिकेतला तिसरा चित्रपट अजून बघायचाय. पण पाहिलेले पहिले दोन निव्वळ अप्रतिम आहेत.

पहिल्या भागात आपल्या कथेचे नायक आणि नायिका अपघाताने एकत्र येतात, युरोप मधील ट्रेन प्रवासात. बोलता बोलता एकमेकांसमोर उलगडत जातात. मग ठरवून ट्रेनमधून खाली उतरतात आणि व्हिएन्नाच्या नितांतसुंदर गल्ल्यांमधून भटकत वेळ घालवतात. खरे तर तिला जायचं Paris ला आणि त्याला US ला. पण हाती असलेले क्षण ते कसे जगतात हे अनुभवण्याचीच गोष्ट आहे. प्रेमाचा आविष्कार तर आहेच, पण त्या ही पलीकडे जाऊन त्यांचे संवाद इतके सहजसुंदर आहेत की असे वाटते की एक कॅमेरा रोल होतोय आणि दोन माणसे त्याचे भानच नसल्यासारखी हितगुज करत आहेत. या मनीचे त्या मनी… दोघेही एकमेकांना एका ठरलेल्या ठिकाणी सहा महिन्यांनी भेटतील या आश्वासनावर पहिला भाग संपतो. दोघं वेगळे होतात -पत्ते, नंबर वगैरे काहीही नं जाणून घेता…

दुसरा भाग सुरु होतो तो एका बुक स्टोर मध्ये. तो प्रसिद्ध लेखक आहे. आपल्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या कादंबरीचे अभिवचन करत तो युरोपभर हिंडत आहे. एक दिवस तो Paris मध्ये येतो. आणि एका बुक स्टोर मध्ये चर्चा करत असताना त्याला ती भेटते… दोघांमधील अधुरा संवाद पुन्हा सुरु होतो. आणि मधला नऊ वर्षाचा काळ अतिशय तलम हळुवारपणे उलगडत जातो.

अनेक समीक्षकांनी या दोन्ही - खरंतर तिन्ही - चित्रपटाना " one of the best romantic films ever" म्हणून गौरवलेले आहे. अर्थात म्हणून त्यांना निव्वळ romantic movies असे लेबल नाही लावता येणार. माझ्या मते त्या दोघांमधील संवाद हाच चित्रपटाचा आत्मा आहे.

एक सहज अनुभव म्हणून नक्की बघा हे चित्रपट. तुम्हाला आवडतील अशी खात्री आहे माझी.

 
 





 

No comments:

Post a Comment

पुण्यनगरीतील वाहतूकव्यवस्था आणि वाहनांवरील साहित्यसंपदा: एक अभ्यासपूर्ण विवेचन !!

नमस्कार, सुमारे दशकभर पुण्यात राहिल्यावर या नगरीच्या विद्वत्तेचा आम्हाला स्पर्श झाला नसता तरच नवल. त्यामुळे झालेय काय, कोणत्याही गोष्टीची...