Wednesday, December 14, 2011

रोपटे नात्यांचे - खुराक गप्पांचा..!!

वाचकहो,
आज माझा मानवी नातेसंबंधांबद्दल लिहायचा मूड आहे. 

आमच्या घरातील सर्वात चांगली गोष्ट काय असेल तर मी आणि माझे पतीदेव (!) खूप वेगवेगळ्या विषयांवर खूप छान गप्पा मारू शकतो. हो, अगदी तासनतास.. दोघांची कधीकधी अगदी जुळणारी मते, किंवा काही वेळा होणारे मतभेद... पण हे सर्व क्षण आम्हाला पुन्हा नव्याने जगायची उर्मी देतात. आम्ही दोघेही असा फक्कड गप्पांचा मूड लागण्याची वाट पाहत असतो जसे काही. Most beautiful thing about our relationship is that we almost never get bored in each other's company... आणि आम्हा दोघांना असे आवर्जून वाटते कि कोणतेही नाते टवटवीत, ताजे ठेवण्यासाठी सर्वात महत्वाचे असते ते त्या नात्यामध्ये असलेल्या व्यक्तींचे एकमेकांशी बोलणे.. मनापासून स्वतःला व्यक्त करणे.. आणि हे मी फक्त नवराबायको या नात्याविषयी म्हणत नाही आहे. कुठल्याही नात्याचे रोपटे जगवण्यासाठी त्याला खूप साऱ्या गप्पांचा खुराक मिळणे अति-आवश्यक आहे...

खेदाची गोष्ट अशी आहे, कि बहुतेक सर्वजण इथेच मार खातात. आपण सर्वजण खूप बोलतो, पण त्यातून भावना पोहोचवतो का? - खास करून चांगल्या भावना... आपण सर्व कानाने ऐकतो जरूर, पण ते आपल्या हृदयापर्यंत पोचते का? 

खरेतर या एका अर्थाने मुक्त समाजात, आपण खरोखरीच मनाने मुक्त आहोत का हा माझ्यासाठी एक प्रश्नच आहे. माझ्यामते तरी मोकळेपणा म्हणजे समोरच्याला आपल्या भावना, आपले विचार कोणताही आडपडदा न ठेवता सांगायचे स्वातंत्र्य ! आपली जवळची, जीवाभावाची नाती जपतानाच नवीन नाती निर्माण करायची, वेगळे विचार, वेगळे अनुभव यांना मोकळेपणाने सामोरे जायचे ही मानसिकता ! 

खर सांगू का तुम्हाला, आपण समोरच्या माणसाचा कुठल्याही लेबल शिवाय विचारच करत नाही.. आपल्यासाठी हा काळा असतो तर ती खूप आगाऊ असते. ही खूप कंजूस असते तर तो खडूस... किती बंद बंद करून ठेवत असतो न आपण आपली मने ...आणि एक स्त्री आणि एक पुरुष बोलत असले तर काय, बघायलाच नको. आपले मन घोड्यासारखे एकाच सरळ रेषेत विचार करत धावत असते.. आपल्या गावीही नसते, कि आपण आयुष्य सुंदर करण्याच्या कितीतरी संधी धुडकावून लावत असतो... अगदी सहजपणे...!!
हा लेख वाचता वाचता जरा आठवून पहा बरे- किती वेळा आपण जाणता अजाणता समोरच्याला अतिशय जिव्हारी लागेल असे बोललोय.. किती वेळा दुसऱ्यांचे सहानभूतीपूर्वक ऐकून घेतले आहे. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे खूप खूप मनात असूनही केवळ न बोलल्यामुळे, अनेक सोनेरी क्षण तसेच फुकट घालवले आहेत...
तुम्ही म्हणाल की या दृष्टीकोनातून आपण अख्ख्या जगाशी वागायला लागलो तर आपले मन म्हणजे समोरच्यासाठी एक आरसाच होईल. आणि मग त्याची काच तडकायलाही फार वेळ लागणार नाही. कबूल ! शंभर टक्के बरोबर..!! आणि म्हणूनच तुम्ही सर्वांशी अशाच मोकळ्या मनोवृत्तीने वागा असा दुराग्रही सल्ला नाही द्यायचाय मला... अहो, पण आपल्या अतिशय जवळची माणसे, आणि -आपण ज्यांच्या आयुष्यात खूप महत्वाचे आहोत, अशी काही अनाम नाती- यांच्या बाबतीत तरी पाळता येईल की नाही हे पथ्य? आणि पथ्य कुठले - तर नात्यामधील कुठलेही गैरसमज हे एकमेकांशी शांतपणे बोलून संपवून टाकायचे आणि जर आपल्याला दुसरयाची कोणतीही (अगदी छोटीशी का होईना ) गोष्ट आवडलेली असली तर त्याची पोट भरून पोचपावती त्या व्यक्तीपर्यंत पोहोचवायची..मग पहा, त्या व्यक्तीच्या डोळ्यातील कृतज्ञतेची निरांजने तुम्हाला आयुष्यभराचा समाधानाचा प्रकाश देतील...
तुम्हाला मी माझ्याबाबतीतच घडलेली छोटीशी गोष्ट सांगते.. मला आवडलेले एखाद्या ओळखीच्या व्यक्तीमधील गुण हे त्या व्यक्तीला पत्ररूपाने सांगण्याची माझी सवय आहे.. (कदाचित लिहायला खूप आवडते त्याचा परिणाम असेल..) तर, झाले असे, की मी माझी आधीची नोकरी सोडून या नव्या नोकरीत रुजू होणार होते.. अर्थात ही नवीन नोकरी मी केवळ मला कार्यक्षेत्र बदलायचे होते म्हणून स्वीकारली होती. आधीच्या नोकरीतही माझ्या माणसांविषयी काहीच तक्रारी नव्हत्या. त्यातून माझे बॉस म्हणजे अगदी देवमाणूस होते. कंपनीत सर्वांनाच ते हवेहवेसे वाटत. तर अशा माणसापुढे मी जड अंतकरणाने माझा राजीनामा ठेवला. ते काही बोलले नाहीत, पण त्यांना वाईट वाटलेले त्यांच्या चेहेऱ्यावर स्पष्ट दिसत होते. तो दिवसभर मी अतिशय उदास होते. शेवटी न राहवून मी माझ्या त्यांच्याशी जोडलेल्या आठवणी लिहून काढल्या व दुसऱ्या दिवशी ते पत्र त्यांच्या हातात ठेवले. त्यामध्ये खूप छोट्याछोट्या अशा गोष्टी होत्या ज्यावेळी सरांनी आम्हाला खूप समजून घेतले होते. माझ्या कुटुंबियांचा सरांप्रती असलेला आदर पण त्या पत्रात व्यक्त झाला होता. सरांनी ते पत्र मनापासून वाचले. त्यावेळी त्यांच्या चेहेऱ्यावर पसरलेला निर्व्याज आनंद मी कधीही विसरू शकणार नाही...
बरोबर एका आठवड्याने आमचे लाडके सर आम्हा सर्वाना सोडून देवाघरी निघून गेले....
त्यांच्या अचेतन शरीराकडे पाहून रडताना, मनात कुठेतरी समाधान होते - या माणसाच्या चेहेऱ्यावर खरे हसू आणण्यात आपलाही खारीचा वाटा होता याचे...!!
असो, थोडेसे विषयांतर झाले असेल कदाचित, पण जाणवतेय ना आपल्याला, मला काय सांगायचे आहे ते - आयुष्य कुणाचाही द्वेष करण्यासाठी खूप लहान आहे... आणि शेवटी आपण जपलेली नाती, हेच तर आपले आयुष्य आहे, नाही का? 
तेंव्हा Pink Floyd गाण्यात म्हणतो तसे - KEEP TALKING !!










4 comments:

  1. khup chan, tu mantes te khare aahe aaplya manat je kay asel te, nidan aapn aplya mansa barobar tari share karave. tarch jivan jagane shakya aahe, ani Purvi "generation gap" baddal bolayache karan don pidhyache antar manaun bolale jayache. pan atta ekach vayatil lokmadhye "communication gap" navache navin phad aale aahe. manun ch ki kay aatta 30-35 vayatli lok pan depression madhye jatat.

    Pan chan vatale tuza lekh vachun.
    manapasun avadla.

    ReplyDelete
  2. नमस्कार,
    तुमची पोस्ट वाचली. या पोस्टवरील पत्राच्या मुद्याबाबत लिहायचे आहे. मी स्वतः पत्रे लिहित असतो. काहींना ते आवडते. काहींना पत्र हा 'ज्याला ते लिहिले आहे त्यांना विचित्र परिस्थितीत टाकणारा प्रकार' वाटतो. हे लोक म्हणतात, पत्रात स्तुती असेल तर ठीक पण किंचितही टीका असेल तर त्रास होतो. त्यामुळे अशावेळी पत्राचा मार्ग असभ्यतेकडे झुकणारा ठरतो.
    आपले काय मत आहे ?
    अनेक पत्रे मानवी संबंधांना अधिकाधिक गहि-या छटा देणारीही असतात,हे अनेकांना बहुधा माहीत नाही. तुमच्या त्या सरांबाबतचा प्रसंग असाच गहिरा होता.
    आपण कोणाकोणाला लिहिली आहेत पत्रे ? काय अनुभव आले ?

    ReplyDelete
  3. नमस्कार श्री. केदार,
    सर्वप्रथम आपल्या प्रतिक्रियेबद्दल मनापासून धन्यवाद.

    मी खूप जणांना पत्रं लिहिली आहेत - अगदी माझ्या कुटुंबीयांपासून ते माझ्या नोकरीतील colleagues पर्यंत सर्वाना.. कारण मी लेखात म्हटल्याप्रमाणे, कोणाचाही मला भावलेला गुण, त्या व्यक्तीपर्यंत पत्ररूपाने पोहोचविण्याची माझी सवय आहे. अर्थातच अशा पत्रात टीकेचा भाग वजा होतो..
    आणि खरे सांगू का, आपला हेतू अतिशय निर्मळ असेल, आपल्या पत्रातून अथवा बोलण्यातून आपली समोरच्या व्यक्ती विषयीची तळमळ प्रकट होत असेल, तर मला नाही वाटत कि समोरच्याला अगदी टीकेचा सुद्धा त्रास होईल. कारण माझ्या मते तरी मार्ग असभ्य नसतातच. इच्छा मात्र प्रामाणिक असावी.. आणि जर ती तशी असेल तर आपोआपच तिचे प्रतिबिंब आपल्या व्यक्त करण्याच्या पद्धतीमध्ये उमटतेच...
    कारण शेवटी काय हो.. तो माणूस महत्वाचा.. पटते का आपल्याला?

    ReplyDelete
  4. वृषाली,

    प्रतिक्रियेची दखल घेतल्याबदद्ल धन्यवाद.

    आपल्याप्रमाणे मी अनेकांना( ईमेलने घुसखोरी केल्यावरही ) पत्रे लिहिली आहेत. पत्रांचा जो गंध आहे तो ईमेलला कुठला?आतापर्यंतचा पत्रांचा एकूण अनुभव अतिशय चांगला होता व संबंध दृढ करणारा होता.
    माझा कल एकत्र घालवलेल्या क्षणांना उजाळा देण्याकडे, शुभेच्छा देण्याकडे व अभिनंदन करण्याकडे असतो. अनेकांनी मला सांगितले आहे की, तुझं पत्र वाचून बरं वाटलं.. जीवनात मला कोणी पत्रच लिहिले नव्हते.
    ही गोष्ट खरी की, प्रामाणिक इच्छा असेल तर तर ते प्रतिबिंब उमटल्यावाचून राहणार नाही. गुणांच्या कौतुकासाठी पत्रे लिहिणे उत्तमच. होणा-या त्रासाबाबतही तळमळीने पत्रे लिहायची असतील तर वाचणाराही तितकाच सुसंवादी हवा.
    अवांतर ः मला एकूण ती सारी प्रक्रियाच आवडते. कागदाची निवड, लिहिण्यासाठी वेळेची निवड, पाकिटावर तिकीट लावणे, जाऊन पोस्टात टाकणे...एक विलक्षण नशा.
    आपलाही असाच अनुभव असावा...

    - केदार

    ReplyDelete

पुण्यनगरीतील वाहतूकव्यवस्था आणि वाहनांवरील साहित्यसंपदा: एक अभ्यासपूर्ण विवेचन !!

नमस्कार, सुमारे दशकभर पुण्यात राहिल्यावर या नगरीच्या विद्वत्तेचा आम्हाला स्पर्श झाला नसता तरच नवल. त्यामुळे झालेय काय, कोणत्याही गोष्टीची...