Sunday, December 18, 2011

राष्ट्र आपले; प्रगती आपली; पण जबाबदारी? ती कोणाची?

मला माहित आहे, की हा विषय अगदी चावून चोथा झालेला आहे. पण तरीही, जेंव्हा कोणी, 'अरे भाई, इस देश का क्या होगा?' असे म्हणून गळा काढते तेंव्हा अगदी राहवत नाही. शेवटी देश, देश म्हणजे तरी कोण हो? तुम्ही आम्हीच ना? मग? शेवटी आपण नेऊ त्याच दिशेला जाईल नं देश आपला?
माझा नवरा यासंदर्भात एक खूप साधे पण पटणारे व्याक्य बोलतो नेहमी. त्याच्या मते, आपण कोणीच देशासाठी काही केले नाही तरी चालेल एकवेळ, पण स्वतःची कामे प्रामाणिकपणे आणि जबाबदारीने करावीत. तरीही खूप गोष्टी सोप्या होतील. 
म्हणजे बघा हं, आपण सगळे कोणत्याही गोष्टीसाठी आजूबाजूच्या परिस्थितीलाच कायम दावणीला बांधत असतो. पण या सगळ्यामध्ये आपणही परिस्थितीचाच एक अविभाज्य घटक आहोत हे सोयीस्करपणे विसरतो. पेट्रोलचे भाव वाढले, करा संप! वाढती महागाई - करा आंदोलने! आपल्या श्रद्धास्थानाचा अपमान झाला - काढा मोर्चे! करा जाळपोळ! नाही नं पडले दान आपल्या मनासारखे - मग उधळून टाका सगळा डाव... नं  रहेगा बांस, नं बजेगी बासुरी..!!!
खरच इतके कठीण आहे का जबाबदारीने वागणे? मला तर ठामपणे असे वाटते की येत्या नवीन वर्षाच्या सुरुवातीला बाकी कुठलेही (पूर्ण न होणारे) संकल्प सोडले नाही तरी चालतील पण स्वतापुरते काही नियम बनवायला काय हरकत आहे? जसे की -
१) मी कोणालाही दिलेली वेळ व दिलेला शब्द पाळेन.
२) मी माझ्या घरातील शक्य तितक्या कामात मदत करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेन.
३) मी कचरा नेहेमी कचरापेटीतच टाकेन. (आजूबाजूला कचरापेटी नसली, तर छोट्या छोट्या गोष्टी, जसे की chocolate चे wrapper  माझ्याजवळ ठेवेन, व घरच्या कचरापेटीत टाकेन.)
४) मी मला नेमून दिलेले काम मन लावून करेन, व त्यामध्ये सुधारणा कशा करता येतील याच्यासाठी सतत प्रयत्नशील राहीन.
५) मी रस्त्यावर, सार्वजनिक ठिकाणी  थुंकणार नाही.
६) मी वाहतुकीच्या नियमांचे पालन करीन.
७) मी मला नेमून दिलेले काम करण्यासाठी कुठल्याही प्रकारची लाच स्वीकारणार नाही, अथवा तशी अपेक्षाही करणार नाही.
८) मी लहान मुले, जेष्ठ नागरिक यांच्याशी प्रेमाने,सन्मानाने वागेन, व त्यांना शक्य तितकी मदत करेन.
९) मी एखादे मत व्यक्त करताना दुसऱ्याच्या भावनांचा जरूर विचार करीन. मी आजूबाजूच्या माणसांना न दुखावण्याचा शक्य तितका प्रयत्न करीन.
१०) माझ्या पैश्याबरोबरच माझा थोडासा वेळही माझ्या कुटुंबियांसाठी देईन.
ही यादी फक्त प्रातिनिधिक स्वरूपाची आहे. यात अजून कितीतरी गोष्टींची भर टाकता येईल. आपल्याकडे आहेत अशा काही छोट्या छोट्या कल्पना, ज्यामुळे आपला समाज अधिक सुंदर, अधिक मोकळा होईल आणि प्रगतीपथाकडे जाईल?






No comments:

Post a Comment

पुण्यनगरीतील वाहतूकव्यवस्था आणि वाहनांवरील साहित्यसंपदा: एक अभ्यासपूर्ण विवेचन !!

नमस्कार, सुमारे दशकभर पुण्यात राहिल्यावर या नगरीच्या विद्वत्तेचा आम्हाला स्पर्श झाला नसता तरच नवल. त्यामुळे झालेय काय, कोणत्याही गोष्टीची...