Tuesday, October 23, 2012

इंग्लिश विंग्लिश- अर्थात शोध स्वतःचा !!

गेल्या आठवडयातील सर्वात सुंदर गोष्ट कोणती असेल तर इंग्लिश विंग्लिश हा चित्रपट दोन वेळा पाहता आला- एकदा माझ्या best half बरोबर आणि दुसऱ्या  वेळेला आईसोबत.
खरच सांगते, काय सुंदर अनुभव होता. श्रीदेवीच्या आतापर्यंच्या पडदाभर व्यापून उरणाऱ्या  अस्तित्वाला वेगळ्या प्रकारे छेद देणारा.. त्याचवेळी तिची नवीन इमेज आपल्या मनभर व्यापून टाकणारा..
हा चित्रपट दोन स्त्रियांचा- एक अर्थातच श्रीदेवी, आणि दुसरी या चित्रपटाची दिग्दर्शिका गौरी शिंदे !! चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी सर्वसामान्य लोकांना माहित नसलेली गौरी आज घराघरात जाऊन पोचली आहे. कोणताही बडेजाव न आणता गोष्टीरूपात तुमच्या-आमच्या आयुष्याची कथा सादर करायची तिची हातोटी विलक्षण आहे. तसे पहिले तर हा विषय खूप नवीन आहे असे नाही. तरीही तो पडद्यावर पाहताना एक क्षणही कंटाळा येत नाही हे श्रेय या दोन superwomen चे. मांडणीतला इतका साधेपणा, विषय सोपा करून सांगण्याची वृत्ती, पण तरीही.. तरीही काहीतरी वेगळे, थेट भिडणारे असे तत्वज्ञान.. असा त्रिवेणी संगम या चित्रपटाच्या निमित्ताने पाहायला मिळतो.. भाषा शिकणे हे केवळ निमित्त, पण त्या अनुषंगाने इतर कितीतरी महत्वाच्या मुद्द्यांना हा चित्रपट स्पर्श करतो.
गोष्ट एका संसारी स्त्रीची. राजा-राणी, दोन मुले व मुलांची आजी असे पुण्यातील सुखी कुटुंब. बाबा नोकरी करणारे, व आई  गृहिणी - हो गृहिणीच, कारण तसे पहिले तर ती अतिशय निगुतीने लाडू करून ते विकत असली तरी घरच्यांच्या दृष्टीने हा प्रकार फारसा दखल न घेण्याजोगा - घरचे लोक ही  तुमच्या-आमच्यासारखीच सामान्य माणसे. ती वाईट, खलनायकी मुळीच नाहीत. त्या चौघांचेही त्या गृहिणीवर खूप प्रेम आहे- अगदी सासुचेसुद्धा !  पण झालेय असे, की ही कथानकाची नायिका, खरेतर अतिशय हुशार असूनही कुठेतरी आत्मविश्वास गमावून बसली आहे. त्याचे मुख्य कारण म्हणजे तिचे इंग्लिश कच्चे आहे. त्यामुळे ती नकळतपणे मुले व नवऱ्याच्या चेष्टेचा विषय झाली आहे. तिला जाणूनबुजून दुखवायचा प्रयत्न कोणी करत नसले, तरी आपली नायिका मात्र आतल्याआत कुढत आहे. "आपण कोणालाच नकोसे आहोत की काय? " असा थोडासा टोकाचा विचारही कधीकधी तिच्या मनात येऊन जातो. (चित्रपटाच्या शेवटी ती तिच्या या अवस्थेची कारणमीमांसाही अतिशय समर्पकपणे आणि नेमकेपणाने करते. )


तिच्या आयुष्याला कलाटणी मिळते जेंव्हा तिला तिच्या भाचीच्या लग्नासाठी एकटीला अमेरिकेला जावे लागते. त्यानंतर तिचे एका -चार आठवडयांमध्ये इंग्लिश शिकवणाऱ्या - क्लासमध्ये जाणे, तिचे तेथील सोबती, आणि सर्वात शेवटी तिचा परत आलेला आत्मविश्वास, या सर्व इथे वाचण्यापेक्षा अनुभवायच्याच गोष्टी आहेत.


या चित्रपटाचा आत्मा अर्थातच श्रीदेवी. एक मध्यमवयीन, आत्मविश्वास गमावलेली स्त्री तिने ज्या तडफेने रंगवली आहे त्याला खरोकारच तोड नाही !! एरवीची नृत्यात अप्सरा असलेली श्री, या चित्रपटातील काही मोजक्या प्रसंगात ज्या प्रकारे अडखळत, लाजत नाचते त्या अभिनयाला खरच hats off !!! शशी गोडबोलेची (या चित्रपटाची नायिका) खंत, उदासी, मध्यमवर्गीय साधेपणा, आणि तरीही अंगभूत हुशारीमुळे नवीननवीन आव्हानांना सामोरे जाताना परत मिळालेला आत्मविश्वास, त्याचबरोबर दुसऱ्यांचे  आपल्या प्रेमात पडणे अतिशय समजूतदारपणे आणि maturity ने हाताळायची वृत्ती  ह्या व अशा असंख्य गोष्टी श्रीदेवीने अतिशय समजून घेऊन साकारल्या आहेत. तिच्या तोंडी असलेले कितीतरी वरवर सहज वाटणारे संवाद पण एखादे तत्वज्ञान सांगून जातात. हे श्रेय अर्थात दिग्दर्शिकेचे. संपूर्ण चित्रपटात कुठेही भपका नाही. खोटा डामडौल नाही. आहेत ती तुमच्या-आमच्या सारखी हाडामासाची जिवंत माणसे !! मेणाचे पुतळे नव्हेत...!!



अर्थात वर म्हटल्याप्रमाणे भाषा शिकणे हे निमित्तमात्र, पण या चित्रपटात जो मुख्य विचार मांडला आहे तो खरोखर स्तुत्य आहे. चित्रपटाच्या शेवटी श्रीदेवी आपल्या फ्रेंच सोबत्याला उद्देशून म्हणते - जब हम अपने आपको पसंद नही करते, अपने आपसे नफरत करते है, तो आसपास की कोई चीज हमे अच्छी नही लगती और मन दुसरी, नयी चीजोंकी तरफ आकर्षित हो जाता है. मगर जब हम खुदसे प्यार करना सीख जाते है, तो वोही चीजे हमे बिल्कुल नयी लगने लगती है. Thank you for teaching me to love myself.... "




खरेच, स्वतःवर प्रेम करणे, स्वतःमधील असामान्यत्व शोधणे आणि त्याच्या जाणीवेने आतून शांत होणे.... किती सुंदर process आहे नं  ही ! पण आजूबाजूच्या भाऊगर्दीत हरवून जात असताना आपण नेमके आत्मभान जपायला विसरतो. त्याचे परिणाम - हरवलेला आत्मविश्वास, दुखावलेली मने, वाटणारी खंत... एक ना दोन !!
चला तर, स्वतःला थोडेसे मोकळे करू या. ज्या इज्जतीची, मानाची आपण समाजाकडून अपेक्षा करतो, ती सर्वप्रथम आपणच आपल्याला देऊ या. आत दडलेल्या कलाकाराला जागे करू या. आपल्यामध्ये काय उणीवा आहेत त्याच्याबद्दल विचार करून खंतावत बसण्यापेक्षा आपल्यातील गुणांना मनोहारी पैलू पाडू  या..!!






आपणा सर्वाना विजयादशमीच्या खूप साऱ्या  शुभेच्छा.. !!

टीप: वरील सर्व चित्रे महाजालावरून साभार...
















5 comments:

  1. गोड्बोले नावाच्या मराठी कुटुंबात ’नवभारत टाईम्स’ पेपर येताना दाखवलाय. पुण्याची गोडबोले नावाची फॅमिली हिंदी पेपर कशाला घेईल? मराठीत काय पेपर नाही निघत? मला तर डोक्यातच गेला हा चित्रपट. इतकाच हिंदीचा पुळका होता तर श्रीदेवीला हिंदी भाषिक दाखवायचं होतं.

    ReplyDelete
    Replies
    1. सर्वप्रथम आपल्या प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद.
      आपण म्हणता ते खरे आहे. चित्रपट पाहून आल्यावर मी आणि माझे पती जेंव्हा चित्रपटाविषयी चर्चा करत होतो, त्यामध्ये हा मुद्दा प्रामुख्याने होता, की एकूणच ते कुटुंब मराठी वाटत नाही, आणि तसेही, ते कुटुंब मराठी दाखवायची खास गरज होती असेही नाही.
      तरीही काही गोष्टी नमूद कराव्याश्या वाटतात:
      मुळात मी चित्रपट समीक्षक नसल्यामुळे माझ्याकडे समीक्षेसाठी अत्यावश्यक असा अलिप्तपणा फार क्वचित असतो. हा लेख म्हणजे म्हणजे तो चित्रपट पाहतानाच्या माझ्या मनस्थितीचे वर्णन आहे. आणि दोन्ही वेळेला हा चित्रपट पाहताना मला जो आनंद मिळाला, तो माझ्या मुठभर वाचकांशी शेअर करावा इतकाच निखळ हेतू आहे.
      राहता राहिला मराठीपणाचा प्रश्न. आपण म्हणता तो मुद्दा नक्कीच महत्वाचा आहे. मी त्याच्याकडे थोड्या वेगळ्या दृष्टीकोनातून पाहत आहे, इतकेच.
      जर 'ते कुटुंब मराठी आहे' ही बाब नजरेआड केली, तर चित्रपटातील अनेक गोष्टी अतिशय संवेदनशीलतेने हाताळल्या आहेत असे मला वाटते. "स्वतःवर प्रेम करा, आपल्यातील गुण हुडकून त्यांचा विकास करा व समाधानी व्हा" असा काहीसा या चित्रपटाचा फोकस असावा असे जाणवते..
      असो, पुन्हा एकदा, आवर्जून आपले मत नोंदवल्याबद्दल आभारी आहे.


      Delete
  2. सिनेमा मला पण आवडला. लहान मोठ्या चुका होतंच असतात.. त्याकडे दुर्लक्ष करण्याइतका सिनेमा नक्कीच चांगला आहे.
    मला आणि सौ.ला एकच सिनेमा कधीच आवडत नाही. ’श्वा” नंतर दोघांनाही आवडलेला हा एकच सिनेमा :)

    ReplyDelete
  3. श्वास लिहायचंहोतं वर.

    ReplyDelete
  4. सकारण घेतलेला असत तो श्वास, आपोआप किंवा विनाकारण घडतो तो विश्वास आणि एखाद्याचा अभाव जाणवला की चाळवतो तो अविश्वास...

    आता सोडतोय तो सुटकेचा निश्वास!

    ReplyDelete

पुण्यनगरीतील वाहतूकव्यवस्था आणि वाहनांवरील साहित्यसंपदा: एक अभ्यासपूर्ण विवेचन !!

नमस्कार, सुमारे दशकभर पुण्यात राहिल्यावर या नगरीच्या विद्वत्तेचा आम्हाला स्पर्श झाला नसता तरच नवल. त्यामुळे झालेय काय, कोणत्याही गोष्टीची...