Thursday, July 2, 2026

गोंधळलेले बटाटे 😀

 साधारण ९ वर्षांनी फिरकले आहे स्वतःच्या ब्लॉग वर. म्हणजे बाकी प्रोफेशनल प्लॅटफॉर्म्स वर लिखाण चालू होते पण मातृभाषेतल्या लिखाणाची मजा वेगळीच. 

तर आज घेऊन आले आहे एक रेसिपी - 

Verwirrender Kartoffeln ( Translation - confusing potatoes) ☺

कृती वाचताना जिन्नस सहज लक्षात येतील-
1. फरसाणाच्या डब्यातलं उरलेलं फरसाण घ्यावं.
2. घरी केलेल्या कुरमुऱ्यांच्या चिवड्यातलं तळागाळातलं मिश्रण घ्यावं.
3. हे सगळं मिश्रण मिक्सर मध्ये बारीक वाटून घ्यावं (इतकं बारीक वाटावं की ब्रम्हदेवाच्या बाबांनाही त्यातले मूळ घटक ओळखता येऊ नयेत 😛).
4. वाटण करताना मध्येच फ्रीजमध्ये ठेवलेल्या आळशीच्या (जवसाच्या) कंटाळवाण्या चटणीची आठवण झाली, की तिलाही या वाटणात चोरपावलानी प्रवेश द्यावा.
5. मग या मिश्रणाच्या सगळ्या तीव्र चवी बॅलन्स होण्यासाठी त्यात उकडलेले बटाटे घालावेत.
6. या मिश्रणाची टिक्की करायचा विचार प्रथम करावा.
7. मग गरम तेलात सोडलेली पहिलीच टिक्की गर्भगळीत झाली, तरी आपण धीर न सोडता “आता याची मस्त थालीपीठं करूया” असं म्हणावं.
8. सरतेशेवटी तव्यावर एकसंध लावलेले थालीपीठ अनेक तुकड्यांमध्ये धारातिर्थी पडल्यावर, सरळ तो सगळा गोळा घेऊन कढईत तेलावर मोकळ्या भाजणीसारखा परतवावा.
9. खायला देताना मात्र पांढऱ्याशुभ्र प्लेटमध्ये याला मध्यभागी ठेवून, बाजूला गोडगुलाबी बिटाच्या दह्यातल्या कोशिंबीरीचे कोंदण द्यावे आणि कांदापातीची कोवळी पाने त्यावर पेरावी 😂
10. आणि कहर म्हणजे, घरच्यांनी “हे मस्त लागतंय, अजून आहे का? “ असं विचारल्यावर, “अशी रेसिपी शतकातून एकदाच, आणि थोडीशीच बनते” असे बाणेदार उत्तर द्यावे 😛😛



Thursday, August 3, 2017

पुण्यनगरीतील वाहतूकव्यवस्था आणि वाहनांवरील साहित्यसंपदा: एक अभ्यासपूर्ण विवेचन !!

नमस्कार,

सुमारे दशकभर पुण्यात राहिल्यावर या नगरीच्या विद्वत्तेचा आम्हाला स्पर्श झाला नसता तरच नवल. त्यामुळे झालेय काय, कोणत्याही गोष्टीची अतिरिक्त चिकित्सा केल्याशिवाय आमचा आत्मा थंड होत नाही. मग त्याला वाहतूक हा विषय कसा वर्ज्य राहील ? मी तर पुण्यातील गाड्यांच्या नंबरप्लेट्सवर पी. एच. डी. केलेली असल्याच्या थाटात निदान करत असते. म्हणजे गाडीची नंबरप्लेट आणि मेक पाहूनच फक्त गाडीच नविन आहे की ड्रायव्हरही, आणि नवीन ड्रायव्हर कश्या प्रकारच्या चुका करेल याचे आडाखे मी सहज बांधू शकते आणि बहुतेक वेळा ते बरोबरही असतात. माझी मॅनेजर यालाच बहुधा कौतुकाने ATD (Attention to Details) म्हणते तर माझे डॉक्टर यालाच ATDD (Attention to Detail Disorder) म्हणतात. असो.

तर, आजच्या रम्य सकाळी सुमारे दहाच्या दरम्यान ऑफिसला निघायचा अतिशहाणपणा केल्यामुळे युनिव्हर्सिटी चौकात अशक्य गर्दी असणार हे निश्चितच होते. पण सकाळपासूनच कधी नव्हे तो बरा मूड जमून आल्यामुळे रोजच्यासारखी स्वतःशीच चिडचिड नं करता (माझी ट्रॅफिक मधील चिडचिड पण unique असते बरं का ! म्हणजे MH27, WB05, etc. असे नंबर्स पाहून, "छे, असे काय नंबर्स असतात? बहुतेक मंगळावरून आलेली गाडी दिसतेय वगैरे वगैरे), गाडीच्या बंद काचांआडून सभोवतालच्या घटनांचे निरीक्षण करायला लागले. आणि काय सांगू लोकहो, माझ्या साहित्यिक ज्ञानात आमूलाग्र भर पडली.

माझ्या समोरील एक "क्षत्रिय कुलवतंस" i20 आपल्या खानदानी सिगरेटचा धूर इतरांवर फेकत त्या सर्वांची कुळे धन्य करण्याचे कर्तव्य चोख बजावत होती. इकडेतिकडे इंचभरही जागा शिल्लक नसताना माझ्या मागच्या हुंदाईने मला कर्णकर्कश्य हॉर्नच्या माध्यमातूनच "थोडं पटकन पुढे होता का प्लिज" असे विचारले. मग मी पण आरशातूनच हातवारे करून "आता समोरच्या गाडीवरून उडून जाऊ का पुढे? " असा प्रेमळ सवाल केल्यावर आमचा संवाद तिथेच थांबला. इतक्याच माझ्या शेजारूनच एक "CNG, Smart Solutions" वायुवेगाने आली आणि तिने "Wrong side ने पटकन पुढे घुसणे" हे कसे smart solution आहे याचे प्रात्यक्षिकच दाखवून दिले. माझ्या थोडेसे पुढे एक "जीवाचे पाखरू" वाला टेम्पो जवळपास रांगतच आणि ते ही उजव्या लेनमधून पुढे सरकण्याचा प्रयत्न करत होता. "बहुदा ह्या पाखराला पंख फुटले नसावेत अजून".. इति माझे मन.. थोडे पुढे गेले गर्दीतून तर एक "नाद केला बाद केला " इंडिका स्वतःच रन आऊट होऊन बंद पडली होती रस्त्याच्या कडेला.
थोडे पुढे एका अरुंद वळणावर गाड्यांची रांगच लागली असताना तेवढ्यात एक नवीकोरी नंबर प्लेटही नं पडलेली ऑडी उडत आली आणि डाव्या बाजूने मार्ग काढायचा प्रयत्न करू लागली. माझ्या मनात विचार सुरु झाले .. "ऑडीच्या नव्या airbags टेस्ट व्हायची हीच ती वेळ !! अरे बाबा, पण नंबर प्लेट नसताना इन्शुरन्स क्लेम करता येत नाही. आणि ड्राइव्हरबाबा, तुझा पण आहे ना mediclaim??" थोडे पुढे सिग्नलला थांबले असताना एका "चांगभलं" fortuner ने एक लालजर्द पिचकारी शेजारच्या दुचाकीस्वारावर उडवून त्याच्या शुभ्र शर्टाचं चांगलंच भलं केलं. मग त्या दुचाकीस्वार बाजीरावानेही fortunerच्या मागील सात पिढ्यांची प्रेमळ चौकशी केली.

अरेच्चा, असे साहित्यिक विवेचन करता करता ऑफिस आलेच की. म्हणजे कोणत्याही परिस्थितीवर विनोद हा जालीम उपाय आहे तर.. हुश्य !!!


तळटीप - वरील विवेचनाचा हेतू केवळ निखळ मनोरंजनाचा आहे. त्यातून कोणी मनाला लावून घेतल्यास मंडळ जबाबदार नाही. कारण जबाबदारी घेणे आणि योग्य वेळी ती टाळणे हे ही आमचे वैशिष्टय आहे बरं का !!!
 

Tuesday, April 4, 2017

पूर्णा - है पूरी कायनात तुझमे कहीं, सवालों कां जवाब खुद है तू हीं ....

नमस्कार,

या आठवड्यात चिरंजीवांची अत्यंत महत्वाची इयत्ता दुसरीची वार्षिक परीक्षा सुरु आहे. त्याच्या तयारीत कमतरता राहू नये म्हणून आम्ही उभयता खूप कष्ट घेत आहोत. त्या तयारीचा एक भाग म्हणजे त्याच्या अभ्यासाकडे  लक्ष देणे बंद केले आहे व दुसरा महत्वाचा भाग म्हणून गेल्या शनिवार-रविवारी आम्ही तिघांनी दोन चित्रपट बघितले - नाम शबाना आणि दुसरा अर्थातच पूर्णा - ज्यावर आजचा लेख आहे.

एक तेरा वर्षाची मुलगी. तिचे आडनाव लक्षातही  राहणार नाही कदाचित चित्रपट संपल्यावर. दिसायला सामान्य, अभ्यासात साधारण, अतिशय गरिबीत वाढलेली, तिचे लवकर लग्न करावे, संसारात अडकवावे आणि तिने मुले जन्माला घालून त्यांचा जमेल तसा सांभाळ करावा हीच आई-बापाची (कदाचित रास्त) इच्छा. तिच्या चुलत बहिणीचे तसेच झाले की. मग ती मुलगी खेळामध्ये कितीही प्रवीण का असेना, तिच्या मोकळ्या जगण्याच्या इच्छेचे कसले एवढे कौतुक? इतक्या गरीब आदिवासी पाड्यावरील मुलींची स्वप्ने पायदळी तुडवली जाण्यासाठीच जन्माला आलेली असतात नं?. ... आणि इथेच कथा वळण  घेते.. उंचीवर जाते .. अगदी थेट माउंट एव्हरेस्ट गाठते... सगरमाथा गाठणारी जगातील सर्वात लहान मुलगी - पूर्णा मालवथ !! तिची कथा खरंच सुफळ संपूर्ण होते जगातील सर्वात उंच जागी. नगाधिराजामधील सर्वोच्च शिखर गाठल्यावरचा तिचा आनंद वाटला जातो आपल्या सर्वांबरोबर , तिचे मार्गदर्शक गुरु श्री प्रवीण कुमार यांच्याबरोबर आणि तिच्या दिवंगत बहिणीबरोबर ..... अशी बहीण जी तिची सख्खी मैत्रीण आहे. स्वप्न वाटून घेणारी साथीदार आहे आणि पूर्णाच्या अडचणी आपल्या अंगावर झेलणारी आधाराची भिंतही..

एका विलक्षण जिद्दीची सरळ साधी कथा. राहुल बोसने या सिनेमाचे चित्रीकरण अवघ्या ११ दिवसात पूर्ण केले आहे. आणि हो, अदिती इनामदारने पूर्णाच्या व्यक्तिरेखेला  १०० टक्के न्याय दिला आहे. हा चित्रपट खास करून आपल्या मुलांना नक्की दाखवा एकदातरी... आपल्या सुरक्षित दुनियेपलीकडची दुनिया दाखवण्यासाठी.

चित्रपटातील निवडक तीन गाण्यांमध्येही अर्जित सिंगने व अमिताभ भट्टाचार्यने त्यांची जादू दाखवली आहे. तेजस्वी शब्द, सुरेख चाली व तितकेच दर्दभरे सूर.. ती सर्व गाणी youtube वर ऐकता येतील -

Poorna Audio Jukebox







Wednesday, February 15, 2017

बंदे की मेहनत को किस्मत का सादर प्रणाम है प्यारे... दंगल दंगल....

नमस्कार,

Biases.... आडाखे.. ठोकताळे.. काही वेळा अचूक पण काही वेळा अगदीच गंडलेले. अशाच एका अतिशय चुकीच्या निदानाविषयी लिहीत आहे आणि ह्या bias ला संपूर्णपणे शरण नं जाता त्याच्या विरोधात action घेतली याचा मनस्वी आनंद आहे..

तर, निमित्त अर्थातच दंगलचे...

गेली काही वर्षे आम्ही साधारण महिन्याला सात-आठ या रेटने थिएटर मध्ये जाऊन चित्रपट बघत आहोत. त्यातले बहुसंख्य एकदातरी बघण्यासारखे होतेच आणि जे अप्रतिम होते ते पुन्हा एकदा थिएटर मध्ये जाऊन पहिले. (उगाच नाही लोक आम्हाला passionate जोडी म्हणत ! आणि लग्नाला १५ वर्षे उलटून गेली तरी आयुष्य समरसून जगण्याची दोघांची उर्मी शाबूत आहे हे विशेष. :) आता त्याला साथ आहे आमच्या शाळकरी छोट्या शिलेदारांची )
त्यामुळेच की काय, "आपला movie choice हा सर्वोत्तम असतो" , "We belong to class and not mass" etc. अशी समजूत होत चाललेली आहे दिवसेंदिवस. (त्यात फारशी अतिशयोक्ती नाहीये, नक्कीच, पण काही सणसणीत अपवाद येतात समोर .... )

तर, डिसेंबर उजाडल्यापासून ज्याच्या त्याच्या तोंडी दंगलची स्तुती ऐकत होतो. आणि का कोण जाणे चित्रपटाचे पोस्टर आणि त्यावरचे  "म्हारी छोरीया छोरों से कम है के? " हे वाक्य वाचून उगीचच हा उगीचच स्री -पुरुष समानता, किंवा कोणीतरी उजवे-डावे  असा काहीतरी संदेश देणारा चित्रपट असावा असे वाटले. (आम्हा दोघांचाही point of view असा - Celebrate the difference, complement each other, be each other's strength and move on. अर्थात आपण समाजाच्या त्या वर्गात मोडतो ज्यांना कोणत्याही गोष्टीसाठी खऱ्या अर्थाने फारसे झगडावे लागले नाही याची जाणीव आहे नक्कीच ..) तर जसजसे भेटणारे प्रत्येकजण चित्रपटाची स्तुती करत होते तसतसा आमचा दंगल नं बघायचा निर्णय पक्का होत होता. अशातच एक दिवस चिरंजीव घरी आले आणि "आपण दंगल बघायला हवा" असे पिल्लू सोडले. त्याचा एक गुण कौतुकास्पद आहे - तो हट्ट करत नाही, धिंगाणा घालत नाही, पण आपले मत शांतपणे रोज मांडत राहतो - त्याची अंमलबजावणी होईपर्यंत. आम्ही सुरवातीला ठाम आणि मग मंद विरोध केला. शेवटी गेल्या शनिवारी त्याच्या आग्रहाला बळी पडलो (इतका शांतपणे रोज सांगतोय, जाऊन तर बघूया, नाही आवडला तर अडीच तासांची झोप होईल, आणि कदाचित आवडलाच चुकून, तर बोनस ...! आता त्यावेळचे हे मनातले विचार मांडताना पण मजा वाटतेय आणि थोडीशी लाज पण ... )

चित्रपट डिसेंबर मध्ये रिलीज झाला असूनही आता मिड-फेब मध्येही गर्दी होती बऱ्यापैकी. बरेच जण दुसऱ्या-तिसऱ्यांदा आले असणार हे नंतर जाणवले. चित्रपट बघून झाल्यावर नवऱ्याचा हुकूम - "लगेच उद्याची पण तिकिटे काढून टाक ! " म्हणून रविवारीही परत दंगल ... पोट भरले नाही, डोळे भरायचे थांबले नाहीत म्हणून चक्क सोमवारीही इंटरनेट वर दंगल ... " मां के पेट से मरघट तक है तेरी कहानी ... आँख में उसकी आँख मिलाके भिड जाने का नाम है प्यारे दंगल दंगल... "

तो मुलींना समाजाच्या तीव्र विरोधात जाऊन कुस्ती शिकवणारा बाप, त्यांची बक्षिसे जपून ठेवणारा बाप, मुलींचे बालपण एकाअर्थी  हिरावून घेऊन त्यांना ताबडतोड मेहनत करायला लावणारा बाप, त्याच मुलींशी तत्वासाठी भांडणारा बाप, आणि मुलीचे अश्रू हीच तिने मागितलेली माफी हे समजून घेऊन तिच्या मदतीसाठी तातडीने धावून जाणारा बाप, तिला मॅचचे व्हिडीओज बघून शिकवणारा बाप, मुलींसाठी चिकन शिजवणारा बाप, आणि शेवटी राष्ट्रगीताची धून ऐकून आनंदाने उचंबळून आलेला बाप ..... खास करून तो जेंव्हा NSA कमिटी मेम्बर्सची माफी मागत असतो तेंव्हाच्या आमिरच्या अभिनयासाठी त्याला हजार गावे इनाम .. आता लिहीत असतानाही गळ्यात आवंढा दाटून आलाय .. डोळे भरून आलेत. सारखे माझे लहानपण आठवतेय आणि अर्थातच बाबा. माझी बक्षिसे जपून ठेवणारे, मी केस कापल्यावर माझ्याशी दोन दिवस अबोला धरणारे, बॅडमिंटन, पत्ते, कॅरम यांसाठी हुकुमी साथीदार, आणि दर वेळी माहेरी गेल्यावर परत निघताना आसवे गाळणारे आणि माझ्या मुलाला पोटाशी घट्ट जवळ धरणारे बाबा ...  चित्रपट संपल्यावर बाबाना फोन लावला अर्थातच. कितीतरी वेळ बालपणीच्या आठवणीत रमलो होतो .... खरंच काय सामर्थ्य आहे ना चित्रपटाचे !!

हा चित्रपट आहे बाप-मुलीच्या हळव्या नात्याचा, मेहनतीचा, साधेपणाचा आणि अतूट विश्वास गाठीशी असला की कोणतेही शिखर अशक्य नाही या सत्याचा !! खऱ्या गीता बबिता त्यांचे वडील आणि कुटुंबीय यांना सलाम आहेच आपला आणि त्याचबरोबर आमिर खान आणि त्याच्या पडद्यावरील दोन मुलींनाही सलाम, चित्रपटाच्या मांडणीला सलाम, गीतकाराला सलाम (एक एक शब्द तावून सुलाखून निवडलाय अमिताभ भट्टाचार्यने), प्रीतमच्या संगीताला सलाम आणि अर्थातच नितीश तिवारीला सलाम ..... !!! शेवटी काय,

सुरज तेरा चढता ढलता गर्दीश में करते है तारे ..

भेड की हाहाकार के बदले शेर की एक दहाड है प्यारे ...


दंगल दंगल ... दंगल दंगल.... !!!!!




Friday, January 27, 2017

YouTube Special: Power, Grace, and Intelligence - Personified !!

नमस्कार,

गेले काही दिवस अमेरिकन इलेक्शनच्या निमित्ताने बरेच व्हिडीओज बघणे होत आहे. आजचा लेख हा फक्त एक व्यक्तिचित्र आहे. इलेक्शनचे राजकीय विश्लेषण अर्थातच नाहीये.

मिशेली ओबामा - अमेरिकेची माजी फर्स्ट लेडी. माझ्या मते राष्ट्राध्यक्षांइतकीच (किंबहुना थोडी जास्तच) प्रसिद्ध झालेली मिशेली. अर्थात तिचे स्वतःचेही कर्तृत्व कारणीभूत  आहे त्याला. जमिनीतून उगवून एका महाप्रचंड वृक्षात रूपांतर व्हावे अशीच या उभयतांची कारकीर्द. अतिशय मध्यमवर्गातून आलेली, हार्वर्ड लॉ-स्कूल मध्ये शिकलेली, स्वतःच्या मतांबद्दल आग्रही, अमेरिकेसारख्या अतिसंपन्न देशात "let's move" चळवळ सुरु करणारी, व्हाईट हाऊस मध्ये vegetable गार्डन तयार करणारी, ellen च्या रिऍलिटी शो मध्ये येऊन push-ups challenge सहजपणे स्वीकारणारी, देशाच्या military families साठी अनेक उपक्रम राबवणारी आणि तितक्याच खेळकरपणे Sesame Street मध्ये जाऊन सकस अन्न आणि व्यायाम यांचे महत्व लहान मुलांनाही पटवणारी अशी ही अष्टपैलू मिशेली !! त्या दोघांनी त्यांची ही इमेज अतिशय जाणीवपूर्वक तयार केली असेल कदाचित, त्यामागे सर्वसामान्यांना ना कळणारी अतिशय complex राजकीय गणितेही असतील, पण तरीही, 8 वर्षात जगाच्या रंगमंचावर एका (almost) सर्वात बलाढ्य, सामर्थ्यशाली व्यक्तीची पत्नी ही भूमिकाच मुळात खरोखरी अवघड आहे याबद्दल दुमत असण्याचे कारण नाही. आणि मिशेली ही भूमिका पूर्ण तन्मयतेने, आणि तितक्याच gracefully जगली. तिची oratory skills, almost स्लोगन्स झालेली अशी "Books before Boys", किंवा "When they go Low, we go High" अशी वाक्ये, तिचे बराक ओबामांविषयी कौतुकाने बोलणे, तिचा सर्वत्र सहज वावर, तिचा फिटनेस.. She is definitely a charm !! We will certainly miss you Michelle !!!!

हे खाली दिलेले व्हिडीओज खास करून मिशेलीची "दोन मुलींची आई" अशी घरगुती इमेज highlight करणारे. कोणत्याही मध्यमवर्गीयाला जवळचे वाटतील असे -

Michelle on Motherhood, Me time, and all No-Nonsense Stuff

Friday, January 20, 2017

YouTube Special: Saturday Night Live

नमस्कार,

गेले अनेक महिने जगभर चर्चिल्या गेलेल्या अमेरिकन निवडणुकीचे आज सूप वाजेल जेंव्हा डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतील. अर्थात आजचा लेख ट्रम्प महाशयांवर नाहीये हं (आपण पामर काय बोलणार anyways अशा 'एकमेवाद्वितीय' व्यक्तिमत्त्वाबद्दल. असो).

तर निवडणुकीसंदर्भात चालू असलेले Presidential Debates तीन चार महिन्यांपूर्वी YouTube वर बघत होते. तेंव्हा या विनोदाच्या खाणीचा शोध लागला. आणि मग actual debates ऐवजी या spoofs च्याच प्रेमात पडले. Alec Baldwin  आणि Kate Mckinnon यांनी कसली धमाल उडवून दिली आहे. काही म्हणजे काही भीडभाड नं बाळगता. मला या लोकांचा एक गुण खास करून आवडतो बुवा. एकदा एखाद्याची आरती उतरवायची म्हटली की त्यांना काही म्हणता काही वर्ज्य नाही. अतिशय शार्प intellect आणि त्याला झालर मला अतिशय आवडणाऱ्या sarcasm ची. मिळून सादर होतो तो टोटल मॅडनेस. अर्थात अमेरिकन टीव्ही नित्यनेमाने बघणाऱ्यांना अर्थातच हे नवीन नाहीये. चांगला १९७५ पासून हा शो प्रसारित होतोय आणि वर्षांगणिक अधिकाधिक प्रसिद्धही. खास करून Kate Mckinnonच्या अभिनयाने मी तर सॉलिड इम्प्रेस झालेय. (बऱ्याच वेळेला अतिरंजित असते ते impersonation , पण तरीही there is really something about it, that you burst into laughing. May be that the timing is perfect !!). खाली दिलेल्या लिंक्स नक्की व्हिजिट करा. धमाल आहेत.







Sunday, January 15, 2017

आत्मानंद, त्रिपुरी पौर्णिमा, रामेश्वर, आणि लेसर शो...

नमस्कार, 

शीर्षक वाचून मी एकदम "भक्तिमार्ग हाच खरा मार्ग", यावर काहीतरी प्रवचन देणार आहे असा गैरसमज नको हं. तसे रूढार्थाने माझे आणि conventional अध्यात्माचे फारसे सख्य नाहीये. हां म्हणजे श्रद्धेवर श्रद्धा आहे आपली, पण ते तेवढंच. असो. 

आज जुना डेटा चाळताना काही नेत्रसुखद रोषणाईचे व्हिडीओज दिसले. मन लगेच दोन महिने मागे गेले. 

१४ नोव्हेंबरची त्रिपुरी अगदी स्पेशल होती माझ्यासाठी. सोमवार होता त्या दिवशी. आदल्या दिवशीच पिंकथॉन धावून वगैरे आले होते. त्या अनुभवाचा आनंद नसानसात already दौडत होता. तशातच मला काही दिवसांपूर्वी भावाबरोबर झालेले बोलणे आठवले. माझ्या माहेरी एक अतिशय पुरातन असे रामेश्वराचे मंदिर आहे. तिथे गेली दोन-तीन वर्षे त्रिपुरी पौर्णिमेला लेसर शो असतो असे त्याने सांगितले होते. मला या वर्षी मनापासून त्या अनुभवाचे साक्षीदार व्हायचे होते.  पण पतिदेवांना वेळ नव्हता आणि चिरंजीवांची शाळा. नवऱ्याचे (अर्थात काळजीपोटी ) मत - "तू बसने जा. जीवाला घोर नको आणि ड्राईव्ह करायचे असेल तर एखाद्या मैत्रिणीला घेऊन जा". पण मला मात्र स्वतः ड्राईव्ह करत जायचे होते आणि ते ही "एकटा जीव सदाशिव " छाप. (माझे माहेर १५० किमी लांब आहे घरापासून ) शेवटी गोडीगुलाबीने त्याची समजूत घालत आणि "दर तासाने तुला फोन करेन" या (अतिशय वाजवी आणि योग्य ) अटीवर माझे एकटीने जायचे ठरले. सकाळी सातला गाडी सुरु केली तेंव्हा सोबत होती ती नवऱ्याच्या शुभेच्छांची, त्याने ठेवलेल्या विश्वासाची आणि अतिशय उत्तम संगीत भरून दिलेल्या पेन ड्राईव्हची... मजल दरमजल करत सकाळी पावणेअकराच्या सुमारास सुखरूप माहेरी पोचले तेंव्हा दोन्ही घरच्या माणसांनी सुटकेचा निःश्वास टाकला. आणि माझ्या मनाची अवस्था कशी वर्णन करू बरं?? काहीतरी नवीन गवसले होते त्यादिवशी.. स्वतःतलेच...स्वतःलाच..!! जणूकाही पंख फुटले होते, आत्मानंदाचे, समाधानाचे..!!! 

तर ज्या अनुभवाच्या ओढीने मी माहेरी धाव घेतली होती  त्या लेसर शो मधले काही क्षण शेअर करत आहे इथे .. 









Wednesday, January 11, 2017

Here is to The Wall.. Mr. Dependable... Happy Birthday Rahul !!!

नमस्कार,

आज सकाळी पतिदेवांबरोबर "चाय पे चर्चा" करताना गाडी क्रिकेटवर आली. गेल्या पाव शतकापासून मी -असंख्य भारतीयांप्रमाणेच - क्रिकेटची उपासक आहे. आणि By cricket, I certainly don't mean 20-20, IPL, ICL etc. which is more of a business and an entertainment. (no offense intended). तर क्रिकेट म्हटलं की टेस्ट मॅचेस आणि फार तर ५० ओव्हरच्या traditional वन डेज हाच अतिशय जिव्हाळ्याचा विषय. आणि त्यातही क्रिकेट हा खेळण्यापेक्षा बोलण्याचाच विषय जास्ती असल्यामुळे प्रत्येक मॅचमध्ये official commentators च्या जोडीने आपली मते मांडतानाचीही मजा मनसोक्त अनुभवलेली. Tendulkar, Lara, Johnty Rhodes, McGrath, Warne, Murlidharan, या व अशा अनेक दिग्गजांविषयी बोलताना वेळ कसा जातो कळतही नाही.

या सर्वांमध्ये राहुल द्रविडचा खेळ ही मात्र माझ्या अगदी मर्मबंधातली ठेव आहे. रोजचे धकाधकीचे आयुष्य जगताना प्रत्येकाच्या मनाचा एक छोटासा कोपरा अगदी निकोप, अस्पर्श राहिलेला असतो. माझ्या मनाच्या त्या कोपऱ्यात ठेवलेल्या सुरेख पेटाऱ्यात इतर अनेक हळुवार आठवणींसोबतच द्रविडच्या असंख्य innings ची मोरपिसे जपून ठेवलेली आहेत. काय आनंद दिलाय हो या माणसाने ! Hamilton टेस्ट मधील १९० रन्स ची अविस्मरणीय खेळी असो, किंवा Australia मधील लक्ष्मण बरोबरील डोंगराएवढी भागीदारी. ते अतिशय प्रतिकूल वातावरणात सगळी दाने उलटी पडत असताना विकेट वर पहाडासारखे टिकून राहणे असो किंवा slip/forward short-leg मधील अशक्य catches. Dravid has been there for all the situations - Without creating a buzz about it. So composed, yet so determined. लोक त्याच्या देहबोलीबद्दल अनेक प्रकारची चर्चा आणि कुत्सित टीकाटिपण्णी करत असताना Matthew Hayden ने काढलेले उद्गार खरंच बोलके आणि द्रविडच्या महानतेची साक्ष पटवणारे. तो म्हणतो - " All this going around is not aggression. If you want to see aggression, look into Rahul Dravid's eyes.. "

मला वाटतं, in many ways, Rahul Dravid defines the true spirit of the game..!!

राहुल, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. We remain indebted forever to you.. for the joy of game, sportsmanship, and lots of memories to be cherished...!!!!!






Monday, January 9, 2017

La La Land.. The Musical Masterpiece of our times...

नमस्कार,

निमित्त आहे गोल्डन ग्लोब पुरस्कारांचे आणि त्यावर आपली मोहोर उठवणाऱ्या "La La Land" या चित्रपटाचे.

गेल्या वर्षी १६ डिसेंबरला हा चित्रपट पाहण्याचा योग आला. इथे भारतात त्याला (का कोण जाणे, पण) सेन्सॉरचे "ए" प्रमाणपत्र मिळालेले असल्यामुळे रीतसर सुट्टी टाकून आणि चिरंजीवांना शाळेत पाठवून मगच आम्ही दोघे चित्रपट पाहायला गेलो. पण परत येताना मात्र एका सुरेख संगीत मैफिलीला त्याला मुकावे लागले याचेच वाईट जास्त वाटले. कोणत्याही मोजमापाने हा चित्रपट  "A" या कॅटेगरीत मोडत नाही. खरं सांगायचं तर अशा चित्रपट-अनुभवांना सहकुटुंब जावे. त्यातील स्ट्रगल अनुभवावा. थोडावेळ स्वप्नांच्या दुनियेत वावरावे. आणि परत आपली स्वप्ने प्रत्यक्षात उतरलेली बघताना त्याच्याबरोबर थोड्याश्या अप्रिय अशा अटळ सत्याचाही समंजसपणे स्वीकार करावा...

एक नायिका बनण्यासाठी धडपड करणारी मुलगी मिया आणि अतिशय pure, original संगीत तयार करतानाच पोटापाण्यासाठी काही तडजोडी कराव्या लागणारा नायक सबॅस्टिअन. दोघांची स्वप्ने, एकमेकांना दिलेली साथ आणि मग पुढे काय होते या सगळ्याची साधी सरळ गोष्ट. या चित्रपटाचा आत्मा अर्थातच संगीत. प्रत्येक मूडला साजेसे. काही नोट्स तर इतक्या शुद्ध आणि काळजाला भिडणाऱ्या आहेत की they are still haunting me... त्यातही ती पियानोवरची विशिष्ट ट्यून सुरु झाली की अगदी खोलवर भिडते काहीतरी..

चित्रपटाचा नायक रायन गोसलिंग आणि नायिका एमा स्टोन या संगीताची उत्तम जाण असलेल्या जोडीने नृत्यातही कमाल केली आहे. या जोडीचा हा तिसरा चित्रपट. त्यामुळे त्यांच्यामधील comfort level अप्रतिम. एकूणच या चित्रपटाचे presentation आपल्याला वेगळ्याच जगात घेऊन जाते. शुद्ध काही जीवघेणे... असेच वर्णन करावे लागेल या सांगीतिकेचे. एकदा तरी जरूर घ्यावा असा हा सुरेख अनुभव... !!

या चित्रपटाला Oscars किती मिळतात ते लवकरच कळेल :). तोपर्यंत YouTube वरील हे साउंडट्रॅक नक्की अनुभवावेत असेच ....!!!


City of Stars

Another Day of Sun

Planetarium

Epilogue



Thursday, January 5, 2017

So long, 2016... Welcome 2017. Happy New Year...!!!

नमस्कार,

माझ्या चिमूटभर वाचकांना नवीन वर्षाच्या खूप शुभेच्छा.

मागे वळून पाहताना गतवर्षाने ओंजळीत टाकलेले अनेक सुखद क्षण आठवत आहेत. केलेले असंख्य पदार्थ, कॉलेज मधील मैत्रिणीची झालेली पुनर्भेट व कसलेल्या मैत्रीच्या रेशीमगाठी, एकटीनेच मनपसंत गाणी ऐकत, रस्ते न्याहाळत , माहेरपर्यंत अनुभवलेली लॉंग ड्राईव्ह, झपाटून केलेले काम, मिळालेली बक्षिसे व प्रमोशन, लग्नसोहळे, आणि मॅरेथॉनसुद्धा. "किती घेशील दो करांने" अशीच काहीशी अवस्था झाली आहे. कृतज्ञता वाटत आहे - सर्व नात्यांबद्दल ज्यांनी प्रेम दिले, आधार दिला, आत्मविश्वास दिला, आणि वेळप्रसंगी कानउघडणीही केली. असेच आनंदाचे दान सर्वांच्या पदरी पडो हीच निसर्गाकडे प्रार्थना .... नवीन वर्षात जरा जास्त लिहिते होण्याचा संकल्प केला आहे. त्याची पूर्तता येणारा काळ ठरवेलच, तोपर्यंत शुभं भवतु ....!!!!!












Sunday, November 13, 2016

Pinkathon.. A Run with a Cause..

नमस्कार,

जनरली रविवार म्हटले की डोळ्यासमोर शुद्ध आराम आणि शून्य काम असे सुट्टीचे चित्र उभे राहते. पण आजचा रविवार समस्त पुणेकरांसाठी (खास करून महिलावर्गासाठी) अगदी वेगळा उगवला होता. निमित्त होते मिलिंद सोमण गेली तीन वर्षे यशस्वीपणे ऑर्गनाईझ करत असलेल्या "Pinkathon" या मॅरेथॉनचे.

कालचा शनिवार हा रविवार पहाटे दीड पर्यंत लांबला होता. "वजनदार" हा मस्त फील गुड चित्रपट, त्यानंतर निवांतपणे झालेले मनपसंद डिनर आणि हे कमी म्हणून की काय, मला लागलेले जिलेबी-रबडीचे डोहाळे (!!!) पुरवण्यासाठी नवरोजींनी रात्री बारा पर्यंत केलेली मॅरेथॉन गाडी-पीट ! (इतके करूनही शेवटी गुलाबजाम-रबडीवर समाधान मानावे लागले तो भाग अलहिदा.) घरी साडेबाराला पोचल्यावरही चिरंजीव टक्क जागे असल्यामुळे त्यांच्याबरोबर टिवल्याबावल्या करण्यात रात्रीचा दीड वाजला. त्यावेळी पावणेपाचचा गजर लावताना अगदी जीवावर आले होते. गजर प्रामाणिकपणे वाजल्यावर "आता ह्याचा गळा घोटावा का?" असा क्रूर विचारही एक क्षण मनात येऊन गेला. पण अशा मोहाच्या क्षणांवर विजय मिळवला तर अमर्याद आनंदप्राप्ती होते अशी काहीशी स्वरचित (किंवा दुसऱ्या कोणाचीही, doesn't matter) सुभाषिते आळवत निमूटपणे स्वतःचे आवरून माझ्या सखिलाही जागे केले आणि महत्प्रयासाने पहिला गिअर टाकला.  साडेपाचला ग्राउंडवर पोचले तर वाहनांची तोबा गर्दी झाली होती. थोड्या लांब एका बोळात गाडी कशीबशी घुसवली आणि पार्किंग मिळाल्यावर स्वर्गाचे तिकीट मिळाल्याच्या आनंदात मुख्य व्हेन्यूकडे जायला निघाले.


एखाद्या समारंभाला आल्यासारख्या नटून-थटून, आणि पळण्याची जय्यत तयारी करून आलेल्या ललना, चिमुरड्या आणि आजीबाई पाहिल्यावर अंगात उत्साह न संचारता तरंच नवल. त्यातील कित्येकांची ही पहिलीच मॅरेथॉन होती. सगळ्या वातावरणातच  Pinkathon चे गारुड भरून राहिले होते. प्रत्यक्ष रेस जरी सातच्या आसपास सुरु होत असल्या तरी आधीचा तासभर झुम्बा आणि वॉर्म अप. स्टेज वर झुंबा करणारे कलाकार रबराचे बनले असल्यागत अविरत थिरकत होते. त्यांच्या स्टेप्सशी मॅच करताना आमच्यासारख्या पामर वृद्धांची तारांबळ उडत होती. पण कोणीही आपल्याला बघत नाहीये, जज्ज करत नाहीये, आणि सर्वजण स्वतःतच रममाण झालेत, हे पाहून मनसोक्त नाचून घेतले. स्वतःला मोकळे करण्यासारखा दुसरा आनंद नाही हे खरे. प्रत्यक्ष रनिंग ३ किमी चे असले तरी एकूण चालणे/धावणे झाले ९ किमी इतका IISER चा कॅम्पस भव्य आहे. माझ्यासारख्या असंख्य जणींची रेस होती स्वतःशीच. स्वतःला आजमावण्यासाठीच. आपण हे करू शकतो या जाणीवेची शिदोरी जमवण्यासाठी. रेस संपल्यावर "Yes, I did it !!" हा क्षण किती सुखद असतो नं?


गेली तीन वर्षे मिलिंद सोमण हे गुणी व्यक्तिमत्व या मॅरेथॉनच्या माध्यमातून brest cancer विषयी जागृती करत आहे. एकंदरीतच निरोगी जीवनशैलीचा व्यायाम हा किती महत्वाचा भाग आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न करत आहे. तीन वर्षांपूर्वी त्यांनी रुजवलेल्या कल्पनेचा आता वटवृक्ष झाला आहे. Pinkathon ही केवळ स्पर्धा नं राहता तो एक ब्रॅन्ड झाला आहे. पुढील वर्षी  मी ५ किमी धावण्याचा संकल्प केला आहे. तोपर्यंत See you Pinkathon !!!




Friday, August 5, 2016

Worries, Weight-Issues, Waste-in-brain??... Just Walk Them Off !!! :)

  नमस्कार,

गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने कहर केलाय. अनेक दुर्घटना घडतायत आणि मन खंतावतंय. आपण काही करू शकत नाही आणि तरीही वाईट वाटतंच... असो.

गेले दोन तीन दिवस पावसामुळे बाहेरच पडावेसे वाटत नव्हते. त्यात सिझनल आजारपणामुळे घ्याव्या लागलेल्या अँटीबायोटिक्सनी पोटात धुडगूस घातलाय. खावेसे वाटतेय पण ऍसिडिटी होतेय, झोप येतेय, काम होत नाहीये, ऑफिसला जाता येत नाहीये आणि व्यायाम तर मागच्या जन्मीच केला होता बहुतेक... चिडचिड होतेय.

शेवटी आज, घरातल्या दोन मुलांना शाळा आणि कामावर धाडून , मनाचा हिय्या करून बाहेर पडले. जोरदार पाऊस, वारा, आजारपण या कशाचीही पर्वा नं करता. ठरवलेच होते, जमेल तेवढे चालायचे. एक पाऊल आणि मग दुसरे ... स्वतःतून बाहेर पडून, डोळे उघडे ठेऊन फक्त माणसे अनुभवायची ....

ती पहा, एक कन्या, बाईकवर स्वार होऊन एका फळ-विक्रेत्यांशी सुमारे पावणेदोन रुपयांसाठी पाच मिनिटे हुज्जत घालत आहे. पै पै वाचवून संसार करणाऱ्या त्या मातामाऊलीला माझा साष्टांग दंडवत !!

थोडे पुढे गेल्यावर ते पहा एक आजोबा.. गेल्या सव्वापस्तीस वर्षांचा सकाळी चालण्याचा दिनक्रम चुकू नये म्हणून आजही बाहेर पडले आहेत. एका हातात मेथीसदृश्य भाजीची पिशवी, छत्री आणि दुसऱ्या हातात?  अगदी बरोबर - पुण्याचा जगप्रसिद्ध "सकाळ" पेपर. :) तमाम पुणेकरांना चहाबरोबर सकाळ लागतोच. सर्व गोष्टींचा तोल सांभाळताना आजोबांच्या हातातून सकाळ निसटतो. कोणीतरी पटकन पुढे होऊन त्यांना तो उचलून देते पण तोपर्यंत पेपरमधील सर्व बातम्या "पाण्यात " गेलेल्या असतात. आता आजोबाना बहुदा इस्री मारून पेपर वाचावा लागणार !

अरेच्या, हा रेनकोट काय बरं करतोय रस्त्यावर?? अच्छा, आतमध्ये एक दप्तर पण आहे वाटतं ! आणि त्या दप्तराच्या ओझ्याआड एक १२-१५ किलोचा गुंडगोळा पण. चेहेऱ्यावर शुद्ध नाईलाज घेऊन ते पोरं शाळेत नेणाऱ्या बसची वाट बघत उभं आहे. "दप्तर फेकून द्यावे, रेनकोट काढून टाकावा, आणि पावसात मनसोक्त (आईने एक धपाटा देईपर्यंत तरी ) हुंदडावे " या त्याच्या मनातील भावना त्याच्या चेहेऱ्यावर अगदी स्पष्ट वाचता येत आहेत. बच्चमजी, आज तरी  तुम्ही जात्यात आणि (मला ऑफिसला जायचे नसल्यामुळे) मी सुपात बरं का !! त्याला टुकटुक करण्याची उर्मी मनात दाबून ठेवत मी गार वारा आणि श्रावणसरी पुन्हा अनुभवायला लागते.

सुमारे एक तास आणि पाच किलोमीटर अंतर पार करून मी घरी येते तेंव्हा आरशातली मी कोणीतरी वेगळीच असते. अनेक चिंता, कटकटी, त्रागा, कशा कशाचा लवलेशही नसतो. तुम्ही अनुभवलंय असे काही ???












Thursday, July 21, 2016

Zootopia... Anyone can be Anything !!!

नमस्कार,

गेली दोन तीन वर्षे आमच्या कुटुंबाचा (मी, पतिदेव, व चिरंजीव ) एक रिवाज ठरून गेलाय जसा काही. वीकेंड्स ना जर दूरवर फिरायला जायचे नसले तर सरळ एखादा 'पिक्चर टाकायचा'. म्हणजे अतिरेकी चिकित्सा नं करता मनाचा कौल घेऊन निघायचे. शक्यतो पाटी कोरी ठेऊन. आणि गंमत म्हणजे बऱ्याच वेळेला चांगलाच अनुभव येतो. त्यात पुत्ररत्न जसजसे मोठे होत आहे तसतसे त्याचे मत हे 'भरतवाक्य' होत आहे. पर्यायाने गेल्या काही वर्षातले जवळपास सर्व ऍनिमेशन चित्रपट बघून झाले आहेत. त्यातले एक-दोन तर फ्रेम- टू-फ्रेम पाठ झाले आहेत. पण खरं सांगू का? सुरुवातीला 'काय ते लहान मुलांचे चित्रपट बघायचे? ' अशी कुरकुर करणारे आम्ही आता 'मोठ्या माणसांच्या बऱ्याच वेळेला अर्थहीन (आणि बिनडोक)चित्रपटांपेक्षा लहान मुलांचे निर्व्याज आनंदी चित्रपट खूप चांगले' अशा मताचे झालो आहोत. त्यात ते 3D असले तर दुधात साखर. :)

या मांदियाळीतला मला सर्वांत आवडलेला चित्रपट - Zootopia .. .!!  Rotten Tomatoes वर 90 % पेक्षा जास्त positive reviews मिळालेला, आणि जाणकारांच्या मते Disney चा २० वर्षांतील सर्वात सुंदर चित्रपट. अर्थात हे नंबर्स मला चित्रपटाविषयी अधिक माहिती मिळवताना कळले बरं का ! चित्रपट बघायला जाताना नेहेमीप्रमाणेच पूर्णपणे अज्ञातात उडी घेतली होती. आणि काय सांगू महाराज, पहिल्या फ्रेम पासूनच चित्रपटाने मनाचा असा ठाव घेतला की ज्याचे नाव ते. लहानांना आवडणारे आणि मोठ्यांसाठीही अतिशय प्रेरणादायी ठरतील अशा चित्रपटांमध्ये झूटोपियाचे नाव नक्की घेतले जाईल यात शंका नाही.

एक आटपाट नगर - झूटोपिया. तिथे सगळे प्राणी गुण्यागोविंदाने नांदत आहेत. त्या नगरातलाच एक गुणी ससा (की मिस. ससा : ) ) तिचे स्वप्न आहे पोलीस ऑफिसर व्हायचे. त्याप्रमाणे अपार कष्ट करून ती आपले ध्येय साध्य करते. मग तिची नेमणूक शहराच्या मध्यभागी असलेल्या सिटी सेंटर या भागात होते. त्या शहराचा पोलीस मुख्यायुक्त चीफ बोगो याच्यासमोर १४ बेपत्ता झालेल्या प्राण्यांचा प्रश्न आ वासून उभा आहे. विशेष म्हणजे हे सर्व प्राणी भक्षक वर्गातले आहेत. भवती नं भवति करत ह्या केसची थोडीशी जबाबदारी ज्युडी कडे (ससा) येऊन पडते. या केसवर काम करताना तिला प्राण्यांचे जे असंख्य मुखवटे आणि मुखवट्यामागील चेहरे दिसतात त्या सगळ्याची गोष्ट म्हणजे हा नितांतसुंदर चित्रपट. थिएटर मध्ये दोन वेळा बघूनही समाधान नं झाल्यामुळे त्याची डीव्हीडी विकत घेऊन टाकली आहे आणि तीसुद्धा तीन चार वेळा बघून झाली आहे.
या चित्रपटातली सर्वच पात्रे - Nick Wilde, Judy Hopps, Chief Bogo, Clawhauser, Mr. Big, Finnick, Flash, Gazelle - अगदी प्रेमात पडावे अशी आहेत. प्रत्येकाचं असं एक वैशिष्टय आहे.  ते इथे सांगून चित्रपटातली मजा घालवायची नाही मला अर्थात. या चित्रपटाचे Animation आणि Voice over चा मात्र आवर्जून उल्लेख करावासा वाटतो. या चित्रपटाचे सार शकीराने गायलेल्या गाण्यात आहे - 

I messed up tonight
I lost another fight
I still mess up but I'll just start again
I keep falling down
I keep on hitting the ground
I always get up now to see what's next
Birds don't just fly
They fall down and get up
Nobody learns without getting it wrong

I won’t give up, no I won’t give in
Till I reach the end
And then I’ll start again
Though I’m on the lead
I wanna try everything
I wanna try even though I could fail

नक्की बघा हा चित्रपट. आपण काहीही करू शकतो असा आत्मविश्वास अंगी रुजवण्यासाठी.... !!!!






Friday, July 15, 2016

पाऊले चालती...

नमस्कार,

पावसाळा म्हटला की आषाढ-श्रावण हीच जोडगोळी जास्त आठवते. त्यात श्रावणाचे पारडे अनेकविध भावगीतांमुळे जड वाटत असले तरी आषाढाचा एक वेगळा रुबाब आहे. गुरुपौर्णिमा, दिवली अमावस्या, कांदेनवमी आणि "बडा ख्याल" म्हणजे आजची आषाढी एकादशी.

वर्षभर कोणतीही व्रतवैकल्ये नं पाळणारे कितीतरी जणही आषाढी एकादशीचा उपास आवर्जून पाळतात. घराघरात all time hit खिचडी, रताळ्याचा किस, मिठाई, वरीतांदूळ, दाण्यांची आमटी, भोपळ्याचे भरीत, काकढीची कोशिंबीर असे अनेक चविष्ट बेत शिजत असतात. जिकडे ऐकावे तिकडे संतांचे अभंग कानावर पडत असतात.

तिकडे पंढरपुरात तर चंद्रभागेला पूर आलेला असतो.   "मेळा गोपाळांचा" डाव मांडलेला असतो. लाखो वारकरी विठ्ठलाच्या दर्शनासाठी आसुसलेले असतात. आणि तो सावळा विठुराया विटेवर उभा राहून हे सर्व न्याहळत असतो. त्याचे दर्शन हे कित्येकांसाठी आयुष्यभराचे समाधान असते.

मी "देव देव" पंथातली किंवा उपास तपास पाळणारी नव्हे हं. पण या वेळी जो अनुभव आला तो आवर्जून शेअर करावासा वाटला. तो अनुभव होता माणसांच्या प्राणशक्तीचा, त्यांच्या झपाटलेपणाचा, त्यांच्या देह धर्म विसरायला लावणाऱ्या भाबड्या श्रद्धेचा.

दिवस २९ जून. पुण्यात वारीचे आगमन होणार होते. माझे ऑफिस येरवड्यात आळंदीकडे जाणाऱ्या रस्त्यावरच आहे, त्यामुळे आधीच ऑफिस कडून खबरदारीच्या, वारीचा मार्ग वर्णन करणाऱ्या मेल्स आल्या
होत्या. माझ्या टीम मधील जवळपास सर्वजण work from home करत होते. आमचे नवरोजी आणि चिरंजीवही सुखेनैव घरी बसले होते. पण त्या दिवशी का कोण जाणे, मी ऑफिस ला आले. माझ्या टीम मधील एकमेव उपस्थित colleague मला लवकर घरी जायचा सल्ला देत होता.   त्याप्रमाणे माझा कॉल संपवून मी सव्वादोनच्या सुमारास घरी जायला निघाले. रस्त्यावर आल्यावर जाणवले की जवळपास सगळे मार्ग गाड्यांसाठी बंद आहेत. कोणत्याही मार्गावरून गेले की वारकऱ्यांचा जत्था नजरेस पडे आणि माझी गाडी त्याच स्पीडमध्ये जात होती. जणू मी सुद्धा वारीबरोबर चालले आहे. भवति नं भवति करत सव्वाचारच्या सुमारास (बरोबर दोन तासांनी) पुन्हा ऑफिस मध्ये आले. काही खाऊन घेतले आणि साडेचारला पुन्हा प्रयत्न करू म्हणून बाहेर पडले. माणसांची संख्या दहा पट झाली होती. कोणत्याही रस्त्यावरून बाहेर पडायचा प्रयत्न केला तरी शेवटी तो बंद होत होता. त्यात माझे पुण्यातील रस्त्यांचे ज्ञान अगाध आहे.  थोडा वेळ स्वतःवर आणि वातावरणावर चिडचिडून झाल्यावर शेवटी मानाने परिस्थितीचा स्वीकार केला आणि मग नकळतच वैतागाचें रूपांतर कुतूहलात झाले. स्वतःमधून बाहेर पडून आजूबाजूला बघायला लागले. काय चैतन्य भरले होते वातावरणात... अक्षरशः भारावून गेले. ती अपरिमित एनर्जी गाडीच्या बंद काचांमधूनही येऊन खोलवर भिडत होती. हजारो लोक एक अपरिचित ओढीने डोक्यावर तुळस किंवा विठ्ठल-रखुमाईच्या मूर्ती घेऊन चालत होते. काहीजण अभंग म्हणत चालले होते. सर्वांचे चेहरे प्रसन्न, तृप्त,.. कसली तक्रार नाही की वखवख नाही. एक माणूस घराच्या अंगणात उभे राहून सर्व वारकऱ्यांना चहाचे आमंत्रण अगदी आग्रहाने देत होता. सर्वजण एकमेकांना नमस्कार करत होते आणि पुन्हा मार्गस्थ होत होते. हजारो गाड्यांमध्ये अडकलेली माझीही एक आणि बाजूने लाखो माणसांचा समुदाय चाललेला. त्या energy चे गारुड इतके होते की क्षणभर "गाडी इथेच ठेऊन या सर्वांबरोबर चालत राहावे" अशी आंतरिक उर्मी दाटून आली. त्याक्षणी मला सच्च्या वारकऱ्यांची तळमळ मनापासून जाणवली व भिडली.

शेवटी साडेनऊला (बरोबर ५ तासांनी) घरी पोचले तेंव्हा घरच्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. नवऱ्याने डिवचलेही - जाशील आता पुन्हा या दिवशी ऑफिस ला? मी हसून वेळ साजरी केली. कदाचित नाही जाणार... पण या दिवसाचे दान कसे व्यक्त करू शब्दात?? ऑफिस ला जाण्याच्या निर्णयाचा पश्चताप होतोय? - त्रिवार नाही.... !!!
कारण माणसातला विठ्ठल मला दिसला की हो त्या दिवशी .... !!!

सर्वाना आषाढीच्या मनापासून शुभेच्छा....!!!!!
























गोंधळलेले बटाटे 😀

 साधारण ९ वर्षांनी फिरकले आहे स्वतःच्या ब्लॉग वर. म्हणजे बाकी प्रोफेशनल प्लॅटफॉर्म्स वर लिखाण चालू होते पण मातृभाषेतल्या लिखाणाची मजा वेगळीच...