Sunday, April 12, 2015

एक छोटेसे पाऊल.. आयुष्य घडविण्यासाठी

नमस्कार,

तुम्ही Leo Babauta हे नाव ऐकले आहे का? माणूस ठरवले तर किती स्वतःमध्ये किती बदल घडवू शकतो याचे हा अवलिया एक उत्तम उदाहरण आहे. त्याच्या अतिशय सुंदर ब्लॉगची लिंक खाली देत आहे.

http://zenhabits.net/

लिओ अगदी जगावेगळे सांगतो असे नाही, पण त्याची शैली विलक्षण आहे हे नक्की. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे त्यातल्या बऱ्याच समस्यांशी आपण अगदी सहजपणे रिलेट होतो. आणि म्हणून लिओ त्या समस्यांवर काय काय साधे सोपे मार्ग सुचवतोय ह्याचा मागोवा आपण नकळतपणे घेत राहतो.

एक पस्तिशीचा मनुष्य. chain smoker, overweight,  पदरी सहा मुले. आर्थिक परिस्थिती इतकी हलाखीची की काही वेळा मुलांच्याच piggy bank मधून थोडेसे पैसे घेऊन  जेवणाची सोय करायची. आयुष्य बदलायचे इतक्या प्रकारे प्रयत्न करून झाले तरीही अपयश हे ठरलेलेच.

एके दिवशी "हे सर्व बदललेच पाहिजे - यश मिळालेच पाहिजे " ह्या ध्यासाने अंतरंगात  तटस्थपणे डोकावून पाहिले असता अचानक लक्षात आले की  - "अरे, आपण खूप सारे प्रयत्न अनेक दिशांनी करत आहोत, पण त्यामध्ये फोकस चा अभाव आहे. स्वतःमधल्या बदलाची सुरुवात ही फक्त एका छोट्या गोष्टीपासून सुरु करायला हवी. ती सवय अंगी बाणली की मगच दुसऱ्या मुद्याकडे वळायचे. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे  पडणारे  प्रत्येक पाऊल मनापासून जगायचे. "

मग काय, एका शांत आणि निश्चिंत प्रवासाला सुरुवात झाली. पहिला संकल्प होता धूम्रपान सोडायचा. एकच संकल्प पहिल्या वर्षी, पण सगळे प्रयत्न त्या दिशेने एकवटलेले. वर्षभराने लक्षात आले की आपण १०० टक्के यशस्वी झालो आहोत. मग दुसरा संकल्प.. या माणसाने काय काय achieve केले आहे ते त्याच्या ब्लॉगवर वाचायला मिळेलच तुम्हाला. पण नक्की वाचा कधीतरी.. त्याचे सगळे लेख सावकाशीने वाचा. ठरवले, आणि फक्त एकच निश्चयाने भरलेले पाऊल पुढे टाकले तर आयुष्याला मनासारखा आकार येत जातो यावर नक्की विश्वास बसेल तुमचा.

 

Saturday, April 11, 2015

आठवणींचा डीप फ्रीझर ..

नमस्कार,

थोडे चक्रमच वाटतेय का शीर्षक? आहे खरे. पण त्याहूनही मजेची गोष्ट ही आहे की आपल्या सगळ्यांच्याच घरात आजकाल ही वस्तू येऊ घातली आहे. काही घरांमध्ये तर दुर्दैवाने ती आयुष्याचा अगदी अविभाज्य भाग बनली आहे. म्हणून विचार केला की  व्यक्त होऊयाच जरा ..

आज चिरंजीवांच्या शाळेत एक कार्यक्रम होता - Graduation Day. गैरसमज नको. आमचे बाळ आता कुठे पहिलीत गेले आहे. पण आजकाल upper KG साठीही पदवीदान समारंभ होतो. :) तर हा कार्यक्रम जवळपास दोन तास चालला होता. ४/५ वर्षांची बछडी अगदी धिटुकलेपणाने काहीबाही सदर करत होती. आणि मुलांचे आईवडील दुप्पट उत्साहाने या प्रसंगाचे चित्रीकरण करत होते. आणि आपल्या पाल्याचा कार्यक्रम झाला की  पुन्हा मोबाईलमध्ये रममाण होत होते.

मला अशा प्रकारांची एकूणच मजा वाटते आजकाल. म्हणजे फोटो काढणे या प्रकाराला विरोध नाही हं माझा. काही महत्वपूर्ण क्षण कॅमेऱ्यात बंदिस्त करून अजरामर करणे ही नक्कीच आनंददायी गोष्ट आहे. पण शिंका आल्यासारखे, अगदी आततायीपणाने आणि "फोटो काढणे is a norm, and hence must" अशा अविर्भावात फोटो काढणे हे कितपत समाधान देणारे असेल याविषयी मला अगदी प्रामाणिक शंका आहे. आणि आताचा क्षण ओरबाडल्यासारखा मुठीत पकडून शिळा करायचा, आठवणींच्या डीप फ्रीझर मध्ये ठेवायचा- जवळपास कधीही न बाहेर काढण्यासाठी - या प्रकारात त्या गोष्टीची सगळी मजाच आपण घालवून टाकतो असे नाही वाटत तुम्हाला?

कशाच्या मागे धावतोय नक्की आपण.. why are we forgetting to eat fresh from the farm, and constantly re-heating the things which have lost their aatma?...

तुम्ही Antoine De Saint चे "The Little Prince" पुस्तक वाचलेय का? त्यामध्ये  तो प्रिन्स एके ठिकाणी म्हणतो - If I had fifty-three minutes time to spend as I liked, I should walk at my leisure toward a spring of fresh water."

आताचा क्षण उद्या, परवा कधीतरी जगू म्हणून शिलकीत ठेऊन द्यायचा, आणि उद्या, परवाही तेच करायचे… शेवटी उरते ते सत्वहीन, भकास रिकामेपण. खूप खूप negative वाटतेय का? असेल कदाचित. पण थोडा विचार करायला काय हरकत आहे.

डीप फ्रीझर ही सोय नक्कीच आहे पण काही वेळा तरी ताजे गरमागरम अन्न घेऊया. आला क्षण पूर्णपणे अनुभवत जगूया. काय म्हणताय ?

 

Thursday, April 9, 2015

Dale Chihuly: इस शीशे पे दिल आ गया…

नमस्कार,

बरोबर दीड वर्षाने पुन्हा एकदा ब्लॉगकडे फिरकले आहे. :) आता थोडा नियमितपणा आणिन म्हणतेय लिखाणात. बघू या कसे जमते ते.

तर, निमित्त झाले एका नवीन YouTube video चे.

थोडा वेळ होता लंच ब्रेक मध्ये तर online लोकप्रभा अंक चाळत बसले होते. त्यात श्री. अमित सामंत यांचा एक लेख वाचनात आला. लेखाचे नाव होते - काचेचे गाव. त्यात त्यांनी न्यूयॉर्क मधील एका काचेच्या museum चा उल्लेख केला होता. त्यात असलेले fern green tower चे १५ फुटी काचशिल्प पाहून उत्सुकता चाळवली. वाचताना कळले की हे Dale Chihuly या जगद्विख्यात कलाकाराचे शिल्प आहे. मग काय, लगेच YouTube शोधले. खाली दिलेली लिंक जरूर बघा. काचेच्या तुकड्यांमध्ये हा अवलिया असे काही भ्रम करतोय की  ज्याचे नाव ते. निव्वळ अप्रतिम.

https://www.youtube.com/watch?v=OndIFim3w0I

खाली वानगीदाखल त्याच्या काही कलाकृती टाकत आहे- इंटरनेट वरून मिळालेल्या अर्थात !



आणि हा त्यांचा जनक -  Dale Chihuly !!




 

Tuesday, October 22, 2013

World Cinema Special: To Rome With Love (Italian, American)

अनेक महिन्यांच्या सुट्टीनंतर पुन्हा एकदा माझ्या चिमुटभर वाचकांच्या सेवेस  हजर झाले आहे. या वेळेचा चित्रपट मात्र एकदम हलकाफुलका निवडला आहे.

खरेतर मला आणि आमच्या 'अहो' ना  (:) ) सशक्त कथाबीज असलेले चित्रपट मनापासून आवडतात. म्हणजे चित्रपट बघायचा दोन/तीन तास आणि त्याच्यावर चर्चा मात्र अनेक दिवस करायची असा आमचा शिरस्ता. पण काही चित्रपट मात्र केवळ बघायचे असतात. म्हणजे भलेही त्यांची कथा खिळवून ठेवणारी नसेल, किंवा त्यांच्यामध्ये "ज्यांच्या केवळ अस्तित्वाने पडदा धन्य होतो" अशी तगडी कलाकारांची फौजही नसेल, पण तरीही सिनेमा सुरु झाला की "आपण एका जागी स्थिर नसून कुठेतरी भटकत आहोत अशी काहीशी जाणीव होते. एखाद्या शहराच्या अनवट जागा ओळखीच्या वाटू लागतात. थोड्या वेळापुरते का होईना पण "मन पाखरू पाखरू" होते. आणि चित्रपट संपल्यावर आपण काय पहिले आहे हे विस्मृतीतही जाते. चित्रपटाचा काळ मात्र आपण मनापासून जगलेलो असतो. आजचा चित्रपट To Rome With Love हाही  याच पठडीतला.

घरबसल्या इटलीतील रोममध्ये फिरून यायचे असेल तर हा चित्रपट एक उत्तम पर्याय आहे. यामध्ये रोम शहर हेच मध्यवर्ती पात्र. त्यामध्ये वावरणारी अनेक माणसे. काही शहरातील तर काही बाहेरची. आपण तो कोलाहल बघत असतानाच हळूहळू त्यातले सूर प्रेक्षकाला सापडू लागतात. काही पात्रे ठळक होऊ लागतात. त्यांच्या गोष्टी आपल्याला उमगू लागतात.

एक सामान्य माणूस ज्याला एके दिवशी सकाळी अचानक तो 'celebrity' झाला आहे असे जाणवते, एक असे जोडपे जे हनिमूनला आले आहे आणि त्यांची चुकामुक झाली आहे, एक अंत्यविधीचे साहित्य पुरवणारा माणूस जो अतिशय चांगला bathroom singer आहे, आणि एक architect जो भूतकाळात हरवून जाण्यासाठी रोममधील जुन्या गल्ल्यांमध्ये फिरत आहे - अशा चार वेगळ्या माणसांच्या मजेशीर गोष्टी म्हणजे हा चित्रपट. कथानक म्हटले तर इतकेच. तरीही वरील माणसांच्या आयुष्यात पुढे काय घडणार आहे हे आपण उत्सुकतेने पाहत राहतो.

प्रथितयश अमेरिकन actor आणि director Woody Allen यांची ही  कलाकृती. चित्रपट नाही  पाहिला तर खूप काही गमवाल असे नाही, पण बघितलात तर निखळ आनंदाचे चार क्षण ओंजळीत नक्की पडतील.

Thursday, July 4, 2013

World Cinema Special: Something Like Happiness (Czech)

नावच किती समर्पक आहे ना - Something Like Happiness...म्हणजे काहीतरी आनंदासारखे वाटणारे. काय आहे ते नक्की नाही माहित पण चांगले वाटतेय काहीतरी आतून.

Rules - प्यार का सुपरहिट फॉर्मुला या फारश्या न गाजलेल्या चित्रपटात नायिकेच्या तोंडी एक वाक्य आहे-  "ख़ुशी का क्या पता, ना जाने कब और कंहा मिल जाये … "

Happiness - निखळ, निर्व्याज आनंद. नक्की कुठे हो मिळतो? कसा असतो तो? आणि किती शाश्वत? म्हणजे मी काही मोठी तत्ववेत्ती नव्हे, पण गम्मत बघा हं, एखादी अतिशय प्रिय वस्तू, एखादा मनापासून आवडणारा खाद्यपदार्थ, एखादे भावलेले गाणे, एखादा रिझवणारा चित्रपट या सर्व गोष्टीही दरवेळी सारखाच आनंद देतात का हो? तर नाही. बहुतांश वेळा ते आजूबाजूच्या आणि आपल्या मनाच्या अवस्थेवर अवलंबून असते. एखादी मनपसंत गजल आपल्या जीवलगांच्या संगतीत खुलते, तर एकटेच असताना अस्वस्थ करते. म्हणजे असेच तुमच्याही बाबतीत होत असेल असे नाही हं, पण थोडक्यात काय, तर प्रत्येकाचा, प्रत्येक क्षणीचा आनंद निराळा आणि तो अनुभवण्याची रीतही निराळी. काहीसे असेच सांगायचा प्रयत्न करतो हा चित्रपट.

कोणतेही तत्वज्ञान नाही, काहीतरी वेगळे सांगितल्याचा अभिनिवेश नाही किंवा कोणत्याही मोठ्या व्यक्तीचे चरित्र नाही. आहेत ती  तुमच्या आमच्यासारखी साधी माणसे.
तीन व्यक्तींची ही गोष्ट - मोनिका, टोनिक, आणि दाशा. एकाच परिसरात वाढलेली तीन मुले. त्यापैकी मोनिकाचे स्वप्न आपल्या प्रियकराबरोबर अमेरिकेला जाण्याचे, टोनिक  मनोमन मोनिकावर प्रेम करणारा तर single mother असलेली दाशा  एका विवाहित पुरुषात गुंतलेली. वास्तवापासून फारकत घेतलेली. पुढे तिचा मनोविकार इतका बळावतो की तिला रुग्णालयात ठेवावे लागते व तिच्या मुलांची जबाबदारी येउन पडते मोनिका व टोनिकवर.
हे असे जगावेगळे कुटुंब आणि त्यांचे एकमेकांमधील bonds.. या सगळ्याची कथा म्हणजे हा चित्रपट.
स्टोरी म्हणावी तर इतकीच. पण आपण या कुटुंबात गुंतत जातो. आणि आपल्याला जाणवते की अरेच्या, आनंद हा असा चोरपावलांनी येतो तर… कोणतीही अपेक्षा नसताना, अचानक.
हेच आयुष्य नव्हे काय? मला असे नाही म्हणायचे की अपेक्षाच नाही ठेवायच्या आयुष्याकडून, पण आठवून पहा जरा, ध्यानीमनी नसताना भेटलेली जीवाभावाची माणसे, अतिशय गरम होत असताना वाऱ्याची आलेली थंडगार झुळुक, दिवसभराच्या कटकटीनंतर आपल्या बाळाने मारलेली मिठी… ही आणि अशी कितीतरी उदाहरणे. पु. लं. च्या भाषेत सांगायचे म्हणजे सहज घराबाहेर पडावे, आकाशाकडे लक्ष जावे आणि ती असावी कोजागिरी पौर्णिमा.. असा सहज मिळालेला निरागस आनंद. किंवा त्यासारखे काहीतरी - Something Like Happiness.... !!

शेवटी खूप दुखः जसे निशब्द तसाच अतिव आनंद हाही तितकाच शब्दांच्या पलिकडला ….  !!!


Thursday, June 20, 2013

World Cinema Special: A Touch of Spice (Greek)

गेले अनेक दिवस प्रचंड धावपळीत घालवल्यावर अचानक जाणवले की  अरे, आपण एक ब्लॉग लिहितो जो गेले सहा महिने अगदी दुर्लक्षित आहे. :( आणि त्याच्यावर काहीतरी छानसे सुरु करून आपण तसेच सोडून दिले आहे. तेंव्हा सर्वप्रथम माझे चिमूटभर वाचक मला माफ करतील अशी अपेक्षा करते.

आज मी ज्या सिनेमाबद्दल लिहिणार आहे तो आहे A Touch of Spice हा ग्रीक सिनेमा. २०१२ च्या एप्रिल महिन्यात पुण्यातील NFAI, FTII, आणि BCL यांच्या संयुक्त प्रयत्नाने भरविल्या गेलेल्या Europian Film Festival मध्ये हा सिनेमा दाखवण्यात आला होता.

आता ग्रीस म्हटले की लगेच आपल्याला Aristotle, Pythagoras, Archimedes, Plato अशा अनेक प्रभृती आठवतात ज्यांचे Physics आणि विशेषतः Astronomy या विषयांमधील कार्य शतकानुशतके नावाजलेले आहे. Astronomy तर अगदी सामान्य ग्रीक माणसाच्याही जगण्याचा एक भाग आहे. तर Astronomy, आयुष्य आणि मसाले अशा वेगळ्याच त्रिकोणावर बेतलेला हा चित्रपट मानवी आयुष्यावर आणि त्यातील खऱ्या अर्थाने महत्वाच्या गोष्टींवर अतिशय नेमकेपणाने भाष्य करतो.

या कथेचा नायक Fanis. एक Astronomy आणि Astrophysics चा अतिशय हुशार professor.  त्याचे आजोबा त्याला बऱ्याच  वर्षांनी भेटणार म्हणून प्रचंड खुशीत असलेला. आजोबाना आश्चर्याचा धक्का देण्यासाठी म्हणून त्याने आजोबांच्या जुन्या मित्रानाही घरी बोलावले आहे. पण काहीतरी बिनसते आणि आजोबा येणार नाहीत असे त्याला उमगते. त्याचे मन भूतकाळात जाते.

यानंतर खऱ्या अर्थाने चित्रपट सुरु होतो. लहानगा Fanis आणि त्याचे हुशार आजोबा या दोघांमधील अतिशय तलम नाते हळूहळू आपल्यासमोर उलगडत जाते. तीच गोष्ट Fanis व त्याची लहानपणीची मैत्रीण Saime यांच्यातील अनुबंधांची. स्वयंपाक करण्याची अतिशय आवड असलेला एक गोड मुलगा… आयुष्य त्याला किती वळणावळणाने उमगत जाते याची ही  अतिशय सुंदर गोष्ट आहे. या मूळ  कथेला जोड आहे ती ग्रीस आणि तुर्कस्थान यांच्यामधील संघर्षाची.

हा चित्रपट कथेप्रमाणेच त्याच्या cinematography साठीही अवश्य पाहण्यासारखा आहे. खास करून Fanis चे आजोबा त्याला ग्राहमालेचा आधार घेऊन मसाले व त्यांचे आयुष्यातील स्थान समजावत असतात तो प्रसंग तर पुन्हा पुन्हा पाहण्यासारखा..  त्यातील तत्वज्ञान समजावून घेण्यासाठी...

चित्रपट संपल्यावर वाटते की  खरच आपल्या सर्वांमध्येही Fanis लपला आहे. अतिशय सुंदर स्वयंपाक करून फक्त त्यात मीठ टाकायला विसरलेला...  आपणही शोधूया का आपल्या आयुष्यातील मीठ ?







Friday, December 7, 2012

World Cinema Special: The Lives of Others (German)


गेले काही दिवस आम्ही घरच्या घरीच European Film Festival भरवला आहे. फ्रेंच, जर्मन, इटालियन, ग्रीक अशा भाषांमधील चित्रपट पाहणे म्हणजे खरोखरच एक आनंदसोहळा असतो. एक विलक्षण अनुभव. कथा काहीही असो, पण ती पडदयावर कशी पेश करावी याची एकापेक्षा एक सरस अशी उदाहरणे डोळ्यासमोर येत राहतात. हे चित्रपट पाहिल्यावर अगदी Hollywood चित्रपटही पाहणे नको वाटते तिथे बऱ्याचश्या हिंदी मसाला चित्रपटांची तर गोष्टच सोडा. वाटेल तशी कथेला अनावश्यक आणि सुमार दर्जाची गाणी, धडधड अंगावर आदळणाऱ्या आणि एकमेकांशी काही संबंध नसलेल्या बेसुमार फ्रेम्स, शब्दांची अर्थहीन पखरण असलेले संवाद-विसंवाद .. या साऱ्या गोष्टीना फाटा देऊन जे काही कसदार, आणि दर्जेदार उरते त्या सगळ्याची गोळाबेरीज म्हणजे हे चित्रपट.
असे काही चित्रपट पाहिल्यावर मनात आले, की जो अमर्याद आनंद या चित्रपटांनी आम्हाला दिला आहे, तो तुमच्याशी का शेअर करू नये? म्हणून पुढचे काही भाग World Cinema वर. :) आपला अभिप्राय आवर्जून कळवा. त्यानिमित्ताने तुमचेही काही अनुभव शेअर झाले तर सोने पे सुहागा !
या मालिकेतील पहिला सिनेमा आहे - The Lives of Others हा जर्मन सिनेमा. २००७ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला त्या वर्षीचे "सर्वोत्कृष्ट परदेशी चित्रपटाचे " ऑस्कर मिळाले होते.
-----------------------------------------------------------------------------------------------------------
काळजी करू नका, तुमच्या कॉम्पुटरवर एकाएकी format problem झालेला नाही आहे. ती 'dotted line' मी मुद्दामच टाकली आहे. माझ्या मनाची अवस्था  वर्णन करण्यासाठी...
खरे सांगू का, माझी साधारण लेखनशैली अशी आहे, की एखादा विषय मिळाला की पुढचे एक दोन दिवस तो विषय मनात चघळला जात असतो, आणि त्यातूनच त्याचा एक कच्चा आराखडा बनत जातो. मग हळूहळू शब्द सहजपणे स्क्रीनवर उतरत जातात.. पण या वेळी परिस्थिती अगदी वेगळी झाली आहे..
या दिवाळीत आम्ही आमच्या पार्ल्याच्या घरी एकत्र जमलो होतो. त्या दोन दिवसांच्याच मुक्कामातही आम्ही उभयता फोर्ट मधील rhythm house ला जाऊन भरपूर परदेशी सिनेमांच्या DVDs बरोबर घेऊन आलो. :) त्यानंतर लगेच आलेल्या विकांताला -शनिवारी रात्री - हा चित्रपट बघायला बसलो. झोप अनावर झाल्यामुळे नाईलाजाने चित्रपट अर्ध्यावरच सोडला व सकाळी बघण्याचे ठरवले. पण रात्रभर बचैनी जाणवत होती. चित्रपट मनात रुंजी घालत होता. पुढे काय होणार आहे, याची सारखी उत्कंठा लागून राहिली होती. म्हणून सकाळी उठल्या उठल्या पटकन सर्व आवरून चित्रपट बघायला बसलो.....
शेवटचा डायलॉग- "no, it's for me."...... चित्रपट संपतो. आम्ही दोघेही freeze झालेलो... डोळ्यांच्या कडा ओलावलेल्या.. जीवाची घालमेल. काय वाटतेय नक्की समजतच नाहीये...
चित्रपट अनुभवून साधारण पंधरा दिवस उलटून गेलेले आणि हा लेख लिहायला घेतलेला - (म्हणजे dotted lines च्या आधीचा भाग हा साधारण आठवडाभरापूर्वी लिहिलेला आहे. ) काही सुचतच नाही. एरवीचे -शहाण्या मुलासारखे हाती लागणारे - शब्द कुठेतरी गायब झालेत. अजूनही असे वाटत आहे की माझे हे चित्रपट जगणे चालूच आहे. हा चित्रपट अजून उलगडतोच आहे... गेला आठवडाभर जवळपास रोज मी तो "शेवटचा सीन" बघतच आहे. आणि डोळ्यात पाणी आणतच आहे. वेड लागलेय कि काय आपल्याला?... इतके भारावून गेलो आहोत आपण ?
म्हणून ठरवले  -  काहीच बोलायचे नाही आता. सरळ  लिंक देऊन टाकायची तुम्हाला- तुम्हीच बघा तो चित्रपट आणि  अनुभवा स्वतःपुरतेच...काही जाणवले अंतर्यामी, तर  जरूर कळवा..

The Lives of Others

इतकेच सांगेन शेवटी, चित्रपट बघा मात्र नक्की...Otherwise, you will miss something real good...!! आणि हो, या चित्रपटातील central character निभावणारे Ulrich Muhe आता आपल्यात नाहीत......!!!!












गोंधळलेले बटाटे 😀

 साधारण ९ वर्षांनी फिरकले आहे स्वतःच्या ब्लॉग वर. म्हणजे बाकी प्रोफेशनल प्लॅटफॉर्म्स वर लिखाण चालू होते पण मातृभाषेतल्या लिखाणाची मजा वेगळीच...