Tuesday, February 16, 2016

मनातले कोकण...

नमस्कार,

सध्या नुसती धावपळ सुरु आहे. एका वेळी ४ प्रोजेक्ट्स वर काम करताना चांगलीच तारांबळ उडत आहे. मन दमून जातंय आणि लहान मुलासारखा ब्रेक मागतंय. पण कुठेही जाता येणार नाहीये इतक्यात. मग काय करायचे? सोप्पं आहे - मोबाईल वरील जुन्या सहलींचे फोटो बघायचे. आणि त्यातही ते कोकणातील फोटो असतील तर काय विचारूच नका - अगदी ब्रह्मानंदी टाळी लागते.

माझे माहेर कोकणातील आहे म्हणूनही असेल कदाचित, पण किनारपट्टीवरील कोणत्याही ठिकाणी "I just feel home". एक "सुकून" मिळतो जीवाला. तो बेफाट निसर्ग, ते virgin समुद्रकिनारे, ती सुरेख देवळे, वाडीत लपलेली टुमदार घरे, त्या घरांच्या ओटी-पडवीत  घुटमळणाऱ्या गोजिरवाण्या मांजरी आणि आपल्या अंगभूत गोडव्याने सर्वांना आपलंसं करणारी कोकणी माणसे. छे… नुसत्या आठवणीनेही जीव कासावीस होतोय…
हे फोटो माझ्यासारख्याच कोंकणवेड्यांसाठी…
















 

Tuesday, February 9, 2016

The Happiness Project अर्थात आनंदाची पूर्वतयारी

नमस्कार,

गेल्या काही दिवसांपासून Gretchen Rubin या लेखिकेचे The Happiness Project  हे पुस्तक वाचत आहे. १२ महिने, १२ उद्दिष्टये, आणि त्यांची अंमलबजावणी असे काहीसे स्वरूप आहे या पुस्तकाचे.

एक ३६ वर्षाची स्त्री. प्रेमळ नवरा, दोन गुणी मुली, मनासारखे काम, सुंदर घर… सगळे कसे चौकटीतल्या चित्रासारखे. आणि एक दिवस तिला अचानक जाणवते - आपण असायला  हवे तितके आनंदी  होत नाही आजकाल. म्हणजे ही स्त्री खंतावलेली, निराश, उदास नाहीये बरं का, पण तिला अतिशय consciously, समजून उमजून आनंदी व्हायचे आहे. हातून निसटलेल्या गेलेल्या असंख्य आनंदी क्षणांबद्दल नंतर कधीतरी हळहळ व्यक्त करण्यापेक्षा सभोवताली असलेल्या सुखाची आताच प्रशंसा करायची आहे, ते साजरं करायचं आहे आणि त्याहूनही पुढे जाऊन येणारे क्षणही आनंदी कसे करता येतील, त्यादृष्टीने आपली मानसिकता कशी असावी लागेल या सगळ्याचाच साधकबाधक विचार करायचा आहे.  या आत्मपरिवर्तनाच्या दिशेने चालू झालेल्या तिच्या प्रवासाचे वर्णन म्हणजे हे पुस्तक.

खरंच आपण सगळेच किती धडपड करत असतो नं आनंदासाठी. आजूबाजूला पाहावे तर कस्तुरीमृगांची वर्दळ दिसते. सगळेच आनंदाच्या शोधात. कुणाला बारीक व्हायचे आहे तर कुणाला जाड. कुणाला थोडा अजून पैसा कमवायचाय, तर कोणाला हाती असलेला पैसा कसा वापरायचा हा प्रश्न. कोणाकडे वेळ नाही म्हणून खंत तर आणखी कोणीतरी हाती असलेल्या वेळाचे काय करायचे या चिंतेत. प्रत्येकालाच दुसऱ्या कुणासारखे तरी होऊन सुख मिळवायचे आहे. नं सरणारी तगमग… काहींच्या बाबतीत अगदी आयुष्य संपेपर्यंत !! आणि मग स्वतःशीच खंतावलेला संवाद -  " I would have been somebody".

खरंतर आपण या क्षणीही "somebody" आहोतच की. प्रश्न आहे तो हे स्वीकारण्याचा.  मला वाटते आनंदाचे diet plan सारखेच आहे. म्हणजे सगळ्यांच्या लेखी आनंदाची व्याख्या, आणि आनंदी व्हायची तत्वे साधारण सारखीच. खरी अडचण येते ती मनातल्या कल्पना प्रत्यक्षात आचरणात आणताना.

"how to be happy" असा Google सर्च केला तर साधारण ६३ कोटी लिंक्स दिसतात. किती मजेची गोष्ट आहे नं, खरंतर हवा, पाणी अन्न वस्त्र आणि निवारा यासारखाच आनंदी असणे हा ही आपला जन्मसिद्ध हक्क आहे. आणि तरीही तो मिळवणे हे कितीतरी लोकांसाठी सर्वात कठीण काम असते. असे तर नसेल नं कदाचित की माहितीच्या महापुरात आपला स्वतःशीच संवाद थांबलाय? सतत दुसऱ्या कुणासारखे तरी होण्याच्या प्रयत्नांमध्ये आपला मूळ आत्माच हरवलाय?

तुम्ही लहान मूल पाहिलेय का लक्ष देऊन? स्वतःमध्ये रममाण झालेले. अपेक्षा आणि अपेक्षाभंगाचे ओझे या सर्वांपासून मुक्त… मोठे होत जाताना आपल्यामधील सहज, उपजत आनंद हळूहळू कसा कमी होत जातो नं.

हे पुस्तक एक निमित्त आहे माझ्यासाठी - आतमधील लहान मूल जोपासण्याचे. Leo Tolstoy म्हणतो त्याप्रमाणे " If you want to be happy, BE. " इतक्या सहजपणे आनंदी राहण्याचे… प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे नं सहजतेसाठी !!!


                                      




 

Tuesday, January 26, 2016

भारत माझा देश आहे…

नमस्कार,

सगळ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप शुभेच्छा.

गेल्या शुक्रवारी "एअरलिफ्ट" बघायला गेलो होतो. सुन्दर… निव्वळ अप्रतिम…

मध्येच येणारी गाणी, इराकी जनरलचे थोडे खटकणारे हिन्दी आणि कदाचित आणखीनही काही दोष, या सर्वांना नजरेआड करूनही प्रत्येक भारतीयाने आवर्जून पाहावा असा हा चित्रपट. कारण कुवेतच्या एम्बसी मध्ये भारताचा झेंडा फडकला जाताना डोळ्यात येणारे अश्रू त्या नायकाचे किंवा त्याच्याबरोबर इराकमध्ये अडकलेल्या दीड लाख लोकांचेच राहत नाहीत तर "आंखो से अश्क़ बनके जजबात बह राहा है " या ओळीप्रमाणे प्रत्येक भारतीयाचे होतात. तरुणाईने ओसंडून वाहणाऱ्या सिनेमागृहातूनही टाळ्यांचा कडकडाट ऐकू येतो. "वन्दे मातरम" चा जयघोष होतो तेंव्हा देशभक्ती, देशप्रेम या मनाच्या कोपऱ्यात वसलेल्या पण एरव्ही निव्वळ पुस्तकी वाटणाऱ्या शब्दांना हिऱ्यांचे तेज चढते.

१९९० चा सुमार. आपली मातृभूमी सोडून पोटापाण्याच्या उद्योगासाठी कुवेत मध्ये गेलेले १७०००० भारतीय. त्यांच्या नाना तऱ्हा. "आपण कुवेती नागरिकच आहोत " या नकळतपणे उराशी बाळगलेल्या समजुतीला जोरदार ठेच लागते जेंव्हा सद्दाम हुसैन कुवेतवर लष्करी हल्ले चढवतो. सर्वप्रथम डोके वर काढतो तो स्वार्थ - मी आणि माझे कुटुंब यांची सुरक्षितता. या स्वार्थाचे रुपांतर हळूहळू एका उदात्त हेतूमध्ये कसे होते आणि मग त्याची अंमलबजावणी करण्यासाठी काय प्रयत्न केले जातात याची सत्यकथा म्हणजे हा चित्रपट.

१७०००० नागरिक आणि सलग ५९ दिवस war-zone मध्ये ४८८ civil airplanes उडवून या नागरिकांची केलेली सुटका - जगातील सर्वात मोठे rescue operation !! त्यातील "रणजीत सन्याल ही व्यक्तीरेखा खरोखर अस्तित्वात आहे का ? या सर्व प्रकरणात शासकीय यंत्रणा कशी राबली?, भारत-कुवेत संबंध कसे होते? इतके लोक कॅम्पमध्ये एकत्र होते का?" हे सर्व प्रश्न निश्चित महत्वाचे आहेत पण त्याही पलीकडे जाऊन सर्वात महत्वाचे ठरते ते भारतीयत्व … आपली मायभूमी आपल्याला पंखाखाली घेईल हा यथार्थ विश्वास ! केवळ देशबांधवांच्या सुटकेसाठी प्राण पणाला लावून वैमानिकांनी केलेले धाडस !! आणि ही शौर्यकथा पडद्यावर पाहताना आपल्या भारतीय असल्याचा वाटलेला अभिमान !!!

असाच ऊर भरून आला आजचे प्रजासत्ताक दिनाचे संचलन टीव्हीवर बघताना. काय वैविध्यपूर्ण आहे हो आपला देश ! एकीकडे हिमालयाची अजस्त्र भिंत तर दुसरीकडे महासागरांचा त्रिवेणी संगम. एकीकडे वाळूचे डोंगर तर दुसरीकडे डोळ्यांचे पारणे फिटवणारी हिरवाई.  किती जातीधर्माचे लोक आणि त्यांच्या अनेकविध चालीरीती. आपली शिल्पकला, हस्तकला, नृत्यसाधना, योगासने, चाणक्यनीती, या  सगळ्याची जगाला वर्षानुवर्षे पडलेली भुरळ. आपले शिष्टाचार, सहिष्णूता, आणि विविधतेमध्ये एकता… किती अनमोल खजिना आहे आपल्याकडे !! असे असतानाही जेंव्हा कोणी "मला देशाने काय दिले? " यासारखे प्रश्न उपस्थित करतात तेंव्हा मनात साहजिकच प्रश्न उमटतो की "आपण देशासाठी काय देत आहोत? " म्हणजे globalization, appreciating other cultures, food trends, quality वगैरे या कशालाही माझा विरोध नाहीये अर्थातच, पण अशी मुक्तपणे विचार करण्याची संधीही एक भारतीय असल्यामुळे मला सहज मिळतेय हे मात्र निश्चित विसरता येणार नाही. आणि शेवटी देश म्हणजे काय हो, त्या देशातील जनताच नं? मग आपण कोणता खारीचा वाटा उचलत आहोत आपल्या देशाच्या प्रगतीमध्ये? आपण पाळतोय का वाहतुकीचे नियम? आपण नकार देतोय का लाच दयायला किंवा घ्यायला? आपण भरतोय का कर नियमितपणे? आपला आहे का सक्रिय सहभाग निवडणूक प्रक्रियेत? आपण परिसराची स्वच्छता राखण्यात लावतोय का हातभार? आपण जगवतोय का एकतरी झाड? अशा कितीतरी गोष्टी… प्रामाणिक इच्छा मात्र हवी.

चला तर, या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने मी संकल्प केलाय एक इवलुसा - आपले विस्मृतीत गेलेले खाद्यपदार्थ शोधून काढून ते माझ्या स्वयंपाकघरात रांधण्याचा… तुम्ही कोणता संकल्प करणार आहात?

वन्दे मातरम… !!

 
 
 
      
 




 

Tuesday, January 19, 2016

रंगूनी रंगात साऱ्या…. Fabian Oefner



नमस्कार,

माझ्या चिमुटभर वाचकांना नवीन वर्षाच्या खूप शुभेच्छा...

मागच्या पोस्ट नंतर कितीतरी वेळ गेला मध्ये. मनात विचार तर येतच होते पण ते ब्लॉगवर काही उतरत नव्हते. वेळाची वाळू हातातून कधी निसटली कळलंच नाही. आज लिहीन, उद्या नक्की लिहीन… शेवटी आज मुहूर्त लागला एकदाचा :)

तर, आजचा लेख एका रंगवेड्याला समर्पित. मध्यंतरी फेरारीची एक अप्रतिम advertisement YouTube वर पाहण्यात आली होती. त्यामधील photographer चे तंत्र, त्याने वापरलेली उत्कट रंगांची आरास, सगळे एकदम खिळवून ठेवणारे होते. त्या अवलियाचे नाव Fabian Oefner. मग थोडे खोलात शिरून शोध घेतला असता  त्याच्या Liquid Jewels, Orchid, आणि Black Hole या थीम्स वर आधारित फोटो सिरीजची माहिती मिळाली, आम्ही तर अगदी भारावून गेलो. किती ती उत्सुकता, मेहनत, अभ्यास आणि त्या सगळ्यांच्या परीपाकातून साधलेले precision.. निव्वळ अप्रतिम. खाली दिलेल्या लिंक्स नक्की बघा. तुम्हीही खात्रीने प्रेमात पडाल. :)

१) Photographing Natural Forces: https://www.youtube.com/watch?v=FAs6ILaXSPM

२) Ferrari: https://www.youtube.com/watch?v=2Cp-fpEYzB0

३) Psychedelic Science : https://www.youtube.com/watch?v=Mh3_wYHdeVs

     


  



 

Thursday, May 7, 2015

The Holiday (2006) : Dreams that come true....

नमस्कार,

सध्या वातावरणात मे महिन्याचा उत्साह ओसंडून वाहत आहे. मुलांना सुट्टया सुरु झाल्यामुळे घरोघरी कुठेतरी बाहेर फिरायला जायचे बेत ठरत आहेत. कोणी स्वित्झर्लंडला जाईल तर कोणी सिमल्याला.  कोणी जवळचाच कोकणातील एखादा निसर्गरम्य समुद्रकिनारा पालथा घालेल तर एखादयाला ताडोबाचे घनदाट जंगल साद घालेल. पसंती काहीही असो, प्रवास हा घडावाच अधूनमधून. इतके काही अनुभव जमा होतात नं आपल्या पोतडीत. आणि काही वेळा तर अख्खे आयुष्य बदलवण्याची ताकद असते प्रवासात. त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे २००६ साली प्रदर्शित झालेला " The Holiday" हा हॉलीवूडपट. कुठेही नं जाता इंग्लंड मधील कंट्रीसाईड आणि लॉसअन्जेलीस यांची अतिशय नयनरम्य सहल घडवणारा.

अटलांटिक महासागराच्या दोन टोकाला राहणाऱ्या दोन तरुणी - एक प्रेमच न करता आलेली आणि दुसरी एकतर्फी प्रेमात अडकलेली. दोघीही निराश, हताश, आणि आयुष्याचा आतिशय कंटाळा आलेल्या. क्रिसमसमध्ये "काय करायचे या एकटेपणाचे" असा प्रश्न पडलेल्या. योगायोगाने त्यांची इन्टरनेट वर भेट होते आणि त्या "home exchange program for 2 weeks" मध्ये एकमेकींच्या घरी राहायचे ठरवतात. आणि मग त्यांचे आयुष्य कसे सुंदर वळणे घेत जाते याचा मागोवा म्हणजे हा चित्रपट.

स्टोरी इतकीच. पण मला कधीही प्रवासाचा मूड आला आणि लगेच कुठेही निघता येणे शक्य नसले की मग मी काही प्रवासावर आधारित चित्रपट बघते (दुधाची तहान पाण्यावर, actually . ) त्या यादीतला हा खूप वरच्या क्रमांकावरचा चित्रपट आहे. नक्की बघा आणि सांगा कसा वाटला ते.  You can easily watch it online. :)

 

Wednesday, May 6, 2015

अमिताभ बच्चन : एक अजब रसायन


नमस्कार,

तुम्ही आज times of India च्या Pune Times पुरवणीतली श्री. बच्चन यांची मुलाखत वाचलीत का? नक्की वाचा. अतिशय Polite, articulated, आणि तरीही precise and extremely straightforward.  निमित्त आहे त्यांच्या आगामी "पिकू" या चित्रपटाच्या प्रदर्शनाचे.

वयाची सत्तरी जाहीरपणे उलटून गेल्यावरही अजूनही प्रसिद्धीच्या शिखरावर विराजमान असलेले हे एक अजब व्यक्तिमत्व आहे -  आयुष्यातील असंख्य चढउतारांना अतिशय gracefully सामोरे जाऊन त्या सगळ्या अनुभवांना पुरून उरलेले. मला स्वतःला त्यांची "angry young man" ही इमेज फारशी भावली नाही कधी (अपवाद फक्त जंजीर या चित्रपटाचा). पण मंजिल किंवा मिली सारख्या चित्रपटातील अतिशय भावूक असा नायक मात्र जवळचा वाटायचा. स्वच्छ, आणि खर्जातले, गांभीर्य जपणारे संवाद आणि जोडीला काळजाचा ठाव घेणारी नजर… खूप आवडून जायचे ते.

आता जेंव्हा या सगळ्याचा जास्ती rationally विचार करते तेंव्हा श्री. बच्चन यांच्या personality मधील इतर अनेक पैलू लक्षात येतात. माझ्या मते सर्वात महत्वाचा गुण म्हणजे the ability to move on... "रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा" या उक्तीप्रमाणे असंख्य अनुभव घेऊनही ते त्या सर्वांपासून वेळीच अलिप्त झाले. शेवटी माणसाचे true character हे ती व्यक्ती "from within" काय आहे त्यावरच ठरत असते हे त्यांच्या "स्वतःला कॅरी करण्याच्या "पद्धतीतून सतत जाणवत राहिले. पडद्यावरची characters आणि प्रत्यक्षातील ते यामध्ये त्यांनी जाणीवपूर्वक अंतर ठेवले. चित्रपटातील भूमिकांचा विचार अतिशय "professionally" केला. कदाचित म्हणूनच त्यांच्याविषयीचा लोकांचा आदर दिवसेंदिवस वाढतच गेला असणार. जोडीला अतिशय मेहनत करण्याची तयारी आणि सतत नवीन काहीतरी शिकत राहायची वृत्ती… सगळेच थक्क व्हायला लावणारे.

त्यांच्या नवीन चित्रपटाला अनेक शुभेच्छा … !! आणि हो, ती मुलाखत मात्र जरूर वाचा. :)





 

Tuesday, May 5, 2015

Family: एक natural सपोर्ट सिस्टीम

नमस्कार,

खूपच trivial शीर्षक आहे ना लेखाचे? बरोबर, पण गम्मत अशी आहे की  ही so called trivial सिस्टीम आपण कालांतराने गृहीत धरत जातो आणि कधीतरी अचानक त्यांची खरी किंमत जाणवून जाते आणि मग नकळत मनात येते - Thank Nature, I have a Family.. a great family...

काल ऑफिसतर्फे  "7 Habits of Highly Effective People" या अतिशय नावाजलेल्या पुस्तकावरील workshop ला गेले होते.  श्री Stephen Covey यांच्या या बेस्ट सेलर पुस्तकाने जगातील लाखो लोकांना जगण्याची योग्य दिशा दाखवली आहे. कालचे ट्रेनिंग हे निसंशय मी attend केलेल्या trainings मधील सर्वात बेस्ट होते. The training facilitator had a correct balance of personal and professional elements. नऊ म्हणजे नऊ वाजता workshop सुरु झाला. Concepts चे अतिशय सुंदर सहज स्पष्टीकरण आणि जोडीला श्री. Covey यांचे अनेक उत्तमोत्तम videos यात वेळ कसा गेला ते कळलेच नाही. In fact, वेळ अतिशय सत्कारणी लागतोय असे जाणवत होते.

ज्यांनी पुस्तक वाचले नाहीये त्यांचा शीर्षकावरून कदाचित असा गैरसमज होण्याची शक्यता आहे की हे पुस्तक फक्त professional efficiency साठी आहे. पण तसे नाहीये हं. श्री. Covey आपल्या अंतर्मनात दडलेल्या अनेक सुप्त प्रक्रिया अगदी मुळापासून ढवळून काढतात. तसे पहिले तर non-trivial, किंवा counter-intuitive असे काहीच नाही, पण तरीही ती सगळी प्रक्रिया कुठेतरी आपल्याला थेट भिडते.

या workshop मध्ये अनेक गमतीशीर आणि थोडया सिरिअस अशा अनेक activities करायच्या होत्या. त्यात एक activity अशी होती - समजा, तुम्ही तुमचा ८० वा वाढदिवस साजरा करताय. त्या पार्टीला कोणती ७ माणसे प्रामुख्याने तुमच्याबरोबर असावी असे तुम्हाला वाटेल? आणि ती माणसे त्यावेळी (किंवा आताही, for that matter) जिवंत असतीलच असे नाही -

नवल वाटेल ऐकून, पण विनाअपवाद प्रत्येकाच्याच लिस्टमध्ये फक्त आणि फक्त कुटुंबातील सदस्यच होते - आताचे मित्रमैत्रिणी किंवा ऑफिस मधील बॉस नाही. म्हणजे इतका लांबचा विचार करायची वेळ आली तेंव्हा nothing else mattered, but just the close family..

मग ज्या व्यक्ती इतकी वर्ष आपल्यासाठी महत्वाच्या आहेत त्यांना वेळोवेळी गृहीत का धरत जातो आपण? What is our way of telling them - "I care.. !! " सगळे धडपड कुटुंबासाठीच करताना एक गोष्ट मात्र सोयीस्करपणे मागे टाकत जातो आपण - आपला वेळ… इतकी काय घाई आहे? बोलू सावकाश बायकोबरोबर. काय कटकट करतायत बरं मुलं? जाऊ की ट्रिपला पुढच्या वेळी (?). आताचे माझे काम तर हातावेगळे होऊ देत. आई-बाबांची तक्रार काय नेहेमीचीच आहे. आता मी इतका/इतकी बिझी आहे, करेन की उदया फोन. काय बिघडणार आहे एका दिवसाने. घेतील की समजून ते …

Leo Babauta चे एक सुंदर वाक्य वाचले काल - Today is not the preparation for tomorrow. Today's is the main event....

थोडा वेळ थबकून सगळ्याचाच अर्थ लावायला काय हरकत आहे… नाही का?





 

गोंधळलेले बटाटे 😀

 साधारण ९ वर्षांनी फिरकले आहे स्वतःच्या ब्लॉग वर. म्हणजे बाकी प्रोफेशनल प्लॅटफॉर्म्स वर लिखाण चालू होते पण मातृभाषेतल्या लिखाणाची मजा वेगळीच...